पण काय शोधत आहे हे ही कळत नाही कधी कधी...थोर अश्या बुवा,गवयांच्या गाण्यानं / आयुष्याच्या कथांनी डोळ्यात पाणी येणारा मी...एकदा बसलो की गाण्याच्या रियाझांवरुन उठुच नये असं वाटणारा मी...मी इथं कशाला आलोय, काय करायचयं मला?? कधी कधी आयुष्य इतकं छोटं वाटतं तर कधी ते अथांग वाटतं ...ह्या सगळ्या प्रश्नांच उत्तर मी गाण्यात शोधायचा प्रयत्न करतो आहे...अखंड...
Wednesday, January 26, 2011
अण्णांच्या एका वाक्यामुळे संगीताकडे वळलो
कलावंत म्हणून स्वत:ला फक्त संगीताला समपिर्त करण्याची खासियत अण्णांच्या ठिकाणी आहे. कितीतरी पिढ्यांचे ते प्रेरणास्थान, आदर्श आहेत. गायनातल्या रचना कौशल्याने श्रोत्यांना तासन्तास गुंतवून ठेवणे कठीण असते. ही गोष्ट अण्णांनी गेले ५० वर्षांपेक्षाही जास्त काळ साध्य केली आहे. मी संगीतात करिअर करावे असे आई-बाबांनी ठरवले यात आण्णांचा सहभाग मोठा आहे. माझ्या ९व्या वर्षी त्यांनी माझे गाणे पहिल्यांदा ऐकले आणि 'हा ज्ञानेश्वरांच्या कुळातला आहे', असे म्हणाले. त्यांच्या एका वाक्यामुळे मी संगीताकडे वळलो.
- संजीव अभ्यंकर
Tuesday, January 25, 2011
भीमसेनी पराक्रम
पं. भीमसेन जोशी यांच्या गायनाला हार्मोनियमची साथ करायला मिळणे हा माझ्या जीवनातील भाग्ययोग होय. एका अत्यंत श्रेष्ठ कलाकाराच्या निकट सहवासात राहण्याचा, सहप्रवास करण्याचा आणि अगदी शेजारी बसून त्याचं स्वर्गीय गायन ऐकण्याचा अमृतोपम आनंद उपभोगण्यात माझी १९५६ पासूनची वीस वर्षे अगदी मंतरलेल्या मन:स्थितीत गेली. या संस्मरणीय सहवासात त्यांच्या उत्तुंग गायनकलेचं मनोहारी दर्शन तर मला घडलंच; परंतु त्याचबरोबर त्यांच्या अभूतपूर्व ‘स्टॅमिना’चा, श्रोत्यांवरील मनस्वी प्रेमाचा, दुर्मिळ निधडेपणाचा आणि साथीदारांवरील खऱ्याखुऱ्या, बरोबरीच्या स्नेहाचा निर्वाळाही मिळाला. किती रोमांचकारी घटना, किती समर प्रसंग, किती अटीतटीचे क्षण!! भीमसेनजी ज्या काळात उदयाला आले, तेव्हा अनेक कीíतमान गवई, गायिका जिकडे तिकडे आपल्या मैफली गाजवीत होते. त्या पाश्र्वभूमीवर भीमसेनजींनी आपली खास मुद्रा उमटवली आणि किराणा गायकीकडं श्रोत्यांचे कान आकर्षून घेतले. त्या समयाला त्यांचा तीन-तीन तास रियाझ चालत असे. दमसास असा की, आम्हा साथीदारांना दम लागावा! सुरेलपणा तर कमालीचा. त्यात बोबडेपणा नावाला नाही. त्यांच्याबरोबर जेथे जेथे गेलो, तिथं हेच अनुभवलं की, त्यांचा ‘पैमाना’ कधी खाली आलाच नाही. ते उंचच जात राहिले. एक आठवण सांगतो. १९६० चं वर्ष असेल. म्हैसूरच्या संगीत महोत्सवात मैफल ठरली होती. दुपारी ४ वाजताची वेळ दिलेली. म्हणजे निदान दोन दिवस अलीकडे रात्री निघायला पाहिजे होतं. त्या काळी म्हैसूरला बंगलोरवरूनच जावं लागे. मी त्यांच्याकडे सांगितल्या वेळी हजर झालो; परंतु काही अपरिहार्य कारणामुळे त्यांना म्हैसूरला जाणं जमणार नव्हतं. त्यांनी मला सांगितलं की, उद्या तार कर, की प्रोग्रॅम ‘रद्द’ समजावा. मी घरी जाऊन झोपलो. दुसरे दिवशी पाहतो, तर काय, सकाळी आठ वाजता दाढी-अंघोळ करून महाराज ‘आत्ता निघायचं’ हे सांगायला आलेले. सकाळी ११ वाजता निघालो. मोटारकार त्यांचीच. ड्रायिव्हग तेच करणार. मी गुलाम रसूलजी (तबला), तंबोरे, शिष्य असे निघालो. कल्पना करा, दुसऱ्या दिवशी दुपारी ४ ची मैफल आणि आम्ही सकाळी ११ ला निघालेले. पण पंडितजींना कसली पर्वा नाही. ते शांत. रात्री झोपणे नाही. शेजारच्या सीटवर मी. गप्पागोष्टी करीत व आम्हा सर्वाना जागं ठेवत यांचं ड्रायिव्हग चालू. दुसऱ्या दिवशी तीन वाजता पोहोचलो. तोपर्यंत त्यांचं खाणं असं फारसं झालेलं नव्हतं. तिथे पोहोचताच नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणं गार पाण्यानं अंघोळ करून आणि तंबाखूचा बार भरून स्वारी रंगमंचावर विराजमान झाली. विशेष हे की, इतक्या दूरच्या प्रवासानंतरही त्यांचं गायन अप्रतिम झालं. त्या दिवसाची ती मैफल श्रोत्यांच्या इतकी पसंतीला उतरली की, त्या महोत्सवात आलेल्या एकूण सहा कार्यक्रमांत हा ‘आइटेम’ सर्वोत्कृष्ट ठरला, अशी पावती संयोजकांनी दिली; परंतु..ही कथा इथेच संपत नाही. कारण दुसऱ्या दिवशी तुळजापूरला मैफल होती. म्हैसूर ते तुळजापूर अशी ‘राघो भरारी’ होती. जेवण नाही, मध्ये थांबणं नाही, अखंड ड्रायिव्हग! पण वेळेवर म्हटलं, तर कसं पोहोचू शकणार? तिकडे तुळजापूरला गानशौकीन रात्री ८ वाजल्यापासून वाट पाहत आहेत. आम्ही कसेबसे रात्री १०-१०।। पर्यंत पोहोचलो. एक तास आराम केला आणि रात्री १२ ला प्रोग्रॅम सुरू झाला. सांगायचं हे की, त्या गाण्यावर इतक्या पल्ल्याच्या प्रवासाचा काहीही परिणाम झालेला नव्हता.
चंबळच्या खोऱ्यातील समरप्रसंग:
पंचवीस-तीस वर्षांपूर्वी भीमसेनजींचं नाव उत्तर भारतातही कुठकुठपर्यंत पोहोचलं होतं, याची एक अद्भुत आणि रोमांचकारी आठवण आवर्जून सांगण्यासारखी आहे. चंबळच्या खोऱ्यातील घटना. आम्ही दिल्लीहून निघालो होतो, मुंबईकडे. ग्वाल्हेपर्यंत आलो. संध्याकाळ झाली. ‘हाय वे’ला लागेपर्यंत ९।।।-१० वाजायला आले होते. तेवढय़ात पेट्रोल संपणार असल्याचं पंडितजींच्या ध्यानात आलं. रस्त्यावर पेट्रोल पंप होता. आम्ही पेट्रोल घेतलं. तो पंपवाला चांगला होता. म्हणाला, ‘साहब, कहाँ जाना हैं आपको?’ ‘हम बंबई की तरफ जा रहे हैं।’ ‘मेरी सलाह मानिए। इस वक्त आगे न जाना। यह सब डाकुओं का इलाका हैं। और खतरनाक इब्राहिम डाकू का इलाका हैं यह। आप रात को कहीं आराम करिए और सबेरे चार-एक बजे निकल पडिये।’ आम्हाला नंतर कळलं की, या चंबळच्या खोऱ्यात वेगवेगळे भाग मोठमोठय़ा डाकूंनी वाटून घेतलेले असतात. पण ते काही असलं, तरी भीमसेनजी जिद्दी आणि त्यांना कमालीचा आत्मविश्वास. ते कुणाचं कशाला ऐकताहेत! झालं. आम्ही निघालोच. ५०-६० कि.मी. जातो न जातो, तोच रस्त्याच्या मधोमध दरोडेखोरांची एक िभतच आमचा रस्ता रोखून उभी होती. मी आणि गुलाम रसूल पुरते घाबरलो होतो. आम्ही तोंडावर रुमाल धरले. भीमसेनजी लुंगी, कुडत्यात शांत बसलेले. ‘गाडी रोको!’चा दणदणीत आवाज झाला. ‘डिकी खोलो..!’ डिकी उघडली, तर लावलेल्या ‘हुक्स’ना तंबोऱ्याची जोडी लावलेली. ‘यह क्या हैं?’ ‘तानपुरे हैं।’ ‘तो आप गाने बजानेवाले लोग हैं?’ ‘हाँ..’ ‘कोन हैं गानेवाले?’ आम्ही सांगितलं. ‘अच्छा, भीमसेनजी हैं।’ ‘हाँ, ये भीमसेनजी हैं, यहाँ बैठे हैं। और यह उन्हींकी गाडी हैं।’ ‘ठीक हैँ, फिर जाने दो.’ आणि आम्ही सहीसलामत पुढे निघालो. पंडितजी आम्हाला म्हणतात, ‘क्यों? अरे, डाकू हमको क्या कर सकता हैं?’ सांगायचं हे आहे की, चंबळखोऱ्यातल्या डाकूंनाही या श्रेष्ठ गायकाचं नाव त्या काळात माहीत झालेलं होतं. रेडिओ, ऐकीव कीर्ती, कॅसेट वगैरेंतून भीमसेनजी ‘ऐसे छा गए थे।’
- अप्पा जळगावकर (ज्येष्ठ पेटीवादक)
======================================================
सदर लेख मंगळवार, २५ जानेवारी २०११ च्या लोकसत्ता मधला आहे. लोकसत्ताचे आभार.
Friday, January 7, 2011
संगीत हेच आपले जीवन मानणाऱ्या कलावंतांची भारतात एकेकाळी वानवा नव्हती. ज्या काळात संगीताला सामाजिक प्रतिष्ठा अजिबात नव्हती, त्या काळातही अनेक कलावंत संगीतालाच आपले सर्वस्व मानत असत. संगीतासारख्या सौंदर्याची उपासना करणाऱ्या कलेचा हा ध्यास संगीताला तग धरून राहण्यास उपयोगी पडला, हे आता लक्षात येते. गेल्या काही वर्षांत, विशेषत: जागतिकीकरणानंतर संगीताच्या दुनियेत प्रतिष्ठेबरोबरच पैसाही आला आणि हे जग वेगळ्याच मार्गाने जाऊ लागले, अशाही काळात सातत्याने उत्तम संगीत निर्माण करण्याचा ध्यास घेणारे पंडित यशवंतबुवा जोशी यांना यंदाचा हृदयेश आर्ट्स या संस्थेतर्फे पहिला ‘हृदयेश संगीत सेवा पुरस्कार’ जाहीर होणे हे खरे म्हणजे एक सुचिन्ह आहे. कलावंताला अशा पुरस्काराने मिळणारी ऊर्जा फार महत्त्वाची असते आणि ही गोष्ट हृदयेश आर्ट्सने ओळखली आहे, हेही तितकेच महत्त्वाचे म्हटले पाहिजे. भारतीय अभिजात संगीताच्या दुनियेत आद्य घराणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्वाल्हेर गायकीतील यशवंतबुवा हे एक नामवंत कलावंत. ग्वाल्हेरबरोबरच आग्रा या घराण्याचीही त्यांना तालीम मिळालेली. त्यांच्या भात्यात या दोन्ही घराण्यांच्या अनेक उत्तमोत्तम चिजांचा भरणा आहे. त्या चिजांकडे पाहण्याची त्यांची एक खास अशी सौंदर्यदृष्टी आहे. आयुष्भर विद्यादानात रमलेल्या यशवंतबुवांना लौकिक अर्थाने प्रसिद्धीचे वलय फार उशिराने प्राप्त झाले. महाराष्ट्रात ग्वाल्हेर गायकीची स्थापन करणाऱ्या बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांचे शिष्य यशवंतबुवा मिराशी हे यशवंतबुवा जोशी यांचे पहिले गुरू. संगीताच्या गायनशैलीत घराण्याच्या अस्सलपणाला फार महत्त्व असते. अनेक कलावंतांनी आपापल्या गायनशैलीत अन्य शैलींचा प्रभाव मिसळत त्यामध्ये वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न केला. यशवंतबुवांनी मात्र आयुष्यभर या अस्सलपणाला फार महत्त्व दिले. त्यामुळे ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्याची तालीम त्यांना मिळाली, तरी या दोन्ही घराण्यांतील अस्सलपणा जपण्याचा प्रयत्न ते आयुष्यभर करत आले आहेत. सतत चिंतन करण्याने गायनात मोठा फरक पडत असतो, याचे भान अलीकडच्या कलावंतांमध्ये क्वचित आढळते. सर्जनशीलतेच्या निसर्गदत्त देणगीवर विसंबून गायनकला पुढे जात नाही, याची जाणीव या कलावंतांना होण्यासाठी त्यांनी यशवंतबुवांचाच आदर्श ठेवायला हवा. स्वरांवर हुकूमत असणाऱ्या मोजक्या कलावंतांमध्ये त्यांचा समावेश करायला हवा. गायला सुरुवात करताच स्वरावर घट्ट पकड करण्याची त्यांची क्षमता अचाट आहे. स्वर आणि लय या संगीताच्या दोन्ही चाकांवर आरूढ होत यशवंतबुवा जेव्हा गायनाला सुरुवात करतात, तेव्हा बंदिशीतल्या सौंदर्यपूर्ण जागांना त्यांच्या खास शैलीत सादर करत ते रसिकांना पटकन कब्जात घेतात. स्वरांच्या आंदोलनांप्रमाणेच तानांवरचा त्यांच्या गळ्याचा ताबा प्रत्येकाला अचंबित करायला लावणारा ठरतो. शरीर म्हटले तर कृश या सदरात मोडणारे. पण गायला लागल्यानंतर रसिकांना साक्षात्काराचीच अनुभूती यशवंतबुवा अनेकवेळा देते आले आहेत. पुण्यात बालपण गेलेल्या यशवंतबुवांना तेव्हाच अनेक दिग्गज गायक ऐकायला मिळाले. जन्म १९२७ चा. म्हणजे संगीत नाटक ऐन बहरात आलेले. खरे तर त्या काळात चांगल्या गायकाला मैफली गवई होण्याबरोबरच गायक नट होण्यात अधिक रस असणे स्वाभाविक होते. यशवंतबुवांना त्यांच्या शरीरयष्टीने ‘साथ’ दिली आणि ते गायनाकडे वळले. ग्वाल्हेरनंतर आग्रा घराण्याची तालीम जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे घेतली, तेव्हा यशवंतबुवांना गाण्यातील भावदर्शनाची एक नवी शैली प्राप्त झाली. आपले गाणे सतत ताजेतवाने ठेवणाऱ्या या कलावंताला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे त्याच्या कलेला मिळणारी सार्वजनिक पावती आहे!
=========================================================================
सदर लेख बुधवार, ०७ जानेवारी २०१ च्या लोकसत्ताच्या 'व्यक्तिवेध' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.
Subscribe to:
Posts (Atom)