किराणा घराण्याचा संक्षिप्त इतिहास...
सप्रेम नमस्कार मंडळी..
आज आपण किराणा घराण्याचा थोडक्यात आढावा घेऊयात..
किराणा घराण्याचा इतिहास हा थोडासा विचित्र आणि थोडासा वादातीत आहे तरीही ते घराणं सर्वात जास्त लोकप्रिय आहे.
असं सर्वसाधारण समज आहे की किराणा घराणं उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेबांपासून सुरु होतं.पण ते काही खरं नव्हे. तर, अमिर खुस्त्रोचा शिष्य 'गोपाल नायक' किराणा घराण्याचा खरा आद्य पिता आहे. त्याच्यापासुन किराणा घराणं सुरु झालं. पुर्वी तो दुताई नावाच्या यमुनातीरी असलेल्या गावी रहात असे. पण त्याने यमुनेच्या पुरामुळे आपला मुक्काम मुझफ्फरनगर जिल्ह्यातील 'किराणा' ह्या गावी हलवला. त्यामुळं ह्या घराण्याला नावं 'किराणा घराणं' असं पडलं. हे कधी झालं याची काही माहीती मिळत नाही. त्यानं पुढे जाऊन 'इस्लाम' धर्माचा स्विकार केला होता असं मानलं जातं.
गोपाल नायकांपासुन किराण्याच्या ४ उपशाखा निघाल्या त्या अशा..
गोपाल नायक
|
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
| | | |
१. २. ३. ४.
१.१ उस्ताद अजीम खाँ २.१ उस्ताद बंदे अली खाँ ३.१ उस्ताद गफुर खाँ ४.१ मेहेबूब बक्ष
१.२ मौला बक्ष २.२ उस्ताद नन्हे खाँ ३.२ उस्ताद वाहीद खाँ ४.२ रेहमान खाँ
१.३ अब्दुल घानी खाँ २.३ उस्ताद काले खाँ ३.३ शकुर खाँ ४.३ अब्दुल माजीद खाँ
२.४ उस्ताद अब्दुल करीम खाँ ३.४ मशकूर अली ४.४ अब्दुल हमीद खाँ
३.५ मुबारक अली ४.५ अब्दुल बशीर खाँ
४.५.१ नीयाज़ अहमद खाँ
४.५.२ फैयाज़ अहमद खाँ
एक आपले लोकप्रिय उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब सोडले तर बाकीच्या शाखा एक तर काळाच्या ओघात नाहीश्या झाल्या किंवा विविध कारणांमूळे पुढे येऊ शकल्या नाहीत.
आता बघुयात उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेबांचा शिष्य परीवार..
१. रामभाऊ कुंदगोळकर उर्फ सवाई गंधर्व,
२. रोशनाआरा बेगम़,
३. बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी,
४. बेहेरेबुवा,
५. उस्ताद अब्दुल रेहमान उर्फ सुरेशबाबु माने, (खाँसाहेबांचे मोठे चिरंजीव),
६. हिराबाई बडोदेकर, (खाँसाहेबांची मोठी मुलगी)
बघा, वर एकसे एक नावं. एका नाव झाकावं आणि दुसरं उघडावं अशी एक एक नावं आणि अशी त्यांची कारकिर्द..
आता सवाई गंधर्वांचे शिष्यगण बघुयात,...
१. गानतपस्विनी गंगुबाई हनगल,
२. पं. भीमसेन जोशी (अण्णा),
३. पं. फिरोज़ दस्तुर,
४. डॉ. प्रभा अत्रे,
५. पं. संगमेश्वर गुरव,
पं. संगमेश्वर गुरव यांच गाणं ऐकण्याचा योग कधी आला नाही पण आपण सगळेच जण बाकीच्या वरील मोठ्या लोकांचे गाणं भरभरुन ऐकत आहोत. वरील ह्या मोठ्या गुरुंच्या शिष्यांपैकी खालील शिष्य जे किराण्याची पताका धरुन आहेत किंवा होते असे,
१. कै. कृष्णा हनगल (गंगुबाई हनगल यांची मुलगी),
२. श्रीकांत देशपांडे,
३. माधव गुडी,
४. नारायणराव पटवर्धन,
५. मिलींद चित्तल,
ह्या सगळ्यांनी आपापली गायकी सिद्ध केलेली आहेच. ह्या सगळ्यांना ही लक्षवेधक लोकप्रियता मिळाली कारण किराण्याची एका विशिष्ठ पद्धतीने विकसित होत जाणारी ख्याल व आलापीची पद्धत. आणि त्यातून विकसित होत जाणारा प्रत्येक स्वर.
उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेबांनी घराणेदार पेशकश करताना त्यात निरनिराळ्या दक्षिण भारतीय पद्धतीच्या सरगमांचा अलंकारी प्रयोग केला होता. खाँ साहेबांनी अजुन एक नोंद घ्यावी असा छान केलेला प्रयोग म्हणजे किराणा घराण्याच्या भरदार गायकीत भावपुर्ण, आर्त, सुंदर अशा प्रणयप्रिय चिंजाचा अंतर्भाव. मंडळी, खाँ साहेबांचा स्वःताचा आवाज अतिशय नादमय आणि नाजूक होता त्यामूळे त्या चिजा अजुनच खुलत असत. खाँ साहेब स्वःत अतिशय जागरुक असत आपला आवाज जपण्यासाठी बरंका.
किराण्याची गोष्ट चालू असताना पं. भीमसेन (अण्णा) यांच्या शिवाय हा लेख पुर्ण होऊच शकत नाही, इतकं त्यांच कार्य मोठं आहे. अण्णांच्या गायकीनं किराणा घराणं चांगल्या पद्धतीने बदलाला सामोरं गेलं. आजच्या काळात ते किराण्याचे मुख्य आधारस्तंभ आहेत तर बाकीचे बिनीचे शिलेदार.
अहोरात्र केलेला रियाझ, अखंड असलेली गुरुभक्ती, प्रचंड विचार व विद्वत्ता ह्या आणि अश्या असंख्य कारणांनी किराणा घराणं कायम लोकप्रिय राहिलेलं आहे आणि तसच राहु दे अशी प्रार्थना करुन इथेच थांबतो.
हा लेख इथेही पाहु शकता...
No comments:
Post a Comment