Tuesday, July 30, 2013

'श्रुती' रंगी रंगले... भाग-२

कही दिल लगायाँ है?
एकदा मी बाहेरगावहून नुकतीच परतले होते. घराचं दार उघडून आत शिरतेय तेवढय़ात फोन वाजला. फोनवरून विचारणा झाली, 'श्रुतीजी है.. मैं बेगम अख्तर बोल रही हँू..',  माझ्या हातातून फोन फक्त पडायचाच बाकी राहिला होता. यांचा फोन मला कशाला, असा विचार मनात आला. त्या मला म्हणाल्या, हमने आपके आवाज की बहुत तारीफ सुनी है. तो हमें आपका गाना सुनना है. कब सुनाऐंगी..'. मी त्यांना म्हटलं की आत्ताच घरी आले आहे. उद्या ऐकवले तर चालेल का? त्यावर 'नहीं नहीं कल मैं लखनौ जा रही हूँ.. तो हमें आपका गाना आज ही सुनना है,' असे म्हणत त्या माझ्या गुरूंबरोबर घरी आल्या. जून महिन्यातला असाच भरपूर पाऊस होता. इतक्या भिजल्या होत्या त्या.. पण, तरीही 'तुम्ही गा' म्हणाल्या.. 'कपडे आपोआप सुकतील', असं त्यांनी सांगितल्यावर मी गायला सुरुवात केली. मग त्याही गायल्या. त्या दिवशीचं त्यांचं गाणं मी रेकॉर्ड करून ठेवलंय, कारण माझ्यासाठी तो प्रसाद होता. गाऊन झाल्यावर त्यांनी मला हळूच विचारलं, 'श्रुतीजी कहीं दिल लगाया है?' त्यांच्या त्या प्रश्नावर मी पुरती गोंधळून गेले होते. समोर घरातली सगळी मंडळी, गुरू सगळेच होते. माझ्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून त्यांनी सांगितलं, 'नहीं..नहीं..हम किसी का नाम नहीं पूछ रहे है.' मला काय बोलायचं कळेना. मग त्या म्हणाल्या, 'देखिए.. दिल है. खूब लगाईए.. दिल ही है. तुट जाएगा. बार बार तुटेगा. जितनी बार तुटेगा उतना दर्द बढेगा. और वोह दर्द जब आपकी आवाज में उतरेगा तो आपकी आवाज तो सोने पे सुहागा बन जाएगी.'  
भातखंडे विद्यापीठाची कुलगुरू होणं सहजसोपं नव्हतं
२००८ मध्ये मुंबई विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून मी रूजू झाले आणि २००९ मध्ये उत्तरप्रदेशच्या राज्यपालांनी माझी भातखंडे संगीत विद्यापीठाची कुलगुरू म्हणून थेट नियुक्ती केली. पण, मी उत्तरप्रदेशमध्ये गेल्या गेल्याच तुम्ही इथे येऊ नका, तुमचा काही फायदा होणार नाही, असं ऐकवण्यात येऊ लागलं. विद्यापीठातल्या काही लोकांना माझ्यासारखी सरळ व्यक्ती तिथे येणं सोयीचं नव्हतं.  मी गेल्या दिवसापासून माझ्याविरोधात कारवाया सुरू झाल्या. मी तिथे येऊ नये म्हणून तिथल्या लोकांनी माझ्याविरोधात संप करणे, माझे पुतळे जाळणे, वर्तमानपत्रातून टीका करणे, अगदी माझ्यावर खुनाचा आळ घेण्यापर्यंत विरोधी कारवाया करून पाहिल्या. पण, नंतर काय करायचं हे त्यांच्या लक्षात येईना. कारण काही केल्या मी तिथून जात नव्हते. शेवटी मी त्यांना बजावून सांगितलं की, तुमचे हे हीन प्रकारचे चाळे आहेत त्याला उत्तर देण्यासाठी मला तुमच्या पातळीवर खाली यावं लागेल. कुलगुरूची ही खुर्ची त्यासाठी नाही. त्यामुळे तुम्हाला जे काही करायचे असेल ते करा. मी कुठल्याही प्रकोरे तुम्हाला उत्तर देणार नाही. पण, कायद्याने त्यांचा जो काही बंदोबस्त करायचा होता तो मी केला. त्यांची सगळी बंडं मी मुळातून मोडून काढली.
कर्नाटकी संगीतातला बंदिस्तपणा आणि ख्याल गायकीतलं स्वातंत्र्य
कर्नाटक संगीतात एक बंदिस्तपणा आहे. त्यांची ती बांधीलकी आहे. म्हणजे बंदिशीमध्ये त्यांच्या ज्या कृती आहेत, त्यामध्ये तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीला एका मर्यादेपर्यंतच वाव देऊ शकता. त्याउलट, उत्तर हिंदुस्थानी संगीतात ध्रुपद धमार मागे पडून ख्याल जास्त प्रचारात आले. कारण, ख्यालामध्ये स्वत:च्या कल्पनाशक्तीलासुद्धा वाव मिळाला, त्यामुळे ही गायकी जास्त प्रचारात आली. इथेही घराणेशाहीची एक चौकट आखून दिलेली आहे. ही मर्यादा घालून दिलेली आहे.. रागाचा विस्तारही तुम्ही या एवढय़ा मर्यादेत करायचा. पण, ही बंधनं पाळूनसुद्धा त्या गायकीत एक स्वातंत्र्य आहे. ख्याल गायकी म्हणजे काय तर बंधनातलं स्वातंत्र्य. हे बंधनातलं स्वातंत्र्य ज्या ज्या गायकीतील घराण्यांनी दिलं, ज्या विचारप्रणालींनी दिलं, त्या विचारप्रणाली जास्त प्रसृत झाल्या. तसं दाक्षिणात्य संगीतात होत नाही. त्यांचा बंदिस्तपणा आहे तसाच आहे. तुम्ही बघाल तर त्यांच्या गायन महोत्सवात कोणी एखादा व्यासपीठावर गात असेल तर तो जसा मांडीवर हाताने ताल धरतो तसाच ताल समोर बसलेल्या श्रोत्यांनीही धरलेला असतो. ते सगळे ती कृती गात असतात. म्हणजे त्यांच्या कृतीतलं जे एक बंदिस्तपण आहे तेच त्यांच्या प्रसारासाठी एक प्रकारे मारक ठरलं.
उत्तर पैदा करती है, दख्खन दाद देती है..
उत्तर भारतात कलांचा जन्म झाला पण प्रसार मात्र दक्षिणेत जास्त झाला. खाँसाहेब म्हणायचे, उत्तर पैदा करती है.. दख्खन दाद देती है. मी उत्तरेत बराच प्रवास केलेला आहे. उत्तरेत ज्या गोष्टीत पटकन यश मिळत नाही, त्या गोष्टींवर काम करायला आज तिथे कोणी तयार नाही. शिवाय, उत्तरेतली भौगोलिक परिस्थितीत आणि निर्माण झालेली ऐतिहासिक-राजकीय परिस्थिती यामुळे लोकांच्या मनात असुरक्षितता असायची आणि तिथे प्रचलित असलेल्या संगीतप्रकारामुळे कलाकारांची प्रतिष्ठा धुळीला मिळाली होती. कलाकार होणे म्हणजे तुम्हाला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत अशी परिस्थिती होती. दुसरी गोष्ट अशी झाली की विद्येसाठी आणि अभ्यासासाठी पोषक असं स्वास्थ्य, तशी मनोभूमी दक्षिणेकडे जास्त होती. आपल्याकडे उत्तर हिंदुस्थानी आणि दक्षिण हिंदुस्थानी-कर्नाटक संगीत असे दोन संगीतप्रवाह निर्माण झाले. दक्षिणेकडे घरटी एक कुठले वाद्य वाजवले जाई, एखादा नृत्यप्रकार शिकवला जाईल नाही तर गाणे तरी गायले जाईल. म्हणजे घरटी कोणीतरी कलेची ओळख असलेला कलाकार तुम्हाला सापडेल. तसे उत्तरेत होत नाही, कारण त्यांच्यासाठी आपले अस्तित्व टिकवून ठेवणे हेच मोठे ध्येय झालेले आहे आणि अशा ठिकाणी कला कधीच रुजत नाही, तिचे संवर्धन त्या ठिकाणी होऊ शकत नाही. मानसिंग तोमर वगैरे मंडळी होती, त्यांनी कलेची जपणूक आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न केला पण, त्यांच्या काळातही त्यांना जी शिष्य मंडळी मिळाली ती तुम्ही बघाल तर दक्षिणेकडची होती, महाराष्ट्रातील होती.
आणखी एक म्हणजे संगीतात घराणेशाही होती, त्या घराणेशाहीत माझी विद्या माझ्या रक्तातील माणसाकडेच गेली पाहिजे अशी पूर्वी भावना असायची. माझी विद्या माझ्या घरातच राहिली पाहिजे, असा एक दंडक होता. बरं विद्येची शान तर अशी की, लग्नामध्ये जावयाला हुंडा म्हणून मी २५ राग दिले, शंभर राग दिले किंवा २०० बंदिशी दिल्या. याचा अर्थ असा की त्या २०० बंदिशी, ते २५ राग मी आयुष्यात कधीही गायचे नाहीत. म्हणजे घराणेशाहीतही विद्येवरची निष्ठा ही अशी होती. आणि ही विद्येची निष्ठा प्राणपणाने जपली गेली ती कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा अगदी मध्य प्रदेशातही कृष्णराव पंडितांसारखी जी मंडळी होती, त्यांनी विद्या ही आपल्या आयुष्यातले सगळ्यात मोठं धन मानले. हा विद्येबद्दलचा पूज्यभाव उत्तरेत असूनसुद्धा तिथे कलेची संवर्धन होण्यासारखी परिस्थिती नसल्यामुळे मग ही मंडळी दक्षिणेकडे आली.
संगीत हे प्रेमासारखे असतं..
व्याकरणात संगीत नोंदलं गेलं म्हणजे ते कमी दर्जाचं होतं, असं नाही. संगीतात कलाकाराची आंतरऊर्मी असते.. म्हणजे मला जेव्हा एखादा कॅनव्हास देऊन त्यावर काम करायला सांगितलं जातं तेव्हा त्या कॅनव्हासपुरतं मर्यादित होण्याचा प्रयत्न मी करते. पण, मला माहिती असतं की जर मला आणखी एक कॅनव्हास त्याच्या शेजारी मिळाला असता तर माझा जो स्ट्रोक आहे तो मला पूर्णत्वाला नेता आला असता. आता या एकाच कॅनव्हासमुळे माझ्या त्या स्ट्रोकची गती थांबल्यासारखी होते, ही जी संकल्पना आहे त्याचा ख्यालामध्ये उपयोग होतो.
आपण प्रत्येक वेळी जेव्हा मोझार्टच्या सिंफनी ऐकतो तेव्हा प्रत्येक जण आपापल्यापरीने अर्थ लावत असतात. ते नुसतेच लिहिलेले नोटेशन वाजवत नसतात. त्याचा जो प्रत्येकाला उलगडणारा गर्भितार्थ आहे तो महत्त्वाचा असतो. कुठलंच संगीत हे कमी दर्जाचं नसतं. संगीत हे प्रेमासारखे असतं. जसं लहानपणी केलेलं प्रेम हे त्या वेळेला तितकंच शंभर टक्के खरं असतं. तसंच मोठेपणी समजून घेऊन, आयुष्यातलं सत्त्व बरोबर घेऊन मग आलेलं प्रेमही तितकंच खरं असतं. मग ते प्रेम नुसतंच दैहिक असेल असं नाही. तर ते वाचनाचं प्रेम असेल, वस्तूवरचं प्रेम असेल, आपल्याबरोबर असणाऱ्या माणसांवरचं प्रेम असेल. ते कोणत्याही वयात असलेलं प्रेम हे तितकंच खरं असतं. अगदी तसंच संगीताचं आहे.
राग हे नुसतं व्याकरण नाही. ते एक्स्प्रेशन आहे
शास्त्रीय संगीताला घराणेशाहीची चौकट असली तरी त्या त्या घराण्यांची सौंदर्यपूर्ण वैशिष्टय़ आहेत. घराण्यामुळे दृष्टी संकुचित होणार नाही, याची काळजी घेत गात राहिले. तसंच गाण्याचं वैशिष्टय़ स्वरांच्या लगावात आहे. म्हणूनच प्रत्येक वेळी यमन ऐकला तरी त्याचा कंटाळा येत नाही. गाताना तो प्रत्येकाच्या लगावाच्या दृष्टीने बदलत जातो, त्या लगावात गोडवा आहे. वैशिष्टय़ आहे. शास्त्रीय संगीतातल्या रागांचही तसंच आहे. राग म्हणजे नुसतं व्याकरण नाही. ते एक्स्प्रेशन आहे. म्हणणं आहे.
पं. पलुस्करांमुळे संगीत मध्यमवर्गीय घरात आलं
पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांनी संगीताला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची केलं होतं. शास्त्रीय संगीताचा प्रसार, प्रचार आणि शिक्षण हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय होतं. सभ्य घरांतील लोक त्या काळात संगीताकडे हिणकस नजरेने बघत. गाणं-बजावणं चांगलं नाही, ही त्या काळी ठाम समजूत होती. पं. पलुस्करांनी तत्कालीन समाजाला या मन:स्थितीतून बाहेर काढण्याचा जणू विडाच उचलला होता. माझ्या वडिलांचे ते गुरू! वडील शालेय शिक्षणात पाचवीपर्यंतच शिकले. मात्र पं. पलुस्करांकडे त्यांचे सर्वच बाबतीतील शिक्षण झालं. आपल्याकडे असलेल्या मुलांचा सगळा वेळ कामात किंवा अभ्यासात जावा, याकडे बुवांचं काटेकोर लक्ष असायचं. अल्लड वयातील मुलांना बरोबर घेऊन संगीताची दीक्षा देणं, हे त्याही वेळी कठोर काम होतं. पण बुवांनी या मुलांचा सर्वागीण विकास व्हावा, यासाठी त्यांना इंग्रजी, गणित, संस्कृत आणि हिंदी या विषयांच्या शिकवण्याही लावल्या होत्या. त्यांच्या प्रयत्नांमुळेच माझ्यासारख्या अनेक गायिका पुढे मुक्त कंठाने गाऊ शकल्या. कोणतीही कला ही एक शास्त्र, विद्या असते, ही शिकवण कदाचित बाबांना त्यांच्याकडूनच मिळाली. पुढे बाबांनी माझ्यावर त्याचप्रमाणे संस्कार केले. संगीताचा सखोल अभ्यास, त्याकडे पाहण्याची दृष्टी, ती कला म्हणजे विद्या आहे, तिला विद्येचे अधिष्ठान आहे, वगैरे सगळ्या गोष्टींचा आवाका वडिलांनीच समजावून दिला.
=======================================================================
सदर लेख शुक्रवार, २६  जुलै २०१३ च्या लोकसत्ताच्या 'व्हिवा' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार

No comments: