Monday, July 22, 2013

रागदारी आणि वसंत देसाई


वसंत देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षांची सांगता ९ जूनरोजी आहे. त्या निमित्ताने, चित्रपट संगीतात देसाईंनी आणलेल्या अनवट मिश्र रागांचा, रागदारी संगीताचा चित्रपटातील समूहगानासाठी वापर करण्याच्या प्रयोगाचा आणि अनेक अभिजात गायक-वादकांना उपयोजित संगीताकडे वळवण्याच्या वसंत देसाईंच्या कर्तृत्वाचा हा मागोवा..
जुन्या जमान्यातले दिग्गज गायक रामकृष्णबुवा वझे यांच्याकडे 'मियाँ की मल्हार' हा राग लोकप्रिय करण्याचे श्रेय जाते. ज्या काळात तबकडय़ा नुकत्याच बाजारात येऊ लागल्या होत्या. त्या काळात वझेबुवांनी 'बोले रे पपीहरा' ही 'मियाँमल्हार' रागातली रचना ध्वनिमुद्रिकेच्या रूपाने प्रसृत केली. वझेबुवांच्या या ध्वनिमुद्रिकेत खटका, गमक आणि मीड हे रागदारी संगीतात अत्यावश्यक समजले गेलेले आवाजाचे लगाव आहेत आणि त्यातूनच 'मियाँमल्हार' रागाचं रूप अधिकाधिक खुलत जातं. ही रचना चित्रपटगीताच्या रूपाने जनप्रिय करण्याचं श्रेय मात्र वसंत देसाईंना द्यायला हवं. 'गुड्डी' या चित्रपटासाठी वाणी जयराम यांच्या आवाजात देसाईंनी ती स्वरबद्ध केली. नाही म्हटलं तरी वझेबुवांची रचना आणि तिची लोकप्रियता रागदारी संगीताच्या श्रोतृवर्गापर्यंतच मर्यादित होती. वसंत देसाईंमुळे 'बोले रे पपीहरा' ही बंदिश तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचली.
 वसंत देसाईंच्या जन्मशताब्दीचं वर्ष सुरू झालं आणि संपूनही जाईल. या वर्षांत वसंत देसाईंच्या संपूर्ण कारकीर्दीची झलक दाखविणारं आणि त्यांच्या प्रकाशित आणि अप्रकाशित चित्रपटगीतांच्या खजिना मोकळा करणारं संकेतस्थळ (www.vasantdesai.co) २२ डिसेंबर या त्यांच्या स्मृतिदिनी सुरू करण्यात आलं, एवढीच वर्षभरातली रसिकांची 'मिळकत'. वसंत देसाईंनी मराठी चित्रपटांना संगीत तर दिलंच पण ते तिथे अडकून राहिले नाहीत. सी. रामचंद्रानी ज्याप्रमाणे िहदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णकाळात आपल्या वैशिष्टय़पूर्ण कर्तृत्वाच्या ठसा उमटविला, तसाच वसंत देसाईंनीही 'झनक झनक पायल बाजे', 'गूंज उठी शहनाई' किंवा 'दो आँखे बारह हाथ' आणि 'गुड्डी' यासारख्या चित्रपटांच्या घवघवीत यशात आपल्या सुरेल संगीताद्वारे मोठीच भर घातली.
'पंडितराज जगन्नाथ' या नाटकाला वसंत देसाईंनी संगीत दिलं त्यातून 'कलावती' हा कर्नाटक संगीतातला राग महाराष्ट्राला परिचित झाला. प्रसाद सावकारांच्या खडय़ा आवाजातील 'जय गंगे भागीरथी' हे पद वास्तविक 'कलावती' आणि 'बसंत' या दोन रागांच्या मिश्रणातून वसंतरावांनी निर्माण केले आहे. परंतु त्यातला अधिक लक्षात रहातो तो राग 'कलावती'. त्यानंतर हा राग महाराष्ट्राच्या मातीत रुळला आणि भावगीतांमधूनही तो प्रकट होऊ लागला. 'स्वयंवर झाले सीतेचे' या चित्रपटासाठी त्यांनी भीमसेन जोशींच्या आवाजात 'रम्य ही स्वर्गाहून लंका' हे गीत गाऊन घेतले होते. हे गाणे अत्यंत लोकप्रिय झाले आणि रागदारीचा गंधही नसणारा श्रोता ते आपुलकीने गुणगुणत असे. वास्तविक हे गाणे 'िहडोल बहार' या रागावर आधारित आहे. 'िहडोल' हा मुळात कठीण मानण्यात येणारा राग आहे. कारण त्यात फक्त चार स्वर लागतात. त्यात 'बहार' मिसळून हा राग जुन्या काळात उस्तादांनी बनवला. भीमसेन जोशी हे सिद्ध रागांचे बादशहा होते. त्यांच्या उमेदीच्या काळात तर ते सहसा 'मिश्र' अथवा 'अछोप' रागांच्या वाटेला जात नसत. पण वसंत दसाईंनी हे गाणं त्यांच्याकडून गाऊन घेतले आणि ते जनमानसात थेट जाऊन बसले.
'देव दीनाघरी धावला' या नाटकासाठी वसंत देसाईंनी कुमार गंधर्वाकडून 'उठी उठी गोपाळा' ही भूपाळी गाऊन घेतली. 'अमरभूपाळी' या मराठी चित्रपटातली 'घनश्याम सुंदरा' ही भूपाळी पंडितराव नगरकर आणि लता मंगेशकर यांनी गायली होती. सुमारे साठ वर्षांपूर्वी ध्वनिमुद्रित झालेली ही भूपाळी आजही तितक्याच भक्तिभावाने आणि चवीने ऐकली जाते. 'भूपाळी' म्हणजे 'घनश्याम सुंदरा' असे जणू समीकरणच बनले आहे. तरीही याच संगीत दिग्दर्शकाने रचलेल्या 'उठी उठी गोपाळा' या भूपाळीची लज्जत काही औरच म्हटली पाहिजे. वसंत दसाईंनी भीमसेन जोशी आणि कुमार गंधर्वाप्रमाणेच अमीर खान या रागदारी संगीताच्या क्षेत्रातल्या महान कलाकाराच्या आवाजाचा उपयोग आपल्या संगीताची शान वाढविण्यासाठी केला. 'झनक झनक पायल बाजे'चे बहुचर्चित शीर्षक गीत अमीर खान खाँसाहेबांनी गायले आहे. मुळात हे गाणे अमीर खान खाँसाहेबांच्या मंद्र सप्तकात चनीत विहार करणार्या आवाजाला अनुरूप अशा 'दरबारी' रागात ध्वनिमुद्रित झाले होते. व्ही. शांताराम वगळता सर्वाना ते अतिशय पसंत पडले होते. पण शांतारामांचे मत लक्षात घेऊन वसंतरावांनी ते पुन्हा ध्वनिमुद्रित करायचे ठरविले. मात्र यावेळी 'दरबारी' मंद्रप्रधान रागाऐवजी 'अडाणा' हा उत्तरांगप्रधान राग निवडला आणि अमीर खान खाँसाहेबांनी जलद तानांची बरसात करून या गीताचे सोने केले.
दिग्गज गायकांप्रमाणे अत्यंत प्रतिभावान वादकांनाही त्यांनी आपल्या संचात गोवले. 'गूंज उठी शहनाई'मधून बिस्मिल्ला खान खाँसाहेबांची शहनाई अक्षरश घराघरात पोचली. त्यांचे वादन समारोहामधून होत असे तेव्हा सामान्य श्रोते 'गूंज उठी'ची फर्माईश करीत आणि खाँसाहेबही ती मान्य करीत असत. सतारनवाझ अब्दुल हलीम जाफर खान यांनीही 'झनक झनक' च्या पाश्र्वसंगीतातला संपन्न करण्यात मोठी भूमिका बजावली. या चित्रपटाने गर्दीचे सर्व उच्चांक मोडले होते. त्यामुळे सुवर्ण महोत्सवी खेळानिमित्ताने 'लिबर्टी' चित्रपटागृहात हलीम जाफर खान यांचे सतारवादन अहमदजान थिरकवाखाँसाहेबांच्या तबला संगतीसह आयोजित करण्यात आले होते असे जाणकार सांगतात. शिवकुमार शर्मा आणि सामताप्रसाद हे वादकही 'झनक'मुळे प्रथम चमकले.
रागावर आधारित रचना आणि तीही समूहगानाच्या रूपाने साकार करणे हा वसंत देसाईंचा हातखंडा होता. 'केदार' रागातली 'हमको मन की शक्ती देना' ही रचना ('गुड्डी' :  वाणी जयराम आणि इतर) इतकी लोकप्रिय झाली की शाळाशाळांमधून प्रार्थना म्हणून ती गायली जाऊ लागली. 'दो आँखे बारह हाथ' मधले 'ऐ मालिक तेरे बंदे हम' या प्रार्थना गीताला 'मालकंस' रागाचा आधार आहे. या गीताने तर सीमेपलीकडच्या पाकिस्तानातही लोकप्रियता मिळविली. भारतातीलच नव्हे तर पाकिस्तानातील तुरुंगांमध्येही प्रार्थना गीत म्हणून गाणं गायले जाऊ लागले. रागदारी संगीताला लोकाभिमुख करण्याबाबत वसंत देसाईंनी जे योगदान दिले आहे त्याची उचित गांभीर्याने दखल घ्यायला हवी.
=======================================================================
सदर लेख रविवार,  ९ जुन २०१३ च्या लोकसत्ताच्या 'विशेष' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार

No comments: