Monday, October 8, 2012

पं. यशवंतबुवा जोशी

महाराष्ट्रात अभिजात संगीताची गंगोत्री आणणाऱ्या बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांची गायकी त्याच दिमाखात आणि त्याच लयीत परंपरेने टिकवून ठेवणाऱ्या यशवंतबुवा जोशी यांच्या निधनाने भारतीय संगीतातील एका संपन्न परंपरेतला एक तेजस्वी तारा निखळला आहे. गायकी शिकायची तर ती अंगात मुरवावी लागते. ती नुसती स्वरांच्या अंगाने म्हणजे बंदिशीची स्वररचना मुरवून चालत नाही, तर लयीत घोळलेल्या स्वरशब्दांसह मुरवावी लागते.
यशवंतबुवांनी पुण्यात पं. मिराशीबुवा यांच्याकडे ग्वाल्हेर घराण्याची जी तालीम घेतली, ती त्यांच्यासाठी आयुष्याची शिदोरी ठरली. मिराशीबुवांनी थेट बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्याकडून ही गायकी आत्मसात केली आणि ती त्यांनी त्यांच्या शिष्यांपर्यंत इतक्या सहजपणे पोहोचवली, की त्यामुळे ग्वाल्हेर घराण्याचे मूळ स्वरूप त्यातील सगळय़ा सौंदर्यखुणांसह यशवंतबुवांनी ती अधिक सशक्तपणे आणि सर्जनशीलतेने रसिकांपर्यंत पोहोचवली. अंगकाठी किडकिडीत, पण आवाजात ताकद अशी की भलेभले थक्क व्हायचे. लयीच्या दुनियेतले यशवंतबुवा हे एक अतिशय सृजनशील कलावंत होते. तालातील मात्रांचे वजन सांभाळत, आलापी आणि बोलबढत करताना यशवंतबुवा जी करामत करायचे, ती फार सुंदर असे. पं. जगन्नाथबुवा पुरोहितांकडे गाणे शिकायला सुरुवात केल्यानंतर यशवंतबुवांना लयीकडे बघण्याची नवी दृष्टी मिळाली. त्यामुळे त्यांच्या गायनाला परिपूर्णता लाभली. मैफलीत यशवंतबुवांच्या आवाजाची फेक, त्यांची तान आणि त्यांची लयीवरची हुकमत चटकन ध्यानात येत असे. त्यामुळे त्यांच्या गाण्यात रटाळपणा कधीच जाणवत नसे. रागाचा रसपरिपोष करण्यासाठी अंगी प्रतिभा असावी लागते. ती त्यांच्याकडे होती. त्यामुळे ग्वाल्हेर गायकीचे मूळ स्वरूप सांभाळताना ती सतत नवरसनिर्मिती कशी करत राहील, याचा ध्यास त्यांनी आयुष्यभर घेतला. घराणेदार गायकीचा अभिजात अनुभव देणारे यशवंतबुवा हे उत्तम गुरू होते. गाणे शिकवायचे, म्हणजे केवळ राग आणि बंदिश शिकवायची नसते, तर घराणेदार गायकी त्यांच्यामध्ये मुरवायची असते, याचे भान त्यांनी त्यांच्या गुरूंप्रमाणेच ठेवले. त्यांचे निधन संगीतासाठी आणि ग्वाल्हेर घराण्यासाठी चटका लावून जाणारे आहे.
 ========================================================================
सदर लेख सोमवार, ८ ऑक्टोबर २०१२ च्या लोकसत्ताच्या 'लेख' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.

1 comment:

Anonymous said...

उत्तम विषय दर्जेदार लिखाण ! आवडलं !