Wednesday, April 27, 2011

माधव गुडी

किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित माधव गुडी यांचे अकाली निधन होणे ही संगीताच्या आणि विशेषत: किराणा घराण्याच्या दृष्टीने दु:खकारक घटना आहे. ‘कर्नाटक भीमसेन’ म्हणून माधव गुडी यांनी आयुष्यभर संगीताची सेवा केली. गुरू भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्यावर असलेली त्यांची भक्ती हा भारतीय संगीत संस्कृतीमधील एक आदर्श म्हणावा असा अध्याय आहे. जगात फक्त भारतीय संगीतातच नवनवोन्मेषी प्रतिभेला प्रत्यक्ष सादरीकरणात महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कला सादर करत असताना जे सुचते, ते तिथेच व्यक्त करण्याची मुभा कोणत्याही कलावंतासाठी आव्हानात्मक असते. आपली प्रतिभा सतत जागती ठेवणे आणि तिला सतत वृद्धिंगत करणे हे भारतीय संगीतातील प्रत्येक कलावंताचे कर्तव्यच समजले जाते. त्यामुळेच या कलेच्या प्रांतात गुरूचे महत्त्व अनन्यसाधारण असते. माधवराव गुडी यांनी आपल्या गुरुच्या चरणी आपले सारे सर्वस्व अर्पण केले आणि त्यामुळे त्यांना संगीतात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करता आले. सततचे दौरे आणि मैफली यामुळे मैफली गवयांना शिष्य तयार करण्यास वेळ मिळत नाही. समोर बसवून तालीम घेण्याएवढी फुरसत मिळत नसल्यामुळे शिष्याला गुरूच्या सहवासातून मिळवावे लागते. गुडी यांनी भीमसेनजींचे शिष्यत्व पत्करल्यापासून ते त्यांच्यासोबत सावलीसारखे राहिले. माधव गुडी यांनी भीमसेनी शैलीचा नीट अभ्यास करून ती आत्मसात केली आणि आपल्या गायकीवर भीमसेनी मोहोर उमटविण्यात यश मिळवले. भीमसेनजींनीच ‘शिष्योत्तम’ अशी पदवी देऊन माधवरावांचे कौतुक केले होते. सरळ मनाचा आणि सतत स्वरात डुंबलेला हा कलावंत आयुष्यभर अजातशत्रू राहिला. भारतीय संगीतात उत्तर हिंदुस्थानी आणि कर्नाटक अशा संगीताच्या दोन समांतर परंपरा आहेत. या दोन्ही परंपरांना देदीप्यमान असा इतिहास आहे. कर्नाटकात राहून तेथील कर्नाटक संगीत शैलीचे अनुकरण न करता उत्तर हिंदुस्थानी संगीतातील किराणा घराण्याची शैली आत्मसात करण्याच्या माधव गुडी यांच्या प्रयत्नांना सवाई गंधर्व, गंगुबाई हनगळ आणि भीमसेन जोशी यांची परंपरा होती. वडील कीर्तनकार असल्याने माधव गुडी यांच्यावर स्वरांचा संस्कार लहानपणीच झाला. भीमसेनजींकडे गायन शिकायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी त्यांच्या शैलीतील सारे बारकावे सूक्ष्मतेने टिपले आणि आपल्या गळ्यात उतरवले. पंडितजींबरोबर सारा देश हिंडणाऱ्या शिष्यांमध्ये माधवराव अग्रेसर होते. कर्नाटक कला तिलक, गायन कला तिलक, गानभास्कर, अमृता प्रशस्ती, संगीत साधक, संगीत रत्न, यशवंतराव चव्हाण पुरस्कार असे अनेक पुरस्कार माधव गुडी यांना मिळाले. भारतातील अनेक संगीत परिषदांमधून त्यांचे सतत गायन झाले. अलीकडच्या काळात गळा रुसला असला, तरीही माधवरावांनी आपली संगीत साधना सुरूच ठेवली होती. भीमसेनजींच्या मृत्यूनंतर त्यांचे शिष्य श्रीकांत देशपांडे आणि आता माधव गुडी यांच्या निधनाने किराणा घराणे शोकाकुल होणे स्वाभाविकच आहे.
===============================================================
सदर लेख बुधवार, सोमवार, २५ एप्रिल २०११ च्या लोकसत्ताच्या 'व्यक्तिवेध' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.