Friday, August 9, 2013

जयमाला शिलेदार

jaymala shiledar: knight of music जयमाला शिलेदार या पूर्वाश्रमीच्या प्रमिला जाधव. इंदूर येथे भाटेबुवांच्या नाटय़कला प्रवर्तक कंपनीच्या बिऱ्हाडी २१ ऑगस्ट १९२६ रोजी त्यांचा जन्म झाला. वयाच्या दहाव्या वर्षांपासून संगीत शिक्षण घेणाऱ्या प्रमिला यांनी १९४२ मध्ये गोविंदराव टेंबे यांच्या 'वेषांतर' या नाटकाद्वारे संगीत रंगभूमीवर पदार्पण केले. गंगाधरपंत लोंढे यांच्या राजाराम संगीत मंडळीमध्ये त्यांचा प्रवेश झाला. मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाटय़महोत्सवात १९४५ मध्ये 'संगीत शारदा' या नाटकामध्ये त्यांनी बालगंधर्व, केशवराव दाते आणि चिंतामणराव कोल्हटकर या नटश्रेष्ठांसमवेत ताकदीने भूमिका रंगविली. १९४७मध्ये डॉ. भालेराव यांच्या नाटय़महोत्सवातील 'धरणीधर' या नाटकामध्ये त्यांनी जयराम शिलेदार यांच्यासमवेत पहिल्यांदा काम केले. तर 'शाकुंतल' नाटकामध्ये त्या शिलेदार यांच्या नायिका होत्या. १० ऑक्टोबर १९४९ रोजी जयराम शिलेदार, नारायणराव जाधव आणि प्रमिला जाधव यांनी मराठी रंगभूमी संस्थेची स्थापना केली. २३ जानेवारी १९५० रोजी जयराम शिलेदार यांच्याशी विवाहबद्ध होऊन त्या जयमाला शिलेदार झाल्या. १९६२ मध्ये संगीत अलंकार ही पदवी त्यांनी संपादन केली.
 कीर्ती, लता आणि सुरेश अशा तीन भावंड शिलेदारांचे 'सौभद्र' १९६२ मध्ये रंगभूमीवर आले. जयमाला शिलेदार यांनी ४६ संगीत नाटकांमध्ये ५२ भूमिका रंगभूमीवर साकारल्या, तर १६ नाटकांचे संगीतदिग्दर्शन केले. सलग २५ वर्षे नायिकेच्या भूमिकेत कार्यरत असल्याबद्दल १९७६ मध्ये त्यांचा सत्कार झाला होता. बालगंधर्व जन्मशताब्दी वर्षांत १९८७ मध्ये सव्वाशेहून अधिक संगीत नाटय़प्रयोग सादर करून त्यांनी बालगंधर्वाना अभिवादन केले. जयराम शिलेदार यांच्या निधनानंतर २१ वर्षे त्यांनी मराठी रंगभूमी संस्थेची धुरा पेलली. संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत १२ वेगवेगळय़ा नाटकांचे ५० प्रयोग करण्यात आले. त्यांच्यावर २००१ मध्ये हृदय शस्त्रक्रिया झाली, मात्र दोन महिन्यांतच त्यांनी पुन्हा नाटय़संगीत शिक्षण देण्यास सुरुवात केली.
गंधर्वगायकीची शिलेदारी हरपली: मान्यवरांची श्रद्धांजली
संगीत रंगभूमीसाठी सर्वस्व अर्पण करून रसिकांना आनंद देणाऱ्या आणि मराठी रंगभूमी संस्थेच्या माध्यमातून संगीत रंगभूमीचे जतन करणाऱ्या जयमाला शिलेदार यांच्या निधनामुळे गंधर्वगायकीची शिलेदारी हरपली आहे, अशा शब्दांत विविध मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दीप्ती भोगले : जयमाला शिलेदार ही जशी माझी आई होती त्याहून अधिक ती आम्हा बहिणींची गुरू म्हणून मोठी होती. मी, कीर्ती आणि सुरेश अशा तिघा भावंडांचे 'सौभद्र' रंगमंचावर आले त्यामागे तिने आमच्या गायकीवर घेतलेली मेहनत कारणीभूत आहे. शाळेतून आल्यावर दुपारी हार्मोनिअम घेऊन आमचा रियाझ करून घ्यायची. अशी वर्षभर आमची रंगीत तालीम झाली होती. गायन शिकविताना गाण्याचे शब्द तर तिने सांगितले. पण, आलापी सांगायची नाही. आम्ही आमचे सूर काढून गायचो. त्यामुळे आमची शैली जपता आली.
शैला दातार : गायनाचार्य पं. भास्करबुवा बखले यांचे शिष्य बालगंधर्व यांची गायकी जपणाऱ्या जयमालाबाईंचा संगीत रंगभूमी हाच श्वास होता. नाटय़संगीत गायनामध्ये त्या आमच्या पिढीतील कलाकारांसाठी आदर्श होत्या.
पं. विनायकराव थोरात : बालगंधर्वाची गायकी जपणाऱ्या शिलेदार कुटुंबीयांसमवेत ५० वर्षे तबलासाथ करताना माझे जीवनच संगीतमय झाले आहे. गायकाकडे लय, ताल यांसह सुरेलपणा असेल आणि पल्लेदार ताना त्याच्या गळ्यातून आल्या तरच त्या गायकाला गंधर्वगायकी जमते. ही कला जयमालाबाईंनी आत्मसात केली होती.
अरविंद पिळगावकर : अभिजात संगीत नाटकात ज्यांनी 'शिलेदारी'केली त्या पिढीतील शेवटचा दुवा जयमाला शिलेदार यांच्या निधनाने निखळला आहे. अभिजात संगीत नाटकात त्यांनी केलेल्या भूमिका अजरामर झाल्या. मला त्यांच्याबरोबर 'एकच प्याला', संगीत सौभद्र', 'संगीत स्वयंवर' या नाटकांमधून काम करण्याची संधी मिळाली. संगीत नाटकाचा वसा त्यांनी घेतला होता. हा वसा त्यांनी लता आणि कीर्ती या त्यांच्या दोन मुलींकडे पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी दिला.
शुभदा दादरकर : जयमाला शिलेदार यांच्याशी आमचे कौटुंबिक आणि खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. संगीत रंगभूमीवर पद्य आणि गद्य कसे सादर करायचे याचा त्या आदर्श होत्या. त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ आणि हसतमुख होता. त्या स्वत: हार्मोनियमही चांगल्या वाजवायच्या. संगीत नाटकात गाणे सादर करताना शब्दांची फेक, त्याचा स्वर उच्चार आणि गाताना स्वरांची गोलाई व गोडवा कसा कायम ठेवायचा हे अवधान त्यांनी कायम सांभाळले.
=======================================================================
सदर लेख शुक्रवार, ९ ऑगस्ट २०१३ च्या लोकसत्ता मधला आहे. लोकसत्ताचे आभार

No comments: