Wednesday, April 24, 2013

गंगूबाई हनगल



गानयोगिनी

आयुष्यभर गाणे आणि गाणे हाच ज्यांचा ध्यास होता, त्या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गंगूबाई हनगल म्हणजे शास्त्रीय संगीताच्या प्रांगणात शांतपणे तेवणारी निरांजनातील वातच! गंगूबाईंच्या जन्मशताब्दी वर्षांची सांगता येत्या ५ मार्च रोजी होत आहे. या निमित्ताने त्यांच्या कृतार्थ जीवनाचा वेध घेणारा खास लेख..
२१ जुलै २००९ रोजी वयाच्या ९७ व्या वर्षी डॉ. गंगूबाई हनगल हे जग सोडून गेल्या. किराणा घराण्याच्या खॉंसाहेब उस्ताद अब्दुल करीमखॉं यांच्या नावानं प्रसिद्ध असलेल्या शाखेतल्या गवयांत त्या सर्वात वयोवृद्ध गायिका होत्या. जवळजवळ एक शतकभराचं कृतार्थ जीवन त्यांना लाभलं. आपल्या प्रदीर्घ आयुष्यातली ऐंशीहून अधिक वर्षे त्या गात होत्या. 'गंगव्वा' (गंगू) हे आजीचं, म्हणजे आईच्या आईचं नाव. हनगल हे त्यांच्या गावाचं नाव. तेच त्यांनी आडनाव म्हणूनही स्वीकारलं. वडील चिक्कूराव नाडगीर व्यवसायानं वकील होते व ब्राह्मण समाजातले होते. त्यांची आई अंबाबाई ऊर्फ अंबाक्का कर्नाटकी पद्धतीचं गाणं फार छान गात असे.
आईच्या गाण्यातूनच संगीताचे प्राथमिक संस्कार छोटय़ा गंगूवर झाले. अंबाक्कांचं 'जावळी' व 'पल्लवी' गायन ऐकण्याकरिता पुष्कळदा खॉंसाहेब उस्ताद अब्दुल करीमखॉं यांच्या घरी येत असत. त्या वेळी कधीकधी छोटय़ा गंगूचं गाणं ऐकत असत. 'बेटा, गला बहुत अच्छा है तेरा. खूब गाना और खूब खाना' असा तोंडभरून आशीर्वादही देत असत. त्यातला 'खूब गाना' हा पूर्वार्ध गंगूबाईंनी अखेपर्यंत आचरणात आणला. शाळेला जाताना वाटेवरच्या ग्रामोफोनच्या दुकानात तबकडय़ा वाजवीत असत. छोटी गंगू तासन्तास ती गाणी ऐकत असे. जोहराबाई आग्रेवाली (१८६८-१९१३) या विख्यात गायिकेची गाणी तिला फार आवडत. 'मुलतानी', 'पूरिया' अशा रागांची नावं ठाऊक नव्हती, पण त्याच्या रेकॉर्ड्स मात्र पाठ झाल्या होत्या. जोहराबाईंसारखं जोशपूर्ण गाता आलं पाहिजे हे त्यांच्या मनानं अगदी लहानपणीच घेतलं.
कुमार गंधर्व व भीमसेन जोशी यांच्यावरही ग्रामोफोन रेकॉर्ड्सचा संस्कार अगदी लहानपणीच झाला होता, याची आठवण या संदर्भात होते. विशेष योगायोगाचा भाग असा की, जोहराबाई १९१३ साली गेल्या व त्याच वर्षी गंगूबाई जन्माला आल्या. त्या काळी हुबळी, धारवाड, बेळगाव परिसरात हिंदुस्थानी पद्धतीचं गाणं प्रचारात व प्रसारात होतं. धारवाडात भास्करबुवा बखले संगीत शिक्षक म्हणून दाखल झाले होते. करीमखॉं जवळच मिरजेला व बेळगावात 'आर्य संगीत विद्यालय' चालवीत होते. अशा वातावरणात छोटय़ा गंगूला उत्तर हिंदुस्थानी संगीत जास्त आवडायला लागलं होतं. तिचा स्वाभाविक कल पाहून आईनं तिच्या परीनं शिक्षणाची व्यवस्था करायचा खूप प्रयत्न केला. तिच्यावर दक्षिणी संगीताची छायाही पडू नये यासाठी स्वत:चं कर्नाटकी पद्धतीचं गाणं बंद करून टाकलं. संगीतातल्या मेहनतीबाबत आई विशेष आग्रही होती. कर्नाटकी पद्धतीप्रमाणे नोटेशन करायला त्या आईकडून शिकल्या व त्याचा गाणं शिकताना खूपच उपयोग झाला. परवडत नसतानाही गाणं व नृत्य यांचं मिळेल तिथून शिक्षण चालूच होतं. पाचवीनंतर शाळा सुटलीच, पण गाण्यात मात्र बरीच प्रगती झाली. सोळाव्या वर्षी १९२९ साली, गुरुराव कौलगी यांच्याशी लग्न झाले. ते वकील होते, पण त्यांनी वकिली कधीच केली नाही. अनेक यशस्वी/ अयशस्वी उद्योग मात्र केले. गंगूबाईंच्या गाण्याला मात्र त्यांचं प्रोत्साहनच असे. १९६६ साली ते गेले. गायनकलेवरती आपल्या मोठय़ा कुटुंबाचा निर्वाह अनेक वर्षे करावा लागेल व होऊ शकेल अशी त्या वेळी गंगूबाईंना कल्पनासुद्धा नव्हती. १९३०-३२ सालापर्यंत त्या हुबळी धारवाड सोडून कुठेच बाहेर गेल्या नव्हत्या. पुढे मात्र या विद्येच्या बळावर त्यांनी हिंदुस्थानातल्या सगळ्या महत्त्वाच्या संगीत परिषदा तर गाजविल्याच; पण उतारवयात युरोप व अमेरिकेतल्या परदेशी रसिकांनाही मंत्रमुग्ध केलं. गाण्याच्या बाबतीत त्यांच्यापुढं हिराबाई बडोदेकरांचा आदर्श होता. १९२० ते ३० या कालखंडात हिराबाईंनी तरुण मुलींसाठी मंचावरचं शास्त्रीय गाणं व नाटक-सिनेमातलं अभिनयाचं क्षेत्र खुलं करून दिलं होतं. त्यांच्यासारखं स्टेजवर बसून गावं असं गंगूबाईंना लहानपणापासून वाटत होतं. ते त्यांनी करून दाखवलं. आपल्या शालीन व नम्र वागणुकीनं दोघींनीही पुरुष गवयांप्रमाणे समाजात आपलं स्थान पक्कं केलं. गंगूबाई तर पुरुषाप्रमाणे गाताना डाव्या हातात पुरुषानं वापरायचं रिस्ट वॉच (घडय़ाळ) वापरत असत. रियाज करताना तानपुरा घेऊनच गात असत. मात्र मंचावर क्वचितच स्वत: तानपुरा छेडीत असत. कारण गाताना दोन्ही हात मोकळे असणं त्यांना आवश्यक वाटत असावं. भीमसेनजींप्रमाणे त्यांचं गाणं नुसतंच श्रवणीय नव्हे, तर प्रेक्षणीयसुद्धा असे. मुद्रा-अभिनय, देहबोली व हातांच्या हालचाली गाण्याला अधिकच खुलवत असत. लहानपणी शिकलेल्या नृत्याचाही त्यात काही वाटा असावा. साथसंगतीला मामा व नात्यातलीच मंडळी असत. गाण्यातली साथ मुलगी क्रिष्णा करत असे. तिलाही त्या भरपूर गाऊ देत असत. त्यांचा आवाज पुरुषी असल्यानं मायलेकींची ही स्त्री-पुरुष आवाजातली अनोखी जुगलबंदी चांगलीच रंगत असे.
गंगूबाई ७५ वर्षांच्या झाल्या त्या वेळी हुबळीत मोठा महोत्सव झाला. त्यात गंगूबाईंची प्रदीर्घ मुलाखत डॉ. अशोक रानडे यांनी घेतली. सुदैवानं ती ध्वनिचित्रफितीवर उपलब्ध असून कंठ संगीताच्या विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना व रसिकांना फार उपयोगाची आहे. या मुलाखतीत आपल्या गाण्याच्या जडणघडणीविषयी त्या म्हणतात, ''माझ्या गुरुजींनी (सवाई गंधर्वानी) माझ्याकडून रोज अर्धा अर्धा तास खर्ज साधना करवून घेतली. ज्या काळात स्त्रियांना ती सांगितली जात नसे त्या काळी त्यांनी मला करायला लावली. त्याचा मला खूपच उपयोग झाला. तानक्रिया अंगात मुरावी याकरिता तास तास/ दीड दीड तास मला पलटे घोटायला लावायचे. मेहनत करायला सांगून ते आत जाऊन आपली कामं करत असत. कित्येक वेळा तेच तेच घोटून कंटाळा येई. इतकं चांगलं गाऊनही पुढचं का सांगत नाहीत, असा विचार मनात येऊन डोळ्यात पाणी येई. पण त्यांचं समाधान होईतो करावं लागे.
अगदी सुरुवातीच्या ध्वनिमुद्रणांमध्ये मात्र त्यांचा आवाज फार बारीक व पातळ होता. १९३० सालाच्या आसपास 'हिज मास्टर्स व्हॉइस' (एच.एम.व्ही.) या ग्रामोफोन कंपनीचे मुंबईतले अधिकारी नवीन आवाजाच्या शोधात फिरत फिरत हुबळी, बेळगाव, धारवाड परिसरात आले. अंबाक्का व गांधारी या मायलेकींच्या गाण्याची चाचणी झाली व ध्वनिमुद्रिका काढायचं ठरलं. तसा रीतसर करारही झाला. पण पोटाच्या ऑपरेशननंतर आईचं निधन झालं. त्यामुळं ते मागं पडलं. पाठोपाठ एक वर्षांच्या आत वडीलही गेले. मग मात्र त्यांनी गायनविद्येकडे व्यवसाय म्हणून अधिक गंभीरपणे लक्ष द्यायला सुरुवात केली. बापूराव पेंढारकर यांच्या 'विजयाची लग्ने' या हिंदी व मराठी बोलपटात त्यांनी नायकासमोर गाणं म्हटलं होतं. दुर्दैवानं तो बोलपट आज उपलब्ध नाही. १९३२ ते ३५ या काळात त्यांनी मुंबईला येऊन ग्रामोफोन कंपनीकरिता सुमारे साठ गाणी ध्वनिमुद्रित केली.
मिया मल्हार, खंबावती, जोगिया, मालकंस, अडाणा, शुद्ध सारंग, मुलतानी, शंकरा, देसकार, हिंडोल, सुहा सुघराई, बागेश्री, देस, मांड, दुर्गा, बहार, भूपाली, बिहाग, पूरिया, कामोद व भैरवी रागांतल्या तीन-साडेतीन मिनिटांच्या ध्वनिमुद्रिका त्यांनी दिल्या. त्यात त्यांचा तरुणपणीचा उंच व टिपेला जाऊन भिडणारा स्त्री-स्वर ऐकायला मिळतो. या रेकॉर्ड्सच्या लेबलवरती व कॅटलॉगमध्ये 'गांधारी हनगल' असं लिहिलेलं आढळतं. ऑगस्ट १९३५ च्या एच.एम.व्ही. कॅटलॉगमध्ये त्यांच्या गायनाची 'विविध वृत्त'ने छापलेली तारीफ छापली असून आतील पानावर चांदणीच्या आकारात त्यांचा फोटो छापलेला आहे. 'ग्रामोफोन क्षितिजावरील नवीन तारा' असं त्यात म्हटलंय. या काळात सवाई गंधर्वाची तालीम सुरू झाली होती खरी, पण ते सतत नाटकांच्या दौऱ्यांमध्ये व्यस्त असल्यानं ती खंडित स्वरूपातली होती. गुरुजी धावतपळत येत, काही सांगत व त्याचा रियाज करायला सांगून निघून जात. मग गंगूबाई जमेल तसा व तितका सराव करत. पण त्यात काही शिस्त नव्हती. शास्त्रीय संगीताबरोबरच गझल व ठुमरी गायनाच्या चार-पाच ध्वनिमुद्रिका त्यांनी दिल्या. त्याही चांगल्याच खपल्या. पण सर्वात जास्त लोकप्रिय झाल्या त्या मराठी गाण्यांच्या. ही वीसेक गाणी आहेत. त्या काळात पं. नारायणराव व्यास व पं. विनायकराव पटवर्धनांसारखे काही गवई राग संगीताकरिता मराठी चिजा रचून जनसामान्यांपर्यंत शास्त्रीय संगीत नेण्याचा प्रयत्न करीत होते. १९३०-१९३२ च्या कालखंडात त्यांच्या ध्वनिमुद्रिकाही बाजारात आल्या. त्याकाळचे विख्यात नाटककार भा. वि. तथा मामा वरेरकर व शीघ्र कवी स. अ. शुक्ल ऊर्फ 'कुमुद बांधव' यांनी अशा रचना करून दिल्या. उदा. 'कशी सदया न ये माझी दया' (राग जोगिया) 'हरीचे गुण गाऊ या' (राग भीमपलास). यमन रागातली 'ए री आली पिया बिन' ही चीज प्रसिद्धच आहे. त्यावर 'चल लगबग ये झणी' ही शुक्ल कवींची रचना गंगूबाईंनी मुद्रित केली. विशेष म्हणजे त्यात साथीला चक्क सतार हे वाद्य आहे. ध्वनिमुद्रिकांच्या माध्यमातून गंगूबाईंचं गाणं जिकडंतिकडं वाजू लागलं. मुलांसाठी गायलेली दोन गाणी सर्वाधिक गाजली. मामा वरेरकर यांची ही दोन गाणी एका रेकॉर्डवर पाठपोठ आली. 'आईचा छकुला' व 'बाळाचा चाळा' ही गाणी फोनवर वाजवली जात व घरोघरीचे छकुले व छकुल्या ती ऐकता ऐकता झोपी जात.
अशाच दोन अनोख्या मराठी भावगीतांची हकीकतही मोठी गमतीशीर आहे.
एच.एम.व्ही.त त्या वेळचे विख्यात गायक जी. एन. जोशी शुक्ल कवींची दोन द्वंद्वगीतं मुद्रित करीत होते. त्यांची चाल काहीशी पाश्चात्त्य पद्धतीची (वॉल्टझ) प्रकारातली होती. त्यांच्या बरोबरीच्या सहगायिकेला ते उंच स्वरातलं व तारसप्तकातलं गाणं काही केल्या पेलत नव्हतं. त्यामुळं सगळेच काळजीत होते. इतक्यात गंगूबाई त्यांच्या ठरलेल्या मुद्रणासाठी स्टुडिओत आल्या. त्यांना पाहून जी. एन. जोशींनी गाण्याची विनंती केली. पण त्यांनी साफ नकार दिला. पण ज्या गायिकेला ते जमत नव्हतं तिनंच आग्रह केल्यावरती मग त्या तयार झाल्या. त्यातूनच 'चकाके कोर चंद्राची' व 'तू तिथे अन् मी इथे हा' ही दोन गाणी मुद्रित झाली व खूपच गाजली. मराठी भावगीतांच्या इतिहासातली ही पहिली युगलगीतं.
सुमारे पंधरा वर्षांपूर्वी दक्षिण मुंबईच्या टाटा थिएटर परिसरात एन.सी.पी.ए.मध्ये गंगूबाईंचा सत्कार समारंभ होता. तिथं ही ध्वनिमुद्रिका घेऊन गेलो होतो. ती बघून त्यांना खूप आनंद झाला. 'कोण ऐकतं का हो ही गाणी आता?' असं विचारून कृष्णाबाईंनाही त्यांनी ती रेकॉर्ड दाखवली. ५० वर्षांपूर्वीच्या त्या काळातल्या आठवणींमध्ये त्या रंगून गेल्या. एच.एम.व्ही. स्टुडिओत रेकॉर्डिग झालं त्या वेळी ही तान्ही होती. तिला थोपटून, झोपवून मग गाणी करायचे. एका गाण्याचे पंधरा रुपये मिळत. पण ह्य़ा ध्वनिमुद्रिकांमुळेच त्यांचं नाव झालं व गाण्याची निमंत्रणं मिळू लागली. १९३६ च्या सुमारास मुंबईत गोरेगाव येथे पहिला जलसा झाला. रेडिओ व गणपती उत्सवातही त्यांची गाणी होऊ लागली. विशेष म्हणजे त्याच सुमारास ज्यांचा आदर्श समोर ठेवला त्या हिराबाई बडोदेकर यांच्या रेकॉर्ड्स बाजारात येत होत्या. तसेच गुरुजी सवाई गंधर्व व मुंबईतले गुरुबंधू मास्टर फिरोज दस्तूर यांच्याही ध्वनिमुद्रिका प्रकाशित होत होत्या. १९३६ च्या आसपास प्रकृतीच्या कारणानं नाटक कंपनी बंद करून गुरुजी कुंदगोळला येऊन राहिले. मग १९३७ ते १९४१ अशी सलग चार वर्षे गंगूबाईंना गुरुजींच्या घरी जाऊन गाणं शिकायला मिळालं. हुबळी ते कुंदगोळ रेल्वेनं प्रवास करावा लागे. कधी लहान मूलही सोबत असे. रस्त्यानं जाताना 'बघा बघा. धडपणे संसार करायचा सोडून ती पाहा गाणारी चालली आहे. लाज कशी वाटत नाही' अशी शेरेबाजीही ऐकावी लागे. पण ह्य़ा सगळ्याला त्या पुरून उरल्या. कधी परतीची गाडी संध्याकाळी उशिरानं येई. मग गुरुबंधू व मानलेला भाऊ भीमण्णा (भीमसेन जोशी) कंदील घेऊन स्टेशनवर सोबत येई. गुरुजींनी काय नवीन शिकवलं त्याची एकमेकांत उजळणी होई. बहीण-भावाचं हे नातं फार फार प्रेमाचं होतं व अखेपर्यंत टिकून होतं. ह्य़ा तालमीमुळं त्यांचं गाणं पक्कं व परिपक्व झालं. घशावरच्या उपचारांनंतर आवाज बदलून रुंद व पुरुषी झाला. त्या आवाजातली ध्वनिमुद्रिका १९५५ साली 'बाई गंगूबाई हनगल' या नावानं निघाली. त्यात 'मारवा' व 'भैरव' हे राग त्या गायल्या आहेत. 'मारवा' रागातली 'सुन सुन बतिया'ची रेकॉर्ड आत्माराम भेंडे त्यांच्या 'डायल एम फॉर मर्डर' या नाटकात वातावरणनिर्मितीसाठी पाश्र्वसंगीत म्हणून वाजवीत असत.
पुढं ई. पी. व एल. पी. रेकॉर्ड्सचा जमाना आल्यावर त्यांनी काही रेकॉर्ड्स केल्या. कॅसेट्स व सी.डी.च्या माध्यमातूनही त्यांच्या देश-विदेशातल्या मैफिली वितरित झाल्या. त्यांच्या मागे खूप छायाचित्रं व ध्वनिमुद्रणं पुढच्या पिढय़ांसाठी उपलब्ध आहेत. त्यांच्या नातवानं हुबळीत 'स्मरण मंदिर' नावाचं संग्रहालय उभं केलं असून तिथं त्यांचे तानपुरे व फोटो पाहायला मिळतात. त्यात तरुणपणीच्या तानपुऱ्याच्याच उंचीच्या गंगूबाई पाहावयास मिळतात. त्या छायाचित्राचं उतारवयात उद्घाटन करतानाही दिसतात. आवाजाच्या बाबतीत विद्यमान स्त्री गायिकांमध्ये त्या एकमेव मर्द गायिका होत्या. पद्मविभूषण, सन्माननीय डॉक्टरेट या सर्वोच्च मानाच्या पदव्या त्यांना प्रदान करण्यात आल्या. त्या मात्र 'अहो, मी तर फक्त पाचवी पास आहे' असं बोलून दाखवत असत. मात्र गाण्यावरचं त्यांचं प्रेम विलक्षण होतं व निष्ठा गाढ होती. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला त्या एकदा गेल्या होत्या. देवीचं दर्शन घेऊन सभामंडपात आल्या. थोडय़ा विसावल्या व हळूहळू गायला लागल्या. त्या आल्याची व गात असल्याची बातमी कानोकानी पोहोचली. पाहता पाहता श्रोते जमा झाले. कलाकार म्हणून त्या फार मोठय़ा होत्याच. पण एक माणूस व विचारी अशा जागरूक नागरिक म्हणूनही गंगूबाई हनगल फार फार थोर होत्या.