संगीत मार्तंड पंडित ओंकारनाथ ठाकुर... भाग -१
नमस्कार मंडळी,भारतीय अभिजात (शास्त्रीय) संगीताच्या आपल्या परंपरेत अनेक उत्तमोत्तम दिग्गज कलाकार होउन गेले. काही कलाकार समाजापुढे आले तर काही आले नाहीत वा येऊ शकले नाहीत. त्याबद्दल नंतर कधीतरी. जे समोर आले त्यातील काही कलाकारांची थोडीशी ओळख करुन देण्याचा हा प्रयत्न. नुकतेच पं. अरविंद गजेंद्रगडकर यांचे 'स्वरांची स्मरणयात्रा' हे पुस्तक वाचनात आले आणि त्यापासून स्फुर्ती घेऊन आपणही चार शब्द लिहावेत असं वाटून गेलं आणि त्यामुळे हा प्रपंच. तर करू या सुरुवात.
=======================================================================
संगीत मार्तंड पंडित ओंकारनाथ ठाकुर...
एकदा ओंकारनाथजींच गाणं ऐकुन गांधीजी म्हणाले होते की "जे तुमच्या एका गाण्याने होऊ शकते ते माझ्या कित्येक भाषणांमधुन होऊ शकत नाही."
तर कोण होते हे पंडित ओंकारनाथजी ठाकुर. तर मंडळी आज आपण पंडित ओंकारनाथजी ठाकुर यांच्या बद्दल जाणुन घेऊया...
ओंकारनाथजींचा जन्म २४ जुन १८९७ साली भंडारण जिल्ह्यातील जहाज या गावी पं. गौरीशंकर व झवेरबा यांच्या पोटी झालेला. त्यांना दोन भाऊ (बाळकृष्ण व रविशंकर) व एक बहिण (पार्वती) होती. ओंकारनाथजी चौथे व शेवटचे अपत्य. ओंकारनाथजींच बाल आयुष्य अतिशय कष्ट, गरिबी व हालअपेष्टांनी भरलेलं होत.
त्यांचे आजोबा पं. महाशंकर ठाकुर व वडिल पं. गौरीशंकर हे नानासाहेब पेशवे व महाराणी जमनाबाई यांचे पदरी शुर वीर लढवय्ये होते. परंतू, 'अलोनीबाबा' नावाच्या एका योग्याच्या सानिध्यात आल्यानंतर गौरीशंकरांचे जीवनविषयक सार पुर्णपणे बदलले. त्यामूळे त्यांनी आपला जास्तीत जास्त वेळ 'ओम' अथवा प्रणव साधनेत खर्च करण्यात घालवला. ह्याच सुमारास त्यांच्या चौथ्या मुलाचा जन्म झाल्याने त्यांनी त्याचे नाव 'ओंकारनाथ' ठेवले. जरी गौरीशंकरांनी आपले आयुष्यांत घर उभारणीला मदत केली तरी त्यांचे मन सतत प्रणव साधनेत होतं. त्यामूळे झवेरबांना नेहेमीच प्रतारणा, घृणा व अपमानाला सामोरं जावं लागल. गौरीशंकरांच्या मोठ्या भावाने झवेरबांना खुप त्रास दिला. शेवटी मोठ्या दिराने झवेरबां व ह्या ४ छोट्या लहानग्यांना एक दिवस कठोरपणाने सगळे कपडे व दागदागिने घेऊन घराबाहेर काढले.
पण झवेरबां अतिशय कष्टाळु, मानसिकरित्या भक्कम व संतुलित होत्या. त्यांनी धुणी-भांडी करण्याची चार कामं लगेच धरली. मुलं मोठी होत होती. सगळच विपरित असताना त्यांनी कधी हिंमत सोडली नाही आणि कधी कोणापुढे हात पसरले नाहीत. आईचा धीरोदात्त स्वभाव, अतिशय प्रखर स्वाभिमान ह्यांचा ओंकारनाथजींच्या मनावर व व्यक्तिमत्वावर चांगलाच खोल ठसा उमटलेला होता.
ओंकारनाथजींनी मोजक्या कलाकरांसारखंच स्वतःच्या शारीरिक क्षमतेवर पण बरेच लक्ष केंद्रित केलं होतं. आयुष्यातल्या अतिशय कठोर शिस्तीशिवाय ओंकारनाथजी स्वतः रोज भरपूर व्यायाम करायचे. अन्न वाया घालवण्याच्या ते एकदम विरोधात होते. त्यांच्या व्यायाम प्रकारात ते सुर्यनमस्कार, पोहोणे याशिवाय 'गामा' ह्या त्यावेळच्या नावाजलेल्या मल्लाकडुन ते मल्लविद्याही शिकलेले होते. त्यांच्या पन्नाशीनंतरही त्यांनी हा व्यायाम चालू ठेवला होता.
आपल्या आई-वडिलांकडून मिळालेल्या प्रणव साधना, धर्माबद्दल आस्था व संकटाना तोंड देण्याची वॄत्ती ह्या सगळ्या गोष्टी व वडिलांपुढे जाऊन 'नाद-उपासना' किंवा अज्ञाताची संगीतातून केलेली भक्ती हे ओंकारनाथजींमध्ये ओतप्रोत भरलेली होती. जेव्हा गौरीशंकरांनी संन्यास घेतला तेव्हा ओंकारनाथजींची अवस्था कात्रीत पकडल्यासारखी झालेली. एकीकडे आपली कष्टाळू आई जिच्याबद्दल त्यांना प्रेम व चिंता होती तर दुसरीकडे नर्मदेच्या काठावर संन्यासी वडिल ज्यांच्याबद्दल ओंकारनाथांना अतिव आदर होता.
अशाच तरुण वयात ओंकारनाथांनी स्वयंपाक शिकुन घेतला व एका वकिलाच्या घरी आचारी म्हणून काम करू लागले. असं करणं त्यांना क्रमप्राप्त होतं कारण आईच्या एकटीच्या पगारावर घर चालेना. हे सगळं करताना त्यांची खुप दमछाक होई. एकीकडे नर्मदेच्या काठावर वडिलांची झोपडी साफ करावी, त्यांना पाण्याचे हंडे भरून द्यावेत, त्यांची व्यवस्था लावावी व नंतर ४-५ मैल पळत जाऊन कामाला लागावं व स्वयंपाक करावा. मंडळी, आज हे सगळं लिहीताना हात थरथर कापताहेत आणि डोळ्यांत आसवांनी घर केलय. ज्यांनी हे भोगलय त्यांनाच ते कळणार.
हे सगळं करत असताना ओंकारनाथजींनी एका मिलमधे मील कामगार म्हणूनही काम केलं. तेथेही मिल मालक ह्या छान दिसण्यार्या, कष्टाळू व हुशार मुलाकडे इतका आकॄष्ट झाला की त्याला वाटलं की ह्या मुलाला आपण दत्तक घ्यावं. परंतु ओंकारनाथजींच्या वडिलांनी हे साफ धुडकावून लावलं व म्हणाले की 'माझ्या मुलाला साक्षात सरस्वतीचा आशिर्वाद आहे. तिच्या जोरावर तो पैसा, प्रसिद्धी मिळवेल. पण कोणा श्रीमंताच्या घराचा दत्तक मुलगा म्हणुन नाही'.
ओंकारनाथजी नेहेमी सांगायचे की त्यांच्या वडिलांकडे बर्याच गुढ विद्या होत्या. त्या आधारे त्यांनी आपला मृत्यू बराच आधी सांगितला होता. १९१० साली आपल्या मृत्यूच्या अगोदर त्यांनी आपल्या लाड्क्या मुलाला ओंकारनाथजींना जवळ बोलावून त्यांच्या जीभेवर अतिशय दुर्मिळ व अमुल्य मंत्र लिहीलेला होता.
याच्या बरीच वर्ष असलेलं ओंकारनाथजींच संगीत प्रेम उफळुन आलेलं होतं. अश्याच वेळी एक दानशूर व्यक्ती शेठ शहापुरजी डूंगाजी मंचेरजी त्यांच्यासाठी देवदुतासारखे ऊभे राहिले. शेठजींनी ओंकारनाथजींना मुंबईच्या पंडित विष्णु दिगंबर पलुस्करांच्या संगीत महाविद्यालयात प्रवेश मिळवुन दिला. हा क्षण ओंकारनाथजींच्या आयुष्यातला सोनेरी क्षणच म्हणावा लागेल. ह्याच वेळेस ओंकारनाथजींच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. पंडितजींच्या प्रेमळ मार्गदर्शन व तालीम ह्यांनी ओंकारनाथजींच एका उत्कृष्ट संगीतकारात रूपांतर झालं.
त्या ६ वर्षांच्या काळात ओंकारनाथजींनी एका अस्सल एकनिष्ठ शिष्याप्रमाणे गुरुची सेवा करून गुरुकडुन सगळी संगीत विद्या मिळविली. पलुस्करांची त्यांच्यावर इतकी मर्जी बसली की जेव्हा पलुस्करांनी लाहोरमधे गांधर्व महाविद्यालय चालु केलं तेव्हा ओंकारनाथजींना त्यांनी मुख्याध्यापक केलं. तेव्हा ओंकारनाथजींच वय अवघ २० वर्ष होतं. त्यावेळेस ओंकारनाथजींचा दिवस काहीसा असा असायचा, ६ तास झोप, १८ तास विद्यालयात स्वतःचा रियाझ व विद्यार्थांना शिक्षण. ते अतिशय शिस्तबद्ध व सात्त्विक आयुष्य जगले. १९१७ साली जेव्हा बडोद्याला संगीत परीक्षक म्हणुन पाठवले गेले तेव्हा बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड व दिवाण मोनुभाईंवर त्यांची चांगलीच छाप पडलेली होती. त्याच साली त्यांना अतिशय प्रसिद्ध जालंधरच्या श्री हरिवल्लभ मेळ्यामध्ये गाण्याचं आमंत्रणही मिळालेलं. त्याकाळी श्री हरिवल्लभ मेळ्यामध्ये गाणं गायला मिळणं ही एक अतिशय पर्वणी असे. अनेक मोठे मोठे कलाकार तिथे आपली कला सादर करीत. असं म्हटल जातं की त्यावर्षी तरूण ओंकारनाथजी व वयोवृद्ध भास्करबुवा बखले यांनी अशी काय मैफल सजवली की लोकांनी दागदागिने व धनसंपत्तीची खैरात दोघांवर केली.
ह्या सगळ्या गोष्टींमधे जवळजवळ २५ वर्षे (१९२६-१९५१) ओंकारनाथजींनी श्रीरामाचे 'रामचरित मानस' चे वाचन, मनन व अभ्यास रोज नियमित चालू ठेवला होता. त्याचबरोबर व्यायाम व आपल्या गुरुप्रमाणे रामधुन व रामनाम संकिर्तन चालू ठेवलं होतं.
पुढे....भाग -२ पहा
No comments:
Post a Comment