Thursday, May 20, 2010

मैं तो फकिर कलंदर हूँ।


अभिजात संगीतकलेतील धृपद शैली आणि विशेषत: त्यातली आलापचारी हा आत्मविद्येचा आगळा आणि वेगळा लोभसवाणा आविष्कार आहे. लययोगाची ती एक हृदययंगम कला आहे. धृपद ही भारतीय संगीत परंपरेतील आद्य सुव्यवस्थित संगीतप्रणाली आहे. हिचा उगम छंद-प्रबंध गायकीपासून ते थेट सामवेदापर्यंत जाऊन पोचतो. आलापचारीमध्ये मुक्त गायन आणि बंदिशीमध्ये बंधनयुक्त गायन असा सर्वोत्तम समन्वय धृपद शैलीत साधला गेला आहे. देव-देवतांच्या स्तुतीच्या बंदिशी सुरुवातीला संस्कृत भाषेमध्येच असत. संगीत ही एक योगसाधना आहे, अध्यात्म साधना आहे, ईश्वरप्राप्तीचे माध्यम आहे अशी भारतीय संस्कृतीची संगीताकडे पाहण्याची दृष्टी होती. ध्रुव बाळाप्रमाणे अढळ श्रुतिंचा शोध, अढळ स्वरांचा शोध, अढळ अशा राग आणि आत्मभावाचा शोध घेण्यासाठी, संगीताची जी शैली निर्माण झाली, तिला म्हणूनच ध्रुवपद किंवा ध्रुपद असे नाव पडले.
या अभिजात ध्रुवपद संगीत परंपरेला, गेली ५०० वर्षे ज्यांनी जतन करून ठेवले त्या डागर घराण्यातील एकोणिसाव्या पिढीचे प्रतिनिधी म्हणजे उस्ताद सईदुद्दिन डागर. महान ध्रुपदिये अल्लाबंदेखाँसाहेबांचा नातू आणि उस्ताद हुसेनुद्दिनखाँ (बाकाजी) साहेबांचे सुपुत्र. डागर घराण्याचा ज्ञात मूळ पुरुष, बाब गोपाळदास हे हिंदू ब्राह्मण होते. त्यांची गुरुपरंपरा थेट स्वामी हरिदासजीपर्यंत पोचते.
हुसेनुद्दिनखाँसाहेब अलवारचे महाराज जयसिंग यांच्या दरबारी ‘गुणीजनखान्याचे प्रमुख’ या पदावर होते. सईदुद्दिनसाहेबांचा जन्म अलवारचा. चौथ्या वर्षी मातृवियोग. देश स्वतंत्र झाल्यानंतरच्या हिंदु-मुस्लिम दंगलीनंतर वडिलांना अलवार सोडावे लागले. बाकाजी जयपूर, दिल्ली अशी मजल-दरमजल करीत शेवटी १९५० मध्ये कलकत्त्याला स्थिरावले.
छोटय़ा सईदची स्वर-साधना वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच सुरू झाली होती. सुरुवातीला एक-दोन तासांचा रियाझ आता आठ-दहा तासांपर्यंत चालू झाला होता. पहाटे  चारला बाकाजी सईदला शिकवायला सुरुवात करीत. षड्जसाधना, मंद्रसाधना, स्वर-स्थाने पक्की करणे, छोटे स्वरालंकार, श्रुतिज्ञान असे हळूहळू शिक्षण सुरू होते. एक पलटा पक्का करण्यासाठी सईदला ११०० मण्यांची माळ, ११ वेळा ओढावी लागत असे. माळा पूर्ण झाल्या नाहीत तर जेवण मिळत नसे.
मेरखंड पद्धतीच्या ५०४० तानांचा रियाझ हा जवळ जवळ सहा वर्षे चालला होता. त्याखेरीज ४० दिवसांचे एक रियाझ-सत्र (चिल्ला) असायचे. या ४० दिवसांत कुठेही बाहेर जायचे नाही. आजारी पडण्याचीही परवानगी नाही. यामध्ये एक-एक स्वराच्या ठेहरावाला पक्के केले जायचे, रोजचे १०-१२ तासांचे असे अनेक ‘चिल्ले’ सईदकडून बाकाजींनी करून घेतले.
संगीत-साधना चालू असतानाच सईदुद्दिन शाळा कॉलेजात क्रिकेट, फुटबॉल आणि हॉकी या खेळातही प्राविण्य मिळवत होता. शाळेत असताना दत्तू फडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तो पंकज रॉय, विजय मांजरेकर अशा धुरंधरांच्या संघांविरुद्ध क्रिकेट खेळला आणि १९६३ मध्ये बंगाल राज्याच्या हॉकी संघातही त्याची निवड झाली. पण त्याच वर्षी बाकाजींचे निधन झाले. सईदचा खेळ संपला आणि गाणेही संपले.
सईदुद्दिन पोरका झाला. त्याचे वडील, आई, मित्र, सखा, शिक्षक आणि गुरुही असलेले बाकाजी त्याला सोडून गेले होते. उदरनिर्वाह कसा करायचा हा यक्षप्रश्न भेडसावत होता. रविंद्रभारतीने बाकाजींच्या जागी सईदुद्दिनला नोकरी देऊ केली. पण हा कलंदर पण प्रामाणिक माणूस स्वत:लाच म्हणाला की, ‘मी अजून गुरू बनण्याच्या योग्यतेचा नाही’ आणि त्याने ती नोकरी नाकारली. पोट भरण्यासाठी, ३५ रु. मासिक पगारावर एका कारखान्यात नोकरी स्वीकारली. लोखंडाच्या पट्टय़ांना ड्रिलिंग मशीनवर भोक पाडणे, हे दिवसभराचे काम. त्या एकाकी घरात सईद पहाटेचा रियाझ करायचा; पण त्यात प्राण नव्हता. तो जणू बाकाजींबरोबर उडून गेला होता. कारखान्यात ड्रिलिंगचे काम करता करता बाकाजींची आठवण यायची. आपल्या ‘एकाकीपणाचा ‘एहसास’ व्हायचा. संगीतातील प्रगत ज्ञान आता यापुढे कसे मिळणार या विचाराने जीव व्याकुळ व्हायचा. ड्रिलिंगच्या लयीत चौताल सुरू व्हायचा. रस्त्यावरील स्वस्तातले काही खाऊन, रात्री आढय़ाकडे पाहात आयुष्यातील पोकळीचा विचार करावा तर मालकंस आठवायचा. ‘पूजन चली महादेव, हंसगमनी पार्वती’ ही बंदिश गातांना मालकंसमधल्या मध्यमाच्या श्रुति अचूक लागल्या नाहीत म्हणून बाकाजींनी भर मैफिलीत मारलेली थप्पड आठवायची. ‘पुन्हा चुकलो तर थप्पड मारायला तरी बाकाजी तुम्ही हवे होतात’ असे म्हणत, हमसून हमसून रडत सईदुद्दिन झोपी जायचा.
दोन-तीन वर्षे अशीच निघून गेली. ३५ रुपये पगारात भागेना. पैसे न भरल्याने घरात पाणी यायचं बंद झाले. वीज कापली गेली. घर सोडण्याची वेळ आली.
एका संध्याकाळी, अशाच विमनस्क स्थितीत सईदुद्दिन गंगेच्या काठावर बसला होता. दिवस मावळत होता, रात्र उगवणार होती. प्रकाश आणि अंधार एकमेकांना ओलांडण्याची ती कातरवेळ. मनात जगण्याबद्दल आणि गाण्याबद्दलही संपूर्ण अंध:कार दाटून आलेला. पण गंगेपल्याड क्षितिजावर, आकाशात रंगपंचमीचा खेळ सुरू होता. आकाशात रंग फुलत होते आणि सईदुद्दिन गात होता.
छुटत पिचकारी चहूँ ओर,
होरी खेलत राधा-कृष्ण रंगमहलमें
श्रीच्या भावश्रुतियुक्त पंचमाला स्वरांचा मुलायम स्पर्श झाला आणि क्षितिजावर चंद्राचा उदय झाला. सईदुद्दिनने त्याच वेळी ठरवले की कलकत्ता सोडायचे आणि गाणेही सोडायचे.
दुसऱ्याच दिवशी सईदुद्दिन लाहोरला निघून गेला. तिथे तीन रुपये रोजावर, रेल्वे मेल सव्र्हिसेस (टपाल खाते) मध्ये नोकरी मिळाली. पहाटे तीन वाजता रेल्वेच्या यार्डात जायचे, आगगाडीच्या डब्यातील टपालाच्या पिशव्या उचलून हातगाडीवर लादायच्या आणि दोन कि.मी. लांब ती हातगाडी ढकलत ढकलत रेल्वेच्या ऑफिसमध्ये न्यायची. हे काम दिवसातून पाच-सहा फेऱ्या मारीत करायचे. ‘जे संगीत मला जगवू शकत नाही, ते काय कामाचे?’ असा अविचार सईदुद्दिनच्या मनात पिंगा घालत होता. पण तरीही, पहाटेपूर्वीच्या अंध:कारात, हातगाडी ढकलतांना बैरागी भैरवाचे सूर मनात नकळत घुमत राहायचे. मनातल्या घोर निराशेला, भीषण भविष्याला बैरागी भैरवाचा ऋषभ चालवत राहायचा आणि तरीही ‘पुन्हा तुला तुझी वाट सापडेल, दिशा गवसेल, प्रकाश दिसेल’ अशी अंधुक आशा आणि दिलासा तोच बैरागी भैरव देऊन जायचा..
आणि ती दिशा मिळाली. वर्षभरानंतर, काकांनी पद्मभूषण उस्ताद रहिमुद्दिनखाँनी सईदला लखनौला बोलावून घेतले. संगीत शिक्षण पुन्हा सुरू झाले. काकांनी निषादाचे प्रकार आणि उपज अंग प्रामुख्याने शिकवले. १९६८ मध्ये ज्युनियर डागर बंधू-उस्ताद झईदुद्दिन व फैयाजुद्दिन यांनी सईदला दिल्लीला आपल्या घरी नेले आणि जवळ जवळ तीन वर्षे पुढचे संगीत शिक्षण दिले.
१९७० ते १९८०, उस्ताद सईदुद्दिनजी जयपूरच्या राजस्थान कॉलेजात संगीताचे प्राध्यापक म्हणून शिकवत होते. १५० रुपये पगारावर सुरू झालेली ही नोकरी १९८० मध्ये ३०० रुपये मासिक पगारावर पोचली. एव्हाना उस्तादजींचे लग्न झाले होते, दोन मुलेही होती. दहा वर्षांनंतरही नोकरीत कायम करीत नसल्याने, उस्तादजींनी नोकरी सोडून दिली आणि १९८० ते ८५ या पाच वर्षांत, दिल्लीला ज्युनियर डागर्स या आपल्या चुलत भावांकडे राहून ते संगीत अध्ययन आणि अध्यापन करीत राहिले.
बाबासाहेब गाडगीळ फौंडेशनच्या निमंत्रणावरून उस्ताद सईदुद्दिनजींचे १९८४ साली पुण्यात आगमन झाले. सुरुवातीला महिनाभर कार्यशाळेत १५०-२०० विद्यार्थी सहभागी झाले होते. पण धृपद शैलीपेक्षा, समाजावरील ख्याल गायकीचा प्रभाव आणि स्वरसाधनेसाठी लागणारी कठोर मेहनत व चिकाटी यांच्या अभावामुळे ही संख्या हळूहळू रोडावत गेली. सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत, शिष्यांसाठी डागर गुरुजींचा स्वरयज्ञ चालू असायचा.
पुढची अनेक वर्षे गुरुजी, धृपदाचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रभर फिरत राहिले. सांगली, सातारा, कोल्हापूर, परळी-वैजनाथ, आंबेजोगाई, जामखेड, मिरज, देगलूर, परभणी, लातूर, उस्मानाबाद, चाळीसगाव, नांदगाव, नांदेड, वासर या आणि अशा अनेक लहान लहान गावातून, गुरुजी धृपदाच्या मैफिली आणि कार्यशाळा करू लागले, तेसुद्धा स्वखर्चाने, एसटीच्या लाल बसमध्ये, तानपुरा मांडीवर घेऊन रात्रंदिवस प्रवास करीत.
एकीकडे आर्थिक उत्पन्न कमी असल्या कारणाने हा माणूस आपले घर गृहस्थाच्या मर्यादेत चालवीत होता आणि दुसरीकडे स्वत:च्याच खिशाला तोशिष लावून, धृपद-धमाराचा प्रचार करण्यासाठी अविश्रांत आणि बेहद परिश्रम करीत होता.
पुण्याच्या ‘गानवर्धन’च्या, अशाच एका गुरुजींच्या कार्यशाळेत गानसरस्वती श्रीमती किशोरीताई आमोणकर उपस्थित होत्या. गुरुजींच्या स्वरातील ‘भावा’ला त्यांनी मन:पूर्वक दाद दिली. १९९३ साली, मुंबईत गानतपस्विनी श्रीमती मोगूबाई कुर्डीकरांना पुरस्कार प्रदान करण्यात आला तेव्हा या मोठय़ा मनाच्या गानसरस्वतीने, उस्ताद सईदुद्दिनजींचे गाणे त्या दिवशी आवर्जून ठेवले. समारंभप्रसंगी त्या म्हणाल्या, ‘शास्त्रीय संगीताला आज रुक्ष व वाळवंटी रुप आले आहे, त्यात भावाचा मागमूसही दिसत नाही. अशा काळात, उस्ताद सईदुद्दिनजींचे भावपूर्ण आणि रसपूर्ण स्वरोच्चारण, हे प्रगल्भ रसिकाला आनंद देणारे आहे.’
मला आठवते, उस्तादजींची पारनेरच्या उत्सवातील मैफिल. उत्तररात्र सरूनही सभागृह श्रोत्यांनी तुडुंब भरले होते. तीनही तानपुरे एकाच सुरात आणि एकाच लयीत झंकारत होते. रात्री अडीच वाजता डागरजींनी ‘जोगिया’ गायला सुरुवात केली.
पहिल्या काही स्वरांतच जोगियाचे अंधुक रुप दिसायला सुरुवात झाली. जोगियाच्या एका भावश्रुतिच्या बिंदूपर्यंतचा स्वरांचा प्रवास सुरू झाला. जणू बिंदूतून निघून अनंतात विलीन होणाऱ्या रेषांचे चित्र-नृत्य सुरू झाले. प्रत्येक स्वराकृतीतून, आणि आप्तयुक्त स्वरातून नव्हे तर अतिसूक्ष्म श्रुतिंमधूनही जोगियाचा करुण रस प्रवाहित होत होता. जणू स्वरांच्या फुलांचे अलंकार माळून, भक्तीची एकतारी वाजवीत, मीरा कृष्णाला भेटायला निघाली आहे.
ते, त, ता, ना, री, न अशा अर्थहीन अक्षरांचा आधार घेऊन फक्त तानपुऱ्यांच्या झंकाराच्या साथीने, उस्तादजी करुण रसाला आळवीत होते. शब्दभाषेचा आणि तालभाषेचा कुठलाच हस्तक्षेप आता स्वरभाषेत होत नव्हता आणि म्हणूनच साहित्य किंवा ताल यामुळे मनात उमटणाऱ्या प्रतिमा, प्रतीके, पूर्वग्रह, अलंकार, उत्प्रेक्षा आणि पूर्वसंस्कार यांचा कुठलाच व्यत्यय रसास्वादात येत नव्हता. शुद्ध स्वरभाषेतून जोगियाचा अमूर्त भाव, सभागृहात मूर्त रुप धारण करत होता.
गुरुजींची कार्यशाळा ही संगीत साधकासाठी एक अद्भुत पर्वणी असते. बावीस श्रुतिंचा ‘मालिक’ असलेला तानपुरा ऐकणे, लावणे, छेडणे आणि त्या तानपुऱ्या‘बरोबर’ गाणे म्हणजे काय हे प्रत्यक्ष गुरुजींकडूनच शिकण्यासारखे आहे.
मुखभंग किंवा हमिंगचा रियाझ, मंद्रसाधना, स्वरस्थानांचा अचूकपणा, ठेहराव, पलाटे, अलंकार या गोष्टी तर ते शिकवतातच; पण त्याहूनही अधिक, नादाचा उच्चार हा नाभी, हृदय, कंठ आणि शीर्ष या शरीरातील चार प्रमुख केंद्रातून वेगवेगळा किंवा संयोगाने कसा करायचा असतो, याचे प्रात्यक्षिकही ते दाखवतात. स्वरश्रुतिंवरील अलौकिक प्रभुत्व हे गुरुजींच्या गायकीचे वैशिष्टय़ आहे. एकाच स्वराची तीव्रतर, तीव्रतम आणि कोमल, कोमलतर व कोमलतम (सकारी) अशी सात रुपेच नव्हे तर त्याच स्वराची अधोमुखी व उध्र्वमुखी रुपेही गुरुजी गाऊन दाखवतात. रागभावाच्या अंतरंगाचा वेध घेताना, एकाच कोमल रिषभाच्या श्री, भैरव, तोडी अशा रागांमधील अचूक श्रुतिस्थानांचे गुरुजी दर्शन देतात. मालकंसचा ‘मध्यम’, श्रीचा पंचम, हमीरचा धैवत, ललितचा धैवत, चाँदनी केदारचा निषाद, देस किंवा मल्हारमधला काकली (किंवा गोपुच्छ) निषाद यांची अचूक स्वरश्रुतिस्थाने आणि लगाव ऐकतांना श्रुति धन्य होतात. भरत मुनींच्या बावीस किंवा पाश्र्वदेवाच्या सहासष्ट श्रुतिंहूनही अधिक, अशा ‘श्रुतिंच्या अनंत संभावना’ या डागरवाणीत जाणवू लागतात.
गोव्याच्या कला अकादमीने पाच वर्षांपूर्वी गुरुजींची कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यशाळेच्या शेवटी मी गुरुजींना गझल गायची विनंती केली. गुरुजींनी गायला सुरुवात केली.
इलाहे आँसूभरी जिंदगी किसी को न दे
खुशीके बाद गमे-जिंदगी किसी को न दे
त्या थोर कलाकाराच्या मनातले वादळ त्या गझलमधून व्यक्त होत होते. १९९८ पासून गेली १२ वर्षे, गुरुजी वर्षांतून दोनदा, तीन-तीन महिने परदेशात जातात. पॅरिस, बेल्जियम, हॉलंड, जर्मनी इथे सर्व मिळून, गुरुजींचे ७०-८० परदेशी शिष्य आहेत. परदेशात मैफिलीही झाल्या आहेत. परंतु गुरुजींच्या मनात येत होते की, परदेशात मला शिष्य मिळणे हे मी माझे भाग्य समजू की, संगीताची आद्य जननी असलेल्या या भारत देशात, रसिक महाराष्ट्रात, विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात, गेल्या २५ वर्षांत माझ्याकडे ध्रुपदासाठी एकही शिष्य येऊ नये हे मी माझे दुर्भाग्य समजू? सूरमणी, गुरुमहात्म्य, स्वरगायत्री, स्वर-साधना रत्न, नाद-निधी, जीवनगौरव, महाराष्ट्र शासन सांस्कृतिक पुरस्कार असे खूप मानसन्मान आयुष्यात मिळाले हा माझ्या साधनेचा सन्मान समजू? की आर्थिक सुबत्ता सोडून द्या; पण निदान आर्थिक स्वास्थ्य प्राप्त होईल. एवढी बिदागी देऊन ठरवलेल्या मैफिली या माझ्याच देशात मला मिळू नयेत, हा मी अपमान समजू? वडिलांना आणि चुलत बंधूंना दिलेल्या वचनाला जागून, माझे संपूर्ण जीवन मी धृपद-धमाराच्या प्रसारासाठी समर्पित केले आणि एवढेच नव्हे तर विसाव्या डागर पिढीतील माझ्या मुलांनाही डागरवाणीच्या धृपद परंपरेचे शिक्षण देऊन, भारतीय अभिजात संगीताचा वारसा जतन करण्यासाठी घडवले ही खुशीची बाब मानू? की म्हातारपणीही अनिकेत असलेल्या आणि स्वत:लाच पुरेशा मैफिली आणि शिष्य नसलेल्या, माझ्या मुलांच्या भवितव्याचे काय याचा ‘गम’ बाळगू? हे परमेश्वरा, आर्थिक दुरावस्था आणि आयुष्यभराची आर्थिक विवंचना हा तू कलावंताला दिलेला शाप मानू?की अशा दुरावस्थेतून होणाऱ्या आंतरिक तगमगीतून व वेदनांतून फुलणारी कला,हा तुझा वर म्हणून स्वीकारू? कलासाधना म्हणजे सौंदर्याच्या, नाविन्याच्या, सखोलतेच्या उत्तुंगतेच्या आणि चैतन्याच्या नवनवीन रुपांचा शोध घेत राहाणे. उस्ताद सईदुद्दिन डागर म्हणजे धृपदासाठी समर्पित झालेले व्रतस्थ जीवन तर आहेच. पण अजूनही, वयाच्या एकाहत्तराव्या वर्षीही ते एक आत्मशोधक कलासाधक आहेत.
उस्ताद सईदुद्दिन डागर यांना ७० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, त्यांच्या व्रतस्थ संगीत साधनेबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत, ‘स्वरमाऊली’, ‘उत्तुंग सांस्कृतिक परिवार’ (विलेपार्ले), राजहंस (गोरेगाव) आणि व्हिलेज म्युझिक क्लब (कांदिवली) या मुंबईतील सांगितिक संस्थांनी त्यांना गौरवनिधी अर्पण करण्याचे ठरविले आहे.
तरल आणि प्रगल्भ जाणीव असलेल्या माझ्या वाचक मित्र-मैत्रिणींनो, एका व्रतस्थ स्वरयोग्याच्या गौरवनिधीसाठी, तुमचे धनादेश ‘उस्ताद सईदुद्दिन डागर गौरव समिती (saiduddin dagar gaurav samiti)  या नावाने  राजहंस प्रतिष्ठान,   ४ / ६५, भट बंगला, पेरु बाग, आरे रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०० ०६३ येथे जरूर पाठवून द्या. संवेदनाक्षम मनाने आणि उदार हस्ताने.
‘हृदयातून जे उमटते आणि हृदयाला भिडते’ ते गाणे असे मानणाऱ्या उस्ताद सईदुद्दिन डागर यांच्या धृपद-धमार गायनात रागभावाचा रस-परिपोष असतो. त्यांची आलापचारी ऐकताना एका अखंड, प्रवाही आणि अथांग अशा नाद-ब्रह्माची अनुभूती येते. रागाच्या आकृतिबंधाच्या मर्यादेत राहूनही, त्यांच्या गायनातून भावपरिणाम, संवेदना, कल्पना आणि जाणीव विविध सौंदर्यपूर्ण रुपात एका विलक्षण समृद्धीने मनाला भेटत राहतात. गमक, उत्स्फूर्त, डगर, आंदोल, अनुरणनात्मक गुंजन, आसयुक्त मिंड अशा सौंदर्यपूर्ण स्वरोच्चरांनी सजवून, उस्ताद सईदुद्दिनजी फक्त रागाचा भाव आणि आशय श्रोत्यांना सादर करीत नाहीत तर संपूर्ण सभागृह, श्रोत्यांची व्यक्तिमत्त्वे, त्यांच्या अंतरात्मा या सगळ्यांना एकाचवेळी रागभावाने आवृत्त करतात आणि त्या स्वरमंत्रांनी भारून टाकतात. बंदिशीतील काव्यभाव आणि राग-भाव यांचे भान ठेवूनच ते आवश्यक तिथेच गमकाचा प्रयोग करतात आणि आड, बिहाड, कुहाड, दुगुन, चौगुन, सम, बिसम, अतीत, अनागत हे लयकारीचे प्रकारही मात्रांच्या गिनतीत न बांधता, भावाला पोषक अशी उपज अंगाने लयकारी करतात. ‘रस’ हाच संगीताचा आत्मा आहे असे मानणाऱ्या आणि गाणाऱ्या स्वरयोगी धृपादिये उस्ताद सईदुद्दिन डागर यांना ७० वर्षे पूर्ण झाली- त्या निमित्ताने.
सरकार याची दखल घेईल का?
३ नोव्हेंबर १९८८ च्या शासन क्रमांक १२८८/ प्रपन-९१/१९ या पत्रान्वये, गृहनिर्माण व विशेष सहाय्य, मंत्रालय यांच्याकडून शासनाच्या स्वेच्छानिर्णयानुसार करावयाच्या राखीव सदनिकांमधून, कलाकार या प्रवर्गातून सईदुद्दिन डागर यांना ८०० चौ. फू.ची सदनिका पुण्यात देण्याचा निर्णय कळविण्यात आला. शरद पवार मुख्यमंत्री असताना हा निर्णय घेतला गेला आणि त्यानंतर डागरांचे पुण्यात १५ वर्षे वास्तव्य नसल्याने ती सदनिका त्यांना देण्यात आली नाही. वास्तविक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डागरांसारखे कलाकार, हे कुठलाही प्रांत किंवा राज्याच्या मर्यादेत सीमित होऊ शकत नाहीत. असे कलाकार हे राष्ट्रीय संस्कृतीचे आणि अस्मितेचे प्रतीक असतात. सरकारने अशा व्यक्तींच्या बाबतीत, १५ वर्षे वास्तव्याची अट शिथिल करायला काहीच हरकत नव्हती.
मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना ८ जानेवारी १९९९ रोजी शासनाने पुन्हा डागर यांना पुण्यात सदनिका देण्याचा निर्णय कळवला. सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर, शासनाने डागर यांना महाराष्ट्र राज्य कला संचनालयातून ‘ते कलाकार आहेत’ असे प्रमाणपत्र आणण्यास सांगितले. तत्कालिन पुणे जिल्हाधिकारी रत्नाकर कुलकर्णी यांनी शासनाला कळविलेदेखील की, राष्ट्रीय  कीर्तीच्या डागर यांच्यासारख्या कलाकारांना असे प्रमाणपत्र आणण्यास सांगणे हा निव्वळ मूर्खपणा आहे. परंतु आज २०१० सालापर्यंत उस्ताद डागरांना शासनाची सदनिका प्राप्त झालेली नाही.
आयुष्याच्या संध्याकाळी, अजूनही ‘अनिकेत’ असलेला हा थोर कलाकार, दर दोन-तीन वर्षांनी भाडय़ाची घरे बदलत, पुण्यात वास्तव्य करून आहे.
उस्ताद डागरच नव्हेत तर कला, क्रीडा, शिल्प, नाटय़, साहित्य आणि जीवनातील विविध क्षेत्रात असे समर्पित आणि व्रतस्थ जीवन जगणाऱ्या व्यक्तींना, सरकारने राखीव कोटय़ातून सदनिकाच नव्हे तर वयाच्या साठीनंतर निदान त्यांचा चरितार्थ आणि वृद्धापकाळातील आजारांच्या औषधांवरील खर्च भागेल एवढे निवृत्ती वेतन, सन्मानपूर्वक त्यांच्या घरी पोहोचेल अशी व्यवस्था करावी.
समाजातील अशा श्रेष्ठ, ललामभूत कलाकारांना किंवा व्यक्तींना आर्थिक परावलंबित्व आणि आर्थिक याचकत्त्व पत्करावे लागणे ही कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी लांच्छनास्पद आहे.
समाज याचा विचार करेल का?
दूरदर्शनवरील नृत्य, नाटय़, संगीतावर आधारीत रिअॅलिटी शोजमधून निवडलेल्या गुणी कलाकारांना रोख व भेटवस्तूंमधून लाखो रुपये देण्याऐवजी, देशातील त्या त्या क्षेत्रातील ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध अशा ज्येष्ठ कलाकारांकडे शिकण्यासाठी कमीत-कमी पाच वर्षांची शिष्यवृत्ती दिल्यास, समाजातील अशा ज्येष्ठ गुणीजनांना आर्थिक स्वास्थ्य प्राप्त होईल. आपापल्या कलेतील नवी क्षितिजे गाठता येतील आणि त्याचबरोबर नव्या पिढीमध्ये, अभिजात कलांची मूलतत्त्वे संक्रमित होऊन, राष्ट्रीय संस्कृतीचं रक्षण, जतन, विकसन आणि संवर्धन होईल.
ज्यांच्या हातात संपत्ती, सत्ता, संस्था आणि जाहिरात क्षेत्र आहे, त्या सर्वानी एकत्र येऊन, व्यापक जाणीवेतून विचार व कृती केल्यास, हे सहजसाध्य आहे.
उस्ताद सईदुद्दिन गौरव समिती
अध्यक्ष- डॉ. घनश्याम बोरकर
चिटणीस- सुहास कबरे
कोषाध्यक्ष- केशव परांजपे
सदस्य- १) पद्मश्री सुरेश आमोणकर, गोवा
२) दीपक प्रभुदेसाई, गोवा
३) विनय करंदीकर, पुणे
४) लक्ष्मीकांत पारनेरकर, पुणे
५) माधवराव खाडिलकर, मुंबई
६) श्री. सुरेश तळवळकर, मुंबई
७) पद्मश्री डी. के. दातार, मुंबई
८) चिन्मय बोरकर, मुंबई