Friday, February 18, 2011

केसरबाई-७

मला एक कथा आठवली : भर दरबारात राजाच्या एका लाडक्या कवीने कविता म्हटली त्यातल्या एका ओळीत ` शीतं बाधते ' ऐवची ` बाधति ' असे त्याने म्हटले . दरबारातल्या एका वेय्याकरण्याला राजाने विचारले , "" कविता कशी वाटली ? " कवी राजाचा लाडका आहे हे ठाऊक असूनही व्याकरणशास्त्री म्हणाले ` बाधति बाधते . ' त्या कवितेत आत्मनेपदी क्रियापदाला परस्मेपदी प्रत्यय लावल्याचे त्या व्याकरणशास्त्रांना बाधले होते . त्यांची भाषाविषयक तालीमच निराळी . आपल्या मताने राजा रागवेल याची भीती त्यांना नव्हती .
असली माणसे लौकिकार्थाने गोड , मनमिळाऊ राहूच शकत नाहीत . आपल्यालाला इष्ट वाटेल ते साधण्यासाठी कलेत मानला गेलेला एखादा नियम जाणीवपूर्वक मोडण्यात एक मिजास असतेही . पण अज्ञानामुळे नियम मोडणे निराळे , आणि कलेच्या सौंदर्यात मी भर घालीन ह्या आत्मविश्वासाने नियम मोडणे निराळे . खुद्द अल्लादियाखांसाहेबांच्या तरूणपणात ध्रुपदियांचा एवढा मोठा दबदबा असताना , त्यांनी , ज्याला विद्वान अंतःपुरातले गाणे म्हणून नाके मुरडीत अशा ख्यालगायकीचाही दबदबा निर्माण केलाच की . याचे कारण त्यांना ध्रुपदाचे सामर्थ्य आणि ध्रुपदाच्या मर्यादा ह्या दोन्हींचे पक्के ज्ञान होते . आंधळेपणाने नियम पाळण्याला कोणीच किंमत देत नसतात . केसरबाईच्या मतात आग्रह असेल पण आंधळेपणा नव्हता .
अशाच एका कुठल्याशा संस्थानिकाच्या दरबारात संगीतोत्सव होता . केसरबाईना संस्थानिकांनी नाटकातले पद म्हणायची फर्माइश केली . केसरबाईंनी त्या महाराजांना सांगितले , " थांबा , आपल्याला नाटकातलं पद कसं म्हणतात ते ऐकायचं आहे ? इथे
कृष्णामास्तर आले आहेत . ते म्हणतील . माझ्या गळ्याला त्या गाण्याची तालीमनाही. " त्या काळी काही संस्थानांत लग्नसमारंभांत ठिकठिकाणच्या गुणीजनांची गाणीबजावणी असायची. मेहेरबानीचा स्वीकार करायचे. " एकदा सकाळी माझ्या खोलीत हे बदामपिस्ते - मिठाईचं ताट आलं . मी म्हटलं , हे कुणी सांगितलं होतं ? तो दरबारी नोकर म्हणाला , हे सगळ्या गाणेबजावणेवाल्यांना वाटतात . मी म्हणाले , घेऊन जा ते ताट . असली दानं माझ्याकडे आणायची नाहीत . " केसरबाईचा हा खानदानीपणा ज्यांना कळला नाही त्यांना त्या गर्विष्ठच वाटल्या असणार . ज्या गायकीच्या महात्मतेने त्यांच्या जीवनातले आनंदनिधान त्यांना सापडले होते , त्या महात्मतेला लोकप्रियतेसाठी किंवा आर्थिक अभ्युदयासाठी बाधा आणणे , बदलत्या अभिरूचीचा अंदाज घेऊन गाणे बदलणे त्यांना मानवतच नव्हते . कालिदासात रमणाऱ्या रसिकाला ` तुम्ही सिनेमातल्या गाण्यांचा पद्यावल्या का वाचीत नाही ? ' असे कोणी विचारीत नाही .
काळ बदलला आहे , अभिरूची बदलली आहे , हे काय त्यांना कळत नव्हते ? त्यांच्या घरातली नातवंडे ` विविध भारती ' वरची फिल्मी गाणी ऐकण्यात आनंद मानीत . केसरबाईंची ऐकमेव कन्या सुमन आणि तिचे यजमान दोघेही डॉक्टर आहेत . मुले आधुनिक जमान्यातली आहेत . एकदा आम्ही बसलो असताना आत मुलांनी सिनेमातली गाणी लावून धुमाकूळ घातला होता .
" ऐक. " हसत हसत माई म्हणाल्या , " दिवसरात्र डोकं उठवतात. "
" माई , तुम्हांला नाही मजा वाटत ? "
" अरे , त्यांच्याएवढी आज मी असते तर मीही हेच केलं असतं . त्यांना ऐकू नका म्हटलं तर काय माझं ऐकणार आहेत ? रस्त्यातून वरातीचे ब्याडं वाजत जातात . त्या ब्यांडवाल्यांना काय ख्याला वाजवा म्हणून सांगायचं ? "
पुतळ्याचे काम पुरे झाले आणि आमच्या नशिबातले ते भाग्यशाली दहाबारा दिवस संपले . त्यानंतर कानी यायच्या त्या माईच्या वाढत्या आजाराच्याच बातम्या . याच सुमाराला मीही मुंबई सोडून पुण्याला स्थायिक झालो . त्यांना भेटून आलेले लोक सांगायचे , माईकडे पाहवत नाही . अंथरूणाला खिळून आहेत . वर्षा - दीडवर्षांनंतर शर्वरी पुतळा घेऊन त्यांच्या घरी गेला . प्लॅस्टरमधला तो अर्धपुतळा त्याने केसरबाईमा अर्पण केला . त्या वेळी त्या बिछान्यावरच होत्या . शर्वरीला त्या अवस्थेत म्हणाल्या, " शर्वरी , जेवायला थांबायला पाहिजे . तू आज येणार म्हणून डाळीच्या वरणात घालायला कारली आमली आहेच . "दीड - दोन वर्षांपूर्वी मी सहज म्हणालो होतो की कारली घातलेले डाळीचे वरण आणि भात हे ह्या शर्वरीचे जेवण . चहा नाही ,
कॉफी नाही , विडीकाडी काही नाही . शरपंजरी पडलेल्या माईंनी आईच्या मायेने शर्वरीचे कारली घातलेले वरण लक्षात ठेवले होते . दूरदूर गेलेले सूर पाहत बसलेल्या गानसम्राज्ञीचा तो पुतळा . शर्वरीची ओळख करून दिली त्या दिवशी माईंनी विचारले होते , "तुझे गुरू कोण ? "
शर्वरीने आपल्या शिल्पकलेतल्या गुरूचे नाव सांगतानादेखील हात जोडले होते . हा गुरूपंरपरा असलेला , खानदान असलेला शिल्पकार आहे याची खात्री पटल्यावरच माई पोज द्यायला तयार झाल्या होत्या.

No comments: