Friday, February 18, 2011

केसरबाई-४


अशाच आठवणी सांगताना त्यांनी मला सहज विचारले, " तू माझं गाणं पहिल्यांदा कुठे ऐकलंस ? मी काय कधी गणपतिउत्सवात नाय गायले . " आमची मुख्य श्रवणसाधना कुठे झाली त्याचा माईना बरोबर पत्ता कोणी दिला देव जाणे.
" मुझफराबाद हॉलात . एका लग्नात . "
" मुंबेकर शेणव्याचं लग्न असणार . त्या हालची तुला काय गोष्ट सांगू ," म्हणत त्यांनी गोष्ट सांगितली . माई गोष्ट सांगायला लागल्या की शर्वरी त्यांच्या चेहऱ्याकडे एकटक पाह्यचा .
त्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव पाहून म्हणायचा ,
" पुलदा , की शुंदर , की शुंदर ! "
" ह्या वेड्याला माझ्या चेहऱ्यात सुंदर काय दिसतं रे - तो फोटो पहा ." माईंच्या तरूणपणीचा एक फोटो तिथे भिंतीवर होता .
" ए , तसला पुतळा कर . म्हातारी करशील तर याद राख . " पुतळ्यासाठी पोज द्यायला बसतानासुध्दा मेफिलीचा थाट करून बसायच्या .
" चालवून घ्या . भागवून घ्या . "" ही भाषा मेफिलीतच नव्हे तर रोजच्या दिनचर्येतही चालू शकत नव्हती .
" ती मुझफराबाद हॉलची गोष्ट सांगा ना , " मी म्हटले .

माई तरूण होत्या त्या काळची ही गोष्ट . वझेबुवा , बर्कतुल्ला - कदाचित भास्कर - बुवांचीही - तालीम मिळाली होती . ही मुलगी पुढेमागे निश्चित नाव काढील असा लौकिक
होऊ लागला होता . ह्याच सुमाराला मुझफराबाद हॉलमध्ये या काळातल्या एका प्रख्यात गायिकेचे गाणे होते . ते गाणे खाजगी होते . ते ऐकायला केसरबाई गेल्या असताना कुणीतरी
सुरूवातीला त्यांनी गावे म्हणून आग्रह केला . केसरबाईंनी नम्रपणाने सांगितले की एवढ्या मोठ्या गायिकेच्या मेफिलीत मला गायला लावू नका. मी मूल आहे तिच्यापुढे. शेवटी खूप
आग्रह झाला. आणि सुरूवातीला केसरबाई गायल्या . तरूण वय , समोर ऐकणारी मंडळी मातबर , त्यात ती गायिका , तिचे चाहते . . . मनावर विलक्षण दडपण आलेले . तरीही "मला
त्या काळात जे येत होतं ते गायले . लोकांनीही कौतुक केलं . माझ्यामागून त्या बाईचं गाणं . मी उठल्यावर सगळ्यांना ऐकू जाईल इतक्या मोठ्याने त्या बाई म्हणाल्या , ` थोडा वेळ थांबा
इथे लागलेले सगळे बे - सूर हॉलच्या बाहेर जाऊ द्या . मग मी गाते . ' "
केसरबाईंनी ती रात्र रडून काढली . आणि त्या दिवशी ठरवले की ` एक दिवस अशी गाईन की ती बाई झाली होती की नाही याची कुणाला आठवण राहणार नाही . ' अल्लादियाखांसाहेब
हे त्या काळी संगीताच्या दुनियेतील प्रातःस्मरणीय नाव होते . भास्करबुवांसारखे प्रतिभासंपन्न गायक त्यांच्यापुढे नतमस्तक होत . खांसाहेब त्या काळी छत्रपती श्रीशाहूमहाराजांच्या
दरबारात कोल्हापूला . त्यांना मुंबईला येऊन राहणे शक्य नव्हते . पण शिकेन तर अल्लादियाखांसाहेबांपाशीच अशी जिद्द धरून केसरबाई बसल्या . आपल्या प्रथम पत्नीच्याच
मानाने केसरबाईंना वागवणाऱ्या गोपाळदासांनीही त्यांच्या ह्या प्रतिज्ञेमागली जिद्द ओळखली . मनात सापत्नभाव न बाळगता , कालिदासाच्या शब्दांत , ` प्रियसखी वृत्ती ' ने वागणाऱ्या गोपाळ - दासांच्या पत्नीनेही साथ दिली . केसरबाईंनी कोल्हापूरच्या छत्रपती श्रीशाहूमहाराजांचे बंधू कागलकरसरकार यांची भेट घेतली . कागलकरसरकार गाण्याचे खूप चाहते . त्यांनी त्या तरूण गायिकेला शाहूमहाराजांच्या पायांवर घातले.
धिप्पाड मनाचा तो राजा म्हणाला, "तुला काय हवं आहे ते सांग."
" मला तुमच्या दरबाराचे गायक अल्लादियाखांसाहेब गुरू म्हणून हवे आहेत."
महाराजांनी ` तथास्तु ' म्हणून अल्लादियाखांसाहेबांना केसरबाईंना गाणे शिकवायला मुंबईत जाऊन राहण्याची परवानगी दिली . दरबारी नोकरीचा अडसर काढून टाकला .
मूळच्या हिऱ्याला असे पेलू पाडलेल्या स्वरूपात भारतीय संगीताच्या दुनियेला केसरबाई लाभल्या , त्यामागे उत्तमम गुणांची तितकीच उत्तम पारख असलेल्या छत्रपती शाहूमहाराजांचा
वरदहस्त होता .
आणि इथून पुढे , केसरबाईच्याच शब्दांत सांगायचे म्हणजे , "माझा वनवास सुरू झाला .
पदरी तान्ही मुलगी , गळ्यात पूर्वीच्या गायनाचे संस्कार , मुळातला आवाज बारीक . पहिले आठनऊ महिने नुसता आवाज खोलायची मेहनत. अरे, घसा फुटायचा. तरीही मेहनतथांबता कामा नये. बरं, खांसाहेबांना मुंबईची हवा मानवली नाही की सांगलीला जाऊन राहायचं . तिथल्या सांभारे वेद्यांवर त्यांची श्रध्दा होती . मग मुलीला घेऊन मी सांगलीला बिऱ्हाड करायची . हाताखाली मदतीला कोण असलं तर असायचं, नसलं तर नसायचं. हवा मानवायची नाही . तरीही तालमीत खंड नाही. "
एक तर ह्या अत्रौली घराण्याचा गायकीचा आवाकाच मोठा . ह्या गायकीच्या वाटेला जाणाऱ्यांनी दहा वेळा विचार करावा . छातीचा भाता लोहाराच्या भात्यासारखा हवा . पुरे
आवर्तन - तेही संथ लयीचेच - ते न तुटलेल्या सुरांनी भरत भरत समेवर यायचे . तेही धापा टाकत नव्हे . निघताना ज्या उत्साहाने निघायचे त्याच उत्साहाने परतीचा मुक्काम गाठायचा .
इथे कुसरीला किंवा कल्पनेच्या वावड्या उडवायला वावच नाही . स्वरलीलेची प्रत्येक क्रिया शास्त्रकाट्याच्या कसोटीवर घासून - तपासून घेतलेली . नसता लाडिकपणा केली की ते विजोडच
दिसायचे . असली ही गायकी आणि ती शिकवणारा महान पण असमाधानी गुरू . नुसता शिकवणीचा रतीब घालणारा नव्हे . स्वतः मेहनतीचे पहाड फोडलेला . ध्रुपदगायकीची सुंदर
वेशिष्ट्ये ख्यालात खलून ख्यालगायकीचे नवीन रयायन करणारा तोही महान कलावंत. चक्रव्यूह मांडल्यासारखे ते भारतीय संगीतातल्याचक्राकार गतीचे सतत भान ठेवून चालणारे
गाणे . आलाप असो वा तान , गतीची पध्दत चक्राकार . सुरांची जाडी गिरणीतल्या सुताच्या नंबरासारखी . ज्या नंबराचे माप घेऊन निघायचे तो तिन्ही सप्तकांत कसा कायम ठेवावा लागायचा ते केसरबाईंच्या गाण्यातून दिसायचे . मऊपणातही कुठे पोकळ फुसकेपणाला वाव नाही . गाण्यात कुठे फोफसेपणा नाही की किरटे चिरचिरेपण नाही . आक्रमकतेच्या नावाखाली आक्रस्ताळेपणा नाही की थिल्लर विभ्रम नाही . लयकारीच्या नावाखाली हापटाहापटी नाही . लयकारीतले धक्केसुध्दा कसे लाटांच्या हेलकाव्यांसारखे , टक्करल्यासारखे नव्हते . आणि सारे काही आखीवरेखीव असूनही अभिजाततेचल्या त्या चिरंतन ताजेपणाने दीप्तिमान , ग्रीक शिल्पासारखे . - ही सारी वेशिष्ट्ये आत्मसात करण्याची केसरबाईंची साधना किती कठोर असेल याची क्लपनाही करणे कठीण आहे .

No comments: