Friday, February 18, 2011

केसरबाई-५

कित्येकदा वाटते की , तरूण केसरबाईंचा अपमान करणाऱ्या त्या गायिकेचे उपकार मानले पाहिजेत . हे सारे कष्ट त्या अपमानाच्या वेदनेपेक्षा हलके असावेत . पण नाही , हे अर्धसत्य झाले . केसबाई त्या गायकीत संपूर्णपणाने रमल्या होत्या . केवळ कुणाला तरी पराभूत करण्याची जिद्द एवढेच प्रयोजन आता उरले नव्हते . ती गायकी गाणे म्हणजेच जगणे असा त्यांच्या जीवनाचा अर्थ झाला होता . किंबहुना त्याच ते गाणे होऊन गेल्या होत्या . त्या गाण्यात उदात्ताविषयीची जी ओढ होती , क्षुद्र तडजोडींचा जो तिटकारा होता तोही त्यांच्या स्वभावाशी जुळून आला होता . हा अहंकार नव्हे . जी गायकी त्यांनी शिकायला घेतली , जी आत्मसात करण्यासाठी जीव मारून मेहनत केली , तिची महात्मता त्यांना पटली होती . ती पटल्यावर ` ब्रम्हज्ञान नव्हे लेकुरांच्या गोष्टी ' म्हणणाऱ्या तुकारामात जसा आपल्याला अहंकार दिसत नाही तसा त्यांच्यातही दिसणार नाही . हे आत्मविश्वासाचे वागणे . आपल्या जीवनहेतूपुढे इतर साऱ्या गोष्टींना गौण मानणाऱ्या उत्तम कलावंतालाच जी लाभते अशी एक विलक्षण निर्भयता
त्यांनी लाभली होती .
राजेरजवाड्यांच्या मिजाशी सांभाळण्याच्या काळात त्यांची गायनाची कारकीर्द चालली होती . पण केसरबाईंना ` अमुक गा ' म्हणून फर्माइश करण्याची तत्कालीन संस्थानिकांची हिंमत नव्हती . कुणालाही नुसतेच खूष करण्यासाठी त्या गायल्या नाहीत . त्यांचे कलावंत म्हणून जे मोठेपण आहे ते गायनाचा व्यवसाय असूनही ` गिऱ्हाइकांचा संतोष हेच आमचे समाधान ' हे सूत्र न मानण्यात . मनाला जे मान्य असेल तेच गाईन ही त्यांची प्रतिज्ञा . मान्यतेचा त्याखेरीज स्वीकारलेला एकमेव शिक्का म्हणजे आपले गुरू अल्लादियाखांसाहेब यांचा .
मी एकदा त्यांना सहज म्हणालो , " माई , तुम्ही अमुक अमुक राग गाताना मी कधी ऐकला नाही. "

असेच आणखी एकदा म्हणालो , " तुमच्या काळात नाटकांतली गाणी इतकी पॉप्युलर होती. तुम्ही का नाही कधी गायलात ? "

नाटकांतली पदं नाटकांत म्हणायची . त्यांचे ख्याल कशाला करायला हवेत ? एक काय ते नक्की ठरवा."

त्यांची सगळीच मते मला पटायची नाहीत . पण ती मते अशा मजेत सांगायच्या की त्यांतल्या अचूकपणापेक्षा त्या सांगण्याचीच मजा अधिक वाटायची . एक गोष्ट खरी ; ` गाणे ' ह्याखेरीज त्यांना दुसरा कसालाही ध्यास नव्हता . घराण्याविषयी माझी मते निराळी असायची. मग त्या माझी हजेरी घेतल्याच्या सुरात बोलत असत.एकदा अशाच त्या ` पोज ' घेऊन बसल्या होत्या . त्यांच्या गाण्याची टेप चालू होती .
शांतपणे आम्ही ऐकत होतो . गाणे संपले . " आणखी खूप गाणं टेप करून ठेवायची इच्छा होती . राहून गेलं. "

काही वेळाने माझ्या पत्नीने विचारले, " माई , हा राग कुठला हो ?"

" तुझ्या नवऱ्याला विचार . तो स्वतःला गाण्यातला शहाणा समजतो ना ? "

वास्तविक मी स्वतःला गाण्यातला शहाणा वगेरे काही समजत नाही . अनवट रागांशी मी कधी लगट केली नाही . चांदनी केदार , जलधर केदार , मलुहा केदार , - ह्यांच्याखात्यांवर कुठले सूर मांडले आहेत आणि कुठले खोडले आहेत यांचे हिशेब मी तपासले नाहीत . एखादा राग सुरू झाल्यावर त्याचे नाव मला नाही कळले तरी त्याच्या आस्वादात काही फरक पडत नाही . मात्र त्या रागाचे चलन ध्यानात आल्यावर त्या लायनीवरून गवई कसा चालतो हे मी बारकाईने पाहतो . तो आनंद घेताना त्या रागाचे नाव कळले नाही तर दातात सुपारी अडकल्यासारखा काही लोकांना त्रास होतो , तसा मला होत नाही . तरीही केसबाईंनी मला छेडल्यावर मी म्हणालो, " भूपनाट का ? "
" ही याची अक्कल . ह्याला भूपनाट आणि शुध्दनाटातला फरककळेनासा झालाय. "
" हल्ली मला भूप आणि शुध्द कल्याणातलासुध्दा फरक कळेनासा झालाय. "
" ऐकून ऐकून गाणं शिका , म्हणजे असंच होणार. "
" पण तुम्ही तरी मेफिलीत रागांची नावं सांगितलीत कधी ? "
" अरे , हा शुध्दनाट . ऐक . . . "" म्हणून शरीराच्या तसल्या त्या अवस्थेत त्यांनी शुध्दनाट आणि भूपनाट ह्यांच्यातला फरक समाजवून देण्यासाठी ` आ ' कार लावला . पुन्हा एकदा त्याच जुन्या तेजाने तळपणारा . तीनचारच मिनिटे गायल्या असतील . पण ते गुणगुणणे नव्हते . अनमोल जडजवाहिर दाखवणारा जवहिऱ्या ज्या दक्षतेने पेटी उघडून जवाहीर दाखवतो , अत्यंत काळजीपूर्वक हाताळतो आणि तितक्याच दक्षतेने ती मिटून ठेवतो तसे त्यांनी ते दोन राग उघडून दाखवले , पुन्हा मिटून घेतले . या क्षणी माझी पुन्हा पाटी कोरीच आहे ; आटवतात ती तीनचार झगमगीत मिनिटे .
" स्वर लावताना आता चक्कर येते रे मला . "
त्यावरून मी सहज त्यांना कुठल्या पट्टीत गात असत हे विचारले.
" पट्टी ? तुला पेटीवाल्याला काळजी , मला नाही. तीन सप्तकांत सहज जाईल ती षड्रजाची पट्टी. "

No comments: