Friday, February 18, 2011

केसरबाई-३


मैफिलीत फोटोग्राफर आला तर त्याला गावाबाहेर घालवा म्हणायला कमी न करणाऱ्या माईंना तुम्ही माझ्या शिल्पकार मित्रासाठी ` पुतळ्यासाठी रोज पोज देऊन बसा ' म्हणायचे
म्हणजे माझ्या धैर्याची कसोटीच होती . पण त्यापूर्वी अशाच स्वरूपाच्या धाडसी कृत्यांत माझा वाटा होता . हिराबाई बडोदेकरांची पार्ल्याला म्युझिक सर्कलतर्फे टिळक मंदिराच्या पटांगणात
एकसष्टी साजरी करायची ठरली असताना केसरबाईंना अध्यक्ष करायचे ठरवले होते . त्याच्या बंगल्याचे तीन मजले चढून जाताना रामरक्षा पाठ नसल्याचे मला दुःख झाले होते आणि
केसरबाईनी मात्र आश्चर्याचा धक्काच दिला होता .

" अरे , मी चंपूला धीर देऊन कलकत्याच्या कॉन्फरन्समध्ये गायला लावली होती . भयंकर भित्री होती . मी समारंभाला येते . पण ती भाषणंबिषणं तू कर . तो फाजीलपणा तुला चांगला
जमतो . मी नुसती येईन . चंपूच्या पाठीवरून हात फिरवून आशीर्वाद देईन . "

डोळे दिपवून टाकणाऱ्या त्या तेजस्वी पण टणक हिऱ्याच्या आत असला , ज्याला कोकणीत ' मायेस्तपणा ' म्हणतात तो त्या दिवशी मला दिसला, . साठी उलटलेल्या हिराबाई बडोदेकर
केसरबाईच्या लेखी . कॉन्फरन्सेस मध्ये आणि राजेरजवाड्यांच्या घरच्या आणि दरबारच्या उत्सवप्रसंगी केसरबाई , हिराबाई आणि फैय्याझखाँसाहेब असा संगीताचा त्रिवेणी
संगम झालाच पाहिजे अशी परिस्थिती होती . हिराबाईंच्या सत्काराला केसरबाई आल्या . त्यांच्या हस्ते हिराबाईंना वाढदिवसाची भेट दिली . हजारो लोकांपुढे हिराबाईनी माईच्या
पायांवर आपले मस्तक ठेवले आणि माईनी चंपूला पोटाशी घट्ट धरून मिठी मारली . मैफिलीतल्या मंचावर स्वतःचा आब एवढासासुध्दा बिघडू न देणाऱ्या केसरबाईचे ते दर्शन .
एका सर्वस्वी निराळ्या घराण्याची गायकी गाणाऱ्या हिराबाईंविषयी वाटणारी आपुलकी त्या मिठीतून जशी सिध्द झाली तशी हजार शब्दांनी व्यक्त झाली नसती . इतके प्रभावी अध्यक्षीय
मूक वक्तव्य त्यापूर्वी आणि त्यानंतर कधीही मी ऐकले नाही . भारतीय संगीतातल्या गंगायमुनांचा संगम पाहिला असेच सर्वांना वाटले .

मुंबई विद्यापीठाच्या संगीत - विभागाचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते झाले . म्हणजे अक्षरशः हस्ते . पुन्ही एकदा केसरबाईना विनंती करण्याचे काम माझ्याकडे आले . रीतसर मी
त्यांचे रागावणे सहन केले. " मी भाषण करणार नाही , सांगून ठेवते . " ही अट मान्य केली .
रवींद्रनाथांसाठी 1938 सालच्या एप्रिल महिन्यात केसबाई गायल्या होत्या . गुरूदेव त्या वेळी सत्याहत्तर वर्षांचे . माई पंचेचाळीस वर्षांच्या . ते गाणे ऐकून रवींद्रनाथांनी लिहिले होते :
" हे गाणे म्हणजे अप्रतिम परिपूर्णतेचा एक कलात्मक चमत्कार आहे . केसरबाईंचे गाणे ऐकण्याची संधी मला साधता आली हे मी माझे भाग्य समजतो . त्यांच्या आवाजातली जादू ,

विविध प्रकारच्या ( मॉड्यूलेशन्स ) संगीतातली वेशिष्ट्ये दाखवणे , आणि तेही केवळ तंत्राला शरण जाऊन नव्हे किंवा यांत्रिक अचूकपणाने किंवा पढिकतेच्या प्रदर्शनाने
नव्हे , संगीतातला हा चमत्कार प्रकट करणे जन्मजात प्रज्ञावंतांनाच ( जिनियस ) शक्य असते हे त्यांनी पुन्हा पुन्हा सिध्द करून दाखवले आहे . आज संध्याकाळी ह्या अनमोल अनुभूतीची
संधी मला दिल्याबद्दल केसबाईंना माझे धन्यवाद आणि आशीर्वाद . " ` सूरश्री ' ही पदवी त्यांना रवींद्रनाथांकडूनच मिळाली होती .

ज्याचे सारे व्यक्तिमत्व सुरांनी भरलेले असा महाकवी श्रोता आणि तपःपूत सुरांनी अंतर्बाह्य प्रज्वलित झालेली अशी ही महान कलावती गायिका . प्राचीन काळातील पुराणकार
म्हणाले असते की , त्या समयी स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी केली . " अरे , चित्रासारखे बसून गाणं ऐकत होते . "" माई म्हणाल्या . रवींद्रनाथांच्याच अदृश्य बोटाला धरून मी पुतळ्याचा विषय काढला .
" माझा म्हातारीचा पुतळा ? तुला चेष्टा करायला सापडले नाय आज कोण ?
" मनाने मोकळ्या झाल्या की माई कोकणीतून बोलायच्या . ` बटाट्याटी चाळ , ' ` वाऱ्यावरची वरात ' वगेरे माझ्या लीला त्यांनी पाहिलेल्या असल्यामिळे त्यांच्या लेखी ` वात्रटपणा ' हाच माझा
स्थायिभाव होता .
" चेष्टा नाही माई . तुम्ही एकदा संधी द्या माझ्या मित्राला . तुमचा परमभक्त आहे . युरोप - अमेरिकेत नाव झालेले शिल्पकार आहे . स्वभावाने लहान मुलासारखा आहे ."
"" काय नाव म्हणालास ? "
" शर्वरी . "
" हे कसलं नाव मुलीसारखं ? "
" आता ते नाव काय मी ठेवलं . ? पण अश्राप माणूस - आणि उत्तम आर्टिस्ट . मग ? "
" अरे मला फार वेळ बसवत नाय रे . "
" तुमच्या तब्येतीला सांभाळून बसू या . "
" पण माझी अट आहे सांगते . तो पुतळा होईपर्यंत तू रोज येऊन बसायला हवं "
" मी काय करू बसून ? "
" बस माझ्याकडे गप्पा मारत . त्या बंगल्याशी मी काय बोलणार ?
" त्याला हिंदी येतं . "
"" येऊ दे . ""
" ठीक आहे . पण एका अटीवर . तुमच्याकडे तुमच्या गाण्यांच्या तुम्ही टेप्स करून घेतल्या
आहेत , त्या तुम्ही ऐकवल्या पाहिजेत . "
" ऐकवीन . "
माझ्या कुंडलीतले सारे शुभग्रह त्या क्षणी केसरबाईंच्या ` पराग ' बंगल्यातल्या त्यांच्या त्या तिसऱ्या मजल्यावरच्या दिवाणखान्यात एकत्र जमलेले असावेत .

मी शर्वरीला तार ठोकली . तो बिचारा तिथूनच पुतळ्याला लागणारी कसलीशी ती पोतेभर माती मळूनच घेऊन आला . त्याला घेऊन मी माईच्या घरी गेलो . शर्वरीने त्यांच्या पायाशी
लोटांगण घातले . आणि त्यानंतरचे दहाबारा दिवस ही एक पर्वणी होती . इकडे शर्वरीची बोटे मातीतून केसबाईंची प्रतिमा आकाराला आणीत होती आणि माई आयुष्यातल्या असंख्य

आठवणी सांगत होत्या . काही सुखाच्या , काही दुःखाच्या . मधूनच फळणीकर डॉक्टर यायचे . एवढे नामवंत भिषग्वर्य . धिप्पाड देहामनाचे . पण माईपुढे लहान होऊन वागत . माई त्यांना
एकदा म्हणाल्या , " डॉक्टर , अहो , थोड्या दिवसांसाठी तरी मला एकदा बरी करा . एकदा गाऊनच दाखवते ." माईवर परमभक्ती असणाऱ्या फळणीकर डॉक्टरांना अश्रू लपवावे
लागायचे .

खुर्चीवर अधूनमधून स्वस्थ बसायच्या . शर्वरी आपल्या कामात दंग . मी त्या वार्धक्यातही तो अंगभूत डौल न गमावलेल्या पण आजाराने जर्जर होत चाललेल्या माईकडे पाहत बसलेलो
असताना मनात विचार यायचा ; ह्या बाहेरून थकलेल्या देहाच्या रंध्रारंध्रात कसा एक अनाहत तंबोरा वाजत असेल . मनातल्या मनात किती रागांची , किती बंदिशींची , किती सुरावटींची किती तांनाची, बेहेलाव्यांची भेट घडत असेल. सूर असे मनात दाटलेले असताना वार्धक्यामुळे ते बाहेर फुटणे बंद व्हावे . - कसल्या यातना ह्या ! त्या सुरांसारख्याच असंख्य मेफिलींच्या आठवणी.

No comments: