माझ्या मना बन दगड
हा रस्ता अटळ आहे!
अन्नाशिवाय, कपडय़ाशिवाय,
ज्ञानाशिवाय; मानाशिवाय.
कुडकुडणारे हे जीव
पाहू नको! डोळे शीव!
नको पाहू जिणे भकास;
ऐन रात्री होतील भास;
छातीमध्ये अडेल श्वास.
विसर यांना, दाब कढ;
माझ्या मना बन दगड!
हा रस्ता अटळ आहे!
ऐकू नको हा आक्रोश,
तुझ्या गळय़ाला पडेल शोष.
कानांवरती हात धर,
त्यातूनही येतील स्वर.
म्हणून म्हणतो ओत शिसे;
संभाळ, संभाळ, लागेल पिसे!
रडणाऱ्या, रडशील किती?
झुरणाऱ्या, झुरशील किती?
पिचणाऱ्या, पिचशील किती?
ऐकू नको असला टाहो;
माझ्या मना दगड हो!
हा रस्ता अटळ आहे!
येथेच असतात निशाचर
जागोजाग रस्त्यावर.
असतात नाचत काळोखात;
हसतात विचकून काळे दात;
आणि म्हणतात, ‘‘कर िहमत,
आत्मा वीक, उचल किंमत!
माणूस मिथ्या, सोने सत्य;
स्मरा त्याला, स्मरा नित्य.’’
भिशील ऐकून असले वेद;
बन दगड, नको खेद!
बन दगड आजपासून;
काय अडेल तुझ्यावाचून;
गालावरचे खारे पाणी
पिऊन काय जगेल कोणी?
काय तुझे हे नि:श्वास
मरणाऱ्यांना देतील श्वास?
आणिक दु:ख छातीफोडे
देईल त्यांना सुख थोडे?
आहे दु:ख तेच फार;
माझ्या मना कर विचार!
कर विचार : हस रगड;
माझ्या मना बन दगड!
हा रस्ता अटळ आहे!
अटळ आहे घाण सारी;
अटळ आहे ही शिसारी.
एक वेळ अशी येईल
घाणीचेच खत होईल!
अन्यायाची सारी शिते
उठतील पुन्हा; होतील भुते.
या सोन्याचे बनतील सूळ!
सुळी जाईल सारे कूळ.
ऐक टापा! ऐक आवाज!
लाल धूळ उडते आज;
याच्यामागून येईल स्वार;
या दगडावर लावील धार!
इतके यश तुला रगड;
माझ्या मना बन दगड!
पण काय शोधत आहे हे ही कळत नाही कधी कधी...थोर अश्या बुवा,गवयांच्या गाण्यानं / आयुष्याच्या कथांनी डोळ्यात पाणी येणारा मी...एकदा बसलो की गाण्याच्या रियाझांवरुन उठुच नये असं वाटणारा मी...मी इथं कशाला आलोय, काय करायचयं मला?? कधी कधी आयुष्य इतकं छोटं वाटतं तर कधी ते अथांग वाटतं ...ह्या सगळ्या प्रश्नांच उत्तर मी गाण्यात शोधायचा प्रयत्न करतो आहे...अखंड...
Monday, March 15, 2010
घेता
देणाऱ्याने देत जावे;
घेणाऱ्याने घेत जावे.
हिरव्यापिवळय़ा माळावरून
हिरवीपिवळी शाल घ्यावी;
सहय़ाद्रीच्या कडय़ाकडून
छातीसाठी ढाल घ्यावी.
वेडय़ापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे;
रक्तामधल्या प्रश्नांसाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे.
उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी;
भरलेल्याशा भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी.
देणाऱ्याने देत जावे;
घेणाऱ्याने घेत जावे;
घेता घेता एक दिवस
देणाऱ्याचे हात घ्यावे!
देणाऱ्याने देत जावे;
घेणाऱ्याने घेत जावे.
हिरव्यापिवळय़ा माळावरून
हिरवीपिवळी शाल घ्यावी;
सहय़ाद्रीच्या कडय़ाकडून
छातीसाठी ढाल घ्यावी.
वेडय़ापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे;
रक्तामधल्या प्रश्नांसाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे.
उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी;
भरलेल्याशा भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी.
देणाऱ्याने देत जावे;
घेणाऱ्याने घेत जावे;
घेता घेता एक दिवस
देणाऱ्याचे हात घ्यावे!
Subscribe to:
Posts (Atom)