Thursday, September 8, 2011

जयपूर-अत्रोली गानपरंपरेतील गायक उस्ताद अजिजुद्दीन खाँ (बाबा) यांचे अलीकडेच निधन झाले. त्यानिमित्ताने.. भारतीय शास्त्रीय संगीताचे खास वैशिष्टय़ असे की, भारतीय संगीतात ‘गायक’, ‘गवैया’ आणि ‘वृंदवादन दिग्दर्शक’ असे तीन प्रकार आहेत. त्यापैकी ज्याच्याजवळ बंदिशींचा आणि रागांचा विपुल प्रमाणात संग्रह आहे, तो केवळ प्रगल्भ शिष्यांना मार्गदर्शन करू शकतो, त्याला नायक म्हणून संबोधले जाते. याचाच चांगला उपयोग करून घेत जो शिष्यांना गाणेही शिकवितो तो ‘गायक’, तर ‘गवैया’ हा मैफलीचा कलाकार. उस्ताद अजिजुद्दीन खाँ (बाबा) हे दुसऱ्या प्रकारचे विद्वत्ता असलेले असे व्यक्तिमत्त्व होते. उस्ताद भुर्जी खाँ साहेबांचे सुपुत्र आणि संगीत सम्राट खाँ साहेब अल्लादियाँ खाँ यांचे नातू असलेले बाबा, जयपूर-अत्रोली घराण्याच्या गौरवशाली परंपरेतून, रक्ताच्या नात्यामधून आजच्या आघाडीच्या कलाकारांना मुक्त हस्ते दुर्मिळ रागातील बंदिशी शिकविण्यापासून, ‘घराण्याचे खलिफा’ या उपाधीपर्यंत जाऊन पोहोचले होते. बाबांचा जन्म ७ फेब्रुवारी १९२१ रोजी राजस्थानमधील उनियारा येथे झाला. अगदी लहान वयातच बाबांना अल्लादियाँ खाँ साहेबांचे बंधू हैदर खाँ यांनी एकतारीवर स्वरसाधना करायला लावली. १९३० नंतर वडील भुर्जी खाँ यांनी आपल्या तरुण मुलाला आपल्या पंखाखाली घेतले. बाबांची शैक्षणिक प्रगतीही त्याचवेळी सुरू होती. १९३६ मध्ये आजोबा अल्लादियाँ खाँ साहेबांनी बाबांना मुंबईत वास्तव्यासाठी बोलावून घेतले. या वर्षांपासून ते खाँ साहेबांच्या निर्वाणापर्यंत म्हणजे १९४६ पर्यंत बाबांना खाँ साहेबांचा सहवास, तालीम, अप्रचलित रागांचे आणि बंदिशींचे भांडार संपादन करण्याचे भाग्य लाभले. बाबांना चुलते नसिरूद्दीन खाँ (बडेजी) यांच्याकडूनही मार्गदर्शन मिळाले. त्यांना विविध रागातील अनेक बंदिशी अवगत होत्या. alt‘तोडी’, ‘भैरव’, ‘बिलावल’, ‘गौरी’, ‘श्री’, ‘कल्याण’,‘केदार’, ‘नट’, ‘कानडा’, ‘बहार’, ‘मल्हार’ यांचे अनेक प्रकार व बंदिशी याची बाबांना तालीम मिळाली होती. ‘सुनवंती’, ‘लाजवंती’, ‘विराट’, ‘मेघावली’,‘बिलावली’, ‘हिंडोली’ अशी अनवट दुर्मिळ रागरत्ने केवळ बाबांच्याच खजिन्यात होती.
वैद्यकीय कारणास्तव बाबा मैफलीत गाऊ शकले नाहीत, तरी बाबांनी आपल्याजवळ असलेले हे स्वरसंचित अनेकांना देण्यात धन्यता मानली. पं.मल्लिकार्जुन मन्सूर, पं.वामनराव सडोलीकर, पं.आनंदराव लिमये, पंडिता धोंडुताई कुलकर्णी, पं.मधुसूदन कानेटकर, पं.जितेंद्र अभिषेकी, श्रुती सडोलीकर-काटकर, श्रअरुण कुलकर्णी, पं.पंचाक्षरी मत्तीकट्टी या साऱ्यांचे गुरू होते बाबा. ही शिष्यमंडळी अखेपर्यंत बाबांकडे हक्काने येत व अलोप अनवट रागातील बंदिशी चिजा त्यांच्याकडून घेत. एक गुरू म्हणून बाबा अमरच राहणार आहेत. कारण इतक्या शिष्यांकडून प्रसृत झालेली जयपूर गायकी अमरच आहे. केवळ गुरू म्हणूनच नव्हे, तर एरवीही बाबांच्या वागण्या-बोलण्यात एक मर्यादाशील सभ्यता होती. कलाकार कितीही छोटा असला तरी त्या कलाकाराचे गाणे शेवटपर्यंत थांबून ऐकत व त्याला प्रोत्साहन देत. त्यामुळे बाबांची मैफलीतली उपस्थिती ही एक आदरयुक्त शान असे. गायन समाज देवल क्लबवर तर बाबांचे अलोट प्रेम होते. १२५ वर्षांच्या देवल क्लबच्या अंगा-खांद्यावर वाढल्याची त्यांची भावना होती. प्रकृती साथ देत नसतानाही गेल्याच महिन्यामध्ये संस्थेच्या रंगमंदिराच्या उद्घाटनासाठी केवळ बाबा याच भावनेने उपस्थित होते. बाबांनी खाँ साहेबांकडून वारसा हक्काने विद्याधन तर मिळविलेच; पण खाँ साहेबांच्या शेवटच्या तीन वर्षांत त्यांना एकांत मिळाला तेव्हा खाँ साहेबांकडून त्यांच्या जीवनातही अनेक घटना, पूर्वजांविषयी माहिती, त्यांचे पराक्रम या संबंधीची माहिती मिळविली आणि खाँ साहेबांच्याच शब्दांत ती लिहून ठेवली. या माहितीचा अनुवाद इंग्रजी भाषेमध्ये mylife या नावाने पुस्तक रूपात प्रकाशित झाला आहे. अशा बाबांच्या जाण्याने अल्लादियाँ खाँ साहेबांच्या जयपूर-अत्रोली गान परंपरेतील शेवटचा शिलेदार, एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, गेली जवळपास ५० वर्षे ज्ञानदान करणारं एक गुरुछत्र काळाच्या पडद्याआड गेलं आहे. ===============================================================
सदर लेख बुधवार, सोमवार, ४ सप्टेंबर २०११ च्या लोकसत्ताच्या 'लेख' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.

Monday, August 1, 2011

उस्ताद रहीम फहिमुद्दीन डागर


अस्सल भारतीय संगीताचा ज्ञात प्रवाह म्हणजे ध्रुपद गायकी. इथल्या मातीचा गंध असणारी आणि इथल्या निसर्गात आणि संस्कृतीत विकास पावलेली ही गायकी गेली अनेक शतके आपले अस्तित्व टिकवून आहे, कारण त्यामध्ये नव्याने भर टाकणारे अनेक प्रतिभाशाली कलावंत दर काही काळाने निर्माण होत गेले. उस्ताद रहीम फहिमुद्दीन डागर हे अशाच अतिशय सर्जनशील कलावंतांपैकी एक होते. त्यांच्या निधनाने ध्रुपदाचा घुमारा मंदावला आहे. माणसाला संगीताचा शोध लागल्यानंतर त्याने त्यातील शैलीसातत्यासाठी ज्या अनेक कल्पना योजल्या त्यातील काही योजना छंद, प्रबंध, ध्रुव आणि मत्त या चार प्रकारांमध्ये निबद्ध केल्या. त्या कल्पनांचा विलास करता करता त्यातून चार शैली विकसित पावल्या. त्या शैलीतून बाहेर आल्या त्या ‘बानी’ (म्हणजे वाणी) खंडर बानी, नौहर बानी, गौहर बानी आणि डागर बानी. ही वाणी स्वरात भिजवत ठेवून मुरवत मुरवत तिला अत्युत्तम अशा रसपूर्ण करण्याकरिता गेल्या शेकडो वर्षांत ज्या अनेक अज्ञात कलावंतांनी योगदान दिले, त्यामध्ये डागर बानीचे महत्त्व फार मोठे आहे. ज्ञात इतिहास मियाँ तानसेनापर्यंत पोहोचतो. म्हणजेच मुसलमानांच्या भारतावरील आक्रमणापर्यंत. त्याहीपूर्वी ध्रुपद गायनशैली विकास पावत होती. या डागर घराण्याने गेल्या २८ पिढय़ा ही गायनशैली घरातील पुढच्या पिढीपर्यंत नेऊन ठेवली आहे. एका अर्थाने भारतीय संस्कृतीवर त्यांनी केलेले हे उपकार परत न फेडता येण्याएवढे मोठे आहेत. फहिमुद्दीन डागर यांनी ध्रुपद शैलीचा प्रसार करण्यासाठी आपले सारे आयुष्य खर्ची घातले. उत्तम आलापी आणि त्यातून होणारे अप्रतिम असे रागदर्शन असे त्यांचे गाणे होते. नव्या पिढीला या शैलीतील बारकावे समजावून सांगत त्यांना त्याची गोडी लावणे हा फहिमुद्दीन खाँसाहेबांचा आवडता विषय होता. ‘स्पीक मॅके’ या अभिजात संगीताच्या प्रसारासाठी सुरू झालेल्या चळवळीचे खाँसाहेब संस्थापकच होते. पद्मभूषण, मैहर फौंडेशन पुरस्कार, कालिदास सन्मान, उस्ताद हफीज अली खाँ पुरस्कार, नाद पुरस्कार हे त्यांच्या स्वरदर्शनाचे लौकिक पुरावे. परंतु खाँसाहेबांनी आयुष्यभर डागर बानी विकसित करण्याचे ध्येय ठेवले आणि ध्रुपद शैली संग्रहालयात जाऊन स्थिरावण्यापासून वाचवले. स्वत: संस्कृतचे उत्तम जाणकार असल्यामुळे या शैलीचा इतिहास आणि परंपरा यांचे त्यांना चांगले भान होते. संगीतात केवळ विद्वान असून चालत नाही. ही विद्वत्ता प्रत्यक्ष मैफलीत दिसणे फार अगत्याचे असते. अशा मोजक्या कलावंतांपैकी फहिमुद्दीन खाँ हे एक होते. स्वरांशी लडिवाळपणे खेळत त्यातील प्रत्येक बारीकसारीक तपशिलाची सौंदर्यपूर्ण उलगड करत ते ज्या रीतीने रागमांडणी करत, ती ऐकताना श्रोता हरखून जात असे. नवनिर्मितीच्या ध्यासातून ध्रुपदातून ख्यालाचा जन्म झाला. पण भारतातील डागर यांच्या घराण्याने ध्रुपद शैलीत राहूनच नवनिर्मितीचे आव्हान पेलले, हे अधिक महत्त्वाचे आहे. उस्ताद रहीम फहिमुद्दीन डागर यांच्या निधनाने हे आव्हान समर्थपणे पेलणारा एक थोर संगीतकार हरपला आहे.
===============================================================
सदर लेख बुधवार, सोमवार, १ ऑगस्ट २०११ च्या लोकसत्ताच्या 'व्यक्तिवेध' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.

Friday, June 17, 2011

आज परत आमच्या विठ्ठलाचं दर्शन झालं...

आज परत विठ्ठलाचं दर्शन झालं....

आज परत आमच्या विठ्ठलाचं दर्शन झालं आणि जणु सारा आसमंत समोर फेर धरुन डोलायला आणि नाचायला लागला..आणि डोळ्यात पाणी उभं राहिलं....काय त्या विठ्ठलाचे भाव आणि त्याची रसाळ वाणी...अक्षरशः त्याचा एक एक शब्द नी सुर हॄदयात कोरुन ठेवावा असा. मोठ्या मोठ्या संत महंत, थोर पुरुषांना मानणारा आणि त्यांच्यावर असीम श्रद्धा ठेवणारा आणि त्यांच्या प्रती असलेली ती श्रद्धा आपल्या भावातुन आणि सुरातुन उलगडुन दाखवणारा हा आमचा विठ्ठल..कुठे ठेवायचे ह्या विठ्ठलाचे उपकार आणि त्यांची ती सुरांची पुरचूंडी कशी नी कुठे ठेवायची हे ठरवणार? कुठे गेली ही माणसं..??

ह्या विद्वजनांच्या पायाशी बसुन गाणं शिकावं, त्यांनी आपला कान पकडुन गाणं शिकवावं अशी माणसं कुठं मिळणार..कधी मिळणार ती सैनत..??

Wednesday, April 27, 2011

माधव गुडी

किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित माधव गुडी यांचे अकाली निधन होणे ही संगीताच्या आणि विशेषत: किराणा घराण्याच्या दृष्टीने दु:खकारक घटना आहे. ‘कर्नाटक भीमसेन’ म्हणून माधव गुडी यांनी आयुष्यभर संगीताची सेवा केली. गुरू भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्यावर असलेली त्यांची भक्ती हा भारतीय संगीत संस्कृतीमधील एक आदर्श म्हणावा असा अध्याय आहे. जगात फक्त भारतीय संगीतातच नवनवोन्मेषी प्रतिभेला प्रत्यक्ष सादरीकरणात महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कला सादर करत असताना जे सुचते, ते तिथेच व्यक्त करण्याची मुभा कोणत्याही कलावंतासाठी आव्हानात्मक असते. आपली प्रतिभा सतत जागती ठेवणे आणि तिला सतत वृद्धिंगत करणे हे भारतीय संगीतातील प्रत्येक कलावंताचे कर्तव्यच समजले जाते. त्यामुळेच या कलेच्या प्रांतात गुरूचे महत्त्व अनन्यसाधारण असते. माधवराव गुडी यांनी आपल्या गुरुच्या चरणी आपले सारे सर्वस्व अर्पण केले आणि त्यामुळे त्यांना संगीतात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करता आले. सततचे दौरे आणि मैफली यामुळे मैफली गवयांना शिष्य तयार करण्यास वेळ मिळत नाही. समोर बसवून तालीम घेण्याएवढी फुरसत मिळत नसल्यामुळे शिष्याला गुरूच्या सहवासातून मिळवावे लागते. गुडी यांनी भीमसेनजींचे शिष्यत्व पत्करल्यापासून ते त्यांच्यासोबत सावलीसारखे राहिले. माधव गुडी यांनी भीमसेनी शैलीचा नीट अभ्यास करून ती आत्मसात केली आणि आपल्या गायकीवर भीमसेनी मोहोर उमटविण्यात यश मिळवले. भीमसेनजींनीच ‘शिष्योत्तम’ अशी पदवी देऊन माधवरावांचे कौतुक केले होते. सरळ मनाचा आणि सतत स्वरात डुंबलेला हा कलावंत आयुष्यभर अजातशत्रू राहिला. भारतीय संगीतात उत्तर हिंदुस्थानी आणि कर्नाटक अशा संगीताच्या दोन समांतर परंपरा आहेत. या दोन्ही परंपरांना देदीप्यमान असा इतिहास आहे. कर्नाटकात राहून तेथील कर्नाटक संगीत शैलीचे अनुकरण न करता उत्तर हिंदुस्थानी संगीतातील किराणा घराण्याची शैली आत्मसात करण्याच्या माधव गुडी यांच्या प्रयत्नांना सवाई गंधर्व, गंगुबाई हनगळ आणि भीमसेन जोशी यांची परंपरा होती. वडील कीर्तनकार असल्याने माधव गुडी यांच्यावर स्वरांचा संस्कार लहानपणीच झाला. भीमसेनजींकडे गायन शिकायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी त्यांच्या शैलीतील सारे बारकावे सूक्ष्मतेने टिपले आणि आपल्या गळ्यात उतरवले. पंडितजींबरोबर सारा देश हिंडणाऱ्या शिष्यांमध्ये माधवराव अग्रेसर होते. कर्नाटक कला तिलक, गायन कला तिलक, गानभास्कर, अमृता प्रशस्ती, संगीत साधक, संगीत रत्न, यशवंतराव चव्हाण पुरस्कार असे अनेक पुरस्कार माधव गुडी यांना मिळाले. भारतातील अनेक संगीत परिषदांमधून त्यांचे सतत गायन झाले. अलीकडच्या काळात गळा रुसला असला, तरीही माधवरावांनी आपली संगीत साधना सुरूच ठेवली होती. भीमसेनजींच्या मृत्यूनंतर त्यांचे शिष्य श्रीकांत देशपांडे आणि आता माधव गुडी यांच्या निधनाने किराणा घराणे शोकाकुल होणे स्वाभाविकच आहे.
===============================================================
सदर लेख बुधवार, सोमवार, २५ एप्रिल २०११ च्या लोकसत्ताच्या 'व्यक्तिवेध' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.

Monday, March 21, 2011

मारवा


मी वसंताचा पेटीवाला. अनेक वर्षे साथ केली आहे. असंख्य मैफली आठवतात. नागपूरला रात्रभर गाणे झाले. सकाळी बाबूरावजी देशमुखांकडे चहा घेऊन अकराची गाडी गाठायची म्हणून गेलो. गाडीला दोन तास अवकाश होता म्हणून तंबोरे जुळवले, संध्याकाळी सहा वाजता मैफली संपली. तोडीने सुरू झालेली मैफल पुरिया धनाश्रीने संपली. तोपर्यंत नागपूरची गाडी मुंबईअच्या अर्ध्या वाटेवर पोहोचली होती. पार्ल्याला तर आम़च्या आणि आमच्या स्नेह्यांच्या घरी वसंताच्या अनेक बैठकी झाल्या. वातावरण गार झाले. वसंत बापट, नंदा नारळकर, माझे बंधू, शरू रेडकर अशी वसंताला आज अनेक वर्षे गवई मानणारी मित्र मंडळी होती. पुन्हा गवसणीतले तंबोरे निघाले आणि तीन वाजता भटियारा सुरु झाला. मारव्याने तर मी वसंताकडून इतक्या तर्‍हेचे स्वरुप पाहिले आहे की त्याला तोड नाही. वसंताला मारवा सर्वात अधिक रुचावा हे मला मोठे सूचक वाटते.ष्‌डज पंचमाला म्हणजे अत्यंत आवश्यक आधाराचा पाठिंबा नसलेला तो राग. वसंतानी जीवनही असेच काहीसे. लहानपणी हक्काच्या घराला मुकलेला. गायक म्हणुन असामान्य असूनही घराण्याचा पंचम पाठिशी नाही. आर्त, अदास, आक्रमक, विचित्र पण अत्यांत प्रभावी असा प्रकाशाच्या झोतला पारखा असलेला हा संधीकालातला समोर फक्त अंधार असलेला हा राग! हा राग वसंता अति आत्मीयतेने गातो. एक जागा पुन्हा नाही असली अचाट विवीध. गझल गायला तर बेगम अखतर सलाम करुन दाद देतात. थिरखवासाहेब 'गवय्या' मानतात. भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, त्याच्या गुणावर लुब्ध. विद्याहरणातली अभिजात गायकीवर रचलेली गाणी एखाद्या नवख्या विद्द्या्र्थींची नम्रतेने स्वत: ज्योत्स्नाबाई भोळे शिकतात. चंपुताईंच्या घरची मैफल वसंताशिवाय सजत नाही. इतकेच कशाला पण आमच्या सारख्यांच्या आग्रहामुळे त्याने गांधर्व महाविद्यालयाची संगीतातली सर्वोच्च पदवी मिळवली. वसंता आता डॉ. देशपांडे आहे. पण आकाशवाणीला त्याचे हे खानदानी संगीतातले स्थान मान्य नाही.
वसंत देशपांड्याचा आकाशवाणी वर अभिजात संगीत गाणारा कलावंत होण्याचा प्रश्न बेळगाव महाराष्ट्राला देण्याचा प्रश्नासारखा कधीपासून लोंबतो आहे. ज्या अधिकार्‍यांनी तो सोडवायचा त्यांनी कोणाच्या भीतीने तो डावलला आहे हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. ज्यांच्या गल्लीत ताल नाही आणि मोहल्ल्यांत सूर नाही असे गायक-गायिका आकाशवाणीवर नित्य नियमाने राग-रागिण्या नासत बसलेल्या असतात आणि वसंतराव देशपांड्यांना मात्र तिथे स्थान नाही. ह्याचे मला वाटते एकच मुख्य कारण की वसंताला घराण्याचा टिळा नाही. वसंताचे दुर्दैव हे की की तान गळ्यात यायला बर्‍याच लोकांना तास तास घासत बसावे लागते ती वसंताला क्षणात येते. स्वर टिपण्याच्या बाबतीतली त्याची धारणा किती अलौकिक आहे ह्याची साक्ष महाराष्ट्रातले सगळे म्युझिक डायरेक्टर्स देऊ शकतील. अनवट राग असो, लावणी असो, वसंतराव ब्लॉटिंग-पेपरसारखी सुरावट टिपतात. वसंताचा एकच मोठा दोष की संगीतात हिंदूही नाही यवनही नाही. 'न मी के पंथाचा' म्हणणार्‍या केशवसूतांसारख्या सूरांच्या साकल्याच्या प्रदेशातला हा पांथस्थ आहे. कारकुनाच्या मर्यादशीतलेने घरगिरस्ती चालवणारा वसंता दोन तंबोर्‍यांच्या मध्ये मात्र स्वत:च्या खयाले चालवणारा आहे. तिथे त्याची कलंदरी दिसते. समोरच्या श्रोत्यांवर प्रेम जमले की गंमत म्हणून वसंता नकला करील. नाना गमती करील, पण तिथेही ह्या विदुषकीमागे दडलेली विद्वत्ता लपत नाही.

Wednesday, February 23, 2011

एकवार पंखावरुनी...बाबुजी..

आज परत तो दिवस उगवला..आणि माझ्या आठवणींमधली एक एक गाणी मनात रुंजी घालू लागली...एवढ्यातच अण्णांच आपलं पृथ्वीतलावरचं घरटं देहरुपानं सोडुन गेले तेव्हा मनात दुखा:शिवाय काहीही नव्हतच, त्यातच माझं अत्यंत आवडतं गाण समोर आलं नी माझे ढसाढसा अश्रु ओघळु लागले...

केवढा तो अर्थ. गदिमांचा परिसस्पर्श झालेलं हे गाणं आणि बाबुजींचा टिपेला पोहोचलेला स्वर...क्या केहने..

एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात |
शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात ||

काय म्हणतो बघा हा कवी....देवा, एकदा तरी तुझा मायेचा हा हात माझ्या पाठीवरुन फिरु दे..
मला माहीत आहे की माझं शेवटचं घरटं हे तुझ्याच अंगणात असणार आहे... ह्या रुपकाला काय दाद द्यायची..?

धरेवरी अवघ्या फिरलो, निळ्या अंतराळी शिरलो|
कधी उन्हामध्ये न्हालो, कधी चांदण्यात ||

वने, माळराने, राई,
ठायी, ठायी केले स्नेही |
तुझ्याविना नव्हते कोणी, आत अंतरात ||

कवी म्हणतो..देवा संपुर्ण जग फिरलो...कितीतरी प्राणी,पक्षी मित्र केले पण शेवटी काळजात तुझ्याशिवाय कुणीच नव्हते. सगळीकडे तुझीच सोबत होती. कितीतरी ऊनपावसाचे खेळ पाहिले आणि झेलले तरी तुझा सहवास सिटला नाही..देवा आतातरी जवळ घे..

फुलारून पंखे कोणी, तुझ्यापुढे नाचे रानी |
तुझ्या मनगटी बसले कुणी भाग्यवंत ||

ह्यापुढे कवी काय म्हणतो बघा...जेव्हा सर्वांग सुंदर मोर पिसांचा पसार करुन वनात तुझ्यासमोर नाचतो तेव्हा त्या भाग्यवंतांना सुद्धा तुझा सहवास लाभला आहे....देवा आता मला कधी रे तुझा सहवास मिळणार?

शेवटच्या आर्त ओळीतर गदिमांच्या प्रतिभेचा अत्युच्च बिंदुच म्हणला पाहिजे...

मुका बावरा, मी भोळा
पडेन का तुझिया डोळा ? |
मलिनपणे कैसा येऊ, तुझ्या मंदिरात ||

ते म्हणतात, ह्या अथांग आणि असीम जगात जेव्हा फक्त सगळ्यांना सुंदर, सुस्वरुप, उत्तम वाणी आणि हुशार लोक जवळ हवे असतात तेव्हा तिथे माझ्यासारखा दुर्बळ तुझ्या नजरेस पडेल का रे? कारण, तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे काम करावं लागेल ते करताना माझ्या हातुन कुठलीही लहानशी सुद्धा चुक, पाप घडु देऊ नकोस, देवा..नाहीतर त्या मलीन झालेल्या तन-मनाने शेवटी तुझ्या दारात, मंदिरात तरी कसा येऊ रे?

मित्रहो, आपले गदिमा आणि बाबुजींची ही कलाकृती हृदयात जपुन ठेवावी अशीच....

त्याच जोडीला रमेश देव आणि सीमा देव यांचा नुसत्या चेहरा आणि डोळ्यांचा सुरेख अभिनय...बाजुला असलेले विवेकानंदाची मुर्ती आणि साईबाबांचा फोटो हे ह्या गीताला साजेसं साधं वातावरण...

एकंदरीत मित्रहो, भट्टी जमली. ही भट्टी शेवटी सहजतेनं आणि कुठलाही भपकेबाज नसलेली आहे त्यामुळे त्याला मरण नाही....
===============================================================

Friday, February 18, 2011

पंडित भीमसेन जोशीं


‘बसंत बहार’ आणि ‘अनकही’
शास्त्रीय संगीतातले गायक आणि फिल्मी दुनियेतले पाश्र्वगायक यांच्यात जेव्हा चित्रपटासाठी जुगलबंदी होते तेव्हा बाजी मारणारे मोहम्मद रफी आणि मन्ना डे असतात आणि मात खाणारे अमीरखॉं किंवा भीमसेन जोशी असतात, असं गमतीनं म्हटलं जातं. कारण काय असेल ते असो, पण पडद्यावरच्या नायकाला (वा नायिकेला) ज्याचा आवाज असतो तोच गायक (वा गायिका) जिंकणार हा जणू अलिखित नियम असावा. म्हणून तर ‘केतकी गुलाब जूही’ (बसंत बहार) या गाण्यात पंडित भीमसेन जोशींना मन्ना डेसमोर हार पत्करावी लागते, ‘बाट चलत नयी चुनरी रंग डारी’ (रानी रूपमती) या भैरवीमध्ये कृष्णराव चोणकरांना मोहम्मद रफीसमोर पराभूत व्हावं लागतं आणि ‘तिनक तिन तानी .. दो दिन कीजिंदगानी’ (सरगम) या लता मंगेशकरांसोबतच्या गाण्यात सरस्वती राणे यांना ‘विनोदी गायिके’ची भूमिका स्वीकारावी लागते. असो. शास्त्रीय संगीत आणि चित्रपट संगीत यांच्यात अढी निर्माण व्हायला हे असले प्रकार कारणीभूत ठरले असावेत. ‘बैजू बावरा’मधल्या जुगलबंदीसाठी एके काळी नौशाद यांना नकार देणाऱ्या बडे गुलामअली खॉँ यांनी पुढे ‘मुगल-ए-आझम’साठीही किती आढेवेढे घेतले आणि मग पाश्र्वगायनाला तयार होताना आपली किंमत कशी वसूल करून घेतली, त्याचे किस्से सर्वश्रुत आहेत. चित्रपटांतल्या गाण्याविषयी कोणताही आकस न ठेवता वा स्वत:चा बडेजाव न मिरवता पूर्णपणे समर्पित होऊन गायन करणारे दोन गायक जुन्या पिढीत होऊन गेले. पहिले उस्ताद अमीर खॉँ आणि दुसरे पंडित भीमसेन जोशी.
‘बसंत बहार’ (१९५६) हा चित्रपट शंकर जयकिशन या जोडीला मिळाला तेव्हा त्यांच्यासमोर नौशाद यांच्या ‘बैजू बावरा’चं आव्हान होतं. ‘बैजू बावरा’ मध्ये तानसेन आणि बैजनाथ यांच्यातल्या ‘आज गावत मन मेरो’ या जुगलबंदीसाठी उस्ताद अमीर खॉँ आणि डी. व्ही. पलुस्कर यांनी पाश्र्वगायन केलं होतं. ‘बसंत बहार’साठी तशीच एक जुगलबंदी करण्याची वेळ आली तेव्हा शंकर जयकिशन यांनी शास्त्रीय संगीतात नव्यानंच तळपू लागलेल्या भीमसेन जोशींना पाचारण केलं आणि त्यांचा मुकाबला ठेवला तो मन्ना डे यांच्याशी. भीमसेन जोशी यांनीच ऐकवलेल्या एका जुन्या बंदिशीवरून शंकर यांनी या गाण्याची चाल बनवली. त्यावर शैलेंद्र यांनी लिहिलेले शब्द होते-
केतकी गुलाब जूही चंपक बन फूले
ॠतु बसंत अपनो कंत गोरी गरवा लगाए
झूलना में बैठ आज पी के संग झूले..
भीमसेन यांच्यापेक्षा दोन वर्षांनी ज्येष्ठ असूनही हे गाणं गायच्या नुसत्या कल्पनेनंच मन्ना डे यांची कशी घाबरगुंडी उडाली आणि भीमसेनना ‘हरवायचं’ आव्हान मन्ना डे यांनी कसं पेललं ते सर्वश्रुत असल्यानं पुनरावृत्ती नको. मात्र, आवर्जून सांगायला हवं ते भीमसेन जोशी यांच्या दिलदार वृत्तीबद्दल. आपला आवाज नायकावर नव्हे तर एक खलपात्रावर चित्रित होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला हरावं लागणार आहे, ही बाब भीमसेन यांनी कोणत्याही तक्रारीविना मान्य केली. एवढंच नव्हे, तर रेकॉर्डिग झाल्यावर मन्ना डे यांना ‘तुमची तयारी चांगली आहे, तुम्ही शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात का येत नाही,’ अशा शब्दांत दादही दिली.
‘बसंत बहार’ नंतर भीमसेनजींचा स्वर हिंदी चित्रपटांत पुन्हा एकदा जोरकसपणे उमटला तो अमोल पालेकर दिग्दर्शित ‘अनकही’ (१९८४) मध्ये. यातली दोन भजनं गाण्यासाठी भीमसेन यांना कसं बोलावण्यात आलं, याविषयी पालेकर यांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. या चित्रपटाची नायिका मानसिकदृष्टय़ा रोगी असते आणि तिचे वडील शास्त्रीय संगीतातले फार मोठे गायक असतात. अनिल चटर्जी साकारत असलेल्या या भूमिकेसाठी दोन भजनं करावीत असं अमोल पालेकर आणि संगीतकार जयदेव यांच्यात ठरलं. ही भजनं कोणा गायकाकडून गाऊन घ्यावीत यावर खल सुरू असताना जयदेव म्हणाले, ‘‘या व्यक्तिरेखेचा विचार करता या गाण्यांना भीमसेन जोशी यांच्यासारखाच गायक हवा.’’
भीमसेन जोशी यांच्यासारखा गायक हवा तर मग भीमसेनच का नकोत? झालं, पालेकरांनी जयदेवजींची अनुमती घेऊन थेट पंडितजींना फोन लावला. ‘पंडितजी, एका कामासाठी भेटायला यायचंय. कधी येऊ?’ सुदैवानं पंडितजींचा अमोल पालेकरांवर विलक्षण लोभ होता. ‘‘तुम्हाला भेटायला परवानगी कशाला हवी? असं करू, उद्या मी दौऱ्यावर जाणार आहे. मुंबईला विमानतळावरच थोडा वेळ भेटू या,’’ पंडितजी म्हणाले.
दुसऱ्या दिवशी विमानतळावरच्या पार्किंगमध्ये पालेकरांच्या मोटारीत या दोघांची भेट झाली. ‘एक सिनेमा करतोय ‘अनकही’ नावाचा. तुम्ही त्यासाठी दोन भजन गावीत एवढीच विनंती आहे..’ पालेकरांनी विषयाला हात घातला. कथा, व्यक्तिरेखा ऐकून घेतल्यानंतर पंडितजींनी विचारलं, ‘म्युझिक कोण देतंय?’ पालेकरांनी ‘जयदेव’ असं सांगताच कानाच्या पाळीला हात लावत पंडितजी उद्गारले, ‘फार मोठा संगीतकार आहे. मी जरूर गाईन. फक्त माझी एक अट आहे. जयदेवजींनी मला गाणं नीट शिकवायला हवं. माझी नीट तालीम त्यांनी करून घ्यावी.’
पालेकरांनी या भेटीचा वृत्तान्त सांगितला तेव्हा जयदेवजींच्या डोळ्यांत पाणीच तरारलं. तेही तयारीला लागले. ‘रघुवर तुमको मेरी लाज’ आणि ‘ठुमक ठुमक पग’ ही दोन भजनं भीमसेन यांच्यासाठी त्यांनी बनवली. गाण्यांची तालीम पालेकर यांच्याच घरी झाली. ‘मी तुमचा नवखा शिष्य आहे, असं समजून मला शिकवा. गाण्यातली प्रत्येक जागा न जागा मला समजावून सांगा,’ असं पंडितजींनी जयदेवजींना निक्षून सांगितलं. जवळजवळ दोन तास तालीम चालली.
प्रत्यक्ष रेकॉर्डिगच्या दिवशी भीमसेनजी ठरल्या वेळी स्टुडिओमध्ये आले. ‘अनकही’साठीच आशा भोसले यांच्या आवाजातल्या एका गाण्याचं रेकॉर्डिग नुकतंच संपलं होतं. त्या दोघांची समोरासमोर भेट झाली तेव्हा आशाताईंनी पंडितजींना वाकून नमस्कार केला. त्यानंतर सुरू झाली भीमसेन यांच्या रेकॉर्डिगची तयारी. ‘मी उभा राहून गाऊ शकत नाही, बसूनच गाईन’ असं त्यांनी सांगितल्यानं स्टुडिओमध्ये त्यांच्यासाठी तशी बैठक तयार करण्यात आली. वादक मंडळींमध्ये शिवकुमार शर्मा (संतूर), हरिप्रसाद चौरसिया (बासरी), झरीन दारूवाला (सरोद) अशा नामवंतांचा समावेश होता. वादक आणि गायक या सर्वाचं एकत्रिपणे रेकॉर्डिग करण्याचा तो काळ होता. पंडितजींनी दोन्ही भजनं तन्मयतेनं गायली. रेकॉर्डिग संपल्यानंतर भीमसेनजी म्हणाले,‘‘तुमच्या मनासारखं झालं ना गाणं? नाही तर पुन्हा एकदा करू.’’ जयदेवजी आणि पालेकर यावर काय बोलणार? दोघेही भारावून जाण्यापलीकडच्या अवस्थेत होते.
‘अनकही’ला त्या वर्षीचे दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. एक जयदेव यांना, तर दुसरा अर्थातच भीमसेनजींना. अभिनंदनाचा स्वीकार करताना पंडितजी पालेकर यांना म्हणाले,‘‘खूप छान वाटलं या गाण्यामुळे. एक वेगळं पारितोषक तुम्ही मला मिळवून दिलंत.’’
===============================================================
सदर लेख बुधवार, रविवार ३० जानेवारी २०११ च्या लोकसत्ताच्या 'लोकरंग' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.