Tuesday, June 23, 2015

धोंडुताई कुलकर्णी यांचे निधन

उस्ताद अल्लादिया खाँ यांनी भारतीय शास्त्रीय संगीतात प्रस्थापित केलेल्या जयपूर अत्रौली घराण्याच्या परंपरेतील गायिका गानयोगिनी धोंडुताई कुलकर्णी यांचे रविवारी मुंबईत बोरीवली येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. धोंडुताईंच्या निधनाने जयपूर अत्रोली घराण्याच्या परंपरेतील तान हरपल्याच्या भावनेने संगीत क्षेत्रात व्यक्त होत आहे. आपल्या संगीत परंपरेत कोणत्याही प्रकारची भेसळ होऊ नये अशा निष्ठेने शुद्ध परंपरा जपणाऱ्या आणि अखेरच्या श्वासापर्यंत या परंपरेशी एकनिष्ठ राहिलेल्या या महान गायिकेच्या निधनामुळे त्यांच्या शिष्यपरिवारावर शोककळा पसरली आहे.
अल्पचरित्र
कठोर संगीतसाधक
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर या कलानगरीत २३ जुलै १९३७ रोजी जन्मलेल्या धोंडुताईंनी वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच आपल्या वडिलांच्या प्रोत्साहनाने संगीत साधना सुरू केली. वयाच्या आठव्या वर्षां आकाशवाणीवर सादर केलेल्या गायनाच्या मैफिलीमुळे त्यांचे नाव संगीत क्षेत्रात पसरले. शिक्षणकाळातील कठोर आणि खडतर साधनेमुळे धोंडुताईंना अल्पावधीतच अनेक नामवंत गायकांच्या मैफिलीत आपली गानकला सादर करण्याची संधी मिळाली.
धोंडुताईंचे वडील कोल्हापूरमध्ये शिक्षक होते. ते ग्वाल्हेर घराण्याचे चांगले जाणकार होते. त्या काळात कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात अल्लादिया खाँ यांचे पुतणे नत्थन खाँ यांच्या सुरांनी मंदिरातील पहाट प्रफुल्लित व्हायची. हे सूर कानावर पडावेत यासाठी लहानपणीच धोंडूताई मंदिरात जात असत. येथूनच त्यांचा कान आणि संगीताची जाण तयार झाली. धोंडूताईंना गाणे शिकवा, असे साकडे एके दिवशी त्यांच्या वडिलांनी नत्थन खाँ यांना घातले, आणि धोडूताई त्यांच्या शिष्या झाल्या. तीन वर्षांतच नत्थन खाँ यांनी मुंबईत स्थलांतर केल्यानंतर अल्लादिया खाँ यांचे पुत्र भुर्जी खाँ यांनी महालक्ष्मी मंदिरात संगीत सेवा सुरू केली, आणि धोंडुताईंच्या वडिलांनी त्यांची भेट घेऊन धोंडूताईंना शिकविण्याविषयी विनंती केली. सूर्योदयाबरोबर सुरू होणाऱ्या या संगीत साधनेतून धोंडूताईंना आवाजाचा कस राखण्याचे कसब साधणे शक्य झाले. संगीताच्या शिक्षणासाठी धोडुताईंना शाळा सोडावी लागली. १९५० मध्ये भुर्जी खाँ यांचे निधन झाले. तोवर धोंडुताईनी त्यांच्याकडून संगीताचे सखोल ज्ञान आत्मसात केले होते. पुढे जवळपास सात वर्षे मार्गदर्शन नसतानाच्या काळात धोंडुताईंनी मैफिली सुरू केल्या. केसरबाई केरकर यांनी संगीत शिकण्यासाठी उत्सुक असलेल्यांना जाहीर निमंत्रण दिल्याने १९६२ मध्ये त्यांनी केसरबाईंना पत्र पाठवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संगीताचे धडे गिरविण्याची इच्छा व्यक्त केली आणि धोडुताई केसरबाईंच्या शिष्या झाल्या. धोंडुताईंच्या संगीतावर केसरबाईंच्या शैलीचा प्रभाव होता. धोंडुताई स्वत नेहमी त्याचा आदरपूर्वक उल्लेखही करीत असत.
संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल धोंडुताईंना १९९० मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
धोंडूताई कुलकर्णी यांच्या निधनामुळे एक करारी व खंबीर व्यक्तिमत्त्व आणि संगीताच्या सुवर्णकाळाच्या एक साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत, सांगीतिक आणि जीवनविषयक तत्वांच्या निष्ठेपायी त्यांनी कशाशीही तडजोड केली नाही. आयुष्यभर जे पटले, त्याचाच पाठपुरावा केला. संगीताच्या बाबतीत सांगायचे तर जयपूर अत्रौली घराण्याच्या परंपरेची शुद्धता जपली आणि वैयक्तिक बाबतीत, संगीताची सेवा करण्यासाठी अविवाहित राहिल्या. त्यांनी कशाचाही मोह धरला नाही आणि लोकमान्यता, राजमान्यता यासाठी तत्वांशी तडजोड केली नाही. एक परिपूर्ण आयुष्य त्यांना लाभले. अखेरच्या काळात त्यांच्या शिष्यांनी त्यांची खूप सेवा करून गुरु-शिष्य परंपरेचे नाते हे रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट असल्याचे दाखवून दिले. एक परिपूर्ण आयुष्य जगलेल्या धोंडूताईंच्या निधनामुळे मातृछत्र हरवल्यासारखे वाटत आहे.
अश्विनी भिडे- देशपांडे, गायिका
धोंडूताई या आमच्या जयपूर अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका होत्या. शुद्ध मोकळा आकारयुक्त बुलंद आवाज आणि स्वरांची भारदस्त मांडणी ही या घराण्याच्या गायकीची वैशिष्टय़े त्यांच्यात अंगभूत होती. या घराण्याची शुद्ध परंपरा त्यांनी जतन केली. किंबहुना जयपूर- अत्रौली घराण्याच्या गायकीबाबत धोंडूताईंचा शब्द अंतिम होता. जयपूर घराण्याची खास तालीम धोंडूताईंच्या गळ्यातून यापुढे ऐकायला मिळणार नाही. धोंडूताईंच्या निधनामुळे या घराण्याच्या परंपरेचे मूर्तिमंत अस्तित्व हरवले, याचे दु:ख वाटते.
रघुनंदन पणशीकर , गायक
======================================================================
Its been a year since Dhondutai passed away. By publishing above marathi except published in Loksatta on June 2, 2014, we want to remember Dhondutai and her gayaki. Thank you loksatta too.

1 comment:

Prasad R Karpe said...

या गानतपस्विनी बद्दल नमिता देवीदयाल यांच्या द म्युसिक रूम या पुस्तकातून विशेष माहिती मिळेल.