Monday, August 1, 2011

उस्ताद रहीम फहिमुद्दीन डागर


अस्सल भारतीय संगीताचा ज्ञात प्रवाह म्हणजे ध्रुपद गायकी. इथल्या मातीचा गंध असणारी आणि इथल्या निसर्गात आणि संस्कृतीत विकास पावलेली ही गायकी गेली अनेक शतके आपले अस्तित्व टिकवून आहे, कारण त्यामध्ये नव्याने भर टाकणारे अनेक प्रतिभाशाली कलावंत दर काही काळाने निर्माण होत गेले. उस्ताद रहीम फहिमुद्दीन डागर हे अशाच अतिशय सर्जनशील कलावंतांपैकी एक होते. त्यांच्या निधनाने ध्रुपदाचा घुमारा मंदावला आहे. माणसाला संगीताचा शोध लागल्यानंतर त्याने त्यातील शैलीसातत्यासाठी ज्या अनेक कल्पना योजल्या त्यातील काही योजना छंद, प्रबंध, ध्रुव आणि मत्त या चार प्रकारांमध्ये निबद्ध केल्या. त्या कल्पनांचा विलास करता करता त्यातून चार शैली विकसित पावल्या. त्या शैलीतून बाहेर आल्या त्या ‘बानी’ (म्हणजे वाणी) खंडर बानी, नौहर बानी, गौहर बानी आणि डागर बानी. ही वाणी स्वरात भिजवत ठेवून मुरवत मुरवत तिला अत्युत्तम अशा रसपूर्ण करण्याकरिता गेल्या शेकडो वर्षांत ज्या अनेक अज्ञात कलावंतांनी योगदान दिले, त्यामध्ये डागर बानीचे महत्त्व फार मोठे आहे. ज्ञात इतिहास मियाँ तानसेनापर्यंत पोहोचतो. म्हणजेच मुसलमानांच्या भारतावरील आक्रमणापर्यंत. त्याहीपूर्वी ध्रुपद गायनशैली विकास पावत होती. या डागर घराण्याने गेल्या २८ पिढय़ा ही गायनशैली घरातील पुढच्या पिढीपर्यंत नेऊन ठेवली आहे. एका अर्थाने भारतीय संस्कृतीवर त्यांनी केलेले हे उपकार परत न फेडता येण्याएवढे मोठे आहेत. फहिमुद्दीन डागर यांनी ध्रुपद शैलीचा प्रसार करण्यासाठी आपले सारे आयुष्य खर्ची घातले. उत्तम आलापी आणि त्यातून होणारे अप्रतिम असे रागदर्शन असे त्यांचे गाणे होते. नव्या पिढीला या शैलीतील बारकावे समजावून सांगत त्यांना त्याची गोडी लावणे हा फहिमुद्दीन खाँसाहेबांचा आवडता विषय होता. ‘स्पीक मॅके’ या अभिजात संगीताच्या प्रसारासाठी सुरू झालेल्या चळवळीचे खाँसाहेब संस्थापकच होते. पद्मभूषण, मैहर फौंडेशन पुरस्कार, कालिदास सन्मान, उस्ताद हफीज अली खाँ पुरस्कार, नाद पुरस्कार हे त्यांच्या स्वरदर्शनाचे लौकिक पुरावे. परंतु खाँसाहेबांनी आयुष्यभर डागर बानी विकसित करण्याचे ध्येय ठेवले आणि ध्रुपद शैली संग्रहालयात जाऊन स्थिरावण्यापासून वाचवले. स्वत: संस्कृतचे उत्तम जाणकार असल्यामुळे या शैलीचा इतिहास आणि परंपरा यांचे त्यांना चांगले भान होते. संगीतात केवळ विद्वान असून चालत नाही. ही विद्वत्ता प्रत्यक्ष मैफलीत दिसणे फार अगत्याचे असते. अशा मोजक्या कलावंतांपैकी फहिमुद्दीन खाँ हे एक होते. स्वरांशी लडिवाळपणे खेळत त्यातील प्रत्येक बारीकसारीक तपशिलाची सौंदर्यपूर्ण उलगड करत ते ज्या रीतीने रागमांडणी करत, ती ऐकताना श्रोता हरखून जात असे. नवनिर्मितीच्या ध्यासातून ध्रुपदातून ख्यालाचा जन्म झाला. पण भारतातील डागर यांच्या घराण्याने ध्रुपद शैलीत राहूनच नवनिर्मितीचे आव्हान पेलले, हे अधिक महत्त्वाचे आहे. उस्ताद रहीम फहिमुद्दीन डागर यांच्या निधनाने हे आव्हान समर्थपणे पेलणारा एक थोर संगीतकार हरपला आहे.
===============================================================
सदर लेख बुधवार, सोमवार, १ ऑगस्ट २०११ च्या लोकसत्ताच्या 'व्यक्तिवेध' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.