पण काय शोधत आहे हे ही कळत नाही कधी कधी...थोर अश्या बुवा,गवयांच्या गाण्यानं / आयुष्याच्या कथांनी डोळ्यात पाणी येणारा मी...एकदा बसलो की गाण्याच्या रियाझांवरुन उठुच नये असं वाटणारा मी...मी इथं कशाला आलोय, काय करायचयं मला?? कधी कधी आयुष्य इतकं छोटं वाटतं तर कधी ते अथांग वाटतं ...ह्या सगळ्या प्रश्नांच उत्तर मी गाण्यात शोधायचा प्रयत्न करतो आहे...अखंड...
Thursday, December 22, 2011
उस्ताद सुलतान खाँ
उस्ताद सुलतान खाँ या थोर सारंगीवादकाच्या निधनाने संगीत जगताची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. सद्य:स्थितीत भारतात मोजकेच सारंगीवादक आहेत. सीकर घराण्याचे उ.सुलतान खाँ हे एक मातबर सारंगीवादक होते.सारंगी हे वाद्य व सारंगीवादक आज दुर्मीळ होत चालले आहेत. भारतात मोजकीच सारंगीवादकांची घराणी आहेत. alt उदा. किराणा घराणे, आमचे झज्जर घराणे, सीकर घराणे. उ. सुलतान खाँ यांनी सारंगीवादनाचे शिक्षण त्यांचे पिताजी व सीकर घराण्याचे सारंगिये उ. गुलाब खाँ यांच्याकडून घेतले. सारंगीवादनाची अनेक वर्षे तपश्चर्या केल्यानंतर ऐन विशीतच त्यांनी गायकांची साथसंगत सुरू केली. अल्पावधीतच त्यांना नावलौकिक मिळाला. त्यानंतर त्यांनी आकाशवाणी राजकोट केंद्रावर स्टाफ कलाकार म्हणून काम केले. मुंबईला ते गुलाब मुस्तफा खाँ, शोभा गुर्टू यांची साथ करण्यासाठी अधूनमधून येत असत. ते जेव्हा मुंबईत असत, तेव्हा माझे मोठे बंधू शाब्बीर हुसेन खाँ यांच्याकडेच त्यांचा मुक्काम असे. भारतरत्न लता मंगेशकर यांनी शोभा गुर्टूबरोबरची साथसंगत ऐकून त्यांना मुंबईत स्थायिक होण्याचा सल्ला दिला. त्यानंतर १९७० च्या आसपास ते मुंबई आकाशवाणी केंद्रावर काम करू लागले.
उ. सुलतान खाँ यांच्या सारंगीवादनाचा पुण्यातील पहिला कार्यक्रम १९६४ साली माझ्या बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने झाला. त्यासाठी ते मुद्दाम राजकोटहून आले होते. या कार्यक्रमाला बालगंधर्व उपस्थित होते. सुलतान खाँ यांचे सारंगीवादन ऐकून बालगंधर्वानी त्यांना ५ रु. बक्षीस दिले. ते बक्षीस जपून ठेवले असल्याचा उल्लेख त्यांनी अगदी अलीकडे पुण्यात झालेल्या कार्यक्रमात केला होता.
माझे वडील उ. महंमद हुसेन खाँ म्हणत असत, की सारंगीवादकाला शास्त्रीय संगीताचे शिक्षण आवश्यक आहे. उस्ताद सुलतान खाँ यांनाही ती उत्तम तालीम मिळाली होती. त्यामुळेच त्यांच्या सारंगीवादनाचे बलपेच, गमक व छूटच्या ताना हे वैशिष्टय़ होते. सारंगीवादन करताना डाव्या हातातील जोरकसपणा ही त्यांना मिळालेली ईश्वरदत्त देणगी होती. याबद्दल किराणा घराण्याचे महान सारंगीवादक पद्मश्री उ. शकूर खाँ यांनी प्रशंसोद्गार काढले होते.
मुंबईच्या सिने जगतात त्यांनी मोठा नावलौकिक मिळवला. जवळजवळ सर्व मोठय़ा संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केले. ‘उमराव जान’ या सिनेमात ‘दिल चिज क्या है’ या गाण्यात त्यांनी वाजवलेली तान कायम स्मरणात राहील. त्यांनी केवळ साथसंगतच केली नाही तर आपल्या गायनानेही रसिकांना मोहीत केले. ‘हम दिल दे चुके सनम’ मध्ये गायिलेले ‘अलबेला साजन’ व ‘पिया बसंती’ हे त्यांच्या अल्बममधील गाणे अत्यंत लोकप्रिय झाले.
खाँसाहेब सारंगीची जुगलबंदी ही एक वेगळीच खासियत होती. एस. एस. गोपालकृष्णन यांच्याबरोबर त्यांनी केलेली जुगलबंदी माझ्या अजूनही स्मरणात आहे. लंडनमध्ये त्यांनी उस्ताद रईस खाँ यांच्याबरोबर केलेल्या जुगलबंदीचे ध्वनिमुद्रण इतके अप्रतिम आहे, की जुगलबंदीमधील नजाकत, एकमेकांना समजावून घेत आणि प्रोत्साहन देत केलेले त्यांचे वादन स्मरणीय झाले आहे. स्वभावत: अतिशय मृदू असलेल्या खाँसाहेबांच्या सहवासात कुणीही आले, तरी त्याला त्यांच्या कुटुंबाचाच भाग होण्याची संधी मिळत असे. मनापासून प्रेम करणारा हा एक अतिशय सर्जनशील कलावंत होता. पुण्यात डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या गायनाला साथ करण्यासाठी खाँसाहेबांना मुद्दाम पाचारण करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना पु. ल. देशपांडे म्हणाले की, भारतात सारंगीवादकांची संख्या हाताच्या बोटांवर आहे. त्यातले एक बोट तर सुलतान खाँसाहेबांनीच हस्तगत केले आहे.
खाँसाहेबांनी भारतातल्या जवळजवळ सर्व मोठय़ा गायकांची साथ केली. सुगम संगीतात प्रख्यात गायिका बेगम अख्तर, शोभा गुर्टू यांच्यासारख्या ख्यातनाम गायिकांचीही समर्थपणे संगत केली. सर्व कलाकारांना त्यांची सारंगीची साथ हवीहवीशी वाटे. सारंगीवादक जर हरहुन्नरी असेल, तर त्याच्या साथीत गायकाचे गाणे एक वेगळेच वातावरण निर्माण करते. त्यांच्या साथीचे उदाहरणच द्यायचे झाले, तर श्रीमती परवीन सुलताना यांनी गायिलेला राग किरवानी, परवीनजींची जागान् जागा सुलतान खाँ यांनी जशीच्या तशी वाजवली आहे. तसेच श्रीमती किशोरी आमोणकर यांनी गायिलेला राग कौशी कानडा. बाईंनी या रागात गाठलेली अत्युच्य पातळी व तितक्याच तोलामोलाची असलेली सुलतान खाँसाहेबांची सारंगीची साथ श्रोते कधीही विसरू शकणार नाहीत.
फैयाज हुसेन खाँ
Subscribe to:
Posts (Atom)