Friday, February 18, 2011

केसरबाई-६

असल्या सहज चालणाऱ्या गप्पांतून त्यांची संगीताविषयीची मते कळायची . अभिजात संगीताच्या सहजसाध्येवर , सुलभीकरणावर त्यांची अजिबात श्रध्दा नव्हती . विद्यालये - बिद्यालये सब झूट . गाणारा जाऊ दे , ऐकणाऱ्यालाही ह्या कलांचा आस्वाद , जाता जाता , सहजपणाने घेता येईल हे त्यांना मान्य नव्हते . निदिध्यासाचा , नित्य अभ्यासाचा , चांगल्या गुरूकडून कठोरपणाने होणाऱ्या चिकित्सेचा ज्ञानमार्गच त्यांना मान्य होता . एक ज्ञानी गुरू आणि ` रियाझाचे घंटे ' किती झाले ते न मोजणारे दोन किंवा तीन गुणी हुशार शिष्य एवढेच गाण्याचे शिक्षण असेच झाले पाहिजे . त्यांच्या बोलण्यात ` बुध्दी पाहिजे ' हे बऱ्याच वेळा आलेले मी ऐकले होते . मेफिलीत उडत उडत कानी येणाऱ्या चिजा ऐकून गाणाऱ्यांचा त्यांना तिटकारा होता . परंपरेच्या आग्रहामागे कलावंताने आपल्या मनाला लावून घेण्याचा शिस्तीचा आग्रह होता . आणि शिस्त कुठली आणि आंधळे अनुकरण कुठले ह्यांतला फरक कळण्याइतकी तीक्ष्ण बुध्दी त्यांना होती . त्यांच्यापूर्वीच्या पंरतु एका निराळ्या घराण्याच्या प्रख्यात गायिकेच्या
गाण्याविषयी मत देताना म्हणाल्या, " तिचा आवाज मोकळा होता , सुरीली होती , पण ख्यालाचे पाढे म्हणत होती. " उगीचच सर्वांमुखी मंगल बोलवावे म्हणून ` आपपल्या जागी सगळेच चांगले ' वगेरे गुळगुळीत बोलणे नसे . अप्रियतेची त्यांना खंत नव्हती . त्यांच्या मतांमुळे त्यांच्याविषयी अनेकांच्या मनात कटुता उत्पन्न व्हायची . पण त्यांच्या विलक्षण दृष्टीचा प्रत्यय यायचा . गुण सांगताना पटकन वेगुण्याकडेही लक्ष वेधायच्या . "" बडे गुलामअली चांगला गायचा . मूळचा सारंगिया . असेना का , पण गवई झाला. "

अजिबात दोष न काढता जर पेकींच्या पेकी मार्क कुणाला त्यांनी दिले असतील तर ते भास्करबुवा बखल्यांना. थोरले खांसाहेब तालीम द्यायला येताना कधीकधी भास्करबुवांना सोबत घेऊन यायचे . एखादी पेचदार तान कशी निघाली पाहिजे ते बुवांकडून गाऊन घेऊन दाखवायचे . मी विचारले, " माई , भास्करबुवांचं मोठेपण कशात होतं , असं तुम्हांला वायतं ? "
" अरे , काय सांगू तुला ? भास्करबुवा त्यांचं जे गाणं होतं तेच गायचे , पण मैफलीतल्या प्रत्येकाला वाटायचं की बुवा फक्त माझ्यासाठी गातायत. असा आपलेपणा वाटायला लावणारा गवई पाहायला मिळणार नाही . . . मोठा माणूस , मोठा माणूस . . . . "
माईंचे ते ` फेड आउट ' होत गेल्यासारखे मोठा माणूस . . . मोठा माणूस ' हे श्बद आजही माझ्या कानांत आहेत. केसरबाईंची मान आदराने लवली नाही असे नाही, पण `साहेबी पाहोनि नमस्कारानें ' ह्या समर्थवचनाला अनुसरून लवली . ` साहेबी ' म्हणजे देवत्व .
एकदा गुरूमुखातून मिळणाऱ्या विद्येबद्दल बोलत होतो . मी म्हणालो, " आता टेपरेकॉर्डर निघाले आहेत . टेपवर , समजा , अस्ताई - अंतरे बरोब्बर रेकॉर्ड केले तर त्यावरून तालीम घेता येणार नाही का . ? "
" नाही . "" माईंचे उत्तर ठाम होते .
" का नाही ? "" मी विचारले . त्यावर त्या काही बोलल्या नाहीत . मला वाटले , विषय संपला .
पण तो प्रश्न माईंच्या मनात घोळत होता . काही वेळ इतर गोष्टी झाल्या आणि त्या एकदम मला म्हणाल्या, " हे बघ , टेपरेकॉर्डरवरून चीज ऐकल्यावर ती गळ्यावर बरोबर चढली की नाही हे काय तो टेपरेकॉर्डर सांगणार ? "
" आपण पुन्हा रेकॉर्ड करावी आणि तुलना करून पाहावी . "
"अरे , आपलंच गाणं परक्यासारखं ऐकता आलं असतं तर काय पायजे होतं ? रेडिओवर आता टेपरेकॉर्डरच वाजवतात ना ? स्वतःचं गाणं स्वतः बसून ऐकतात . सुधारतात ?
तुझ्यासारखे त्यांचे दोस्तही कधी त्यांना त्यांच्या चुका सांगणार नाहीत . कशाला उगाच वाईटपणा घ्या ? . . . काय ? "
" बरोबर. "
"म्हणून डोळ्यांत तेल घालून शागिर्दाचं गाणं पाहणारा, चुकला तर त्याचा कान पिळणारा गुरू लागतो . अरे, आठ - आठ दिवस तान घासली तरी खांसाहेबांच्या तोंडावरची सुरकुती हलायची नाही. वाटायचं, देवा, नको हे गाणं . . . "
शिकवणी टिकवायला शिष्येचीच नव्हे तर तिच्या आईबापांचीही तारीफ करणारे अनेक गुरू माझ्या डोळ्यांपुढून तरळून गेले . शिष्यांना वाट दाखवण्याऐवजी त्यांची वाट लावणारे गुरू काय कामाचे ?
" माझी शिस्त परवडत असेल तर शिकवीन " म्हणणारे गुरू आमच्या विश्वविद्यालयात राहिले नाहीत तिथे गायनमास्तरांना काय दोष द्यायचा !
आणि मग तालमीशिवाय, बंदिशीतली दमखम गळ्यावर नीट चढवल्याशिवाय एक चीज गाणाऱ्या एका गायिकेची त्यांनी मला गोष्ट सांगितली . " कलकत्त्याला लालाबाबूंची कान्फरन्स होती . ह्या बाईंचं गाणं सुरू झालं . उगीच कान खराब करायला जाऊन बसायची मला सवय नव्हती . तसाच कोणी फेय्याझखांबिय्याझखांसारखा असला तर मी जायची . मजा करायचा फैय्याझखां. लालाबाबूंनी आग्रह केला होता म्हणून गेले होते . बाईंनी ` रसिया होना ' सुरू केलं .
आता ती काय त्यांच्या घराण्याची चीज नाही . तिला तालीम कशी मिळणार ? आणि मग , `अरे रसिया, हे रसिया, ओ रसिया - ' सुरू झालं . माझ्या शेजारी चंपू . मी म्हटलं , `ऊठ , जाऊ या.' ती भित्री . ती म्हणते, `माई , बरं दिसत नाही.' मी उठले आणि हालच्या बाहेर आले .
लालाबाबू धावत आले मागून . मला म्हणतात , `केसरबाईजी, कहॉचली आप ? ' मी म्हणाले
`ओ बाईजीका रसिया किधर खो गया हे - ओ रसिया , अरे रसिया करके चिल्लाती हे , सुना नहीं ? उसका रसिया धुंडनेको जा रही हूँ . - ' "

No comments: