Friday, February 18, 2011

केसरबाई-१०

मी त्यांचे शेवटले गाणे 1966 साली ऐकले. त्यांचीही मला वाटते ही शेवटलीच जाहीर मैफिल . तो प्रंसगही एक पर्व संपल्याचे सुचवणाराच होता . पेडर रोडवर श्री. भाऊसाहेब आपट्यांचा प्रासादतुल्य बंगला होता. आपट्यांच्या मुलीवर माईंचा खूप जीव. क्रिकेटर माधव आपटेची ही बहीण. ह्या आपट्यांच्या बंगल्याच्या जागी आता अनेक दुमजी ` वुडलँड्रस अपार्टमेंट ' उभे राहणार होते. मूळ वास्तूला कृतज्ञतेने निरोप देण्याचाच जणू काय तो प्रसंग होता.
जुन्या मुंबईतील एक जुनी वास्तु दिवसा - दोन दिसृवसांत दृष्टीआड होणार होती. पुरातन असूनही सतेज राहिलेला तो वृध्द प्रासाद आणि वार्धक्यातही सुरांची तेजस्विता न गमावलेली ही वृद्धगानसम्राज्ञी. वाड्याला वास्तुपुरूष असतात अशी जुन्या लोकांची एक श्रध्दा आहे . त्या वाड्याच्या वास्तुपुरूषालाही असल्या तपःपूत सुरांनी बांधलेली आपली उत्तरपूजा आवडली असेल . त्या गाण्याला मुंबईतल्या नामवंत गायक - गायिकांप्रमाणे , सत्येनभाईसारख्या केसरबाईंची गाणी ऐकण्याचा रेकॉर्ड मोडणाऱ्या रसिकापासून अनेक आमंत्रित रसिकांची हजेरी होती. शिवाय अनेक अनाहूत. त्या प्रशस्त हॉलमध्ये , जिन्यात, खालच्या अंगणात ही गर्दी . कुणीतरी आणून मायक्रोफोन ठेवला.
" हा उचला आधी. "" बाईंनी हुकूम दिला . त्यांना टेपरेकॉर्डिंगची शंका आली होती.
" माझं गाणं ऐकायचं असेल तर माझं गाणं ऐकण्याचे कायदे पाळून ऐका." हे त्यांनी कुणाचाही मुलाहिजा न बाळगता आयुष्यभर सांगितले होते . त्यांची त्या सांगतील ती बिदागी देऊन गाणी करणारेही `माझ्या गाण्याला अमकेतमके दिसता कामा नयेत. ' ही त्यांची अटदेखील मान्य करीत असत असे म्हणतात. खरेखोटे देव जाणे. पण केसरबाईंनी संगीतात असे काही विलक्षण स्थान मिळवले होते की , माझ्या गाण्याला सर्व पुरूषांनी डोक्याला टोपी किंवा पगडी घालूनच आले पाहिजे अशी अट त्यांनी घातली असती तरीही ती मान्य झाली असती . हे का होऊ शकले याला माझ्यापाशी उत्तर नाही . सगळ्याच गोष्टींना तर्कसंगती लावून उत्तरे सापडत नसतात . मायक्रोफोनचा प्रकार त्यांतलाच .
" मायक्रोफोन असू द्या. खाली गर्दी आहे . ऐकू जाणार नाही."
" ऐकू जाणार नाही ? खाली काय बाजार भरलाय ? माझं गाणं कुठपर्यंत ऐकू जातं ते मला बरोबर ठाऊक आहे. हा मायक्रोफोन माझा आवाज खातो. उचला. "
रात्री एक वाजेपर्यंत गाणे झाले. माणसे त्या सुरांना खिळून बसली होती . वार्धक्याचा त्या गळ्याला आणि सुरांना जरा कुठे स्पर्श झाला नव्हता. आवर्तना - आवर्तनाला प्रदक्षिणा घालून येणारी तशीच अखंड तान. श्रीपाद नागेशकर तबल्याला होते . मधूनच एक सुरेल तुकडा लावायची त्यांनी हिंमत केली. जागच्या जागी मी घाबरलो होतो. पण तानेच्या योग्य अंदाजाने आलेल्या त्या तुकड्यानंतर त्यांनी श्रीपादाकडे कौतुकाने पाहिले त्यात श्रीपादाला आपण शिकलेल्या विद्येचे चीज झाल्यासारखे वाटले असेल . त्या मेफिलीत केसरबाईंना पुष्पहार देण्याचा मान मला मिळाला.
"हा . कर तुझं भाषण. "" केसरबाईंनी तेवढ्यात मला चिमटा काढला . त्या दिवशी केसरबाईंच्या गाण्यातल्या त्या वाहत्या प्रकाशमान धवलतेला उद्देशून मी म्हणालो होतो की, " अल्लादियाखांसाहेबांना बॅरिस्टर जयकरांनी. भारतीय संगीताचे
गौरीशंकर म्हटलं होतं. संगीतातल्या त्या गौरीशंकराच्या कृपेने आम्हांला लाभलेल्या सुरांच्या धवलगंगेत आमची मनं न्हाऊन निघाली. - तेव्हा पहिलं वंदन अल्लादियाखांसाहेबांना आणि दुसरं केसरबाईंना."

गणेशचतृर्थीच्या दिवशी केसरबाई गेल्या. 13 जुले 1893 साली गोव्यातल्या केरी नावाच्या सुदंर खेड्यात त्यांचा जन्म झाला होता. गोव्याच्या मातीने भारतीय संगीताला अर्पण केलेल्या देण्यांतले हे फार मोठया मोलाचे देणे. ज्या मुबंईनगरीला त्यांच्या सुरांचे स्नान घडले होते त्या मुंबईतल्या दादरच्या समुद्रतीरावर त्यांच्या पार्थिव देहावर ऋषिपंचमीच्या दिवशी अग्निसंस्कार झाला. भारतीय संगीतातल्या ऋषींचे ऋण आजन्म संगीतव्रती फेडणाऱ्या केसरबाईसारख्या गानतपस्विनीचा ऋषींच्या मालिकेतच कृतज्ञतेने अंतर्भाव करायला हवा.
त्यांच्या निधनाची वार्ता रात्री आठच्या सुमाराला मुंबईहून त्यांच्या नातवाने मला फोनवरून सांगितली. सात - सव्वासाताच्या सुमाराला त्या अलौकिक दमश्वासातला शेवटला श्वास टाकून इथली मेफिल केसरबाईंनी संपवली होती. माझा चेहरा उतरलेला पाहून मला भेटायला आलेला माझा एक मित्र म्हणाला, " काय झालं ? "
मनात म्हणालो : " एका तेजःपुजं स्वराचा अस्त. "
त्याला सांगितलं, " केसरबाई गेल्या."

No comments: