Monday, January 23, 2012

रसिकवंत!


ज्यांच्याशी थेट जाऊन बोलायची जराही भीती वाटू नये असे भीमसेन होते. सगळ्या समाजाशी भीमसेन जोशी यांचा जो ‘कनेक्ट’ होता, तो त्यांच्या आधीच्या पिढीतल्या कलावंतांकडे जवळजवळ नव्हताच. भारतीय अभिजात संगीत घरोघरी पोहोचवत असताना त्या घरातल्या प्रत्येकाला कलावंत आणि कला याबद्दल आत्मीयता वाटेल, यासाठी त्यांनी केलेलं कार्य म्हणूनच अधोरेखित करायला हवं. २४ जानेवारी २०११.
वेळ : रात्री साडेअकरा- बाराची.
भीमसेनजींच्या घरात दिवसभर हजारो माणसांनी अंत्यदर्शनासाठी रीघ लावली होती. पण रात्र तशी सुनी सुनी होती. घरात एखादा दिवा जळत होता. रात्रीच्या अशावेळी कार्यालयातून घरी जाताना त्यांच्या घरावरून जावंसं वाटलं. तिथं पोहोचलो, तर दाराशी एक मोठी गाडी येऊन उभी राहिलेली. पटापटा त्यातून सात-आठ माणसं उतरली. घर बंद होतं. दाराशीच उभी राहिली. सगळ्यांनी हात जोडले आणि नमस्कार केला. त्यातल्या काहीजणांना अश्रू आवरत नव्हते आणि हमसाहमशी रडणंही! दिवसभर भीमसेनांचं शेवटचं दर्शन घेणाऱ्यांपैकी अनेकांचे चेहरे रडून थकलेले दिसत होते. त्यातल्या कितीजणांना पंडितजी प्रत्यक्षात भेटले असतील, त्यांच्याशी गप्पा मारल्या असतील, कोण जाणे. ज्यांच्या वाटय़ाला पंडितजींच्या आयुष्यातला एखादा क्षणही आला, त्यांचं जगण्ां भीमसेनांशी जोडलं गेलं होतं. पण जे त्यांना भेटलेही नाहीत, त्यांच्याही मनातली भावना जणू आपल्या घरातला, अगदी हृदयाजवळचा कुणी गेल्याची.
भीमसेनांचा समाजाशी असलेला हा जो संबंध होता, तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होता. पण भारतीय अभिजात संगीतासाठी त्याने एक अतिशय वेगळं परिमाण मिळवून दिलं. कोणताही कलावंत बेटावर राहून कला सादर करू शकत नाही. निदान परफॉर्मिंग आर्टमध्ये तर ते अशक्यच वाटावं. तरीही भारतीय अभिजात संगीताच्या परंपरेत कलावंतांचं समाजाशी असलेलं नातं नाटकातल्या नटांएवढंच होतं. नाटक संपलं, रंग उतरले, की जो- तो कलाकार आपापल्या विश्वात आणि प्रेक्षकही त्याला त्यापलीकडे आपल्या आयुष्यात वेगळं स्थान देण्याच्या भानगडीत न पडणारे. कलावंत आणि रसिक यांचा हा संबंध केवळ नाटय़गृहापुरताच. संगीताच्या बाबतीत तर गेल्या काही शतकांमध्ये भारतात जेवढय़ा दंतकथा निर्माण झाल्या असतील, तेवढय़ा अन्य कोणत्याच कलेच्या वाटय़ाला आल्या नसतील. गायक जरासे तिरसट असायचे. सहजी कुणाला भेटायचे वगैरे नाहीत. आणि भेटले, तरी फार समाधान वाटेल अशी स्थिती नाही. ते सारे आपल्याच धुनीत.. तंद्रीत. आपला संबंध फक्त कलेशी. तीच आपलं सर्वस्व. बाकी सारं क्षणभंगुर- अशी ती भावना होती.
स्वातंत्र्यापूर्वीपर्यंत अशा दिग्गजांची गाणी ऐकायला मिळणं दुरापास्त असायचं. ती सर्वाना ऐकता येतील, अशी शक्यता नसे. एकतर ती दरबारात होत. तिथं सामान्यांना प्रवेशच नसे. ‘अदाकारीचं गाणं’ ऐकण्याची ठिकाणं सर्वसामान्यांना जाता येतील अशी नसत. त्यामुळे भुकेल्या रसिकांना कलावंतांचं दर्शनही दुर्लभ असे. त्यातून त्या काळातील अनेक कलाकार स्वभावानं विक्षिप्त असत. त्यांच्या शिष्यांनाही त्यांची भीती वाटावी, असा स्वभाव. रसिकांची तर बातच सोडा. पण त्यांच्याजवळ असलेली प्रतिभा आणि सर्जनशीलता रसिकांना वेड लावणारी असे. मैफलीत मंचावर एकदा बैठक घातली, की मग तासन् तास आपला गळा सहजगतीने फिरवत ठेवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असे. समोरच्यांना दीपवून टाकावं, या ईष्र्येनं जे गाणं व्हायचं, ते समोर कुणी इतर घराण्याचा कलावंत असेल तरच. आपण बरं की आपली कला बरी, अशी ही समजूत बराच काळ होती.
प्रत्यक्ष मैफलीशिवाय रसिकांपर्यंत जाण्याचं अन्य कोणतंच माध्यम त्याकाळी अस्तित्वात नसल्यानं विसाव्या शतकापर्यंत कलावंत आणि रसिक यांचं नातं दूरचंच असे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस संगीत नाटक निर्माण झालं आणि हे अभिजात संगीत वेगळ्या रूपात रसिकांसमोर जाऊ लागलं. त्या नाटकांमध्ये नट होण्यासाठी अभिनय येण्यापेक्षा गाणं येणं आवश्यक असे. बालगंधर्वासारख्या नटाला त्या काळात जी अफाट लोकप्रियता मिळाली, ती त्यांच्यातील अतिशय मधुर आणि अभिजात गायकीमुळे. महाराष्ट्रात पहिल्यांदा ‘हिरोवर्शिप’ मिळणारा कलावंत म्हणजे बालगंधर्व. विसाव्या शतकात ध्वनिमुद्रणाचं तंत्रज्ञान विकसित झालं आणि गाणं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची संधी निर्माण झाली. परंतु हे तंत्रज्ञान बाल्यावस्थेत आणि गाणं परिपक्व अवस्थेत- अशी काहीशी स्थिती. त्यामुळे बऱ्याच दिग्गज कलावंतांनी आपणहून ध्वनिमुद्रणाकडे पाठ फिरवली. गाणं ऐकवायचं तर ते मैफलीतच, असा जणू चंगच बांधला त्यांनी. मात्र, तंत्रज्ञानानं (नभोवाणीचं भारतातील आगमनही साधारण त्याच सुमाराचं!) घराण्यांचा कोट हळूहळू गळून पडायला लागला होता. ब्रिटिशांच्या राजवटीचाही तो परिणाम होताच. मुक्तता आणि स्वातंत्र्य या मूल्यांचा उद्घोष होण्याचा काळ होता तो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अभिजात संगीताच्या प्रांतात फारच उलथापालथी झाल्या. राजाश्रय संपला होता. लोकाश्रय मिळेल, अशी आशा होती. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही फ्रेंच राज्यक्रांतीमधली त्रिसूत्री वेगवेगळ्या रूपांत स्पष्ट होऊ लागली होती.
.. अशा काळात भीमसेनांचा संगीताच्या क्षितीजावर उदय झाला. पारंपरिक घराण्याची चौकट न मोडता त्यात नवनवे प्रयोग करण्याची अचंबित करणारी सर्जनशीलता त्यांच्याकडे असल्यानं आणि भवतालचं वातावरणही अशा प्रयोगांना अनुकूल होण्याची शक्यता असल्यानं भीमसेनांनी एका नव्या प्रयोगाला सुरुवात केली. ‘सा रे ग म’ कंपनीने प्रकाशित केलेल्या ध्वनिमुद्रणाच्या संचामध्ये पंडितजींचे अगदी सुरुवातीचे ध्वनिमुद्रण आहे. त्यात त्यांच्या गाण्यावर सवाई गंधर्वाची इतकी छाप आहे, की क्षणभर विचार करावा. पण त्या गाण्यातही त्यांनी आपलं वेगळेपण शोधण्याचा केलेला प्रयत्न लक्षात राहतो. नंतर ते गाणं अधिकाधिक वेगळं होत गेलं. त्यात अनेक हिऱ्या-मोत्यांची भर पडली. ते श्रीमंत झालं. गायनकलेचा समाजाशी जवळचा नातेसंबंध जोडण्याचं व्रतच जणू पंडितजींनी घेतलं होतं. हे सगळं जाणूनबुजून, बुद्धिपुरस्सर होतं की नाही, ठाऊक नाही. पण गाणं अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचं, आणि असं करताना त्याचा दर्जा कुठंही पातळ होऊ द्यायचा नाही, असं हे व्रत होतं.
चित्रपट बोलायला, नव्हे गायला लागूनही बराच काळ झाला होता आणि ललित संगीतातील भावगीतासारखे प्रयोगही यशस्वी होत होते. अशा काळात अभिजात संगीत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं प्रचंड मोठं काम भीमसेनांनी केलं. विष्णू दिगंबर पलुस्करांनी त्याआधीच्या काळात भारतीय संगीत सामान्यांपर्यंत नेण्यासाठी जे वेगवेगळे प्रयोग केले, त्याच्या पुढची पायरी भीमसेनांनी गाठली. ललित संगीत लोकप्रियतेच्या शिखरावर जात असतानाच्या काळात उत्तम अभिजात संगीताची गोडी लोकांना लावण्यासाठी भीमसेनजींनी देशभर जो प्रवास केला, तो आजच्या काळातही चकित करायला लावणारा आहे. वाहनांची सोय नाही, राहण्याची सुविधा नाही, खाण्यापिण्याची खात्री नाही, बिदागी मिळण्याची शाश्वती नाही, अशा कठीण परिस्थितीत भीमसेनांनी गाणं सगळीकडे पोहोचवण्यासाठी जे काही केलं, त्याला तोड नाही. गाणं असं करायचं, की पुन्हा निमंत्रण मिळायला हवं. मग तिथं शे-दोनशे रसिक असले म्हणून काही बिघडत नाही. त्या प्रत्येकाशी आपल्या गाण्यानं नातं जोडण्याची जी हातोटी त्यांना प्राप्त झाली होती, ती दैवी म्हणावी अशीच.
गेल्या वर्षभरात भीमसेनजींचं स्मरण करणारे अनेक कार्यक्रम देशात अनेक ठिकाणी झाले. तिथल्या प्रत्येकाला या कलावंताबद्दल कमालीची आपुलकी होती.. जिव्हाळा होता.. प्रेम होतं. हा कलावंत आपल्या कलेतून थेट आपल्या हृदयात पोहोचतो, याचं आश्चर्य वाटावं असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. ज्यांच्याशी थेट जाऊन बोलायची जराही भीती वाटू नये, असं. सगळ्या समाजाशी त्यांचा हा जो ‘कनेक्ट’ होता, तो त्यांच्या आधीच्या पिढीतल्या कलावंतांकडे जवळजवळ नव्हताच.
किराणा घराण्याचे अध्वर्यु अब्दुल करीम खाँसाहेबांबद्दल एक दंतकथा सांगितली जाते, की ते जेव्हा बडोद्याहून म्हैसूरच्या दरबारात राजगायक म्हणून रुजू होण्यासाठी गेले, तेव्हा तिथं त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली होती. भीमसेनजींना हाच मान भारतात सगळ्या प्रांतांत सतत मिळत राहिला. त्यांच्या गाण्याचं नाणं इतकं खणखणीत होतं, की कुणाशी लांगुलचालन करण्याची गरज त्यांना पडली नाही. त्यांचा स्वभावही तसा नव्हता. तरीही समोरच्या प्रत्येकाबद्दल मनात कळवळा असणारा हा एक वेगळाच कलावंत होता. भीमसेनांना देशात आणि जगभरात एक श्रेष्ठ कलावंत म्हणून भरभरून लौकिक मिळाला. पण त्याहीपेक्षा त्यांना कोटय़वधींच्या हृदयात जे स्थान मिळालं, ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अलौकिकाची झळाळी देणारं होतं. त्यांच्या निधनानंतरच्या काळात तर हे अधिकच जाणवलं. कलावंत म्हणून भारतीय अभिजात संगीत घरोघरी पोहोचवत असताना त्या घरातल्या प्रत्येकाला कलावंत आणि कला याबद्दल आत्मीयता वाटेल, यासाठी त्यांनी केलेलं कार्य म्हणूनच अधोरेखित करायला हवं. हजारो रसिकांना ते जाऊन वर्ष झालं, तरीही त्यांचं स्मरण व्याकुळ करतं, हे अचंबित करणारं आहे आणि भीमसेनांच्या कर्तृत्वाची झळाळी अधिक उजळवणारंही आहे.
=======================================================================
सदर लेख बुधवार, सोमवार, रविवार २२ जानेवारी २०१२ च्या लोकसत्ताच्या 'लेख' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.