Tuesday, July 30, 2013

'श्रुती' रंगी रंगले... भाग-१

व्हिवा लाउंजमध्ये सोमवारी ज्येष्ठ गायिका श्रुती सडोलीकर- काटकर यांनी रसिकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांच्या 'रामरंगी रंगले'च्या स्वरांनी प्रभादेवीचं पु. ल. देशपांडे मिनि थिएटर भारलं गेलं. श्रुतीताईंच्या स्वरांबरोबरच त्यांच्या विचारांनीही उपस्थित भारावून गेले.
श्रुती या नावातच संगीत!
शास्त्रीय संगीतात श्रुती या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वरांबरोबर येणाऱ्या श्रुतीही सांभाळून गाणाऱ्या गायकाला या क्षेत्रात खूप मान आहे. तोच धागा पकडून श्रुती सडोलीकर-काटकर यांना त्यांच्या नावाबद्दल विचारले असता, त्यांनी त्यांचे गुरू व वडील वामनराव सडोलीकर यांची आठवण सांगितली. वामनरावांना एकदा कोलकातामध्ये एका माणसानं विचारलं होतं की, तुमच्या मुलीचे नाव श्रुती कोणी ठेवले आणि का ठेवले? त्यावर वामनरावांनी त्यांना उत्तर दिले होते, 'श्रुती हे नाव मीच ठेवले आहे. माझी मुलगी गाणार याची मला खात्री होती आणि ती सर्व श्रुती सांभाळून गाणार, याची पूर्ण खात्री होती.'
हिंदुस्थानी संगीतातलं जयपूर-अत्रौली घराणं कठीण गायकीसाठी ओळखलं जातं. याच घराण्यातल्या श्रुती सडोलीकर-काटकर यांनी मात्र आपल्या आर्त स्वरांनी शास्त्रीय संगीत एकदमच हृदयाला भिडवलं. 'व्हिवा लाउंज'च्या मंचावर त्यांनी संगीताबद्दलची आपली मतं आत्मीयतेनं मांडली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी झालेल्या या कार्यक्रमात आपल्या गुरूंबद्दल बोलताना त्या भावविवश झाल्या. श्रुतीताईंचे गानविचार आणि एकूणच आयुष्याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन या गप्पांतून ऐकायला मिळाला. वेळ संपली तरी श्रुतीताईंशी संवाद संपलेला नव्हता. गुरूंनी भरभरून दिलं, हे सांगणाऱ्या श्रुतीताईंना ऐकताना प्रेक्षकांचीही अवस्था घेता किती घेशील दो कराने, अशीच झाली होती.
अति कौतुक घातकच
सध्या रिअ‍ॅलिटी शोजच्या नावाखाली टीव्हीवर जे काही चालले आहे, ते संगीतासाठी मारक आहे. रिअ‍ॅलिटी शोमधून तुम्हाला चांगले गायक मिळू शकतात. मात्र संगीत ही जन्मभर चालणारी प्रक्रिया आहे. शिकणं ही मनाची अवस्था आहे. रिअ‍ॅलिटी शोजमधून मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे 'बन चुके' ही भावना मनात निर्माण होते. अशा शोजमधून चमकलेल्या मुलांचे पालक त्यांचं अति कौतुक करतात. या मुलांच्या वयात हे कौतुक  हवंहवंसंच वाटतं, पण हे अति कौतुकच त्यांच्या प्रगतीसाठी घातक ठरतं. या मुलांच्या अंगात गुण नक्कीच असतात, पण त्या गुणांना खतपाणी घालण्याची गरज आहे. नाहीतर चौथ्या वर्षीचं गाणंच ते १४ व्या वर्षी गात राहतात. त्या वयात पडती प्रतिष्ठा सहन होत नाही. म्हणून या मुलांना अधिकाधिक अभ्यास करू दे. पैसा त्यांना नंतरही मिळेल. पण हे वय अधिकाधिक शिकण्याचं आहे. त्यांच्या कलेला विद्येचं अधिष्ठान मिळणं गरजेचं आहे. या सगळ्यात पालकांची भूमिकाही महत्त्वाची आहे. माझ्या सुदैवाने माझ्या आईवडिलांनी माझ्यासमोर कधीच माझे कौतुक केलं नाही. गुरूंनीही माझ्या पाठीवर शाबासकीची थाप खूप उशिराच मारली. वडील तर नेहमी म्हणायचे की, लहान मुलं टीपकागदासारखी असतात. घरात संगीत आहे त्यामुळे श्रुती लहान वयात गाते, हे काही फार आश्चर्य नाही. ज्या दिवशी ती स्वतचं म्हणून गाणं गाईल त्या दिवशी तिला बोलवा, असं ते सांगायचे.
करडय़ा शिस्तीचे संस्कार
गाण्याच्या बाबतीतील शिस्तीचं महत्त्व वडिलांनी मला खूप लहानपणी समजावून दिलं. अगदी अडीच-तीन वर्षांची असल्यापासून मी अत्यंत अनवट राग, मिश्र राग वगैरे गात होते. मात्र कधी कधी कंटाळा यायचा. वडिलांकडे मी कधी शिकायला म्हणून बसले नव्हते. मात्र त्यांच्याकडे एक मुलगी शिकायला येत असे. ती चुकली की मग पुढे काही गातच नसे. तिची भीड चेपावी म्हणून वडिलांनी मलाही तिच्याबरोबर शिकायला बसवले. गाताना मांडीवर हाताने ताल देणे, हे माझ्यासाठी खूपच कंटाळवाणे होते. एकदा मला खूपच कंटाळा आला होता म्हणून मी हात दुखत असल्याचा बहाणा केला. वडिलांच्या ते लक्षात आले. मात्र ओरडणे हे त्यांच्या स्वभावातच नव्हते. त्यामुळे त्यांनी मला अगदी लाडाने जवळ बसायला बोलावले. 'माझ्या बाबाचा हात दुखतोय, अरेरे', असं म्हणत त्यांनी स्वत:च्या हाताने माझ्या मांडीवर जोरजोरात ताल द्यायला सुरुवात केली. बाबांचा हात खूप लागत होता, पण मीदेखील हट्टाने काही न बोलता तशीच गात राहिले. शिकवणी संपल्यानंतर तशीच दुखऱ्या पायाने खेळायलाही गेले. मात्र रात्री आईबाबांचा संवाद ऐकला आणि डोळ्यांत पाणी आलं. माझे बाबा त्या रात्री जेवले नव्हते. आईने त्यांना कारण विचारलं तर ते म्हणाले, 'ज्या हाताने मी माझ्या मुलीला मारलं, त्या हाताने मी आज कसा जेवू? पण या वेळी तिला शिस्तीचं महत्त्व पटवून देणं गरजेचं होतं. नाहीतर पुढे तिलाच त्रास झाला असता.' या एका प्रसंगाने गाण्यातलीच नाही, तर एकंदरीत आयुष्यातही शिस्तीचं महत्त्व पटलं.
गुरुंचा विश्वास माझी पुण्याई
शास्त्रीय संगीताचे शिक्षण वडिलांकडे सुरू करण्याआधीपासूनच मला अनेक बंदिशी मुखोद्गत होत्या. त्यामुळे वडिलांचे अनेक स्नेही घरी येऊन मला एखाद्या रागातील बंदिश, तानापलटे वगैरे गायला सांगत. असेच गुलुभाई जसदनवाला वडिलांकडे आले. त्यांनी मला गाताना ऐकलं व म्हणाले, 'माझ्याकडे भरपूर विद्या आहे, पण ती विद्या मी द्यावी असा शिष्य काही सापडला नाही. तुमची मुलगी गाते, तर तिला माझ्याकडे गाणं शिकवायला पाठवाल का?' वडिलांनी हरकत घ्यायचा प्रश्नच नव्हता. माझं शिक्षण गुलुभाईंकडे सुरू झालं. गुलुभाई म्हणजे जबरदस्त असामी होते. ते केवळ संगीतातील गुरूच नव्हते, तर बडे व्यावसायिक होते. त्यांच्या पदरी रेसचे घोडे होते, भाताची शेती, बांधकाम वगैरे सगळ्याच गोष्टी त्यांच्याकडे होत्या. १६ ऑगस्ट १९६८ रोजी मी त्यांच्याकडे पहिला राग शिकायला सुरुवात केली. तो राग होता 'भूपनट'! त्या वेळी संगीतातील काहींनी त्यांच्यावर टीका केली होती. अनेकांना त्यांच्याकडे शिकायचे होते, मात्र त्यांनी कधीच कोणाला शिकवण्याचा विडा उचलला नाही. माझ्यासाठी ते खूप लोकांशी भांडले. त्यांनी मला १२ वर्षे सातत्याने शिकवले. जाण्याआधी त्यांनी मला शेवटच्या वेळी भेटायला बोलावले होते. त्या वेळी ते म्हणाले की, 'बाबा, आप हमारी जिंदगीमें बहोत देरसे आये. २५ साल पहले मिलते तो बहोत कुछ सिखाता था. अब अगली जिंदगी में मिलेंगे.' त्यांचे हे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात त्याही वेळी पाणी आलं होतं. खरंच, माझी पुण्याई म्हणून मला असे गुरू लाभले. पुढल्या जन्मीही तेच गुरू म्हणून लाभावेत, अशी प्रार्थना करतेय.
सुशिक्षित कलाकार होणं महत्त्वाचं
शिक्षणानंतर माझ्या आईनेही एका चित्रपटात काम केले. मात्र आईचा भर शिक्षणावर होता. ती नेहमी म्हणायची की, अशिक्षित कलाकार होण्यापेक्षा सुशिक्षित कलाकार होणे मला जास्त आवडेल. कुरुंदवाडच्या सीताबाई पटवर्धन हायस्कूलात जाणारी ती पहिली मुलगी होती. विशेष म्हणजे त्या वेळी शाळेत आईशिवाय सगळी मुलंच शिकत होती. मात्र आईच्या मॅट्रिकचा रिझल्ट लागला, तेव्हा संपूर्ण शाळेमधून ती एकटीच पास झाली होती. १९७४मध्ये आई गेली. १९७६ला शाळेचा सुवर्णमहोत्सव साजरा करायचा होता. त्या वेळी त्या शाळेतील काही ज्येष्ठ शिक्षक माझ्या घरी आले आणि त्यांनी मला सांगितले की, त्या वर्षी तुमच्या आई पास झाल्या नसत्या, तर शाळा बंद झाली असती. वडिलांमुळे गाण्याची शिकवण, तर आईमुळे शिक्षणाची परंपरा आमच्या घरात आली. वडील पलुस्कर आाणि भुर्जी खाँसाहेब यांचे शिष्य! उस्ताद अल्लादियाँ खाँसाहेबांनीही त्यांना पुढे तालीम दिली. त्यामुळे दोन्ही घरांमध्ये खानदानीपण आणि संस्कार ठासून भरले होते. वडिलांचं शिक्षण फार झालं नव्हतं. मात्र त्यांचं वाचन दांडगं होतं.  मला आठवतं की, घरी एखादी गोष्ट बांधून आणलेला कागदही ते टाकून देण्याआधी वाचत असत.
गळ्यात 'शुगर' पण फॅक्टरी नाही
श्रुती सडोलीकर-काटकर यांचे वडील कोल्हापूरातील एका साखर कारखान्याचे मालक होते, असा उल्लेख इंटरनेटवरील एका संकेतस्थळावर त्यांच्याबद्दलच्या माहितीत केला आहे. पण हे खरं नाही, असं स्पष्टीकरण श्रुतीताईंनी 'व्हिवा लाउंज'च्या मंचावर केलं. श्रुतीताईंचे वडील कोल्हापूरचे. त्या काळात कोल्हापूरमध्ये संगीत, नाटय़ आणि चित्रपट या कलांना प्रोत्साहन होते. कोल्हापूरमध्ये राममोहन लोहिया यांचा कोल्हापूर साखर कारखाना होता. लोहिया हे स्वत: नाटय़प्रेमी होते. त्यामुळे त्यांनी साखर कारखान्यात 'जीवन कल्याण' नावाचा एक विभाग सुरू केला होता. या विभागामार्फत नाटके बसवली जात. बहुतांश वेळा ती बसवण्याचे किंवा संगीत दिग्दर्शनाचे काम श्रुतीताईंचे वडील करत असत. त्यामुळे त्यांचा संबंध या साखर कारखान्याच्या मालकीशी जोडला गेला असावा, असा कयास श्रुतीताईंनी व्यक्त केला. गळ्यात थोडीफार मिठ्ठास असली, तरी साखर कारखान्याची मालकी वगैरे श्रीमंती घरात नव्हती, असं त्या म्हणाल्या.
संस्कारांची श्रीमंती वारसाहक्काने
माझा जन्म कुरुंदवाडला झाला. माझ्या आईचं माहेर कुरुंदवाड! त्या गावात ज्या घरात माझा जन्म झाला त्या घरासमोरील घरात उस्ताद रहिमतखाँ राहायचे. त्या घराच्या कट्टय़ावर बसून ते रियाज करायचे. आमच्या घरी आई आणि वडील हे दोघेही शास्त्रीय संगीताचे चाहते होते. वडील तर पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्या पहिल्या काही शिष्यांपैकी एक! त्यामुळे गाण्याचे संस्कार जन्माच्याही आधीपासून होत होते. आईच्या आणि वडिलांच्या दोघांच्याही घरांत संगीत, नाटक, चित्रपट, साहित्य यांना पोषक वातावरण होते. आईची एक बहीण, आम्ही तिला तानीबाई म्हणायचो, ती उस्ताद अल्लादियाँ खाँसाहेबांची शिष्या. एका आजारामुळे ती लवकर गेली. त्या वेळी उस्तादजी म्हणाले होते की, 'आज अल्लादियाँ गुजर गया है.. केसरको (केसरबाई केरकर) हमनें अपनी गायकीका चार आना भी नहीं दिया. लेकीन तानी हमारी गायकीका सोला आना लेके चली गयी.' सांगायचा मुद्दा, संगीताचे संस्कार गर्भावस्थेत होते, तेव्हापासूनच होत होते. प्रभात कंपनीतही आमचे शेअर्स होते. प्रभात कंपनीच्या चार-पाच मालकांपैकी एक म्हणजे केशवराव धायबर! ते म्हणजे माझ्या आईच्या आत्याचे पती! माझी एक मावशी वासंती म्हणजे पहिली बाल सिनेतारका! 'कुंकू', 'धर्मात्मा' वगैरे चित्रपटांत तिने काम  केलं होतं.

=======================================================================
सदर लेख शुक्रवार, २६  जुलै २०१३ च्या लोकसत्ताच्या 'व्हिवा' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार

No comments: