Thursday, January 28, 2010

१९२२ साली ओंकारनाथजींच लग्न श्रीमती इंदिरादेवींसोबत झालं. इंदिरादेवी, शेठ प्रल्हादजी दलसुखराम ह्या धनवान शेठजींच्या कन्या. १९२४ साली नेपाळचे राजे महाराज चंद्र समशेर जंग बहादुर यांच्या आमंत्रणावरुन त्यांनी अतिकठीण असा नेपाळ दौरा केला. त्यांना तेव्हा अमाप धन व प्रतिष्ठा मि़ळाली. स्वतः राजाने त्यांना ५००० रु. रोख व अगणित मौलिक अलंकार दिले. ह्याच वेळेस महीना ३००० रु. अशी घसघशीत दरबार गायकाची नोकरीसुद्धा देऊ केली. पण ओंकारनाथजींना घरी परतण्याचे वेध लागलेले. कधी एकदा घरी आईच्या पायावर सगळी संपत्ती घालतो असं त्यांना झालेलं. त्यांच ते कित्येक वर्षे जपलेलं स्वप्न होतं. म्हणुन त्यांनी ती नोकरी धुडकावून लावली.
ह्याच सुमारास ओंकारनाथजींना विविध शास्त्रांचा अभ्यास करण्याचा छंद लागला. शिवाय ते एक सच्चे देशभक्तही होते. ओंकारनाथजींनी भडोच काँग्रेस कमिटी व गुजरात काँग्रेस कमिटी वरही काम केले. दैवाचे आभार मानावे तितके थोडेच की ते तिथे अडकले नाहीत. १९३० साली ओंकारनाथजींना परत नेपाळ दौरा घडला. ह्या वेळेस त्यांनी सगळी संपत्ती गुरु पलुस्करांच्या पायावर अर्पण केली. पलुस्करांचा आनंद गगनात मावेना. ह्यानंतर ओंकारनाथजींचे हैद्राबाद, म्हैसुर व बंगालचे दौरे झाले. हैद्राबादमधे त्यांनी मालकंस रागात अशी काही मैफल जमवली की स्वतः गुरुने पं. पलुस्करांनी त्यांना भर बैठ्कीत मिठी मारली व आपल्या आसवांचा आशीर्वाद दिला.
आपल्या पुर्व आयुष्यात ओंकारनाथजींनी जैन मंदिरासाठी काम करत असताना जैन भाषा अवगत करुन घेतली. ह्याशिवाय त्यांना हिंदी, मराठी, इंग्रजी, संस्कृत, बंगाली, पंजाबी, उर्दू व नेपाळी भाषांवर प्रभुत्व होतं.
१९३२ साली पं. पलुस्करांचा मृत्यु झाला. त्यानंतर २ वर्षे ओंकारनाथजी दु:खात होते. १९३३ साली जागतिक संगीत संमेलनाचे त्यांना निमंत्रण मिळाले म्हणुन ते इटलीला फ्लॉरेन्समधे गेले. इटलीची त्यांची एक कथा खुप प्रसिद्ध आहे. त्यांनी सरळ जाऊन मुसोलिनीच्या व्यक्तिगत सचिवास मुसोलिनीला फक्त ५ मिनीटे गाणं ऐकवण्याची गळ घातली. केवढं ते धैर्य. पण फक्त ५ मिनीटांच्या बोलीवर तो तयार झाला. तशी मुसोलिनीसाठी त्यांनी 'तोडी' गायला. ५ मिनीटांनी ओंकारनाथजी थांबले. तर मुसोलिनीने त्यांना खुणेनेच गात राहायला सांगितले. अर्ध्यातासाने शेवटी सचिवाने गाणं थांबावायची सुचना केली. जाताना मुसोलिनी डोळे पुसत एवढच म्हणाला की ' हे संगीत मी पुन्हा ऐकणार नाही. माझं हृदय असं विरघळलेलं चालणार नाही. मी हुकुमशहा आहे. मला कठोरच रहायला हवं. पुन्हा हे संगीत मला ऐकवू नकोस. तुझी बिदागी सन्मानपुर्वक घे. तुझं संगीत चालू राहु दे पण इथे नाही तुझ्या देशात..'. मंडळी, अशी जादु आहे आपल्या भारतीय अभिजात संगीताची आणि ओंकारनाथजींच्या आवाजाची होती. नंतर ओंकारनाथजींनी संपुर्ण युरोप दौरा केला. त्यांनी शेख अमानुल्ला ह्या अफगाणिस्तानमधल्या राजासमोरही गायन केलं. त्यांच्या मित्रांनी त्यांना लंडनमध्ये असताना किंग जॉर्ज (पाच) ह्याच्यासामोर गायला परवानगी मिळावी म्हणुन प्रार्थना कर असं तेव्हा ओंकारनाथजींनी स्वाभिमान ठेऊन ते साफ धुडकावून लावली.
ओंकारनाथजी रशियाकडे जात असताना आपल्या लाड्क्या पत्नीचं बाळंतपणात मृत्यु झाल्याचं कळलं. त्यांना हा जबरदस्त आघात होता. इतका की त्यांनी दौरा अर्धवट सोडलाच पण त्यांना अल्पकाळासाठी स्मृतीभ्रंश झाल्यासारखं झालं. ओंकारनाथजींच्या बोलण्यात नेहेमीच आपल्या एकनिष्ठ, प्रेमळ व वात्सल्यपुर्ण पत्नीबद्दल आदरभाव असे. ते म्हणत की इंदिराजींशिवाय त्यांना इथपर्यंत पोहोचताच आलं नसतं. कलकत्याच्या मोठ्या संगीत सभेत रसिकांनी एकदा त्यांना 'निलांबरी' राग गाण्याची फर्माइश केल्यावर विनयपुर्वक नाही असे सांगितल्यावर कारण काय तर ते म्हणाले की 'इंदिराजींचा हा आवडता राग. जर गायला बसलो तर इंदिराजींच्या आठवणीने गाता येणार नाही.' केवढं हे निस्सीम प्रेम. परत लग्न कर अशी आईने गळ घातली तरी त्यांनी परत लग्न केलं नाही व उत्तरादाखल ते म्हणाले की 'माझ्या रामाच्या वचनाप्रमाणेच मीही एकपत्नीव्रत राहणार'. केवढी ही निष्ठा...
पत्नीच्या मृत्युनंतर जरी ओंकारनाथजींच गाणं सुरु राहिलं तरी त्यात एक प्रकारची करूण छटा असे. पंडितजींनी ह्यानंतर कटु आठवणींमुळे भडोच सोडलं व मुंबईमधे 'संगीत निकेतन' चालु केलं. पं मदनमोहन मालवीय ह्यांची एक इच्छा होती की बनारस हिंदु विश्वविद्यालयात त्यांना पंडितजींच्या देखरेखीखाली संगीत विभाग चालु करायचा होता. पण पं. मालवियांचा मृत्यु झाला. नंतर हे काम पं. गोविंद मालविय यांनी पुरे केलं. तेव्हा ओंकारनाथजींनी (पंडितजींनी) 'डिन' म्हणुन अतिशय चोख काम पार पाडलं. त्यांनी बरेच शिष्य तयार केले जसे डॉ. प्रेमलता शर्मा, यशवंत राय पुरोहीत, बलवंत राय भट, डॉ. राजम, राजबाबू सोनटक्के, फिरोझ दस्तुर, अतुल देसाई, पि. न. बर्वे असे कितीतरी. त्यातील डॉ. राजम ह्या त्यांच्याबरोबर अखेरपर्यंत व्हायोलीन साथीदार होत्या. ज्या ज्या वेळेस डॉ.राजम ह्यांना गुरुची आठवण येत असे त्या त्या वेळेस त्यांच्या डोळ्यात पाणी येत असे. त्यांच्या बोलण्यात नेहेमीच गुरुची भक्ती, त्यांचा प्रेमळ स्वभाव, कडक शिस्त येत असे.
पंडितजींना जे जे पुरस्कार मिळाले त्यात
१९५५ साली 'पद्मश्री',
'संगीत प्रभाकर' , - पं मदनमोहन मालवीय,
'संगीत मार्तंड' - कलकत्ता संस्कृत महाविद्यालय - १९४०,
'संगीत महामहोदय' - नेपाळ नरेश - १९४० हे विशेष नमूद करण्यासारखे.
१९५४ साली ओंकारनाथजींना पहिला हृदयविकाराचा पहिला झटका बसला. १९६५ साली त्यांना अर्धांगवायुचा (पॅरॅलिसीस) झटका बसला. त्यानंतर ते फक्त ३ वर्षे होते. तोपर्यंत त्यांचे बंधु, आई, बहिण सगळेच गेलेले त्यामुळे ओंकारनाथजींजवळ कुणीच नसे.
डॉ. राजम लिहीतात की गुरुंकडे ह्या काळात बघवत नसे. ६५ वर्षी गुरु स्वतः घर साफ करत असत. एकदा पुर्णपणे अंथरुणाला खिळल्यानंतर खुपच कमी शिष्यांना त्यांची सेवा करता आली. बलवंत राय भट हे त्यांच्यासोबत शेवटपर्यंत (२९ ऑक्टो. १९६७) होते.
अश्या ह्या प्रखर, प्रेमळ, सात्त्विक, शिस्तप्रिय व संगीत मेरुमणीला शतशः प्रणाम !!!!
=======================================================================
तळटिप : हिंदुस्तानी संगीतामधल्या कलाकारांची एक आठवण म्हणुन हा एक प्रयत्न. काही त्रुटी राहील्यास नक्की सांगा. आपल्या प्रतिक्रिया ऐकायला नक्कीच आवडेल.
छायाचित्र : जालावरून साभार. ओंकारनाथजींच्या काही चिजा इथे ऐकता येतील.

1 comment:

suhas modar blog said...

Hi mukulji... mi pandit Omkarnath thakur yancha lekh vachala. far cchan lihia aahe. pls mala 09867722166 ya no. var call karal ka? mala thoda classical music babat bolayavha aahe.
Regards,
suhas modar
Mumbai