Friday, February 18, 2011

पंडित भीमसेन जोशीं


‘बसंत बहार’ आणि ‘अनकही’
शास्त्रीय संगीतातले गायक आणि फिल्मी दुनियेतले पाश्र्वगायक यांच्यात जेव्हा चित्रपटासाठी जुगलबंदी होते तेव्हा बाजी मारणारे मोहम्मद रफी आणि मन्ना डे असतात आणि मात खाणारे अमीरखॉं किंवा भीमसेन जोशी असतात, असं गमतीनं म्हटलं जातं. कारण काय असेल ते असो, पण पडद्यावरच्या नायकाला (वा नायिकेला) ज्याचा आवाज असतो तोच गायक (वा गायिका) जिंकणार हा जणू अलिखित नियम असावा. म्हणून तर ‘केतकी गुलाब जूही’ (बसंत बहार) या गाण्यात पंडित भीमसेन जोशींना मन्ना डेसमोर हार पत्करावी लागते, ‘बाट चलत नयी चुनरी रंग डारी’ (रानी रूपमती) या भैरवीमध्ये कृष्णराव चोणकरांना मोहम्मद रफीसमोर पराभूत व्हावं लागतं आणि ‘तिनक तिन तानी .. दो दिन कीजिंदगानी’ (सरगम) या लता मंगेशकरांसोबतच्या गाण्यात सरस्वती राणे यांना ‘विनोदी गायिके’ची भूमिका स्वीकारावी लागते. असो. शास्त्रीय संगीत आणि चित्रपट संगीत यांच्यात अढी निर्माण व्हायला हे असले प्रकार कारणीभूत ठरले असावेत. ‘बैजू बावरा’मधल्या जुगलबंदीसाठी एके काळी नौशाद यांना नकार देणाऱ्या बडे गुलामअली खॉँ यांनी पुढे ‘मुगल-ए-आझम’साठीही किती आढेवेढे घेतले आणि मग पाश्र्वगायनाला तयार होताना आपली किंमत कशी वसूल करून घेतली, त्याचे किस्से सर्वश्रुत आहेत. चित्रपटांतल्या गाण्याविषयी कोणताही आकस न ठेवता वा स्वत:चा बडेजाव न मिरवता पूर्णपणे समर्पित होऊन गायन करणारे दोन गायक जुन्या पिढीत होऊन गेले. पहिले उस्ताद अमीर खॉँ आणि दुसरे पंडित भीमसेन जोशी.
‘बसंत बहार’ (१९५६) हा चित्रपट शंकर जयकिशन या जोडीला मिळाला तेव्हा त्यांच्यासमोर नौशाद यांच्या ‘बैजू बावरा’चं आव्हान होतं. ‘बैजू बावरा’ मध्ये तानसेन आणि बैजनाथ यांच्यातल्या ‘आज गावत मन मेरो’ या जुगलबंदीसाठी उस्ताद अमीर खॉँ आणि डी. व्ही. पलुस्कर यांनी पाश्र्वगायन केलं होतं. ‘बसंत बहार’साठी तशीच एक जुगलबंदी करण्याची वेळ आली तेव्हा शंकर जयकिशन यांनी शास्त्रीय संगीतात नव्यानंच तळपू लागलेल्या भीमसेन जोशींना पाचारण केलं आणि त्यांचा मुकाबला ठेवला तो मन्ना डे यांच्याशी. भीमसेन जोशी यांनीच ऐकवलेल्या एका जुन्या बंदिशीवरून शंकर यांनी या गाण्याची चाल बनवली. त्यावर शैलेंद्र यांनी लिहिलेले शब्द होते-
केतकी गुलाब जूही चंपक बन फूले
ॠतु बसंत अपनो कंत गोरी गरवा लगाए
झूलना में बैठ आज पी के संग झूले..
भीमसेन यांच्यापेक्षा दोन वर्षांनी ज्येष्ठ असूनही हे गाणं गायच्या नुसत्या कल्पनेनंच मन्ना डे यांची कशी घाबरगुंडी उडाली आणि भीमसेनना ‘हरवायचं’ आव्हान मन्ना डे यांनी कसं पेललं ते सर्वश्रुत असल्यानं पुनरावृत्ती नको. मात्र, आवर्जून सांगायला हवं ते भीमसेन जोशी यांच्या दिलदार वृत्तीबद्दल. आपला आवाज नायकावर नव्हे तर एक खलपात्रावर चित्रित होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला हरावं लागणार आहे, ही बाब भीमसेन यांनी कोणत्याही तक्रारीविना मान्य केली. एवढंच नव्हे, तर रेकॉर्डिग झाल्यावर मन्ना डे यांना ‘तुमची तयारी चांगली आहे, तुम्ही शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात का येत नाही,’ अशा शब्दांत दादही दिली.
‘बसंत बहार’ नंतर भीमसेनजींचा स्वर हिंदी चित्रपटांत पुन्हा एकदा जोरकसपणे उमटला तो अमोल पालेकर दिग्दर्शित ‘अनकही’ (१९८४) मध्ये. यातली दोन भजनं गाण्यासाठी भीमसेन यांना कसं बोलावण्यात आलं, याविषयी पालेकर यांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. या चित्रपटाची नायिका मानसिकदृष्टय़ा रोगी असते आणि तिचे वडील शास्त्रीय संगीतातले फार मोठे गायक असतात. अनिल चटर्जी साकारत असलेल्या या भूमिकेसाठी दोन भजनं करावीत असं अमोल पालेकर आणि संगीतकार जयदेव यांच्यात ठरलं. ही भजनं कोणा गायकाकडून गाऊन घ्यावीत यावर खल सुरू असताना जयदेव म्हणाले, ‘‘या व्यक्तिरेखेचा विचार करता या गाण्यांना भीमसेन जोशी यांच्यासारखाच गायक हवा.’’
भीमसेन जोशी यांच्यासारखा गायक हवा तर मग भीमसेनच का नकोत? झालं, पालेकरांनी जयदेवजींची अनुमती घेऊन थेट पंडितजींना फोन लावला. ‘पंडितजी, एका कामासाठी भेटायला यायचंय. कधी येऊ?’ सुदैवानं पंडितजींचा अमोल पालेकरांवर विलक्षण लोभ होता. ‘‘तुम्हाला भेटायला परवानगी कशाला हवी? असं करू, उद्या मी दौऱ्यावर जाणार आहे. मुंबईला विमानतळावरच थोडा वेळ भेटू या,’’ पंडितजी म्हणाले.
दुसऱ्या दिवशी विमानतळावरच्या पार्किंगमध्ये पालेकरांच्या मोटारीत या दोघांची भेट झाली. ‘एक सिनेमा करतोय ‘अनकही’ नावाचा. तुम्ही त्यासाठी दोन भजन गावीत एवढीच विनंती आहे..’ पालेकरांनी विषयाला हात घातला. कथा, व्यक्तिरेखा ऐकून घेतल्यानंतर पंडितजींनी विचारलं, ‘म्युझिक कोण देतंय?’ पालेकरांनी ‘जयदेव’ असं सांगताच कानाच्या पाळीला हात लावत पंडितजी उद्गारले, ‘फार मोठा संगीतकार आहे. मी जरूर गाईन. फक्त माझी एक अट आहे. जयदेवजींनी मला गाणं नीट शिकवायला हवं. माझी नीट तालीम त्यांनी करून घ्यावी.’
पालेकरांनी या भेटीचा वृत्तान्त सांगितला तेव्हा जयदेवजींच्या डोळ्यांत पाणीच तरारलं. तेही तयारीला लागले. ‘रघुवर तुमको मेरी लाज’ आणि ‘ठुमक ठुमक पग’ ही दोन भजनं भीमसेन यांच्यासाठी त्यांनी बनवली. गाण्यांची तालीम पालेकर यांच्याच घरी झाली. ‘मी तुमचा नवखा शिष्य आहे, असं समजून मला शिकवा. गाण्यातली प्रत्येक जागा न जागा मला समजावून सांगा,’ असं पंडितजींनी जयदेवजींना निक्षून सांगितलं. जवळजवळ दोन तास तालीम चालली.
प्रत्यक्ष रेकॉर्डिगच्या दिवशी भीमसेनजी ठरल्या वेळी स्टुडिओमध्ये आले. ‘अनकही’साठीच आशा भोसले यांच्या आवाजातल्या एका गाण्याचं रेकॉर्डिग नुकतंच संपलं होतं. त्या दोघांची समोरासमोर भेट झाली तेव्हा आशाताईंनी पंडितजींना वाकून नमस्कार केला. त्यानंतर सुरू झाली भीमसेन यांच्या रेकॉर्डिगची तयारी. ‘मी उभा राहून गाऊ शकत नाही, बसूनच गाईन’ असं त्यांनी सांगितल्यानं स्टुडिओमध्ये त्यांच्यासाठी तशी बैठक तयार करण्यात आली. वादक मंडळींमध्ये शिवकुमार शर्मा (संतूर), हरिप्रसाद चौरसिया (बासरी), झरीन दारूवाला (सरोद) अशा नामवंतांचा समावेश होता. वादक आणि गायक या सर्वाचं एकत्रिपणे रेकॉर्डिग करण्याचा तो काळ होता. पंडितजींनी दोन्ही भजनं तन्मयतेनं गायली. रेकॉर्डिग संपल्यानंतर भीमसेनजी म्हणाले,‘‘तुमच्या मनासारखं झालं ना गाणं? नाही तर पुन्हा एकदा करू.’’ जयदेवजी आणि पालेकर यावर काय बोलणार? दोघेही भारावून जाण्यापलीकडच्या अवस्थेत होते.
‘अनकही’ला त्या वर्षीचे दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. एक जयदेव यांना, तर दुसरा अर्थातच भीमसेनजींना. अभिनंदनाचा स्वीकार करताना पंडितजी पालेकर यांना म्हणाले,‘‘खूप छान वाटलं या गाण्यामुळे. एक वेगळं पारितोषक तुम्ही मला मिळवून दिलंत.’’
===============================================================
सदर लेख बुधवार, रविवार ३० जानेवारी २०११ च्या लोकसत्ताच्या 'लोकरंग' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.

No comments: