भारतीय अभिजात संगीताच्या गेल्या पन्नास वर्षांच्या कालपटलावर आपली ठसठशीत
मुद्रा उमटविणाऱ्या गायक कलावंतांमध्ये पंडिता किशोरी आमोणकर यांचे नाव
अग्रभागी आहे. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनानंतर त्यांच्या
नावाने दिल्या जाणाऱ्या पहिल्या पुरस्कारासाठी किशोरीताईंची निवड जाहीर
करून महाराष्ट्राने त्यांच्या कलेला महत्त्वपूर्ण दाद दिली आहे. ज्या
महाराष्ट्राचे नाव संगीताच्या क्षेत्रात अतिशय मानाने घेतले जाते, त्या
महाराष्ट्रातच संस्थापित झालेल्या जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ कलावंत म्हणून
किशोरीताईंनी साऱ्या विश्वाला संगीताच्या माध्यमातून कवेत घेण्याचा
प्रयत्न केला आहे. त्यांच्या गायनाने दिव्यत्वाची प्रचिती आलेले लाखो रसिक
त्यांच्या प्रतिभास्पर्शाने अक्षरश: पावन झाले आहेत. पंडित भीमसेन जोशी,
पंडित कुमार गंधर्व आणि किशोरीताई या तिघांनी गेल्या पाच दशकातील भारतीय
संगीतावर अधिराज्य गाजवले आहे. या तिघांच्याही गायनशैली निरनिराळ्या असल्या
तरीही त्यांच्या गायनाने भारतीय अभिजात संगीताला उत्तुंग शिखरावर नेऊन
ठेवले आहे. भारतीय संगीतात गेल्या काहीशे वर्षांमध्ये काळाच्या प्रत्येक
टप्प्यावर आपल्या नवोन्मेषी प्रतिभेने त्यात मोलाची भर घालणारे कलावंत
निर्माण झाले. त्यांनी आपल्या प्रज्ञेने या संगीताला नवी झळाळी प्राप्त
करून दिली. त्यामुळे ते प्रवाही राहिले. गुरू-शिष्य परंपरेत गुरू मुखातून
मिळालेल्या कलेवर आपल्या बुद्धीने आणि प्रतिभेने त्यात भर घालणे हे भारतीय
अभिजात संगीताचे वैशिष्टय़ मानले जाते. गुरूप्रमाणेच गाणे आणि त्याच्या
गायकीत स्वत:ची भर घालून ते नव्याने सादर करणे या दोन प्रकारांमध्ये
स्वप्रतिभेच्या कलावंतांना नेहमीच महत्त्वाचे स्थान प्राप्त होते.
किशोरीताई यांनी अशी भर घातली आणि त्यामुळे संगीत आजवर टिकून राहण्यास मदत
झाली. जयपूर घराण्याची तालेवार तालीम मिळाल्यानंतर त्यातील सौंदर्यस्थळांचा
शोध घेताना किशोरीताईंनी संगीताचा शास्त्रीय अभ्यास केला. जुने पुराणे
ग्रंथ वाचून त्यांचा अर्थ समजावून घेऊन, त्याचा संगीतात कसा उपयोग करता
येईल, याचा विचार त्यांनी केला. त्यामुळे घराणे तेच असले, तरी त्या
घराण्यातील अन्य कलावंतांपेक्षा त्यांचे गायन नेहमीच वेगळे भासत आले.
'स्वरार्थ रमणी' हा त्यांनी सिद्ध केलेला ग्रंथ हे त्यांच्या अभ्यासू
वृत्तीचे एक सुरेख दर्शन आहे. सौंदर्यशास्त्राच्या गहन गुहेत शिरून तेथील
मौल्यवान रत्नांचा आपल्या गायनाद्वारे साक्षात्कार घडवण्याचे सामथ्र्य
त्यांच्यापाशी आहे. त्यांच्यासाठी गायन कला हे साध्य नाही, तर ते जीवनाच्या
पलीकडील विश्वापर्यंत जाण्याचे एक अमोल साधन आहे. त्यामुळे संगीताद्वारे
त्या आपल्याबरोबरच रसिकांनाही एका अनवट आणि अद्भुतरम्य दुनियेत घेऊन जातात
आणि त्यांना परीसस्पर्शाची अनुभूती मिळवून देतात. त्यांच्या या
योगदानाबद्दल महाराष्ट्रानेच नव्हे, तर साऱ्या देशाने त्यांचे ऋणी राहायला
हवे. संगीत ही अमूर्त कला असली तरी ती माणसाच्या जगण्यातील अर्थ शोधणारी
कला आहे, असे मानणाऱ्या कलावंतांपैकी किशोरीताई एक आहेत. भीमसेनजींनी
ज्याप्रमाणे आपल्या संगीतातून साऱ्या विश्वाला भारतीयत्वाचे एक अपूर्व
दर्शन घडवले, त्याप्रमाणेच किशोरी आमोणकरांनीही या संगीताच्या ताकदीची
प्रखर जाणीव करून दिली. रागसंगीताप्रमाणेच भक्तिसंगीतातील परंपरेत त्यांनी
स्वत:ची मुद्रा उमटवली. भावगीतासारख्या शब्दसंगीतातील त्यांचे अस्तित्व
आणखी एका वेगळ्या प्रांतातून सफर घडवते. संगीत हे केवळ स्वरांमध्ये नसते,
तर त्यातून व्यक्त होणाऱ्या भावदर्शनांत असते, याची जाणीव त्यांचे गायन
ऐकताना सतत होते. हे भावदर्शन मनाच्या गाभ्याचा ठाव घेते आणि रसिकाला
वेगळ्या विश्वात घेऊन जाते. त्यांच्या या सन्मानाबद्दल त्यांचे अभिनंदन
करीत असताना, त्यांचे ऋणही मान्य करायला हवेत.
======================================================================= सदर लेख रविवार, १८ फेब्रुवारी २०१३ च्या लोकसत्ताच्या 'विशेष' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.
======================================================================= सदर लेख रविवार, १८ फेब्रुवारी २०१३ च्या लोकसत्ताच्या 'विशेष' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.