Friday, January 7, 2011


संगीत हेच आपले जीवन मानणाऱ्या कलावंतांची भारतात एकेकाळी वानवा नव्हती. ज्या काळात संगीताला सामाजिक प्रतिष्ठा अजिबात नव्हती, त्या काळातही अनेक कलावंत संगीतालाच आपले सर्वस्व मानत असत. संगीतासारख्या सौंदर्याची उपासना करणाऱ्या कलेचा हा ध्यास संगीताला तग धरून राहण्यास उपयोगी पडला, हे आता लक्षात येते. गेल्या काही वर्षांत, विशेषत: जागतिकीकरणानंतर संगीताच्या दुनियेत प्रतिष्ठेबरोबरच पैसाही आला आणि हे जग वेगळ्याच मार्गाने जाऊ लागले, अशाही काळात सातत्याने उत्तम संगीत निर्माण करण्याचा ध्यास घेणारे पंडित यशवंतबुवा जोशी यांना यंदाचा हृदयेश आर्ट्स या संस्थेतर्फे पहिला ‘हृदयेश संगीत सेवा पुरस्कार’ जाहीर होणे हे खरे म्हणजे एक सुचिन्ह आहे. कलावंताला अशा पुरस्काराने मिळणारी ऊर्जा फार महत्त्वाची असते आणि ही गोष्ट हृदयेश आर्ट्सने ओळखली आहे, हेही तितकेच महत्त्वाचे म्हटले पाहिजे. भारतीय अभिजात संगीताच्या दुनियेत आद्य घराणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्वाल्हेर गायकीतील यशवंतबुवा हे एक नामवंत कलावंत. ग्वाल्हेरबरोबरच आग्रा या घराण्याचीही त्यांना तालीम मिळालेली. त्यांच्या भात्यात या दोन्ही घराण्यांच्या अनेक उत्तमोत्तम चिजांचा भरणा आहे. त्या चिजांकडे पाहण्याची त्यांची एक खास अशी सौंदर्यदृष्टी आहे. आयुष्भर विद्यादानात रमलेल्या यशवंतबुवांना लौकिक अर्थाने प्रसिद्धीचे वलय फार उशिराने प्राप्त झाले. महाराष्ट्रात ग्वाल्हेर गायकीची स्थापन करणाऱ्या बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांचे शिष्य यशवंतबुवा मिराशी हे यशवंतबुवा जोशी यांचे पहिले गुरू. संगीताच्या गायनशैलीत घराण्याच्या अस्सलपणाला फार महत्त्व असते. अनेक कलावंतांनी आपापल्या गायनशैलीत अन्य शैलींचा प्रभाव मिसळत त्यामध्ये वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न केला. यशवंतबुवांनी मात्र आयुष्यभर या अस्सलपणाला फार महत्त्व दिले. त्यामुळे ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्याची तालीम त्यांना मिळाली, तरी या दोन्ही घराण्यांतील अस्सलपणा जपण्याचा प्रयत्न ते आयुष्यभर करत आले आहेत. सतत चिंतन करण्याने गायनात मोठा फरक पडत असतो, याचे भान अलीकडच्या कलावंतांमध्ये क्वचित आढळते. सर्जनशीलतेच्या निसर्गदत्त देणगीवर विसंबून गायनकला पुढे जात नाही, याची जाणीव या कलावंतांना होण्यासाठी त्यांनी यशवंतबुवांचाच आदर्श ठेवायला हवा. स्वरांवर हुकूमत असणाऱ्या मोजक्या कलावंतांमध्ये त्यांचा समावेश करायला हवा. गायला सुरुवात करताच स्वरावर घट्ट पकड करण्याची त्यांची क्षमता अचाट आहे. स्वर आणि लय या संगीताच्या दोन्ही चाकांवर आरूढ होत यशवंतबुवा जेव्हा गायनाला सुरुवात करतात, तेव्हा बंदिशीतल्या सौंदर्यपूर्ण जागांना त्यांच्या खास शैलीत सादर करत ते रसिकांना पटकन कब्जात घेतात. स्वरांच्या आंदोलनांप्रमाणेच तानांवरचा त्यांच्या गळ्याचा ताबा प्रत्येकाला अचंबित करायला लावणारा ठरतो. शरीर म्हटले तर कृश या सदरात मोडणारे. पण गायला लागल्यानंतर रसिकांना साक्षात्काराचीच अनुभूती यशवंतबुवा अनेकवेळा देते आले आहेत. पुण्यात बालपण गेलेल्या यशवंतबुवांना तेव्हाच अनेक दिग्गज गायक ऐकायला मिळाले. जन्म १९२७ चा. म्हणजे संगीत नाटक ऐन बहरात आलेले. खरे तर त्या काळात चांगल्या गायकाला मैफली गवई होण्याबरोबरच गायक नट होण्यात अधिक रस असणे स्वाभाविक होते. यशवंतबुवांना त्यांच्या शरीरयष्टीने ‘साथ’ दिली आणि ते गायनाकडे वळले. ग्वाल्हेरनंतर आग्रा घराण्याची तालीम जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे घेतली, तेव्हा यशवंतबुवांना गाण्यातील भावदर्शनाची एक नवी शैली प्राप्त झाली. आपले गाणे सतत ताजेतवाने ठेवणाऱ्या या कलावंताला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे त्याच्या कलेला मिळणारी सार्वजनिक पावती आहे!
 =========================================================================
 सदर लेख बुधवार, ०७ जानेवारी २०१ च्या लोकसत्ताच्या 'व्यक्तिवेध' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.

1 comment:

Anonymous said...

In the seventh heaven Additional Year[url=http://sdjfh.in/flexpen/],[/url] everybody under the sun! :)