रंगभूमी अडचणीत असतानाच्या काळात जयमालाबाईंनी रंगभूमीवरच पाऊल टाकले. नंतर
संगीत नाटक हेच आपले जीवनध्येय आहे आणि त्यासाठी होणाऱ्या कोणत्याही
त्रासातून आपल्याला आनंदच मिळणार आहे, याची खात्री त्यांनी पुढील पिढीला
दिली.
जयमालाबाई शिलेदार यांचा जन्मच संगीत नाटकासाठी झाला होता. जन्म झाला तोही याच संगीत नाटकाच्या परंपरेत मुरलेल्या नारायण जाधव यांच्या घरात. संगीत नाटके तेव्हा लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर होती. चित्रपटाचे आगमन दादासाहेब फाळके यांनी करवले होते, पण त्याला बोलते करता आलेले नव्हते. समाजाला उच्च अभिरुचीचे संगीत काय असते, याचा अंदाज नाटय़संगीतामुळे आला होता आणि अभिजात संगीतही राजे आणि सम्राटांच्या दरबारातून समाजाच्या पुढय़ात येऊन ठेपले होते. जयमालाबाईंना जन्मल्यापासूनच ज्या नाटय़संगीताचे बाळकडू मिळाले, तेच आपल्या आयुष्याचे ईप्सित आणि सुखनिधानही असेल, याचा अंदाज येण्यासाठीही फार काळ जावा लागला नाही. संगीत नाटकांचा जन्म झाला, तेव्हा म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस, नाटकातून स्त्रीला भूमिका करण्याची परवानगी समाजाने दिलेली नव्हती. एवढेच काय अशी नाटके पाहायलाही बराच काळ बंदी होती. सामाजिक क्षेत्रातील स्त्रीपुरुष भेदाभेदाच्या या साखळय़ा तोडून संगीत आणि नाटकही बाहेर पडायला बराच अवकाश जावा लागला. पण जयमालाबाईंच्या जन्मापर्यंत नाटकांमधून उच्च कुलातील मुलींना भूमिका करू देण्यास समाज राजी झाला होता. ती एक सांस्कृतिक क्रांतीच होती. त्यामुळे वयाच्या सोळाव्या वर्षांत पदार्पण करताना जयमालाबाईंनी आपल्या सुरेल गात्या गळय़ाला रंगभूमीला अर्पण करून टाकण्याचा निर्णय घेऊन टाकला. आयुष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे याचा कोणताही विचार न करता त्यांनी घेतलेला हा निर्णय अगदी शेवटच्या श्वासापर्यंत निभावण्याची हिंमत त्यांच्यामध्ये होती.
मोठाले डोळे, कपाळावर रुपयाएवढे कुंकू, हसतमुख चेहरा, अंगावर मोजकेच पण ठसठशीतपणे दिसतील असे दागिने, नीटनेटकेपणाने नेसलेली साडी आणि बोलताना होणारे मधुर उच्चार, रंगभूमीसाठी निश्चितच पुरेसे होते. पण तेवढय़ानेच भागण्यासारखेही नव्हते. संगीत रंगभूमीवर भूमिका करण्यासाठी या सगळय़ाच्या जोडीला, खरेतर काकणभर अधिकच, गळय़ात संगीत आवश्यक असते. जयमालाबाईंकडे तेही पुरेपूर होते. पदार्पणातच गोविंदराव टेंबे यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न कलावंताचे मार्गदर्शन मिळाल्याने चिंतूबुवा गुरव, गणपतराव बोडस यांच्यासारख्या दिग्गजांची शाबासकी मिळाली खरी, पण तोपर्यंत काळ बदलला होता. १९३१ मधील रुपेरी दुनियेच्या ‘बोलक्या’ अवतरणानंतर संगीत रंगभूमीचे वैभव ओसरायला लागले होते आणि तो सुवर्णकाळही पडद्याआड जाऊ लागला होता. महाराष्ट्राने जगाच्या संगीताला देणगी दिलेल्या या अवीट अशा संगीतप्रकाराची लोकप्रियता कमी झाली नसली तरीही रंगभूमी मात्र संकटात सापडली होती. जयमालाबाईंनी तशाही स्थितीत रंगभूमीवरच पाऊल ठेवण्याचे ठरवले. त्यानंतर आयुष्यात येणाऱ्या अपार कष्टांची चाहूल नसतानाही त्यांनी हा निर्णय घेतला, तेव्हा ‘रामजोशी’ या चित्रपटातून आपल्या अभिनयकौशल्याने सगळय़ांची मने जिंकून घेतलेल्या तेव्हाच्या तरुण आणि होतकरू जयराम शिलेदारांशी त्यांची भेटही व्हायची होती. जयराम यांचे जयमालाबाईंच्या आयुष्यातील आगमन हा केवळ त्या दोघांच्या आयुष्यातील सुवर्णक्षण नव्हता. त्यामुळे अडचणीत आलेल्या संगीत रंगभूमीला जीवदान मिळणार होते. झालेही तसेच. वयाच्या तेविसाव्या वर्षी जयमालाबाई आणि जयराम शिलेदार यांनी ‘मराठी रंगभूमी’ या संगीत नाटकाला वाहिलेल्या ‘नाटक कंपनी’ची स्थापना केली. लगेचच त्या दोघांनी रंगभूमीबरोबरच आपले आयुष्यही एकमेकांना अर्पून टाकण्याचे ठरवले. ज्या जिद्दीने जयमालाबाईंनी संगीत रंगभूमीवर पाऊल टाकले होते, ती जिद्द जागती ठेवण्यासाठी अचानकपणे आयुष्यात आलेल्या जयराम यांनी जी साथसंगत केली, त्याने मराठी संगीत रंगभूमीवर एक नवा दीपत्कार घडला.
चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे नाटक हा कलाप्रकारच जिवंत राहतो की नाही, अशी परिस्थिती असताना छोटा गंधर्वासारखा एक अतिशय गोड गळय़ाचा कलावंत ती कला जिवंत ठेवण्यासाठी झटत होता. चित्रपटाच्या आगमनानंतर बालगंधर्वानाही प्रभात चित्रच्या ‘संत एकनाथ’ या चित्रपटात भूमिका करण्याचा मोह आवरता आला नव्हता. चित्रपटाच्या या दुनियेत आपले मन रमणार नाही, याची पुरेपूर खात्री असतानाही रंगभूमीच्या पुनरुज्जीवनासाठी खुद्द बालगंधर्वानी केलेले अनेक प्रयत्नही रसिकांच्या पचनी पडत नव्हते. चित्रपटाकडे वळलेल्या रसिकांना परत वळवण्यासाठी छोटा गंधर्वानी जे प्रयत्न केले, त्याला तोड नाही. पण त्यांच्या प्रयत्नांनाही पडणाऱ्या मर्यादा ओलांडून पुढे जाण्याची हिंमत शिलेदार पती-पत्नीने दाखवली आणि आजपर्यंत ही रंगभूमी टिकवून ठेवण्यात अतिशय मोलाचा वाटा उचलला. एकाच वेळी संसार, गायन, अभिनय, संस्थेची जबाबदारी, नाटकांचे गावोगावीचे दौरे अशा अनेक पातळय़ांवर लढाई करणाऱ्या जयमालाबाईंनी हे सारे श्रम आपल्या चेहऱ्यावर तसूभरही उमटू न देण्याची खबरदारी घेतली. संगीत रंगभूमी हाच आपला धर्म आणि तोच आपला ध्यास, असे जीवन जगताना येणाऱ्या अनंत अडचणींवर मात करण्यासाठी मन फारच खंबीर लागते. जयमालाबाईंना जयरामांच्या मदतीने तसे ते ठेवता आले. जोडीला कन्या कीर्ती आणि दीप्ती यांची सांगीतिक कारकीर्द फुलवत ठेवण्याचीही जबाबदारी या पालकांनी अतिशय आनंदाने स्वीकारली. शिलेदारांचे सारे कुटुंबच संगीत रंगभूमीसाठी आपले आयुष्य अर्पण करायला तयार झाले, याचे महत्त्वाचे कारण निष्ठा हे होते. ती जराही ढळू न देण्यासाठीचा निग्रह त्यांच्यापाशी होता. बालगंधर्वानी नाटय़संगीताला अभिजाततेच्या भरजरी वस्त्रांनी झळाळून टाकले होते. नाटय़संगीतातील तो एक मानदंड झाला होता आणि त्यालाही आपल्या प्रतिभेने नवे आव्हान देत मा. दीनानाथ आणि केशवराव भोसले यांच्यासारख्या कलावंतांनी ही रंगभूमी उजळून टाकली होती. दंतकथांनी भरलेल्या आणि त्या काळातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात भरून राहिलेल्या या नाटकांनी तेव्हाचे कलाजीवन समृद्ध केले होते.
जयमालाबाईंनी ही समृद्धी आणखी वाढवली आणि आपल्या कलागुणांनी तिला स्वराभिनयाच्या दागिन्यांनी नखशिखान्त मढवले. नाटय़संगीताच्या बरोबरीने अभिजात संगीताच्या क्षेत्रात आवडीने मुशाफिरी करत त्यांनी अखेपर्यंत आपला गळा गाता ठेवला. मराठी रंगभूमी या संस्थेतर्फे संगीत रंगभूमीला पुन्हा जीवदान देणाऱ्या शिलेदारांनी चित्रपट, दूरचित्रवाणी आणि त्यानंतर आलेल्या असंख्य नव्या आकर्षणांच्या मोहजालातही संगीत नाटक रसरशीतपणे जिवंत ठेवले. कीर्ती शिलेदार यांनी त्यात घातलेली भर अधिकच मोलाची. नव्या नाटकांची निर्मिती करत असताना परंपरेने आलेल्या नाटकांना नवा रंग देण्यासाठी हे सारे कुटुंब आयुष्यभर झटले. पुरस्कार आणि मानमरातब वाटय़ाला येण्यासाठी आतासारखे माध्यमांचे मोहजाल नसतानाच्या काळात जयमालाबाईंनी अतिशय खडतरपणे आयुष्य व्यतीत केले. पण या साऱ्या वेदनांचा, कष्टाचा खासगीत किंवा जाहीरपणे उच्चारही न करण्याची अभिजातता त्यांच्यापाशी होती. संगीत नाटक हेच आपले जीवनध्येय आहे आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या त्रासातून आपल्याला मनोमन आनंदच मिळणार आहे, याची खात्री जयमालाबाईंनी पुढील पिढीला दिली आहे. कलावंताच्या चेहऱ्यावरील रंग उतरले की उरते ते वास्तव. त्याला सामोरे जाण्याचे धैर्यही जयमालाबाईंनी अभिनयातून आणि संगीतातूनच मिळवले. ज्यासाठी आपण जन्मलो, ते कार्य अखेपर्यंत करत राहता येण्याचे भाग्य त्यांना मिळाले. त्यांचे निधन केवळ शोकात्म नाही, तर नवी जिद्द निर्माण करणारे आहे!
=======================================================================
सदर लेख शुक्रवार, ९ ऑगस्ट २०१३ च्या लोकसत्ता मधला आहे. लोकसत्ताचे आभार