Friday, August 9, 2013

संगीत शिलेदार

jaymala shiledar: knight of music रंगभूमी अडचणीत असतानाच्या काळात जयमालाबाईंनी रंगभूमीवरच पाऊल टाकले. नंतर संगीत नाटक हेच आपले जीवनध्येय आहे आणि त्यासाठी होणाऱ्या कोणत्याही त्रासातून आपल्याला आनंदच मिळणार आहे, याची खात्री त्यांनी पुढील पिढीला दिली.
जयमालाबाई शिलेदार यांचा जन्मच संगीत नाटकासाठी झाला होता. जन्म झाला तोही याच संगीत नाटकाच्या परंपरेत मुरलेल्या नारायण जाधव यांच्या घरात. संगीत नाटके तेव्हा लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर होती. चित्रपटाचे आगमन दादासाहेब फाळके यांनी करवले होते, पण त्याला बोलते करता आलेले नव्हते. समाजाला उच्च अभिरुचीचे संगीत काय असते, याचा अंदाज नाटय़संगीतामुळे आला होता आणि अभिजात संगीतही राजे आणि सम्राटांच्या दरबारातून समाजाच्या पुढय़ात येऊन ठेपले होते. जयमालाबाईंना जन्मल्यापासूनच ज्या नाटय़संगीताचे बाळकडू मिळाले, तेच आपल्या आयुष्याचे ईप्सित आणि सुखनिधानही असेल, याचा अंदाज येण्यासाठीही फार काळ जावा लागला नाही. संगीत नाटकांचा जन्म झाला, तेव्हा म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस, नाटकातून स्त्रीला भूमिका करण्याची परवानगी समाजाने दिलेली नव्हती. एवढेच काय अशी नाटके पाहायलाही बराच काळ बंदी होती. सामाजिक क्षेत्रातील स्त्रीपुरुष भेदाभेदाच्या या साखळय़ा तोडून संगीत आणि नाटकही बाहेर पडायला बराच अवकाश जावा लागला. पण जयमालाबाईंच्या जन्मापर्यंत नाटकांमधून उच्च कुलातील मुलींना भूमिका करू देण्यास समाज राजी झाला होता. ती एक सांस्कृतिक क्रांतीच होती. त्यामुळे वयाच्या सोळाव्या वर्षांत पदार्पण करताना जयमालाबाईंनी आपल्या सुरेल गात्या गळय़ाला रंगभूमीला अर्पण करून टाकण्याचा निर्णय घेऊन टाकला. आयुष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे याचा कोणताही विचार न करता त्यांनी घेतलेला हा निर्णय अगदी शेवटच्या श्वासापर्यंत निभावण्याची हिंमत त्यांच्यामध्ये होती.
मोठाले डोळे, कपाळावर रुपयाएवढे कुंकू, हसतमुख चेहरा, अंगावर मोजकेच पण ठसठशीतपणे दिसतील असे दागिने, नीटनेटकेपणाने नेसलेली साडी आणि बोलताना होणारे मधुर उच्चार, रंगभूमीसाठी निश्चितच पुरेसे होते. पण तेवढय़ानेच भागण्यासारखेही नव्हते. संगीत रंगभूमीवर भूमिका करण्यासाठी या सगळय़ाच्या जोडीला, खरेतर काकणभर अधिकच, गळय़ात संगीत आवश्यक असते. जयमालाबाईंकडे तेही पुरेपूर होते. पदार्पणातच गोविंदराव टेंबे यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न कलावंताचे मार्गदर्शन मिळाल्याने चिंतूबुवा गुरव, गणपतराव बोडस यांच्यासारख्या दिग्गजांची शाबासकी मिळाली खरी, पण तोपर्यंत काळ बदलला होता. १९३१ मधील रुपेरी दुनियेच्या ‘बोलक्या’ अवतरणानंतर संगीत रंगभूमीचे वैभव ओसरायला लागले होते आणि तो सुवर्णकाळही पडद्याआड जाऊ लागला होता. महाराष्ट्राने जगाच्या संगीताला देणगी दिलेल्या या अवीट अशा संगीतप्रकाराची लोकप्रियता कमी झाली नसली तरीही रंगभूमी मात्र संकटात सापडली होती. जयमालाबाईंनी तशाही स्थितीत रंगभूमीवरच पाऊल ठेवण्याचे ठरवले. त्यानंतर आयुष्यात येणाऱ्या अपार कष्टांची चाहूल नसतानाही त्यांनी हा निर्णय घेतला, तेव्हा ‘रामजोशी’ या चित्रपटातून आपल्या अभिनयकौशल्याने सगळय़ांची मने जिंकून घेतलेल्या तेव्हाच्या तरुण आणि होतकरू जयराम शिलेदारांशी त्यांची भेटही व्हायची होती. जयराम यांचे जयमालाबाईंच्या आयुष्यातील आगमन हा केवळ त्या दोघांच्या आयुष्यातील सुवर्णक्षण नव्हता. त्यामुळे अडचणीत आलेल्या संगीत रंगभूमीला जीवदान मिळणार होते. झालेही तसेच. वयाच्या तेविसाव्या वर्षी जयमालाबाई आणि जयराम शिलेदार यांनी ‘मराठी रंगभूमी’ या संगीत नाटकाला वाहिलेल्या ‘नाटक कंपनी’ची स्थापना केली. लगेचच त्या दोघांनी रंगभूमीबरोबरच आपले आयुष्यही एकमेकांना अर्पून टाकण्याचे ठरवले. ज्या जिद्दीने जयमालाबाईंनी संगीत रंगभूमीवर पाऊल टाकले होते, ती जिद्द जागती ठेवण्यासाठी अचानकपणे आयुष्यात आलेल्या जयराम यांनी जी साथसंगत केली, त्याने मराठी संगीत रंगभूमीवर एक नवा दीपत्कार घडला.
चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे नाटक हा कलाप्रकारच जिवंत राहतो की नाही, अशी परिस्थिती असताना छोटा गंधर्वासारखा एक अतिशय गोड गळय़ाचा कलावंत ती कला जिवंत ठेवण्यासाठी झटत होता. चित्रपटाच्या आगमनानंतर बालगंधर्वानाही प्रभात चित्रच्या ‘संत एकनाथ’ या चित्रपटात भूमिका करण्याचा मोह आवरता आला नव्हता. चित्रपटाच्या या दुनियेत आपले मन रमणार नाही, याची पुरेपूर खात्री असतानाही रंगभूमीच्या पुनरुज्जीवनासाठी खुद्द बालगंधर्वानी केलेले अनेक प्रयत्नही रसिकांच्या पचनी पडत नव्हते. चित्रपटाकडे वळलेल्या रसिकांना परत वळवण्यासाठी छोटा गंधर्वानी जे प्रयत्न केले, त्याला तोड नाही. पण त्यांच्या प्रयत्नांनाही पडणाऱ्या मर्यादा ओलांडून पुढे जाण्याची हिंमत शिलेदार पती-पत्नीने दाखवली आणि आजपर्यंत ही रंगभूमी टिकवून ठेवण्यात अतिशय मोलाचा वाटा उचलला. एकाच वेळी संसार, गायन, अभिनय, संस्थेची जबाबदारी, नाटकांचे गावोगावीचे दौरे अशा अनेक पातळय़ांवर लढाई करणाऱ्या जयमालाबाईंनी हे सारे श्रम आपल्या चेहऱ्यावर तसूभरही उमटू न देण्याची खबरदारी घेतली. संगीत रंगभूमी हाच आपला धर्म आणि तोच आपला ध्यास, असे जीवन जगताना येणाऱ्या अनंत अडचणींवर मात करण्यासाठी मन फारच खंबीर लागते. जयमालाबाईंना जयरामांच्या मदतीने तसे ते ठेवता आले. जोडीला कन्या कीर्ती आणि दीप्ती यांची सांगीतिक कारकीर्द फुलवत ठेवण्याचीही जबाबदारी या पालकांनी अतिशय आनंदाने स्वीकारली. शिलेदारांचे सारे कुटुंबच संगीत रंगभूमीसाठी आपले आयुष्य अर्पण करायला तयार झाले, याचे महत्त्वाचे कारण निष्ठा हे होते. ती जराही ढळू न देण्यासाठीचा निग्रह त्यांच्यापाशी होता. बालगंधर्वानी नाटय़संगीताला अभिजाततेच्या भरजरी वस्त्रांनी झळाळून टाकले होते. नाटय़संगीतातील तो एक मानदंड झाला होता आणि त्यालाही आपल्या प्रतिभेने नवे आव्हान देत मा. दीनानाथ आणि केशवराव भोसले यांच्यासारख्या कलावंतांनी ही रंगभूमी उजळून टाकली होती. दंतकथांनी भरलेल्या आणि त्या काळातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात भरून राहिलेल्या या नाटकांनी तेव्हाचे कलाजीवन समृद्ध केले होते.
जयमालाबाईंनी ही समृद्धी आणखी वाढवली आणि आपल्या कलागुणांनी तिला स्वराभिनयाच्या दागिन्यांनी नखशिखान्त मढवले. नाटय़संगीताच्या बरोबरीने अभिजात संगीताच्या क्षेत्रात आवडीने मुशाफिरी करत त्यांनी अखेपर्यंत आपला गळा गाता ठेवला. मराठी रंगभूमी या संस्थेतर्फे संगीत रंगभूमीला पुन्हा जीवदान देणाऱ्या शिलेदारांनी चित्रपट, दूरचित्रवाणी आणि त्यानंतर आलेल्या असंख्य नव्या आकर्षणांच्या मोहजालातही संगीत नाटक रसरशीतपणे जिवंत ठेवले. कीर्ती शिलेदार यांनी त्यात घातलेली भर अधिकच मोलाची. नव्या नाटकांची निर्मिती करत असताना परंपरेने आलेल्या नाटकांना नवा रंग देण्यासाठी हे सारे कुटुंब आयुष्यभर झटले.  पुरस्कार आणि मानमरातब वाटय़ाला येण्यासाठी आतासारखे माध्यमांचे मोहजाल नसतानाच्या काळात जयमालाबाईंनी अतिशय खडतरपणे आयुष्य व्यतीत केले. पण या साऱ्या वेदनांचा, कष्टाचा खासगीत किंवा जाहीरपणे उच्चारही न करण्याची अभिजातता त्यांच्यापाशी होती. संगीत नाटक हेच आपले जीवनध्येय आहे आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या त्रासातून आपल्याला मनोमन आनंदच मिळणार आहे, याची खात्री जयमालाबाईंनी पुढील पिढीला दिली आहे. कलावंताच्या चेहऱ्यावरील रंग उतरले की उरते ते वास्तव. त्याला सामोरे जाण्याचे धैर्यही जयमालाबाईंनी अभिनयातून आणि संगीतातूनच मिळवले. ज्यासाठी आपण जन्मलो, ते कार्य अखेपर्यंत करत राहता येण्याचे भाग्य त्यांना मिळाले. त्यांचे निधन केवळ शोकात्म नाही, तर नवी जिद्द निर्माण करणारे आहे!
=======================================================================
सदर लेख शुक्रवार, ९ ऑगस्ट २०१३ च्या लोकसत्ता मधला आहे. लोकसत्ताचे आभार

जयमाला शिलेदार

jaymala shiledar: knight of music जयमाला शिलेदार या पूर्वाश्रमीच्या प्रमिला जाधव. इंदूर येथे भाटेबुवांच्या नाटय़कला प्रवर्तक कंपनीच्या बिऱ्हाडी २१ ऑगस्ट १९२६ रोजी त्यांचा जन्म झाला. वयाच्या दहाव्या वर्षांपासून संगीत शिक्षण घेणाऱ्या प्रमिला यांनी १९४२ मध्ये गोविंदराव टेंबे यांच्या 'वेषांतर' या नाटकाद्वारे संगीत रंगभूमीवर पदार्पण केले. गंगाधरपंत लोंढे यांच्या राजाराम संगीत मंडळीमध्ये त्यांचा प्रवेश झाला. मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाटय़महोत्सवात १९४५ मध्ये 'संगीत शारदा' या नाटकामध्ये त्यांनी बालगंधर्व, केशवराव दाते आणि चिंतामणराव कोल्हटकर या नटश्रेष्ठांसमवेत ताकदीने भूमिका रंगविली. १९४७मध्ये डॉ. भालेराव यांच्या नाटय़महोत्सवातील 'धरणीधर' या नाटकामध्ये त्यांनी जयराम शिलेदार यांच्यासमवेत पहिल्यांदा काम केले. तर 'शाकुंतल' नाटकामध्ये त्या शिलेदार यांच्या नायिका होत्या. १० ऑक्टोबर १९४९ रोजी जयराम शिलेदार, नारायणराव जाधव आणि प्रमिला जाधव यांनी मराठी रंगभूमी संस्थेची स्थापना केली. २३ जानेवारी १९५० रोजी जयराम शिलेदार यांच्याशी विवाहबद्ध होऊन त्या जयमाला शिलेदार झाल्या. १९६२ मध्ये संगीत अलंकार ही पदवी त्यांनी संपादन केली.
 कीर्ती, लता आणि सुरेश अशा तीन भावंड शिलेदारांचे 'सौभद्र' १९६२ मध्ये रंगभूमीवर आले. जयमाला शिलेदार यांनी ४६ संगीत नाटकांमध्ये ५२ भूमिका रंगभूमीवर साकारल्या, तर १६ नाटकांचे संगीतदिग्दर्शन केले. सलग २५ वर्षे नायिकेच्या भूमिकेत कार्यरत असल्याबद्दल १९७६ मध्ये त्यांचा सत्कार झाला होता. बालगंधर्व जन्मशताब्दी वर्षांत १९८७ मध्ये सव्वाशेहून अधिक संगीत नाटय़प्रयोग सादर करून त्यांनी बालगंधर्वाना अभिवादन केले. जयराम शिलेदार यांच्या निधनानंतर २१ वर्षे त्यांनी मराठी रंगभूमी संस्थेची धुरा पेलली. संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत १२ वेगवेगळय़ा नाटकांचे ५० प्रयोग करण्यात आले. त्यांच्यावर २००१ मध्ये हृदय शस्त्रक्रिया झाली, मात्र दोन महिन्यांतच त्यांनी पुन्हा नाटय़संगीत शिक्षण देण्यास सुरुवात केली.
गंधर्वगायकीची शिलेदारी हरपली: मान्यवरांची श्रद्धांजली
संगीत रंगभूमीसाठी सर्वस्व अर्पण करून रसिकांना आनंद देणाऱ्या आणि मराठी रंगभूमी संस्थेच्या माध्यमातून संगीत रंगभूमीचे जतन करणाऱ्या जयमाला शिलेदार यांच्या निधनामुळे गंधर्वगायकीची शिलेदारी हरपली आहे, अशा शब्दांत विविध मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दीप्ती भोगले : जयमाला शिलेदार ही जशी माझी आई होती त्याहून अधिक ती आम्हा बहिणींची गुरू म्हणून मोठी होती. मी, कीर्ती आणि सुरेश अशा तिघा भावंडांचे 'सौभद्र' रंगमंचावर आले त्यामागे तिने आमच्या गायकीवर घेतलेली मेहनत कारणीभूत आहे. शाळेतून आल्यावर दुपारी हार्मोनिअम घेऊन आमचा रियाझ करून घ्यायची. अशी वर्षभर आमची रंगीत तालीम झाली होती. गायन शिकविताना गाण्याचे शब्द तर तिने सांगितले. पण, आलापी सांगायची नाही. आम्ही आमचे सूर काढून गायचो. त्यामुळे आमची शैली जपता आली.
शैला दातार : गायनाचार्य पं. भास्करबुवा बखले यांचे शिष्य बालगंधर्व यांची गायकी जपणाऱ्या जयमालाबाईंचा संगीत रंगभूमी हाच श्वास होता. नाटय़संगीत गायनामध्ये त्या आमच्या पिढीतील कलाकारांसाठी आदर्श होत्या.
पं. विनायकराव थोरात : बालगंधर्वाची गायकी जपणाऱ्या शिलेदार कुटुंबीयांसमवेत ५० वर्षे तबलासाथ करताना माझे जीवनच संगीतमय झाले आहे. गायकाकडे लय, ताल यांसह सुरेलपणा असेल आणि पल्लेदार ताना त्याच्या गळ्यातून आल्या तरच त्या गायकाला गंधर्वगायकी जमते. ही कला जयमालाबाईंनी आत्मसात केली होती.
अरविंद पिळगावकर : अभिजात संगीत नाटकात ज्यांनी 'शिलेदारी'केली त्या पिढीतील शेवटचा दुवा जयमाला शिलेदार यांच्या निधनाने निखळला आहे. अभिजात संगीत नाटकात त्यांनी केलेल्या भूमिका अजरामर झाल्या. मला त्यांच्याबरोबर 'एकच प्याला', संगीत सौभद्र', 'संगीत स्वयंवर' या नाटकांमधून काम करण्याची संधी मिळाली. संगीत नाटकाचा वसा त्यांनी घेतला होता. हा वसा त्यांनी लता आणि कीर्ती या त्यांच्या दोन मुलींकडे पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी दिला.
शुभदा दादरकर : जयमाला शिलेदार यांच्याशी आमचे कौटुंबिक आणि खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. संगीत रंगभूमीवर पद्य आणि गद्य कसे सादर करायचे याचा त्या आदर्श होत्या. त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ आणि हसतमुख होता. त्या स्वत: हार्मोनियमही चांगल्या वाजवायच्या. संगीत नाटकात गाणे सादर करताना शब्दांची फेक, त्याचा स्वर उच्चार आणि गाताना स्वरांची गोलाई व गोडवा कसा कायम ठेवायचा हे अवधान त्यांनी कायम सांभाळले.
=======================================================================
सदर लेख शुक्रवार, ९ ऑगस्ट २०१३ च्या लोकसत्ता मधला आहे. लोकसत्ताचे आभार

Tuesday, July 30, 2013

'श्रुती' रंगी रंगले... भाग-२

कही दिल लगायाँ है?
एकदा मी बाहेरगावहून नुकतीच परतले होते. घराचं दार उघडून आत शिरतेय तेवढय़ात फोन वाजला. फोनवरून विचारणा झाली, 'श्रुतीजी है.. मैं बेगम अख्तर बोल रही हँू..',  माझ्या हातातून फोन फक्त पडायचाच बाकी राहिला होता. यांचा फोन मला कशाला, असा विचार मनात आला. त्या मला म्हणाल्या, हमने आपके आवाज की बहुत तारीफ सुनी है. तो हमें आपका गाना सुनना है. कब सुनाऐंगी..'. मी त्यांना म्हटलं की आत्ताच घरी आले आहे. उद्या ऐकवले तर चालेल का? त्यावर 'नहीं नहीं कल मैं लखनौ जा रही हूँ.. तो हमें आपका गाना आज ही सुनना है,' असे म्हणत त्या माझ्या गुरूंबरोबर घरी आल्या. जून महिन्यातला असाच भरपूर पाऊस होता. इतक्या भिजल्या होत्या त्या.. पण, तरीही 'तुम्ही गा' म्हणाल्या.. 'कपडे आपोआप सुकतील', असं त्यांनी सांगितल्यावर मी गायला सुरुवात केली. मग त्याही गायल्या. त्या दिवशीचं त्यांचं गाणं मी रेकॉर्ड करून ठेवलंय, कारण माझ्यासाठी तो प्रसाद होता. गाऊन झाल्यावर त्यांनी मला हळूच विचारलं, 'श्रुतीजी कहीं दिल लगाया है?' त्यांच्या त्या प्रश्नावर मी पुरती गोंधळून गेले होते. समोर घरातली सगळी मंडळी, गुरू सगळेच होते. माझ्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून त्यांनी सांगितलं, 'नहीं..नहीं..हम किसी का नाम नहीं पूछ रहे है.' मला काय बोलायचं कळेना. मग त्या म्हणाल्या, 'देखिए.. दिल है. खूब लगाईए.. दिल ही है. तुट जाएगा. बार बार तुटेगा. जितनी बार तुटेगा उतना दर्द बढेगा. और वोह दर्द जब आपकी आवाज में उतरेगा तो आपकी आवाज तो सोने पे सुहागा बन जाएगी.'  
भातखंडे विद्यापीठाची कुलगुरू होणं सहजसोपं नव्हतं
२००८ मध्ये मुंबई विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून मी रूजू झाले आणि २००९ मध्ये उत्तरप्रदेशच्या राज्यपालांनी माझी भातखंडे संगीत विद्यापीठाची कुलगुरू म्हणून थेट नियुक्ती केली. पण, मी उत्तरप्रदेशमध्ये गेल्या गेल्याच तुम्ही इथे येऊ नका, तुमचा काही फायदा होणार नाही, असं ऐकवण्यात येऊ लागलं. विद्यापीठातल्या काही लोकांना माझ्यासारखी सरळ व्यक्ती तिथे येणं सोयीचं नव्हतं.  मी गेल्या दिवसापासून माझ्याविरोधात कारवाया सुरू झाल्या. मी तिथे येऊ नये म्हणून तिथल्या लोकांनी माझ्याविरोधात संप करणे, माझे पुतळे जाळणे, वर्तमानपत्रातून टीका करणे, अगदी माझ्यावर खुनाचा आळ घेण्यापर्यंत विरोधी कारवाया करून पाहिल्या. पण, नंतर काय करायचं हे त्यांच्या लक्षात येईना. कारण काही केल्या मी तिथून जात नव्हते. शेवटी मी त्यांना बजावून सांगितलं की, तुमचे हे हीन प्रकारचे चाळे आहेत त्याला उत्तर देण्यासाठी मला तुमच्या पातळीवर खाली यावं लागेल. कुलगुरूची ही खुर्ची त्यासाठी नाही. त्यामुळे तुम्हाला जे काही करायचे असेल ते करा. मी कुठल्याही प्रकोरे तुम्हाला उत्तर देणार नाही. पण, कायद्याने त्यांचा जो काही बंदोबस्त करायचा होता तो मी केला. त्यांची सगळी बंडं मी मुळातून मोडून काढली.
कर्नाटकी संगीतातला बंदिस्तपणा आणि ख्याल गायकीतलं स्वातंत्र्य
कर्नाटक संगीतात एक बंदिस्तपणा आहे. त्यांची ती बांधीलकी आहे. म्हणजे बंदिशीमध्ये त्यांच्या ज्या कृती आहेत, त्यामध्ये तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीला एका मर्यादेपर्यंतच वाव देऊ शकता. त्याउलट, उत्तर हिंदुस्थानी संगीतात ध्रुपद धमार मागे पडून ख्याल जास्त प्रचारात आले. कारण, ख्यालामध्ये स्वत:च्या कल्पनाशक्तीलासुद्धा वाव मिळाला, त्यामुळे ही गायकी जास्त प्रचारात आली. इथेही घराणेशाहीची एक चौकट आखून दिलेली आहे. ही मर्यादा घालून दिलेली आहे.. रागाचा विस्तारही तुम्ही या एवढय़ा मर्यादेत करायचा. पण, ही बंधनं पाळूनसुद्धा त्या गायकीत एक स्वातंत्र्य आहे. ख्याल गायकी म्हणजे काय तर बंधनातलं स्वातंत्र्य. हे बंधनातलं स्वातंत्र्य ज्या ज्या गायकीतील घराण्यांनी दिलं, ज्या विचारप्रणालींनी दिलं, त्या विचारप्रणाली जास्त प्रसृत झाल्या. तसं दाक्षिणात्य संगीतात होत नाही. त्यांचा बंदिस्तपणा आहे तसाच आहे. तुम्ही बघाल तर त्यांच्या गायन महोत्सवात कोणी एखादा व्यासपीठावर गात असेल तर तो जसा मांडीवर हाताने ताल धरतो तसाच ताल समोर बसलेल्या श्रोत्यांनीही धरलेला असतो. ते सगळे ती कृती गात असतात. म्हणजे त्यांच्या कृतीतलं जे एक बंदिस्तपण आहे तेच त्यांच्या प्रसारासाठी एक प्रकारे मारक ठरलं.
उत्तर पैदा करती है, दख्खन दाद देती है..
उत्तर भारतात कलांचा जन्म झाला पण प्रसार मात्र दक्षिणेत जास्त झाला. खाँसाहेब म्हणायचे, उत्तर पैदा करती है.. दख्खन दाद देती है. मी उत्तरेत बराच प्रवास केलेला आहे. उत्तरेत ज्या गोष्टीत पटकन यश मिळत नाही, त्या गोष्टींवर काम करायला आज तिथे कोणी तयार नाही. शिवाय, उत्तरेतली भौगोलिक परिस्थितीत आणि निर्माण झालेली ऐतिहासिक-राजकीय परिस्थिती यामुळे लोकांच्या मनात असुरक्षितता असायची आणि तिथे प्रचलित असलेल्या संगीतप्रकारामुळे कलाकारांची प्रतिष्ठा धुळीला मिळाली होती. कलाकार होणे म्हणजे तुम्हाला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत अशी परिस्थिती होती. दुसरी गोष्ट अशी झाली की विद्येसाठी आणि अभ्यासासाठी पोषक असं स्वास्थ्य, तशी मनोभूमी दक्षिणेकडे जास्त होती. आपल्याकडे उत्तर हिंदुस्थानी आणि दक्षिण हिंदुस्थानी-कर्नाटक संगीत असे दोन संगीतप्रवाह निर्माण झाले. दक्षिणेकडे घरटी एक कुठले वाद्य वाजवले जाई, एखादा नृत्यप्रकार शिकवला जाईल नाही तर गाणे तरी गायले जाईल. म्हणजे घरटी कोणीतरी कलेची ओळख असलेला कलाकार तुम्हाला सापडेल. तसे उत्तरेत होत नाही, कारण त्यांच्यासाठी आपले अस्तित्व टिकवून ठेवणे हेच मोठे ध्येय झालेले आहे आणि अशा ठिकाणी कला कधीच रुजत नाही, तिचे संवर्धन त्या ठिकाणी होऊ शकत नाही. मानसिंग तोमर वगैरे मंडळी होती, त्यांनी कलेची जपणूक आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न केला पण, त्यांच्या काळातही त्यांना जी शिष्य मंडळी मिळाली ती तुम्ही बघाल तर दक्षिणेकडची होती, महाराष्ट्रातील होती.
आणखी एक म्हणजे संगीतात घराणेशाही होती, त्या घराणेशाहीत माझी विद्या माझ्या रक्तातील माणसाकडेच गेली पाहिजे अशी पूर्वी भावना असायची. माझी विद्या माझ्या घरातच राहिली पाहिजे, असा एक दंडक होता. बरं विद्येची शान तर अशी की, लग्नामध्ये जावयाला हुंडा म्हणून मी २५ राग दिले, शंभर राग दिले किंवा २०० बंदिशी दिल्या. याचा अर्थ असा की त्या २०० बंदिशी, ते २५ राग मी आयुष्यात कधीही गायचे नाहीत. म्हणजे घराणेशाहीतही विद्येवरची निष्ठा ही अशी होती. आणि ही विद्येची निष्ठा प्राणपणाने जपली गेली ती कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा अगदी मध्य प्रदेशातही कृष्णराव पंडितांसारखी जी मंडळी होती, त्यांनी विद्या ही आपल्या आयुष्यातले सगळ्यात मोठं धन मानले. हा विद्येबद्दलचा पूज्यभाव उत्तरेत असूनसुद्धा तिथे कलेची संवर्धन होण्यासारखी परिस्थिती नसल्यामुळे मग ही मंडळी दक्षिणेकडे आली.
संगीत हे प्रेमासारखे असतं..
व्याकरणात संगीत नोंदलं गेलं म्हणजे ते कमी दर्जाचं होतं, असं नाही. संगीतात कलाकाराची आंतरऊर्मी असते.. म्हणजे मला जेव्हा एखादा कॅनव्हास देऊन त्यावर काम करायला सांगितलं जातं तेव्हा त्या कॅनव्हासपुरतं मर्यादित होण्याचा प्रयत्न मी करते. पण, मला माहिती असतं की जर मला आणखी एक कॅनव्हास त्याच्या शेजारी मिळाला असता तर माझा जो स्ट्रोक आहे तो मला पूर्णत्वाला नेता आला असता. आता या एकाच कॅनव्हासमुळे माझ्या त्या स्ट्रोकची गती थांबल्यासारखी होते, ही जी संकल्पना आहे त्याचा ख्यालामध्ये उपयोग होतो.
आपण प्रत्येक वेळी जेव्हा मोझार्टच्या सिंफनी ऐकतो तेव्हा प्रत्येक जण आपापल्यापरीने अर्थ लावत असतात. ते नुसतेच लिहिलेले नोटेशन वाजवत नसतात. त्याचा जो प्रत्येकाला उलगडणारा गर्भितार्थ आहे तो महत्त्वाचा असतो. कुठलंच संगीत हे कमी दर्जाचं नसतं. संगीत हे प्रेमासारखे असतं. जसं लहानपणी केलेलं प्रेम हे त्या वेळेला तितकंच शंभर टक्के खरं असतं. तसंच मोठेपणी समजून घेऊन, आयुष्यातलं सत्त्व बरोबर घेऊन मग आलेलं प्रेमही तितकंच खरं असतं. मग ते प्रेम नुसतंच दैहिक असेल असं नाही. तर ते वाचनाचं प्रेम असेल, वस्तूवरचं प्रेम असेल, आपल्याबरोबर असणाऱ्या माणसांवरचं प्रेम असेल. ते कोणत्याही वयात असलेलं प्रेम हे तितकंच खरं असतं. अगदी तसंच संगीताचं आहे.
राग हे नुसतं व्याकरण नाही. ते एक्स्प्रेशन आहे
शास्त्रीय संगीताला घराणेशाहीची चौकट असली तरी त्या त्या घराण्यांची सौंदर्यपूर्ण वैशिष्टय़ आहेत. घराण्यामुळे दृष्टी संकुचित होणार नाही, याची काळजी घेत गात राहिले. तसंच गाण्याचं वैशिष्टय़ स्वरांच्या लगावात आहे. म्हणूनच प्रत्येक वेळी यमन ऐकला तरी त्याचा कंटाळा येत नाही. गाताना तो प्रत्येकाच्या लगावाच्या दृष्टीने बदलत जातो, त्या लगावात गोडवा आहे. वैशिष्टय़ आहे. शास्त्रीय संगीतातल्या रागांचही तसंच आहे. राग म्हणजे नुसतं व्याकरण नाही. ते एक्स्प्रेशन आहे. म्हणणं आहे.
पं. पलुस्करांमुळे संगीत मध्यमवर्गीय घरात आलं
पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांनी संगीताला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची केलं होतं. शास्त्रीय संगीताचा प्रसार, प्रचार आणि शिक्षण हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय होतं. सभ्य घरांतील लोक त्या काळात संगीताकडे हिणकस नजरेने बघत. गाणं-बजावणं चांगलं नाही, ही त्या काळी ठाम समजूत होती. पं. पलुस्करांनी तत्कालीन समाजाला या मन:स्थितीतून बाहेर काढण्याचा जणू विडाच उचलला होता. माझ्या वडिलांचे ते गुरू! वडील शालेय शिक्षणात पाचवीपर्यंतच शिकले. मात्र पं. पलुस्करांकडे त्यांचे सर्वच बाबतीतील शिक्षण झालं. आपल्याकडे असलेल्या मुलांचा सगळा वेळ कामात किंवा अभ्यासात जावा, याकडे बुवांचं काटेकोर लक्ष असायचं. अल्लड वयातील मुलांना बरोबर घेऊन संगीताची दीक्षा देणं, हे त्याही वेळी कठोर काम होतं. पण बुवांनी या मुलांचा सर्वागीण विकास व्हावा, यासाठी त्यांना इंग्रजी, गणित, संस्कृत आणि हिंदी या विषयांच्या शिकवण्याही लावल्या होत्या. त्यांच्या प्रयत्नांमुळेच माझ्यासारख्या अनेक गायिका पुढे मुक्त कंठाने गाऊ शकल्या. कोणतीही कला ही एक शास्त्र, विद्या असते, ही शिकवण कदाचित बाबांना त्यांच्याकडूनच मिळाली. पुढे बाबांनी माझ्यावर त्याचप्रमाणे संस्कार केले. संगीताचा सखोल अभ्यास, त्याकडे पाहण्याची दृष्टी, ती कला म्हणजे विद्या आहे, तिला विद्येचे अधिष्ठान आहे, वगैरे सगळ्या गोष्टींचा आवाका वडिलांनीच समजावून दिला.
=======================================================================
सदर लेख शुक्रवार, २६  जुलै २०१३ च्या लोकसत्ताच्या 'व्हिवा' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार

'श्रुती' रंगी रंगले... भाग-१

व्हिवा लाउंजमध्ये सोमवारी ज्येष्ठ गायिका श्रुती सडोलीकर- काटकर यांनी रसिकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांच्या 'रामरंगी रंगले'च्या स्वरांनी प्रभादेवीचं पु. ल. देशपांडे मिनि थिएटर भारलं गेलं. श्रुतीताईंच्या स्वरांबरोबरच त्यांच्या विचारांनीही उपस्थित भारावून गेले.
श्रुती या नावातच संगीत!
शास्त्रीय संगीतात श्रुती या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वरांबरोबर येणाऱ्या श्रुतीही सांभाळून गाणाऱ्या गायकाला या क्षेत्रात खूप मान आहे. तोच धागा पकडून श्रुती सडोलीकर-काटकर यांना त्यांच्या नावाबद्दल विचारले असता, त्यांनी त्यांचे गुरू व वडील वामनराव सडोलीकर यांची आठवण सांगितली. वामनरावांना एकदा कोलकातामध्ये एका माणसानं विचारलं होतं की, तुमच्या मुलीचे नाव श्रुती कोणी ठेवले आणि का ठेवले? त्यावर वामनरावांनी त्यांना उत्तर दिले होते, 'श्रुती हे नाव मीच ठेवले आहे. माझी मुलगी गाणार याची मला खात्री होती आणि ती सर्व श्रुती सांभाळून गाणार, याची पूर्ण खात्री होती.'
हिंदुस्थानी संगीतातलं जयपूर-अत्रौली घराणं कठीण गायकीसाठी ओळखलं जातं. याच घराण्यातल्या श्रुती सडोलीकर-काटकर यांनी मात्र आपल्या आर्त स्वरांनी शास्त्रीय संगीत एकदमच हृदयाला भिडवलं. 'व्हिवा लाउंज'च्या मंचावर त्यांनी संगीताबद्दलची आपली मतं आत्मीयतेनं मांडली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी झालेल्या या कार्यक्रमात आपल्या गुरूंबद्दल बोलताना त्या भावविवश झाल्या. श्रुतीताईंचे गानविचार आणि एकूणच आयुष्याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन या गप्पांतून ऐकायला मिळाला. वेळ संपली तरी श्रुतीताईंशी संवाद संपलेला नव्हता. गुरूंनी भरभरून दिलं, हे सांगणाऱ्या श्रुतीताईंना ऐकताना प्रेक्षकांचीही अवस्था घेता किती घेशील दो कराने, अशीच झाली होती.
अति कौतुक घातकच
सध्या रिअ‍ॅलिटी शोजच्या नावाखाली टीव्हीवर जे काही चालले आहे, ते संगीतासाठी मारक आहे. रिअ‍ॅलिटी शोमधून तुम्हाला चांगले गायक मिळू शकतात. मात्र संगीत ही जन्मभर चालणारी प्रक्रिया आहे. शिकणं ही मनाची अवस्था आहे. रिअ‍ॅलिटी शोजमधून मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे 'बन चुके' ही भावना मनात निर्माण होते. अशा शोजमधून चमकलेल्या मुलांचे पालक त्यांचं अति कौतुक करतात. या मुलांच्या वयात हे कौतुक  हवंहवंसंच वाटतं, पण हे अति कौतुकच त्यांच्या प्रगतीसाठी घातक ठरतं. या मुलांच्या अंगात गुण नक्कीच असतात, पण त्या गुणांना खतपाणी घालण्याची गरज आहे. नाहीतर चौथ्या वर्षीचं गाणंच ते १४ व्या वर्षी गात राहतात. त्या वयात पडती प्रतिष्ठा सहन होत नाही. म्हणून या मुलांना अधिकाधिक अभ्यास करू दे. पैसा त्यांना नंतरही मिळेल. पण हे वय अधिकाधिक शिकण्याचं आहे. त्यांच्या कलेला विद्येचं अधिष्ठान मिळणं गरजेचं आहे. या सगळ्यात पालकांची भूमिकाही महत्त्वाची आहे. माझ्या सुदैवाने माझ्या आईवडिलांनी माझ्यासमोर कधीच माझे कौतुक केलं नाही. गुरूंनीही माझ्या पाठीवर शाबासकीची थाप खूप उशिराच मारली. वडील तर नेहमी म्हणायचे की, लहान मुलं टीपकागदासारखी असतात. घरात संगीत आहे त्यामुळे श्रुती लहान वयात गाते, हे काही फार आश्चर्य नाही. ज्या दिवशी ती स्वतचं म्हणून गाणं गाईल त्या दिवशी तिला बोलवा, असं ते सांगायचे.
करडय़ा शिस्तीचे संस्कार
गाण्याच्या बाबतीतील शिस्तीचं महत्त्व वडिलांनी मला खूप लहानपणी समजावून दिलं. अगदी अडीच-तीन वर्षांची असल्यापासून मी अत्यंत अनवट राग, मिश्र राग वगैरे गात होते. मात्र कधी कधी कंटाळा यायचा. वडिलांकडे मी कधी शिकायला म्हणून बसले नव्हते. मात्र त्यांच्याकडे एक मुलगी शिकायला येत असे. ती चुकली की मग पुढे काही गातच नसे. तिची भीड चेपावी म्हणून वडिलांनी मलाही तिच्याबरोबर शिकायला बसवले. गाताना मांडीवर हाताने ताल देणे, हे माझ्यासाठी खूपच कंटाळवाणे होते. एकदा मला खूपच कंटाळा आला होता म्हणून मी हात दुखत असल्याचा बहाणा केला. वडिलांच्या ते लक्षात आले. मात्र ओरडणे हे त्यांच्या स्वभावातच नव्हते. त्यामुळे त्यांनी मला अगदी लाडाने जवळ बसायला बोलावले. 'माझ्या बाबाचा हात दुखतोय, अरेरे', असं म्हणत त्यांनी स्वत:च्या हाताने माझ्या मांडीवर जोरजोरात ताल द्यायला सुरुवात केली. बाबांचा हात खूप लागत होता, पण मीदेखील हट्टाने काही न बोलता तशीच गात राहिले. शिकवणी संपल्यानंतर तशीच दुखऱ्या पायाने खेळायलाही गेले. मात्र रात्री आईबाबांचा संवाद ऐकला आणि डोळ्यांत पाणी आलं. माझे बाबा त्या रात्री जेवले नव्हते. आईने त्यांना कारण विचारलं तर ते म्हणाले, 'ज्या हाताने मी माझ्या मुलीला मारलं, त्या हाताने मी आज कसा जेवू? पण या वेळी तिला शिस्तीचं महत्त्व पटवून देणं गरजेचं होतं. नाहीतर पुढे तिलाच त्रास झाला असता.' या एका प्रसंगाने गाण्यातलीच नाही, तर एकंदरीत आयुष्यातही शिस्तीचं महत्त्व पटलं.
गुरुंचा विश्वास माझी पुण्याई
शास्त्रीय संगीताचे शिक्षण वडिलांकडे सुरू करण्याआधीपासूनच मला अनेक बंदिशी मुखोद्गत होत्या. त्यामुळे वडिलांचे अनेक स्नेही घरी येऊन मला एखाद्या रागातील बंदिश, तानापलटे वगैरे गायला सांगत. असेच गुलुभाई जसदनवाला वडिलांकडे आले. त्यांनी मला गाताना ऐकलं व म्हणाले, 'माझ्याकडे भरपूर विद्या आहे, पण ती विद्या मी द्यावी असा शिष्य काही सापडला नाही. तुमची मुलगी गाते, तर तिला माझ्याकडे गाणं शिकवायला पाठवाल का?' वडिलांनी हरकत घ्यायचा प्रश्नच नव्हता. माझं शिक्षण गुलुभाईंकडे सुरू झालं. गुलुभाई म्हणजे जबरदस्त असामी होते. ते केवळ संगीतातील गुरूच नव्हते, तर बडे व्यावसायिक होते. त्यांच्या पदरी रेसचे घोडे होते, भाताची शेती, बांधकाम वगैरे सगळ्याच गोष्टी त्यांच्याकडे होत्या. १६ ऑगस्ट १९६८ रोजी मी त्यांच्याकडे पहिला राग शिकायला सुरुवात केली. तो राग होता 'भूपनट'! त्या वेळी संगीतातील काहींनी त्यांच्यावर टीका केली होती. अनेकांना त्यांच्याकडे शिकायचे होते, मात्र त्यांनी कधीच कोणाला शिकवण्याचा विडा उचलला नाही. माझ्यासाठी ते खूप लोकांशी भांडले. त्यांनी मला १२ वर्षे सातत्याने शिकवले. जाण्याआधी त्यांनी मला शेवटच्या वेळी भेटायला बोलावले होते. त्या वेळी ते म्हणाले की, 'बाबा, आप हमारी जिंदगीमें बहोत देरसे आये. २५ साल पहले मिलते तो बहोत कुछ सिखाता था. अब अगली जिंदगी में मिलेंगे.' त्यांचे हे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात त्याही वेळी पाणी आलं होतं. खरंच, माझी पुण्याई म्हणून मला असे गुरू लाभले. पुढल्या जन्मीही तेच गुरू म्हणून लाभावेत, अशी प्रार्थना करतेय.
सुशिक्षित कलाकार होणं महत्त्वाचं
शिक्षणानंतर माझ्या आईनेही एका चित्रपटात काम केले. मात्र आईचा भर शिक्षणावर होता. ती नेहमी म्हणायची की, अशिक्षित कलाकार होण्यापेक्षा सुशिक्षित कलाकार होणे मला जास्त आवडेल. कुरुंदवाडच्या सीताबाई पटवर्धन हायस्कूलात जाणारी ती पहिली मुलगी होती. विशेष म्हणजे त्या वेळी शाळेत आईशिवाय सगळी मुलंच शिकत होती. मात्र आईच्या मॅट्रिकचा रिझल्ट लागला, तेव्हा संपूर्ण शाळेमधून ती एकटीच पास झाली होती. १९७४मध्ये आई गेली. १९७६ला शाळेचा सुवर्णमहोत्सव साजरा करायचा होता. त्या वेळी त्या शाळेतील काही ज्येष्ठ शिक्षक माझ्या घरी आले आणि त्यांनी मला सांगितले की, त्या वर्षी तुमच्या आई पास झाल्या नसत्या, तर शाळा बंद झाली असती. वडिलांमुळे गाण्याची शिकवण, तर आईमुळे शिक्षणाची परंपरा आमच्या घरात आली. वडील पलुस्कर आाणि भुर्जी खाँसाहेब यांचे शिष्य! उस्ताद अल्लादियाँ खाँसाहेबांनीही त्यांना पुढे तालीम दिली. त्यामुळे दोन्ही घरांमध्ये खानदानीपण आणि संस्कार ठासून भरले होते. वडिलांचं शिक्षण फार झालं नव्हतं. मात्र त्यांचं वाचन दांडगं होतं.  मला आठवतं की, घरी एखादी गोष्ट बांधून आणलेला कागदही ते टाकून देण्याआधी वाचत असत.
गळ्यात 'शुगर' पण फॅक्टरी नाही
श्रुती सडोलीकर-काटकर यांचे वडील कोल्हापूरातील एका साखर कारखान्याचे मालक होते, असा उल्लेख इंटरनेटवरील एका संकेतस्थळावर त्यांच्याबद्दलच्या माहितीत केला आहे. पण हे खरं नाही, असं स्पष्टीकरण श्रुतीताईंनी 'व्हिवा लाउंज'च्या मंचावर केलं. श्रुतीताईंचे वडील कोल्हापूरचे. त्या काळात कोल्हापूरमध्ये संगीत, नाटय़ आणि चित्रपट या कलांना प्रोत्साहन होते. कोल्हापूरमध्ये राममोहन लोहिया यांचा कोल्हापूर साखर कारखाना होता. लोहिया हे स्वत: नाटय़प्रेमी होते. त्यामुळे त्यांनी साखर कारखान्यात 'जीवन कल्याण' नावाचा एक विभाग सुरू केला होता. या विभागामार्फत नाटके बसवली जात. बहुतांश वेळा ती बसवण्याचे किंवा संगीत दिग्दर्शनाचे काम श्रुतीताईंचे वडील करत असत. त्यामुळे त्यांचा संबंध या साखर कारखान्याच्या मालकीशी जोडला गेला असावा, असा कयास श्रुतीताईंनी व्यक्त केला. गळ्यात थोडीफार मिठ्ठास असली, तरी साखर कारखान्याची मालकी वगैरे श्रीमंती घरात नव्हती, असं त्या म्हणाल्या.
संस्कारांची श्रीमंती वारसाहक्काने
माझा जन्म कुरुंदवाडला झाला. माझ्या आईचं माहेर कुरुंदवाड! त्या गावात ज्या घरात माझा जन्म झाला त्या घरासमोरील घरात उस्ताद रहिमतखाँ राहायचे. त्या घराच्या कट्टय़ावर बसून ते रियाज करायचे. आमच्या घरी आई आणि वडील हे दोघेही शास्त्रीय संगीताचे चाहते होते. वडील तर पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्या पहिल्या काही शिष्यांपैकी एक! त्यामुळे गाण्याचे संस्कार जन्माच्याही आधीपासून होत होते. आईच्या आणि वडिलांच्या दोघांच्याही घरांत संगीत, नाटक, चित्रपट, साहित्य यांना पोषक वातावरण होते. आईची एक बहीण, आम्ही तिला तानीबाई म्हणायचो, ती उस्ताद अल्लादियाँ खाँसाहेबांची शिष्या. एका आजारामुळे ती लवकर गेली. त्या वेळी उस्तादजी म्हणाले होते की, 'आज अल्लादियाँ गुजर गया है.. केसरको (केसरबाई केरकर) हमनें अपनी गायकीका चार आना भी नहीं दिया. लेकीन तानी हमारी गायकीका सोला आना लेके चली गयी.' सांगायचा मुद्दा, संगीताचे संस्कार गर्भावस्थेत होते, तेव्हापासूनच होत होते. प्रभात कंपनीतही आमचे शेअर्स होते. प्रभात कंपनीच्या चार-पाच मालकांपैकी एक म्हणजे केशवराव धायबर! ते म्हणजे माझ्या आईच्या आत्याचे पती! माझी एक मावशी वासंती म्हणजे पहिली बाल सिनेतारका! 'कुंकू', 'धर्मात्मा' वगैरे चित्रपटांत तिने काम  केलं होतं.

=======================================================================
सदर लेख शुक्रवार, २६  जुलै २०१३ च्या लोकसत्ताच्या 'व्हिवा' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार

Monday, July 22, 2013

रागदारी आणि वसंत देसाई


वसंत देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षांची सांगता ९ जूनरोजी आहे. त्या निमित्ताने, चित्रपट संगीतात देसाईंनी आणलेल्या अनवट मिश्र रागांचा, रागदारी संगीताचा चित्रपटातील समूहगानासाठी वापर करण्याच्या प्रयोगाचा आणि अनेक अभिजात गायक-वादकांना उपयोजित संगीताकडे वळवण्याच्या वसंत देसाईंच्या कर्तृत्वाचा हा मागोवा..
जुन्या जमान्यातले दिग्गज गायक रामकृष्णबुवा वझे यांच्याकडे 'मियाँ की मल्हार' हा राग लोकप्रिय करण्याचे श्रेय जाते. ज्या काळात तबकडय़ा नुकत्याच बाजारात येऊ लागल्या होत्या. त्या काळात वझेबुवांनी 'बोले रे पपीहरा' ही 'मियाँमल्हार' रागातली रचना ध्वनिमुद्रिकेच्या रूपाने प्रसृत केली. वझेबुवांच्या या ध्वनिमुद्रिकेत खटका, गमक आणि मीड हे रागदारी संगीतात अत्यावश्यक समजले गेलेले आवाजाचे लगाव आहेत आणि त्यातूनच 'मियाँमल्हार' रागाचं रूप अधिकाधिक खुलत जातं. ही रचना चित्रपटगीताच्या रूपाने जनप्रिय करण्याचं श्रेय मात्र वसंत देसाईंना द्यायला हवं. 'गुड्डी' या चित्रपटासाठी वाणी जयराम यांच्या आवाजात देसाईंनी ती स्वरबद्ध केली. नाही म्हटलं तरी वझेबुवांची रचना आणि तिची लोकप्रियता रागदारी संगीताच्या श्रोतृवर्गापर्यंतच मर्यादित होती. वसंत देसाईंमुळे 'बोले रे पपीहरा' ही बंदिश तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचली.
 वसंत देसाईंच्या जन्मशताब्दीचं वर्ष सुरू झालं आणि संपूनही जाईल. या वर्षांत वसंत देसाईंच्या संपूर्ण कारकीर्दीची झलक दाखविणारं आणि त्यांच्या प्रकाशित आणि अप्रकाशित चित्रपटगीतांच्या खजिना मोकळा करणारं संकेतस्थळ (www.vasantdesai.co) २२ डिसेंबर या त्यांच्या स्मृतिदिनी सुरू करण्यात आलं, एवढीच वर्षभरातली रसिकांची 'मिळकत'. वसंत देसाईंनी मराठी चित्रपटांना संगीत तर दिलंच पण ते तिथे अडकून राहिले नाहीत. सी. रामचंद्रानी ज्याप्रमाणे िहदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णकाळात आपल्या वैशिष्टय़पूर्ण कर्तृत्वाच्या ठसा उमटविला, तसाच वसंत देसाईंनीही 'झनक झनक पायल बाजे', 'गूंज उठी शहनाई' किंवा 'दो आँखे बारह हाथ' आणि 'गुड्डी' यासारख्या चित्रपटांच्या घवघवीत यशात आपल्या सुरेल संगीताद्वारे मोठीच भर घातली.
'पंडितराज जगन्नाथ' या नाटकाला वसंत देसाईंनी संगीत दिलं त्यातून 'कलावती' हा कर्नाटक संगीतातला राग महाराष्ट्राला परिचित झाला. प्रसाद सावकारांच्या खडय़ा आवाजातील 'जय गंगे भागीरथी' हे पद वास्तविक 'कलावती' आणि 'बसंत' या दोन रागांच्या मिश्रणातून वसंतरावांनी निर्माण केले आहे. परंतु त्यातला अधिक लक्षात रहातो तो राग 'कलावती'. त्यानंतर हा राग महाराष्ट्राच्या मातीत रुळला आणि भावगीतांमधूनही तो प्रकट होऊ लागला. 'स्वयंवर झाले सीतेचे' या चित्रपटासाठी त्यांनी भीमसेन जोशींच्या आवाजात 'रम्य ही स्वर्गाहून लंका' हे गीत गाऊन घेतले होते. हे गाणे अत्यंत लोकप्रिय झाले आणि रागदारीचा गंधही नसणारा श्रोता ते आपुलकीने गुणगुणत असे. वास्तविक हे गाणे 'िहडोल बहार' या रागावर आधारित आहे. 'िहडोल' हा मुळात कठीण मानण्यात येणारा राग आहे. कारण त्यात फक्त चार स्वर लागतात. त्यात 'बहार' मिसळून हा राग जुन्या काळात उस्तादांनी बनवला. भीमसेन जोशी हे सिद्ध रागांचे बादशहा होते. त्यांच्या उमेदीच्या काळात तर ते सहसा 'मिश्र' अथवा 'अछोप' रागांच्या वाटेला जात नसत. पण वसंत दसाईंनी हे गाणं त्यांच्याकडून गाऊन घेतले आणि ते जनमानसात थेट जाऊन बसले.
'देव दीनाघरी धावला' या नाटकासाठी वसंत देसाईंनी कुमार गंधर्वाकडून 'उठी उठी गोपाळा' ही भूपाळी गाऊन घेतली. 'अमरभूपाळी' या मराठी चित्रपटातली 'घनश्याम सुंदरा' ही भूपाळी पंडितराव नगरकर आणि लता मंगेशकर यांनी गायली होती. सुमारे साठ वर्षांपूर्वी ध्वनिमुद्रित झालेली ही भूपाळी आजही तितक्याच भक्तिभावाने आणि चवीने ऐकली जाते. 'भूपाळी' म्हणजे 'घनश्याम सुंदरा' असे जणू समीकरणच बनले आहे. तरीही याच संगीत दिग्दर्शकाने रचलेल्या 'उठी उठी गोपाळा' या भूपाळीची लज्जत काही औरच म्हटली पाहिजे. वसंत दसाईंनी भीमसेन जोशी आणि कुमार गंधर्वाप्रमाणेच अमीर खान या रागदारी संगीताच्या क्षेत्रातल्या महान कलाकाराच्या आवाजाचा उपयोग आपल्या संगीताची शान वाढविण्यासाठी केला. 'झनक झनक पायल बाजे'चे बहुचर्चित शीर्षक गीत अमीर खान खाँसाहेबांनी गायले आहे. मुळात हे गाणे अमीर खान खाँसाहेबांच्या मंद्र सप्तकात चनीत विहार करणार्या आवाजाला अनुरूप अशा 'दरबारी' रागात ध्वनिमुद्रित झाले होते. व्ही. शांताराम वगळता सर्वाना ते अतिशय पसंत पडले होते. पण शांतारामांचे मत लक्षात घेऊन वसंतरावांनी ते पुन्हा ध्वनिमुद्रित करायचे ठरविले. मात्र यावेळी 'दरबारी' मंद्रप्रधान रागाऐवजी 'अडाणा' हा उत्तरांगप्रधान राग निवडला आणि अमीर खान खाँसाहेबांनी जलद तानांची बरसात करून या गीताचे सोने केले.
दिग्गज गायकांप्रमाणे अत्यंत प्रतिभावान वादकांनाही त्यांनी आपल्या संचात गोवले. 'गूंज उठी शहनाई'मधून बिस्मिल्ला खान खाँसाहेबांची शहनाई अक्षरश घराघरात पोचली. त्यांचे वादन समारोहामधून होत असे तेव्हा सामान्य श्रोते 'गूंज उठी'ची फर्माईश करीत आणि खाँसाहेबही ती मान्य करीत असत. सतारनवाझ अब्दुल हलीम जाफर खान यांनीही 'झनक झनक' च्या पाश्र्वसंगीतातला संपन्न करण्यात मोठी भूमिका बजावली. या चित्रपटाने गर्दीचे सर्व उच्चांक मोडले होते. त्यामुळे सुवर्ण महोत्सवी खेळानिमित्ताने 'लिबर्टी' चित्रपटागृहात हलीम जाफर खान यांचे सतारवादन अहमदजान थिरकवाखाँसाहेबांच्या तबला संगतीसह आयोजित करण्यात आले होते असे जाणकार सांगतात. शिवकुमार शर्मा आणि सामताप्रसाद हे वादकही 'झनक'मुळे प्रथम चमकले.
रागावर आधारित रचना आणि तीही समूहगानाच्या रूपाने साकार करणे हा वसंत देसाईंचा हातखंडा होता. 'केदार' रागातली 'हमको मन की शक्ती देना' ही रचना ('गुड्डी' :  वाणी जयराम आणि इतर) इतकी लोकप्रिय झाली की शाळाशाळांमधून प्रार्थना म्हणून ती गायली जाऊ लागली. 'दो आँखे बारह हाथ' मधले 'ऐ मालिक तेरे बंदे हम' या प्रार्थना गीताला 'मालकंस' रागाचा आधार आहे. या गीताने तर सीमेपलीकडच्या पाकिस्तानातही लोकप्रियता मिळविली. भारतातीलच नव्हे तर पाकिस्तानातील तुरुंगांमध्येही प्रार्थना गीत म्हणून गाणं गायले जाऊ लागले. रागदारी संगीताला लोकाभिमुख करण्याबाबत वसंत देसाईंनी जे योगदान दिले आहे त्याची उचित गांभीर्याने दखल घ्यायला हवी.
=======================================================================
सदर लेख रविवार,  ९ जुन २०१३ च्या लोकसत्ताच्या 'विशेष' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार

Friday, May 10, 2013

तपश्चर्या फळाला आली..

penance come to fruiton..   आजवर मी अनेक चित्रपटांना संगीत दिलं, अनेक ध्वनिफिती केल्या. मात्र, या सर्वात लोकप्रियतेचा कळस गाठला तो 'ऋतु हिरवा' या ध्वनिफीतीने. यातील कोणतंही गाणं कधीही ऐका, ते तितकंच आनंद देतं. याचं रहस्य काय, असा प्रश्न अनेकजण मला विचारतात. उत्तर अगदी सोपं आहे, अहो, ही गाणी दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर आशाबाईंनी गायली आहेत. ती सदाबहार झाली नसती तरच नवल.
१९९१मध्ये आलेल्या या ध्वनिफितीनंतर आशाबाईंच्या आवाजात आणखी एक ध्वनिफीत करावी, अशी प्रबळ इच्छा होती. मात्र ही गाणी एवढी लोकप्रिय झाली की काही काळ थांबावं, असं ठरवलं. त्यानंतर 'काही बोलायाचे आहे', 'तेजोमय नादब्रह्म', 'अबोलीचे बोल', 'हे गगना', 'संगीत मनमोही रे', 'लिलाव' आदी माझ्या ध्वनिफिती एकापाठोपाठ येतच होत्या. यातील गाण्यांनाही रसिकांनी डोक्यावर घेतलं. मात्र आशाबाईंच्या आवाजातील ध्वनिफीत येण्यास बराच वेळ लागतोय, या भावनेने अस्वस्थताही होती. बरं, दुसरीकडे आशाबाईंसोबतच्या ध्वनिफितीची तयारी सुरू होतीच. उदाहरणच द्यायचं झालं तर, 'मंदिरे सूनी सूनी कुठे न दीप काजवा', 'मेघ वाही श्रावणात ये सुगंधी गारवा', या ग्रेस यांच्या कवितेला मी १९९५ मध्येच चाल लावली होती. इंदिरा संत यांच्या समर्थ लेखणीतून उतरलेलं 'रुतत चालले तिळातिळाने' ही कविताही संगीतबद्ध होऊन तयार होती, तर या ध्वनिफितीचं 'साकार गंधार हा' हे शीर्षकगीत मी २००१ मध्येच शांता शेळके यांच्याकडून लिहून घेतलं होतं, त्याचीही चाल तयार होती. उर्वरीत गाणीही आकारास येत होती.  मात्र, ध्वनिमुद्रणाचा योग येत नव्हता.
या गाण्यांना आशाबाईंशिवाय कोणीही न्याय देऊ शकणार नाही, यावर मी ठाम होतो, म्हणूनच थांबलो. अखेर आशाबाईंच्या जादुई आवाजात या गाण्यांचं रेकाìडग पार पडलं. हा अनुभव शब्दांच्या पलीकडचा होता. ही माझी गाणी आहेत म्हणून सांगत नाही, परंतु काय गायल्या आशाबाई.. ८०व्या वर्षांत पदार्पण केलेल्या या महान गायिकेचं सुरांवरील प्रभुत्व, दमसास, हरकती-ताना घेणं.. सगळंच अफाट. शब्दांचा भाव ओळखून गावं तर त्यांनीच. फारच विलक्षण आणि रोमांचकारी अनुभव होता तो!
मराठी गाण्यांच्या निवडीबाबत आशाबाई खूपच चोखंदळ आहेत. या ध्वनिमुद्रणानंतर त्यांनी माझ्या पाठीवर दिलेली शाबासकीची थाप खूप काही बोलून गेली. 'ऋतु हिरवा'नंतर १० वर्षांनी म्हणजे २००१च्या आसपास ही ध्वनिफीत यावी, अशी माझी इच्छा होती, मात्र हा योग जुळून येण्यासाठी १२ वर्षांचा काळ जावा लागला.
एकप्रकारे माझी तपश्चर्याच फळाला आली..
ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि श्रीधर फडके या जोडीचा 'ऋतु हिरवा' हा अल्बम मराठी भावगीतात मैलाचा दगड ठरला. हीच जोडी आता  'साकार गंधार हा' या नवा अल्बम रसिकांसमोर सादर करत आहे. या अल्बमचे प्रकाशन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते व आशा भोसले यांच्या उपस्थितीत २८ एप्रिलला ठाण्याच्या डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहात होत आहे. व्हीएसएस मल्टिमीडिया क्रिएशन्सची निर्मिती असलेल्या या अल्बमच्या पाश्र्वभूमीवर श्रीधर फडके यांनी खास लोकसत्ताशी संवाद साधला.
=======================================================================
सदर लेख रविवार,  २१ एप्रिल २०१३ च्या लोकसत्ताच्या 'विशेष' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.

धोंडूताई कुलकर्णी

''संगीतात ऐंशी र्वष काढल्यानंतरही हे विश्व मला सागराप्रमाणे अथांग वाटतं. त्याची खोली अजूनही कळत नाही. मी गायलेल्या एका बंदिशीचे शब्द आहेत, 'ढुँढूँ बारे सैंया तोहे सकल बन बन.. बिदन तिहारी कोऊ न जाने..' संगीताचं मर्म समजलंय असं वाटत असतानाच त्याची ओढ मात्र अजूनही स्वस्थ बसू देत नाही..'' सांगताहेत, जयपूर-अत्रौली घराण्याच्या जेष्ठ गायिका धोंडूताई कुलकर्णी.
बनारसमधील गंगेचं विशाल आणि अथांग पात्र. नुसती नजर टाकली तरी भिरभिरावी असं. घाटावर जमलेला श्रोतृवृंद गाणं ऐकायला अधीर झालेला. आणि कलावंतासाठी व्यासपीठ कुठे, तर गंगेच्या पात्रात. होय, चक्कनदीच्या पात्रात तरंगत्या नौकेवर! या नौकेवर बसून गाणं म्हणायचं? मी चकित झाले. आजवर शेकडो मैफली केल्या. पण हा अनुभव अनोखा होता. संयोजकांना म्हणाले, 'अहो या नावेत बसून मी कशी गाणार? नाव डगमगणार नाही का? आणि श्रोते एवढय़ा दूर. त्यांना गाणं ऐकू जाईल का?'  ते म्हणाले, 'तुम्ही अजिबात चिंता करू नका. नाव डगमगणार नाही. आवाज श्रोत्यांपर्यंत व्यवस्थित जाईल.' मी शंकित मनानंच त्या व्यासपीठावर बसले. नौकेला चहूबाजूंनी कंदील लावलेले. घाटावरून नौकेवर प्रकाशझोत सोडलेला. दोन बाजूंना बसलेल्या दोन नावाडय़ांनी होडी स्थिर ठेवलेली. समोर श्रोते, इकडे मी आणि मध्ये गंगेचा प्रवाह. त्या स्थितीत मी गायले. मनात विचार आला, अशी मैफल कुठल्या कलावंताची झाली असेल? त्या दिवशी गायले तो आनंद अलौकिकच होता. बनारस रेडिओचे मोठे अधिकारी आणि रसिकाग्रणी जयदेवसिंह हे माझ्या गाण्याचे चाहते होते. त्यांच्या निधनानंतर पहिला स्मृतिदिन माझ्याच गाण्यानं व्हावा, ही संयोजकांची इच्छा होती. बनारस हिंदू विद्यापीठातील आनंद कृष्ण यांनी ती इच्छा अशा प्रकारे पूर्ण केली. सोबत त्यांच्या संस्थेच्या वतीनं भलंथोरलं मानपत्र देऊन माझा गौरवही केला.
आठ वर्षांपूर्वीच्या त्या मैफलीची आठवण जागी झाली म्हणजे मनात विचार येतात.. गंगेच्या त्या पात्रासमोर मी केवढी, माझं गाणं केवढं! खरं तर वयाची ऐंशी वर्षे गाण्याखेरीज दुसऱ्या कशाचाच विचार केला नाही. पण एवढय़ा वर्षांच्या साधनेनंतरही त्या संगीत सागरासमोर स्वत:ला लीन समजण्याएवढा विनम्रभाव आला कोठून.. तर त्या संगीतातूनच!
जयपूर-अत्रौली घराण्याची बुजुर्ग गायिका म्हणून आज माझा गौरवानं उल्लेख केला जातो. आता लक्षात येतं, हा गौरव वाटय़ाला येण्यासाठी किती साधना करावी लागली. कोल्हापूरजवळच्या हिरवडे गावातील गणेश नारायण कुलकर्णी या सामान्य शिक्षकाच्या घरात जन्मलेली मी. योग्य वयात लग्न करून संसारी बाई म्हणून स्थिरावले असते तर आज कुणाच्या खिजगणतीतही नसते. पण माझी वाट वेगळी असावी. वडिलांना गाणं शिकायची खूप आवड होती. ते थोडंफार शिकलेही होते. पण प्रापंचिक जबाबदाऱ्यांमुळे पुढे त्यांना जमलं नाही. पहिलं मूल होईल त्याला मी गाणं शिकवीन हा त्यांचा ध्यास होता. मुळात माझ्याआधीची तीन भावंडं जगलीच नाहीत. त्या काळी प्रथा अशी की, न जगलेल्या अपत्यांच्या पाठची मुलगी जगावी म्हणून तिला दगडधोंडय़ासारखं धट्टंकट्टं नांव द्यायचं. त्याच हेतूनं मला 'धोंडूताई' नाव मिळालं. जन्मदिवस होता २३ जुलै १९२७.  माझ्या पाठीवर एक भाऊ आणि एक बहीण झाली. पण गाणं मलाच मिळालं. वयाच्या पाचव्या वर्षांपासून गाणं शिकायला लागले. वडिलांनी माझ्यासाठी चांगल्या गुरूचा शोध सुरू केला. मला लहानपणापासूनच घराण्याची तालीम मिळावी हा त्यांचा प्रयत्न होता.
 पाचव्या वर्षांपासून मी कोल्हापुरात उस्ताद नत्थनखॉँ यांच्याकडे शिकले. आठव्या वर्षी ऑल इंडिया रेडिओ मुंबईवर माझं गाणं झालं. जयपूर-अत्रौली घराण्याचे थोर गायक उस्ताद अल्लादियाखॉँ यांचे चिरंजीव भूर्जीखॉँ हे त्या काळात कोल्हापूरला होते. महालक्ष्मी मंदिरात दररोज पहाटे काकड आरतीच्या आधी भूर्जीखाँ शास्त्रीय गायन करीत. कोल्हापूरच्या शाहूमहाराजांनीच त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली होती. वडिलांनी मला शिकवण्यासंबंधी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी आम्हाला टाळण्याच्या हेतूने प्रचंड फी सांगितली. तेवढी फी देणं कल्पनेतही शक्य नव्हतं. मात्र, महालक्ष्मी मंदिरात रोज पहाटे त्यांचं गाणं ऐकायला जाणं हा आमचा नित्यक्रम बनला. एखाद्या वेळी भूर्जीखॉँ आजारी असले तर आम्ही तिथं गात असू. माझी ती जिद्द पाहून अखेर भूर्जीखॉँ कोणत्याही अटीविना मला शिकवायला तयार झाले. १९४० ते १९५० या काळात त्यांनी मला शिक्षण दिलं. जयपूर-अत्रौली घराण्याची गायकी मला शिकविली. याच काळात मी रेडिओची ए ग्रेड आर्टिस्ट झाले.
१९५० मध्ये भूर्जीखॉँ यांचं अकाली निधन झालं आणि त्यांच्यानंतर गुरू कोण हा प्रश्न उभा राहिला. तब्बल सात वर्षे मी कोणत्याही गुरूविना गाण्याची साधना केली. या काळात आमचं वास्तव्य हैदराबादला आमच्या मामाकडे होतं. तिथं खूप मैफली केल्या. रेडिओवर गायले. पण समाधान मिळत नव्हतं. सात वर्षांनी आम्ही पुन्हा कोल्हापूरला आलो. अल्लादियाखाँसाहेबांच्या शिष्या लक्ष्मीबाई जाधव - ज्या बडोदा दरबारच्या गायिका होत्या- नोकरी सोडून कोल्हापुरात आल्या होत्या. त्यांच्याकडे मी शिकू लागले. त्याच काळात भूर्जीखॉँसाहेबांचे चिरंजीव अजीजुद्दिनखॉँ यांना भेटले. त्यांच्याकडूनही मार्गदर्शन मिळालं. तो तीन वर्षांचा काळ म्हणजे माझ्या संगीतशिक्षणाचा सुवर्णकाळच होता. अजीजुद्दिनखॉँ आणि लक्ष्मीबाई या दोघांनीही मला खूप स्नेह दिला. त्यांच्याच कृपेनं अल्लादियाखॉँसाहेबांना प्रत्यक्ष भेटायची संधी मिळाली. लक्ष्मीबाईंनी तर माझ्यावर मुलीप्रमाणे लोभ केला. त्या काळात लोक विचारत, 'काय हो, लक्ष्मीबाईंनी तुम्हाला दत्तक घेतलंय का?' लक्ष्मीबाई एवढय़ा थोर की, एका टप्प्यावर त्यांनी मला सांगितलं, 'मी शक्य तेवढं तुम्हाला शिकवलंय. आता केसरबाई तुम्हाला शिकवतात का बघा.'
केसरबाईंकडे गाणं शिकायचं? नुसत्या कल्पनेनंच मी मोहरून उठले. पण अनामिक भीतीनं दडपणही आलं. मुळात उस्ताद अल्लादियाखॉँसाहेब हेच पहाडासारखं व्यक्तिमत्त्व. त्यांची शागिर्दी भल्याभल्यांना मिळत नसे. त्यांच्या पट्टशिष्या केसरबाई हे तर त्या काळी तळपणारं नाव होतं. 'तुमच्याकडून मी एकटी शिकणार, दुसऱ्या कुणालाही तुम्ही शिकवायचं नाही,' अशी अट अल्लादियाखॉँसाहेबांना घालून त्याप्रमाणे तब्बल दहा र्वष त्यांची तालीम घेतलेल्या केसरबाई! प्रकांड बुद्धिमत्ता, तेजस्वी गायन, श्रोत्यांना जरबेत ठेवणारा मनस्वी स्वभाव ही केसरबाईंची गुणवैशिष्टय़ं ऐकून माहीत होती. त्यांची नजर म्हणजे 'हंड्रेड पॉवरचे दोन दिवे'.. दहा दहा र्वष तालीम घेतलेले लोक दहा मिनिटंदेखील त्यांच्यासमोर उभे राहू शकत नाहीत.. असं बरंच ऐकून होते. अत्यंत मेहनतीचं गाणं होतं केसरबाईंचं. पहाटे तीन वाजता उठून सात वाजेपर्यंत रियाझ, मग थोडासा नाश्ता करून दुपापर्यंत पुन्हा रियाझ हा त्यांचा दिनक्रम असे. अनेक तरुण गायिकांना त्यांनी शिकवायला नकार दिला. गाणं शिकवणं हे बाईमाणसाचं काम नव्हे, गाणं उस्तादांनीच शिकवावं असं त्या म्हणत. अतिशय विद्वान बाई. कोण किती पाण्यात आहे, हे त्यांना लगेच कळायचं. अशा या केसरबाईंकडे मी कशी गेले याची एक कथाच आहे.
 १९६०-६१ चा काळ असेल. दादर-माटुंगा सर्कलमध्ये केसरबाई केरकरांचं गाणं होतं.'लोकसत्ता'चे तेव्हाचे संपादक ह. रा. महाजनी श्रोत्यांमध्ये होते. गाणं झाल्यावर महाजनी केसरबाईंना म्हणाले, 'बाई, तुमचं गाणं ऐकून अल्लादियाखॉँसाहेबांची आठवण होते. पण तुमच्यानंतर पुढे कोण?' केसरबाईंना तो प्रश्न आवडला नसावा. पण त्या शांतपणे म्हणाल्या, 'महाजनी, आज शिकून उद्या रेडिओवर गाणारे कधी उस्ताद बनू शकतात का? मी ज्याप्रमाणे मेहनत घेतली तेवढी मेहनत घेणारं कुणी आलं तर मी जरूर शिकवीन. असा कुणी मिळाला तर तुम्ही माझ्याकडे घेऊन या.'
महाजनी-केसरबाई भेटीचा हा वृत्तांत 'लोकसत्ता'मध्ये छापून आला. केसरबाई केरकरांचं आव्हान वाचून कुणीही त्यांच्यापर्यंत जाण्याचं धाडस केलं नाही. त्या वेळी मी इंदोरला होते. अल्लादियाखॉँसाहेबांचे नातू अजीजुद्दिनखॉँ यांनी 'लोकसत्ता'च्या बातमीचं कात्रण पत्रासोबत मला पाठवलं आणि केसरबाईंचं हे आव्हान पेलण्याची ताकद केवळ तुमच्यात आहे, तुम्ही त्यांना पत्र लिहा. असंही कळवलं. मी केसरबाईंना पत्राद्वारे माझी सर्व माहिती कळवली. तुम्ही शिकवणार असाल तर मुंबईला यायची माझी तयारी आहे, असं लिहिलं. त्यांच्याकडून उत्तर येणार नाही या भ्रमात मी होते. पण माझ्या सुदैवानं उत्तर आलं. धडधडत्या हृदयानं मी पत्र वाचू लागले. त्यांनी लिहिलं होतं, 'इतक्या लोकांकडे गाणे शिकूनही तुम्हाला अजूनही शिकावेसे वाटते, याचे मला कौतुक वाटते. तुम्हाला माहीतच असेल, या घराण्याची तालीम कशी दिली जाते. आता मी बहात्तर वर्षांची आहे. या वयात मी शिक्षण देऊ शकेन का याविषयी शंका वाटते. पण तुम्ही या. जमेल तेवढे शिकवू.' ते वर्ष होतं १९६२.
केसरबाईंनी होकार देताच माझ्या वडिलांनी कोल्हापूरचं घरदार विकून मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. बाईंना भेटण्यासाठी आम्ही गेलो तेव्हा बिर्ला मातुश्री सभागृहात त्यांचं गाणं होतं. अजीजुद्दिनखॉँ आम्हाला त्यांच्याकडे घेऊन गेले. आम्हाला पाहताच बाईंनी माझ्या येण्याचा हेतू ओळखला असावा. मला त्यांनी तानपुऱ्यावर साथीला बसायला सांगितलं.
केसरबाईंची तालीम हा माझ्या गायनशिक्षणाचा कळसाध्याय होता. तब्बल दहा र्वष, म्हणजे त्यांच्या मृत्यूपावेतो त्यांनी मला शिक्षण दिलं. मी त्यांच्याकडे कशाकरिता गेल्येय हे त्यांना पुरेपूर माहीत होतं. म्हणूनच पहिल्या दोन वर्षांत त्यांनी मला जे हवं होतं ते शिकवलंच नाही. माझी परीक्षाच घेत असाव्यात जणू. दोन वर्षांनंतर मात्र त्यांची खात्री पटली आणि लोणावळ्याच्या एक महिन्याच्या मुक्कामात त्यांनी मला सगळं काही शिकवलं. व्हॉइस कल्चर म्हणजे काय, मैफलीत रंग कसा भरावा, रागाचं सादरीकरण कसं असावं, अशा अनेक गोष्टी त्यांनी शिकवल्या. महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याच्या बदल्यात त्यांनी माझ्याकडून एक पैसादेखील घेतला नाही. मरताना त्या म्हणाल्या, 'धोंडूताई, मी माझं गाणं विश्वासानं तुझ्याकडे सोपवलंय. माझं गाणं तू रस्त्यावर आणू नकोस. आपण मुलगी कोणाला देतो, तर जो मुलगा तिचा आयुष्यभर तिचा सांभाळ करेल त्यालाच. गायनविद्या ही माझी मुलगी आहे. तिला मी तुझ्या हाती सोपवतेय..'
केसरबाईंची ही शिकवण मी आयुष्यभर जोपासली. असंख्य मैफली केल्या. घराण्याचं नाव वाढवलं. शिकण्याची इच्छा असणाऱ्यांना मनापासून शिकवलं. पण ग्लॅमरच्या, पैशाच्या मागे आम्ही कधी लागलो नाही. केसरबाईच म्हणायच्या, मैफल कधीही पडू देऊ नये. आपण जर वाजवून बिदागी घेतो तर गाणंदेखील वाजवून गायला हवं. माझ्याकडे शिकणाऱ्यांना मी हेच सांगते, ग्लॅमरच्या मागे लागू नका. ते फार काळ टिकणार नाही. ग्लॅमर आणि यश यात फरक आहे. मला वयाच्या आठव्या वर्षी व्ही. शांतारामांकडून 'कुंकू' सिनेमासाठी ऑफर आली होती. घसघशीत पगार आणि सिनेमाचं ग्लॅमर. पण वडिलांनी त्यांना सांगितलं, 'आम्हाला या क्षेत्रात यायचंच नाही. तिनं शास्त्रीय संगीतातच नाव काढावं अशी माझी इच्छा आहे.'
केसरबाईंची एक आठवण. एकदा त्यांच्या मैफलीत पहिल्या रांगेत बसलेले गृहस्थ वही-पेन्सिल घेऊन गाण्याची प्रत्येक ओळ न ओळ सरगमसहित लिहून घेत होते. केसरबाईंच्या ते लक्षात आलं. गाणं न थांबवता मांडी घातलेल्या स्थितीतच त्या पुढे सरकत गेल्या आणि खालमानेनं टिपणं घेणाऱ्या त्या गृहस्थाच्या हातावर फटका मारला. वही-पेन्सिल वर उडाली आणि ते महाशय भांबावून बघत राहिले. 'बुवा, असं लिहून घेऊन गायक होता येत नाही. त्याला तालीम लागते.' केसरबाईंनी त्यांना सुनावलं. आज कॅसेट-सीडी ऐकून शास्त्रीय संगीत शिकणाऱ्यांना मी हेच सांगते, 'बाबा रे, सीडी ऐकून तुम्ही फक्त कॉपी करू शकाल. पण एखाद्या रागाचा विचार, तो मांडण्यामागचं शास्त्र तुम्हाला गुरूकडूनच कळू शकेल.'
एवढय़ा वर्षांच्या संगीतसाधनेनं मला काय दिलं तर आध्यात्मिक शक्ती दिली. संगीत हेच माझं अध्यात्म आहे. या शक्तीमुळे मला कशाचीही भीती वाटत नाही. लग्न न करता आयुष्यभर मी एकटी राहिले. पण त्याची मला खंत नाही. लग्न केलं असतं तर संसारातच गुरफटले असते. दिवसातून आठ आठ तासांची मेहनत शक्यच झाली नसती. 'जोड राग' गाण्यात माझा हातखंडा आहे, असं म्हणतात. दोन रागांचा एक राग, त्याप्रमाणेच तीन, चार, पाच असे अनेक राग एकत्र करून गाण्याला 'जोड राग' म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं दहा रागांपर्यंत एकत्र गाण्यात मी पारंगत होते. हे सगळं साध्य झालं ते बहुधा संगीत आणि संसार यांचा 'जोड राग' न केल्यामुळेच!
जयपूर-अत्रौली घराण्याची शिस्त मोठी कडक. इथं खोटेपणा चालत नाही. कृत्रिम, चोरटा आवाज लावून गाण्याची आमची रीत नाही. त्यासाठीच 'व्हॉइस कल्चर'वर आम्ही वर्षांनुर्वष मेहनत घेतो. गेल्या तीस-चाळीस वर्षांत घराण्याच्या भिंती मोडण्याची, सगळी  घराणी एक करण्याची भाषा सुरू झाली आहे. पण त्यामुळे शास्त्रीय संगीताची केवढी दुर्दशा झालीय ते आपण बघतोच आहोत. आमच्या घराण्याचं गाणं समजायला कठीण असं म्हणतात. पण तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला कळेल ना! खरं गाणं हे घराणेदार गाणंच हवं. ज्यांना 'भेळपुरी' खायचीय त्यांनी त्यात खुशाल आनंद मानावा.
संगीतात ऐंशी र्वष काढल्यानंतरही हे विश्व मला सागराप्रमाणे अथांग वाटतं. त्याची खोली अजूनही कळत नाही. मी गायलेल्या एका बंदिशीचे शब्द आहेत, 'ढुँ ढूँ बारे सैंया तोहे सकल बन बन.. बिदन तिहारी कोऊ न जाने..' (हे श्रीकृष्णा मी तुला किती बरे शोधू? तुझं ब्रीद काय आहे, हे अजून कुणालाही कळत नाही.) संगीताचं मर्म समजलंय असं वाटत असतानाच त्याची ओढ मात्र अजूनही स्वस्थ बसू देत नाही..  
(शब्दांकन : सुनील देशपांडे)
====================================================================
सदर लेख शनीवार,  ९ फेब्रुवारी एप्रिल २०१३ च्या लोकसत्ताच्या 'विशेष' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.

श्रुती सडोलीकर-काटकर

   गाणं हा मनाचा उद्गार आहे याची जाणीव मला आतूनच झाली. खूप मजेत असले की गाणं सहजपणे उमटत जाई. आजही असंच होतं. निसर्गाच्या सान्निध्यात असले, समुद्रकिनारी असले, दूरवर पसरलेल्या पर्वतराजींच्या रंगछटा न्याहाळत असले, एवढंच काय, कालपर्यंत अंग मिटून घेतलेली कळी आज फूल होताना पाहूनही स्वर गळयातून उमटत जातात. स्वराशी तद्रूप झाल्यावर जी उन्मनी अवस्था होते तिनं तृप्तीचा येणारा अनुभव शब्दातीत, अवर्णनीय म्हणावा असा जाणवला. त्यातूनच अनवट रागांच्या गाठी सोडवणं हा माझा छंद वाढीला लागला.
अ जूनही केव्हातरी स्वप्नात दादर, िहदू कॉलनीमधल्या आमच्या घरात मी भाऊंच्या (माझ्या वडिलांच्या)मांडीवर बसलेय हे दृश्य दिसत राहातं.. सारं वातावरण तानपुऱ्याच्या जवारीदार सुरांनी भारून गेलेलं, त्यात भाऊंच्या गोड, धारदार आवाजाची मोहिनी वातवरणात पसरलेली.. मांडीवर असताना झोपेच्या गुंगीत अनेकदा भाऊंच्या छातीवर डोकं टेकवलं की त्यांच्या हृदयाची धडधड आणि आवाजाची स्पंदने जाणवत. त्या स्पंदनांनी मला स्वर, तालाच्या झोपाळयावर अलगद झुलवलं, जोजवलं आणि आयुष्यभर पुरणारी साथ दिली..
मी केव्हा, कशी गायला लागले हे मला कळलंच नाही. बोलणं आणि गाणं एकत्रच सुरू झालं असावं. कारण गाण्यासाठी काही वेगळं करावं लागलंच नाही. गाणं हाच माझा श्वास झाला आणि श्वासाचं प्रयोजन गाणं झालं.
मी दीडेक वर्षांची असेन भाऊंनी बायकांनीच सर्व भूमिका (पुरुष भूमिकासुद्धा) केलेलं 'सं. मानापमान' नाटक बसवलं होतं. माझी मोठी बहीण वीणा माझ्या जन्मानंतर लगेचच देवाघरी गेल्यानं भाऊ मला कधी दूर ठेवत नसत. त्यामुळे नाटकाच्या तालमी असोत वा गाण्याच्या शिकवण्या, माझा मुक्काम त्यांच्या पाशीच असे. परिणामी नाटय़संगीताच्या निमित्ताने नाटयपदं कशी गावीत याचे संस्कारही होत गेले. संवादाबरोबर आवाजाचा लहानमोठेपणा, पिच, शब्दांवर जोर, स्वरांदोलनं हीदेखील खूप काही सांगत असतात हे कळू लागलं. त्याचा गाण्यात कसा उपयोग होतो, हेही कळत गेलं. कारण अजाण वयात रात्ररात्र नाटकं आणि गाण्याच्या मफलींना आई-भाऊंबरोबर जाण्याचा सराव झाला. बरं, रात्री जागरण झालं म्हणून शाळा किंवा अभ्यासाला दांडी नाही! त्यामुळे तेही एका बाजूला सहजपणे होत गेलं.
गाणं हा मनाचा उद्गार आहे याची जाणीव मला आतूनच झाली. खूप मजेत असले, की गाणं सहजपणे उमटत जाई. आजही असंच होतं. छान निसर्गाच्या सान्निध्यात असले, समुद्रकिनारी असले, दूरवर पसरलेल्या पर्वतराजींच्या रंगछटा न्याहाळत असले, एवढंच काय, कालपर्यंत अंग मिटून घेतलेली कळी आज फूल होताना पाहूनही स्वर गळयातून उमटत जातात. मला गाण्याकरिता काही विशेष आविर्भाव कधीच करावा लागला नाही. कारण गातो म्हणजे आपण काही वेगळं करतोय असं वाटलंच नाही.
भाऊंनी स्वरसाधना करून घेतली आणि ही जन्मभर करतच राहायची हे पटवलं. तेही स्वरभरणा करीत असत. या साधनेनं मनाची एकाग्रता, श्वासावर नियंत्रण ठेवणं, सबुरी, मनाचा धीर हे साधतं. हा त्यांचा अनुभव मलाही आला. एवढंच नव्हे तर एकंदरीतच मनाच्या व्यापाराचा अभ्यास झाला.
स्वराशी तद्रूप झाल्यावर जी उन्मनी अवस्था होते तिनं तृप्तीचा येणारा अनुभव शब्दातीत, अवर्णनीय म्हणावा असा जाणवला.
मला अनेकदा विचारलं जातं की तुम्ही मफलीची तयारी कशी करता? माझ्या मनात मफल कायमच सुरू असते. काही शिकलं, ऐकलं की ते सोडवायचं, स्वत:साठी त्याचा अभ्यास करायचा हा माझा नेहमीचा शिरस्ता.
उस्ताद गुलुभाई जसदनवालांनी १९६८ च्या १६ ऑगस्टला शिकवायला प्रारंभ केला तेच 'भूपनट' या रागापासून. माझं वय लहान असूनही तोवर मी नटाचे प्रकार गात असल्यानं शिकताना मला जड गेलं नाही. अनवट रागांच्या गाठी सोडवणं हा माझा छंद वाढीला लागला.
मी मफल केव्हा करू लागले म्हटलं तर अगदी १०-१२ व्या वर्षी मी दोन-अडीच तास गात असे. भाऊंच्या गुरुपौर्णिमेला किंवा परिचितांच्या, जाणकारांच्या घरी झालेल्या बठकीत मी कानडा प्रकार, नटाचे प्रकार सहज पेश करत होते, जोडीला नाटय़संगीतही असे. एका मफलीला विजय तेंडुलकर आले होते. ''काय गळा फिरतोय या मुलीचा, वीजच जणू!'' असं कौतुकही केलं. एका कार्यक्रमानंतर
पं.नारायणराव व्यास म्हणाले, ''पोरी, जयपूर घराण्याचं शिवधनुष्य उचलू पाहातेस. प्रत्यंचा लावून वामनरावांना धन्य कर.''  मला वाटतं या सर्व आशीर्वाद, सदिच्छांनी मला माझ्या जबाबदारीची जाणीव करून दिली. ते नुसतं कोरडं कौतुक नव्हतं. मी ज्या मार्गावरून सहज म्हणून चालत होते, ती वाट किती कठीण आहे आणि कुठे नेते, याचा विचार मला अंतर्मुख करत गेला.
'साधना' या शब्दाची प्रचीती मी रोज घेत होते. ज्यावेळी माझा शाळा कॉलेजचा अभ्यास एवढीच माझी जबाबदारी होती, तेव्हा माझ्यासाठी गाणं मनाचा विरंगुळा पण बुद्धीसाठी रोज नवं कोडं होतं. ते कोडं सोडवण्यातला बौद्धिक आनंद खूप निरागस होता. मला कोणा पुढं काहीही सिद्ध करायचं नव्हतं. सुदैवानं कोणतंही गाणं, चीज एकदा ऐकली की माझी झाली. इतकी बुद्धी टिपकागदासारखी होती. त्यामुळे 'पुढय़ात वही ठेवून गाणं म्हणजे आपल्या स्मरणशक्तीवर आपलाच विश्वास नाही', अशी माझी धारणा झाली आणि ती अजूनही आहे. त्या काळात मी जो गाण्याचा अभ्यास केला तो साधनेच्या व्याख्येत बसत होता की नाही हे माहीत नाही. पण एका खोलीची जागा, सतत पाहुणे, कुणी राहायला येणारे, कुणी चहापाणी करून जाणारे, शिकणारे यामुळे घर भरलेलं. स्वत:च्या स्वरसाधनेसाठी मी कधी गॅलरीत बसायची. कधी कधी आठदहा दिवस तेवढंही करता यायचं नाही. मग मनातल्या मनात रागांचं चिंतन, मनन करण्याची सवयच लागली. दुसरे शिष्य शिकताना आणि स्वत: शिकताना असं दुहेरी शिक्षण होऊ लगलं. एकंदरीत गाणं नाही, असा एकही दिवस जात नसे.
आमच्याकडे अनेक संगीतज्ञ, नाटककार, समीक्षक, सतत येत असल्यानं संगीत विश्वाची ओळख अनेक पलूंनी पक्की होत गेली. अनेक बंदिशी, राग अनायासे पदरात पडू लागले. भाऊंना कार्यक्रमाचं बोलवणं आल्यावर ते कसे बोलतात, व्यवहार कसा सांभाळतात, नकार घायचा असेल तर काय करतात, प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी ते कसे असतात हे बघायला मिळालं, त्यातून मी मफलीची कलाकार म्हणून घडत गेले. गुरूगृहातच जन्माला आले हे माझं सद्भाग्यच! आपसूकच गुरुकुल पद्धतीनं घराणेदार गायकी शिकता आली. भाऊंकडे ज्याला पद्धतशीर (Formal) शिक्षण म्हणतात ते ५/६ व्या वर्षी सुरू झालं आणि ५/७ व्या वर्षांत मफलीच्या वरच्या श्रेणीच्या रागदारीची तालीमसुद्धा सुरू झाली. गुलुभाईंप्रमाणे गुरुवर्य अझीझुद्दीन खाँसाहेब (बाबा)देखील अनवट रागातल्या दुर्मीळ बंदिशी मला शिकवू लागले. काही वेळा पं. मल्लिकार्जुन मन्सूर, पं. जितेंद्र अभिषेकी हेदेखील हजर असत. आम्ही तिघेही एकदम शिकत असू. अन्य कलाकार आपल्या मफलीत हे राग कसे मांडतात हे मी आवर्जून ऐकत असे त्यामुळे मला माझ्या मफलीत मी काय करावं याबद्दल विचार करावा लागे.
माझ्या मफलीमागे इतर अनेक कलाकारांच्या मफलींचे माझे श्रवणानुभव आहेत. माझी एखादी मफल ठरली, की ती कितीही दिवसांनंतर असली, तरी तानपुरे तत्काळ मनात झंकारू लागतात. वेळेचा अंदाज येताच काय काय गाता येईल याचा विचार इतर व्यापातून मनात डोकावू लागतो. तरीही मी कधीच सगळा मेन्यू अगोदर ठरवून ठेवत नाही. खरंतर प्रत्यक्ष मफलीत जे गायचं ते फार मनात घोकलं तर त्यातली उत्स्फूर्तता जाते असं वाटतं, त्यामुळे एखादा राग गाणं म्हणजे घोटलेलं गाणं नव्हे अशी माझी कल्पना आहे. काही वेळा श्रोत्यांकडे पाहून आयत्या वेळी (त्यात जाणकार आणि विशेषत: गायक-वादक असतील तर) मी काय गायचं ते ठरवते. ग्रीन रूममध्ये जरी काही विचार करून आले असले तरी आयत्यावेळी रागही बदलते. एखाद-दोन वेळा तर विलंबित बंदिश गायल्यावर त्याला शोभेलशी द्रुत (अर्थ आणि रचनेच्या दृष्टीने) बंदिश मी गातागाता नव्याने रचलेली आहे. अशा मन्मना रचना त्या त्या वेळच्या रागाच्या मांडणीतून निर्माण झालेल्या, आवेगातून निर्माण झालेल्या आहेत.
पण एका रात्री मी मास्टर कृष्णरावांचा कौशीकानडा रेडिओवर ऐकला. ती रात्र आणि पुढचे कित्येक दिवस माझ्या मनावर त्याचाच पगडा होता. मी दुसरा काही विचारच करू शकत नव्हते. अखेरीस ३ आठवडयांनी मी तो राग एका मफलीत गायले तेव्हा मी मोकळी झाले. एखादा राग पछाडतो म्हणजे काय याचा तो उत्कट अनुभव होता.
माझ्या मफलीतल्या शास्त्रीय गायकीत 'पाणी घालून लोकांसाठी पचायला हलकी' करण्याचा प्रयोग जसा मी कधी केला नाही तशी जाणूनबुजून उगाच गूढ, अनाकलनीय आणि भ्रमित करणारी गायकीही मी कधी लोकांपुढे मांडली नाही. जशी मी, तशी माझी गायकी. उपशास्त्रीय संगीत प्रकारांना मी कधी वाळीत टाकलं नाही. त्यातही काय रस आहे, आनंद आहे, सौंदर्य आहे ते मी खूप लहानपणापासून ऐकल्यामुळे मला जाणवलेलं होतं. सुदैवानं भाऊ, गुलुभाईंजी अथवा बाबांनी मला कधी ठुमरी, दादरा, नाटय़ संगीत किंवा गझल गाण्याला मनाई केली नाही. उलट ते प्रकार शिकवले. रसूलन बाई, सिद्धेश्वरी देवी, बेगम अख़्तर अशा दिग्गजांच्या कार्यक्रमांना ते मला घेऊन जात. मलाही ते प्रकार गाताना अवघड वाटले नाहीत. श्रोत्यांमधून फर्माइश आली तर एखाद वेळी गझलही गाते मी. पण मर्यादा पाळूनच. रसपरिपोष करावा हा नियम मी नेहमी पाळते.
७-८ फेब्रुबारी १९७९ ला मुंबईत रंगभवनमध्ये पं. रविशंकरांचा सतार वादनाचा कार्यक्रम होता. त्यापूर्वी होतकरू कलावंत म्हणून मला कार्यक्रम द्यायला बोलावलं गेलं. त्यादिवशी एका वेगळ्याच आवेशाने मी गायले. माझ्यानंतर पंडितजींना ऐकण्यासाठी म्हणून आधीच हजारों श्रोत्यांचा जमाव उपस्थित होता त्यावेळी श्री मेहरा हे वयोवृद्ध रसिक आले होते. मी बिहागडा आणि बसंतीकेदार राग गायले. तंबोरे ठेवून मी श्रोत्यांना वंदन केलं आणि श्री मेहरा मोठय़ाने म्हणाले, ''कोण कहे छे, केसरबाई जीवती नथी! आ छोकरी ने सांभळो, केसरबाई जीवती छे!''  पं. लक्ष्मणराव बोडसांनी साश्रु नयनांनी आशीर्वाद दिला, ''यावच्चंद्र दिवाकरौ तुझ्या दोन्ही (सडोलीकर आणि जयपूर अत्रौली) घराण्यांची कीर्ती अखंड राहो!''
त्याच वर्षीच्या ३ जूनला सबर्बन म्युझिक सर्कलनं माझी सकाळची बठक ठेवली होती. जाणकार श्रोत्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या सर्कलचा कलाकारांना एक वेगळाच धाक होता. त्या दिवशी श्रोत्यात समीक्षक तात्या बाक्रे, गायक नीनू मुझुमदार, विष्णुदास शिराळी आणि आणखीही संगीतज्ञ हजर होते. गुलुभाईजी होते. बटुक दीवानजी आणि सत्येंद्र भाई त्रिवेदीदेखील होते. मी सव्वा नऊला 'मियाँ की तोडी'ने मफल सुरू केली. विभास, िहडोल (१५ च मि.), मध्यंतरांनंतर बहादुरी तोडी, सारंग आणि भरवीनं शेवट करेपर्यंत दुपारचे दोन वाजले होते. वेळेचं भान तर नव्हतंच, पण गंमत म्हणजे भरवी म्हणून मी तंबोरा ठेवला आणि पाहाते तो विलक्षण स्तब्धता पसरली होती. मीही बुचकळ्यात पडले आणि अचानक टाळ्यांचा कडकडाट झाला. नीनू मुझुमदार भाऊ आणि गुलुभाईजींचं अभिनंदन करताना डोळे पुसत होते, ''आम्हाला दुसऱ्याच जगात नेलं हो श्रुतीनं!'' असं वारंवार म्हणत होते.
१९७६ ला दिल्लीत प्रथमच 'सप्तसुर' संमेलनात गायले. गाणं संपताच निवृत्तीबुवा स्टेजवर आले आणि अश्रुभरल्या डोळ्यांनी मला म्हणाले,''तू वामनरावांच्या तपश्चय्रेचं सार्थक केलंस. 'जयपूर'ची गायकी तूच गाशील!'' श्रोत्यांमध्ये आकाशवाणी व दूरदर्शनचे अधिकारी होते. मुंबईला परतण्याच्या आतच माझ्या नावे दिल्लीहून तार आली ''ऑडिशन टेस्ट न घेताच मला 'बी हाय' श्रेणी प्रदान केली होती.''
एका पावसाळी संध्याकाळी बेगम अख्तर माझ्या घरी माझं गाणं ऐकायला आल्या. स्वत:ही गायल्या. त्यांचं गाणं मी रेकॉर्ड करून घेतलं. काही वर्षांनंतर त्यांनी गुलुभाईंना भेट दिलेला तानपुरा ''यह अब आपका है'' असं म्हणून गुलुभाईंच्या पुतण्याने मला दिला. ती अपूर्व भेट माझ्या गुरूंची अखेरची इच्छा होती. माझ्यासाठी प्रसादच होता.
देवाचे आशीर्वाद पाठीशी आहेत, गुरूंच्या विद्य्ोचं बळ आणि शुभाशीर्वाद सर्व प्रसंगांतून तारून नेतात आणि आपण चांगलं माणूसही असलो तर रसिकांचं प्रेम भरभरून मिळतं याचा वारंवार प्रत्यय येतो. आपल्या स्वरात दैवी प्रसाद भरून राहातो याची प्रचीती येणारे प्रसंग अनेक घडले. त्यापकी एकच सांगते.
परदेश दौऱ्यात एक रुग्णआजी माझ्या कार्यक्रमाला हट्टाने आल्या. वेदनाशामक औषधाने गुंगी येते म्हणून ते न घेता आल्या. घरची मंडळी धास्तावली होती की मध्येच वेदनांमुळे आजींना घरी न्यावं लागेल. कार्यक्रमाचे ३ तास त्या बसल्या आणि संपल्यावर हळूहळू स्टेजवर येऊन मला मिठी मारून म्हणाल्या, ''आज कित्येक वर्षांनंतर मी पूर्ण शुद्धीवर राहून वेदनारहित काळ व्यतीत केला. तुझ्या गाण्यानं मी इतका वेळ माणूस म्हणून जगले.''
यापेक्षा मोठा आशीर्वाद कोणता असेल?
माझं गाणं माझ्यासाठी एक संरक्षक कवच आहे. वय नुसतंच कॅलेंडरच्या तारखा बदलून वाढत नसतं अनुभवाची जोड नसेल तर उपयोग काय? आई-भाऊंच्या आजारपण आणि जाण्यानं जगाची ओळख पटू लागली. पण हर तऱ्हेच्या बऱ्या-वाईट प्रसंगातसुद्धा मन ताळ्यावर राहाण्यासाठी संगीताची फार मदत झाली. भाऊ गेले तेव्हा मी सातारा-पुण्याचे 'बठकीची लावणी' आणि 'देवगाणी'चे कार्यक्रम आटोपून पहाटे ३.२५ ला घरी आले. 'भाऊ नाहीत' हे कळलं. मी सुन्न झाले. अपेक्षित होतं तेच झालं. पण कुठेतरी आत एक गाण्याची ओळ मन व्यापून होती. पुढचे सगळे व्यवहार पार पडले, पण गाणं आत चालूच होतं. माझ्या अपरिमित दुखाची धार त्यांनं बोथट केली. मी कोसळले नाही. अटळ घटना स्वीकारली. नामजपही हेच काम करतो.
माझ्या संगीतानं मला माझा शोध लागला. जीवन आणि अध्यात्म संगीतापासून वेगळे नाहीत ही गोष्ट आपोआप ध्यानात येऊ लागली. जीवनातलं सौर्दय, प्रेम, कला, विद्या, शास्त्र, सादरीकरण, शरीराची व मनाची शिस्त अशा साऱ्या संकल्पना हळूहळू जशा स्पष्ट झाल्या तसा जीवनातला रस कसा घ्यावा हेही कळू लागलं.
आज एका संस्थेची प्रमुख म्हणून काम करताना, अलिप्तपणे परंतु संस्थेच्या हितासाठी जागरूक राहून, शिस्तीनं, सत्यानं संगीत कलेची सेवा करण्याचं व्रत पार पाडताना संकटात डगमगून न जाता नेटानं पुढे जाण्याची प्रेरणा मला माझ्या संगीतानं दिली. बंधनात राहून मुक्तीचा अनुभव म्हणजे माझं संगीत, हा साक्षात्कार घडल्यामुळे आता केवळ आनंदच आनंद! हीच खरी मुक्ती!
======================================================================
सदर लेख शनीवार,  २० एप्रिल २०१३ च्या लोकसत्ताच्या 'विशेष' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.

उस्ताद तौफिक कुरेशी

''ड्रम, झेंबे, कोंगो, बोंगो, पॅड आदी वाद्ये वाजवायला मला कोणी शिकवली नाहीत. मीच शिकलो. जेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडे पाहतो तेव्हा त्यांच्यातील चतन्य मला जाणवतं. वाटतं, अरे या वाद्यांच्या मध्यावर काही बोल अडकून पडले आहेत, त्यांना बाहेर यायचं आहे, बाजूला कडेवर काही बोल आहेत, पट्टीवर काही बोल, वाद्यांच्या खोडावर काही बोल आहेत. त्यांना लोकांपर्यंत पोचायचं आहे. एका अनावर ओढीनं मी त्या वाद्यांवर प्रेमानं, विश्वासानं थाप देतो आणि ती वाद्य्ो बोलू लागतात.. त्यावेळी जे नादब्रह्म उभं राहतं ते ती वाद्यंच जन्माला घालत असतात. मी निमित्तमात्र असतो..'' सांगताहेत प्रसिद्ध तालवादक  उस्ताद तौफिक कुरेशी.
३ फेब्रुवारी २००७.
षण्मुखानंद हॉल खचाखच भरलेला. अब्बाजींची सातवी बरसी. दुपारचं सत्र सुरू झालेलं. समोर रसिकांमध्ये खुद्द उस्ताद झाकीर हुसेन, पं. सुरेश तळवलकर, पं. अरिवद मुळगावकर, विभव नागेशकर, योगेश सम्सी, नीलाद्रीकुमार असे दिग्गज बसलेले. वातारणात निरव शांतता!  लेहरा सुरू झाला आणि माझी झेंबेवर पहिली थाप पडली. मी पहिल्यांदाच परकीय झेंबेसारख्या वाद्यावर शास्त्रोक्त तबल्याचे ताल वाजवणार होतो. तो पहिलाच प्रयोग होता. तरलो तर यशस्वी नाही तर..
वादनाला सुरुवात झाली, पण मन अचानक स्तब्ध झालं.. काहीच सुचेना, सम चुकली. काय करू कळेना.. हार्मोनियम एकीकडे जातंय आणि मी दुसरीकडे अशी स्थिती. मी डोळे मिटले. डोळ्यांसमोर उभे राहिले अब्बाजी, उस्ताद अल्लारखांसाहेब. त्या मूर्तीने रंगमंच व्यापला, षण्मुखानंद व्यापलं. जग व्यापलं. ते आणि मी. मी आणि ते. अशी स्थिती काही क्षण राहिली. अचानक मला रस्ता दिसला. लेहरा सापडला. आपसूक तिहाई आली आणि मी सम साधली.. समोरून टाळ्यांचा कडकडाट झाला. जाणकारांची दाद आली. झेंबेवरून शिखर ताल त्या सभागृहात गुंजू लागला. नादभर झाला. नादब्रह्माच्या तीरावर मी वावरू लागलो..
''झाकीरभाई, मला तबल्याऐवजी दुसरी तालवाद्य्ो वाजवायची आहेत. काही तरी नवं करायचं आहे.'' १९८८ मध्ये केव्हातरी मी माझे मोठे बंधू झाकीरभाईंना विनंती केली. झाकीरभाईंना माझ्या मनाची ओढ माहिती होती. मी तबला चांगला वाजवत होतो. पण बडी रिच (विख्यात ड्रमर) आणि अब्बाजी यांची 'रिच -अल्लारखां' ही एल्. पी. रेकॉर्ड लावण्यासाठी लहानपणचा तीन-चार वर्षांचा छोटा तौफिक, खुर्शीद आपाच्या मागे हट्ट करायचा व दिवसात दहा-पंधरा वेळा ती रेकॉर्ड रोज लावून वेडा होऊन ऐकत रहायचा हे त्यांनी पाहिलं होतं. माहीमच्या बाबा मगदुमशहा दग्र्याच्या उरुसात बेभान होऊन स्वत: झाकीरभाई ढोल वाजवायचे, त्यावेळी त्यांच्या खांद्यावरचा तीन वर्षांचा तौफिक त्या ढोलाच्या तालात तितकाच बेभान व्हायचा हे त्यांनी अनुभवलं होतं. त्यांनीच मला दहा-बारा वर्षांपूर्वी बोंगो हे वाद्य दिलं होतं. त्यांचा एक वाद्यवृंद होता; त्या वाद्यवृंदात हेमलता, सुलक्षणा पंडित, नरेंद्र चंचल, महेशकुमार गायचे; झाकीरभाई स्वत:ही किशोरकुमारचं  ''एक चतुर नार'' रंगून गायचे; त्या वाद्यवृंदात सात-आठ वर्षांचा तौफिक अगदी रंगून जाऊन खंजिरी वाजवायचा! माझी तबल्याखेरीज अन्य तालाची आवड झाकीरभाईंना विनंती करत होती. त्यांनी मला परवानगी दिली. मला म्हणाले, ''जा प्रयत्न कर, नाही यश मिळालं तर 'दाया-बायाची' (तबला डग्ग्याची) साथ आहेच.'' मग मी अब्बाजींकडे दबकत गेलो. अब्बाजींनी थोडय़ा नाखुशीने मला परवानगी दिली (नंतर ते त्यांच्या एका मित्राजवळ बोलले की,''A good pair of hands is wasted!)''  त्यावेळी त्यांचा होकार मला दशदिशांतून आलेल्या परमेश्वराच्या हुंकारासारखा वाटला!
  मग माझा चाचपडत प्रवास सुरू झाला. मी सिने म्युझिक असोसिएशनचं कार्ड काढलं. पण दोन वष्रे मला कामच नव्हतं. मी त्यावेळी ऑर्केस्ट्रा वाजवायचो, दांडिया वाजवायचो आणि पसे मिळवायचो. कॉलेजमध्ये असतानाच मी घरून पसे घेणे थांबवले होते. आणि एक दिवस मला आनंद-मििलद यांच्या संगीतदिग्दर्शनाखाली एका चित्रपटाच्या गाण्यात ऑक्टोपॅड वाजवायचं निमंत्रण मिळालं आणि मग प्रवाह वाहता झाला. कुणालाही माहीत नव्हतं की मी अल्लारखांसाहेबांचा मुलगा आहे आणि उस्ताद झाकीरभाईंचा भाऊ आहे. मी सांगितलंही नाही. लोकांना हळूहळू ते कळलं!
 तुम्हाला सांगतो, ही सर्व तालवाद्य्ो माझ्याशी बोलतात. ड्रम, झेंबे, कोंगो, बोंगो, पॅड आदी वाद्य्ो मला वाजवायला कोणी शिकवली नाहीत. माझी मीच वाजवायला शिकलो. ती नुसती ठेवलेली असतात तेव्हा निर्जीव वस्तू वाटतात. पण मी त्यांच्याकडे जेव्हा पाहतो तेव्हा त्यांच्यातील चतन्य मला जाणवतं. मला वाटतं, अरे या वाद्याच्या मध्यावर काही बोल अडकून पडले आहेत, त्यांना बाहेर यायचं आहे, बाजूला कडेवर काही बोल आहेत, पट्टीवर काही बोल, वाद्यांच्या खोडावर काही बोल आहेत त्यांना लोकांपर्यंत पोचायचं आहे. एका अनावर ओढीनं मी त्या वाद्यांवर प्रेमानं, विश्वासानं थाप देतो आणि ती वाद्य्ो बोलू लागतात. त्यावेळी जे नादब्रह्म उभं राहतं ते मी नाही निर्माण करत, ते ती वाद्यंच जन्माला घालत असतात. मी निमित्तमात्र असतो. कधी कधी तर मीच अचंबित होऊन जातो व त्या वाद्यांना ऐकू लागतो!
अम्मीला वाटायचं की, ''अब्बाजी, झाकीरभाई, फजल सारेच तबलानवाझ आहेत. माझा एक तरी मुलगा सरकारी अफसर व्हावा.'' अब्बाजींनी ते मान्य केलं. पण मी मात्र, शाळेतून दुपारी तीनच्या सुमारास घरी आलो की, शागीर्दाच्याबरोबर असायचो. त्याचं तबलावादन ऐकायचो, त्यांच्यासमवेत वाजवायचो. आठवडय़ातून सहा दिवस दिवसाला चार-सहा तास हे चालायचंच. सपाट पृष्ठभाग दिसला की माझी बोटं चालायचीच. शाळेत, वर्गात हे सुरू असायचं, अगदी डबाही वाजवायचो. दोन-चार ताकिदी मिळायच्या, मग वर्गातून हकालपट्टी. बाहेर नोटीस बोर्ड वाटच पाहात असायचा. मी तोही वाजवत बसायचो. हेडमास्तर म्हणायचे, ''हा कधी सुधारायचा नाही.'' घरीही चमचे, वाटय़ा, ताटं, पेले, तांब्या जे मिळेल त्यावर मी ताल धरायचो. त्यातून निघणारे नाद मला मोहवायचे. अभ्यासात मला फारशी गती नव्हती, पण नापासही झालो नाही. अखेर अब्बाजींनी अम्मीकडून परवानगी घेऊन मला तबला शिकवायला सुरुवात केली. मला घरात संगीताची दोन विद्यापीठं मिळाली होती. त्यामुळे रियाझ चोवीस तास सुरूच. घरी मोठमोठे कलाकार यायचे. पं. रविशंकरजी, पं. हरिप्रसादजी, पं. शिवकुमारजी, उस्ताद अमजद अलीजी, उस्ताद अली अकबर खांसाहेब असे. त्यांना नुसते पाहणे, त्यांच्या चर्चा ऐकणे, हाही मोठा रियाझ होता. मी सिनेसृष्टीत अनेक वष्रे विविध तालवाद्य्ो वाजवत होतो. विख्यात संगीतकार बोलवत होते आणि एक दिवस गीतिका, माझी पत्नी मला म्हणाली, ''तौफिक किती दिवस तू हे काय करतोयस? तू अल्लारखांसाहेबांचा मुलगा आहेस, झाकीरभाईंचा भाऊ आहेस. दुसऱ्यांचं संगीत किती काळ वाजवणार आहेस? नवीन काही करणार की नाहीस?'' मी सर्द झालो. हतबुद्ध झालो. ''गीतिका, पसे कसे मिळवायचे? जगायचं कसं?'' ती म्हणाली, ''नंतर पाहू. आता आधी हे थांबव.'' मी थांबलो. रियाजाला सुरुवात केली, अगदी तास न् तास.
त्यापूर्वी मी, अब्बाजी आणि झाकीरभाईंसोबत अनेक कार्यक्रमात तबला वाजवला होता. पण माझी छाप पडत नसे, याचं कारण माझा रियाज कमी पडत होता. मी आधी तबल्यावर, नंतर नवनव्या तालवाद्यांवर नव्याने रियाज सुरू केला. झेंबेसारख्या वाद्यावर मी तबल्याचे बोल आरूढ करून काही नवे करता येते का, याचे प्रयोग करू लागलो आणि यातून एक नवा तौफिक जन्माला आला. २००० मध्ये माझा 'ऱ्हिधून' हा नवा अल्बम आला. त्यात मी 'ऱ्हिदमचे, तालाचे वेगळे प्रयोग केले आहेत. अब्बाजींनी त्यात अनेक वर्षांनी गायन केले आहे. २७ जानेवारी २००० रोजी त्यांनी रेकॉìडग केलं. ते आजारी होते, पण, त्या दिवशी ते प्रसन्नचित्त होते. मजेत गायले, अचूक सम गाठली. तबला वाजवणं सोडलेला आपला मुलगा आता प्रयोगशील संगीतकार होतोय व नवं करतोय याचंच समाधान त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होतं. त्यानंतर लगेच ३ फेब्रुवारी २००० रोजी ते पगंबरवासी झाले. पण जाता जाता त्यांनी या तौफिकला पसायदान दिलं. 'ऱ्हिधून' ने इतिहास घडवला व तौफिक कुरेशी या नावाची जगाने दखल घेतली..
आजही मी रंगमंचावर जाताना अस्वस्थ असतो. मी नीट वादन करू शकेन का, याविषयीची अधीर अस्वस्थता मनात असते. एकदा झाकीरभाईंबरोबर मी व सेल्वा गणेश अमेरिकेच्या दौऱ्यावर होतो. आधी झाकीरभाई वाजवणार व मग आम्ही दोघे!. सेल्वा व मी, दोघेही अस्वस्थ होतो. रंगमंचावर उद्घोषणा सुरू झाली. आमची स्थिती झाकीरभाईंनी बघितली व म्हणाले, ''नव्‍‌र्हस आहात का?'' मी हळूच पुटपुटलो, ''त्याहून बिकट परिस्थिती आहे.'' झाकीरभाई हसले व म्हणाले, ''अरे, नव्‍‌र्हस असणं केव्हाही चांगलं. आपण वाजवताना त्यामुळे सावध राहतो. पण फार नव्‍‌र्हस होऊ नका. जास्त नव्‍‌र्हस झालात तर चुका कराल आणि अतिआत्मविश्वास आला तर अधिक चुका कराल. नव्‍‌र्हसनेसचा सकारात्मक उपयोग करा. मी तर आताही नव्‍‌र्हस आहे.'' तो अल्लाचा आवाज होता. आमचा ताण दूर झाला व मफिलीचं एक इंगित गवसलं. आम्ही मफिलीवर लक्ष केंद्रित करू लागलो.
मी अब्बाजी आणि झाकीरभाईंबरोबर अनेक दौरे केले होते. कॉलेजमध्ये शिकत असतानाच मी युरोप अन् अमेरिका पाहिली होती. १९८६ मध्ये जर्मनीत स्टुटगार्डला कार्यक्रम होता. अडीच हजार लोकांनी सभागृह काठोकाठ भरलं होतं. नेहमी अब्बाजी आणि झाकीरभाई विलंबित लयीमध्ये सुरू करायचे, मध्य लयीवर यायचे आणि मग मी त्यांच्या सोबत वादनासाठी जायचो. पण त्या दिवशी काही वेगळेच घडले. तयारी सुरू असताना झाकीरभाईंनी मला बोलावले. मला वाटलं, नुसतं बसायचं आहे. पण लेहरा सुरू झाला अन् झाकीरभाई मला म्हणाले, ''तू सुरू कर.'' मी हादरलो, अब्बाजींनाही आश्चर्य वाटलं. ''तू सुरू तर कर.'' झाकीरभाई पुन्हा म्हणाले. लेहरा सुरू झाला होता, पाच हजार डोळे माझ्याकडे पाहात होते. मी कव्हर्स काढली, छोटी पेशकाराची उपज केली. पुढचं मला आजही आठवत नाही, आठवतं ते समेवर आल्यावर समोरून आलेली दाद! त्या क्षणी माझ्यात आत्मविश्वास आला. अब्बाजी आणि झाकीरभाईंचा समाधानी चेहरा मला सुखावून गेला. ती वेळ निभावली गेली. कारण माझ्या धमन्यांत अब्बाजींनी ताल भरला होताच! ताल हा माझा ध्यास आहे, ती माझ्या जीवनाची आस आहे, नव्हे तो माझ्या जगण्याचा श्वास आहे.
पण मला आजही असं वाटतं की, वादन करताना एकरूप भावावस्था वा समाधी अवस्था प्राप्त होते ना त्यापर्यंत मी अजूनही पोहोचलेलो नाही. त्याबाबत मी थोडासा दुर्दैवी आहे, म्हणा ना! पण एकदा पुण्याला ओशो आश्रमात पंडित रविशंकरजी आणि झाकीरभाई यांची एक मफल ऐकताना तशी समाधी लागली होती. मी स्वत:ला विसरून गेलो होतो..
'ऱ्हिधून'ने माझी नवी ओळख निर्माण झाली. नवनवे अल्बम येऊ लागले. यामागे गीतिकाची प्रेरणा असते. प्रत्येक वेळी मी वादनासाठी उभा राहतो तेव्हा रंगमंचाला नमस्कार करतो. हजारो वर्षांच्या सांगीतिक परंपरेला तो नमस्कार असतो. डोळे मिटतो तेव्हा मन:चक्षूंसमोर अब्बाजी उभे राहातात! त्यांचे मनोमन आशीर्वाद घेतो. थोडय़ा साशंकतेने मी वाद्यावर पहिली थाप देतो. मला मनात उत्सुकता असते की ते वाद्य आता काय बोलणार आहे. ते वाद्य आधी माझ्याशी बोलते, मग रसिकांशी. मी नादब्रह्माच्या मध्यावर पोहचायला निघालेलो असतो. मफल संपल्यावर जाणवतं, अरे, आपण अजून किनाऱ्यावरच आहोत..
.. पण मला नादब्रह्माच्या मध्यावर जायचंच आहे! एकदा तरी!!
शब्दांकन - प्रा. नितीन आरेकर
 =======================================================================
सदर लेख शनीवार, १३ एप्रिल २०१३ च्या लोकसत्ताच्या 'विशेष' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.

Wednesday, April 24, 2013

गंगूबाई हनगल



गानयोगिनी

आयुष्यभर गाणे आणि गाणे हाच ज्यांचा ध्यास होता, त्या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गंगूबाई हनगल म्हणजे शास्त्रीय संगीताच्या प्रांगणात शांतपणे तेवणारी निरांजनातील वातच! गंगूबाईंच्या जन्मशताब्दी वर्षांची सांगता येत्या ५ मार्च रोजी होत आहे. या निमित्ताने त्यांच्या कृतार्थ जीवनाचा वेध घेणारा खास लेख..
२१ जुलै २००९ रोजी वयाच्या ९७ व्या वर्षी डॉ. गंगूबाई हनगल हे जग सोडून गेल्या. किराणा घराण्याच्या खॉंसाहेब उस्ताद अब्दुल करीमखॉं यांच्या नावानं प्रसिद्ध असलेल्या शाखेतल्या गवयांत त्या सर्वात वयोवृद्ध गायिका होत्या. जवळजवळ एक शतकभराचं कृतार्थ जीवन त्यांना लाभलं. आपल्या प्रदीर्घ आयुष्यातली ऐंशीहून अधिक वर्षे त्या गात होत्या. 'गंगव्वा' (गंगू) हे आजीचं, म्हणजे आईच्या आईचं नाव. हनगल हे त्यांच्या गावाचं नाव. तेच त्यांनी आडनाव म्हणूनही स्वीकारलं. वडील चिक्कूराव नाडगीर व्यवसायानं वकील होते व ब्राह्मण समाजातले होते. त्यांची आई अंबाबाई ऊर्फ अंबाक्का कर्नाटकी पद्धतीचं गाणं फार छान गात असे.
आईच्या गाण्यातूनच संगीताचे प्राथमिक संस्कार छोटय़ा गंगूवर झाले. अंबाक्कांचं 'जावळी' व 'पल्लवी' गायन ऐकण्याकरिता पुष्कळदा खॉंसाहेब उस्ताद अब्दुल करीमखॉं यांच्या घरी येत असत. त्या वेळी कधीकधी छोटय़ा गंगूचं गाणं ऐकत असत. 'बेटा, गला बहुत अच्छा है तेरा. खूब गाना और खूब खाना' असा तोंडभरून आशीर्वादही देत असत. त्यातला 'खूब गाना' हा पूर्वार्ध गंगूबाईंनी अखेपर्यंत आचरणात आणला. शाळेला जाताना वाटेवरच्या ग्रामोफोनच्या दुकानात तबकडय़ा वाजवीत असत. छोटी गंगू तासन्तास ती गाणी ऐकत असे. जोहराबाई आग्रेवाली (१८६८-१९१३) या विख्यात गायिकेची गाणी तिला फार आवडत. 'मुलतानी', 'पूरिया' अशा रागांची नावं ठाऊक नव्हती, पण त्याच्या रेकॉर्ड्स मात्र पाठ झाल्या होत्या. जोहराबाईंसारखं जोशपूर्ण गाता आलं पाहिजे हे त्यांच्या मनानं अगदी लहानपणीच घेतलं.
कुमार गंधर्व व भीमसेन जोशी यांच्यावरही ग्रामोफोन रेकॉर्ड्सचा संस्कार अगदी लहानपणीच झाला होता, याची आठवण या संदर्भात होते. विशेष योगायोगाचा भाग असा की, जोहराबाई १९१३ साली गेल्या व त्याच वर्षी गंगूबाई जन्माला आल्या. त्या काळी हुबळी, धारवाड, बेळगाव परिसरात हिंदुस्थानी पद्धतीचं गाणं प्रचारात व प्रसारात होतं. धारवाडात भास्करबुवा बखले संगीत शिक्षक म्हणून दाखल झाले होते. करीमखॉं जवळच मिरजेला व बेळगावात 'आर्य संगीत विद्यालय' चालवीत होते. अशा वातावरणात छोटय़ा गंगूला उत्तर हिंदुस्थानी संगीत जास्त आवडायला लागलं होतं. तिचा स्वाभाविक कल पाहून आईनं तिच्या परीनं शिक्षणाची व्यवस्था करायचा खूप प्रयत्न केला. तिच्यावर दक्षिणी संगीताची छायाही पडू नये यासाठी स्वत:चं कर्नाटकी पद्धतीचं गाणं बंद करून टाकलं. संगीतातल्या मेहनतीबाबत आई विशेष आग्रही होती. कर्नाटकी पद्धतीप्रमाणे नोटेशन करायला त्या आईकडून शिकल्या व त्याचा गाणं शिकताना खूपच उपयोग झाला. परवडत नसतानाही गाणं व नृत्य यांचं मिळेल तिथून शिक्षण चालूच होतं. पाचवीनंतर शाळा सुटलीच, पण गाण्यात मात्र बरीच प्रगती झाली. सोळाव्या वर्षी १९२९ साली, गुरुराव कौलगी यांच्याशी लग्न झाले. ते वकील होते, पण त्यांनी वकिली कधीच केली नाही. अनेक यशस्वी/ अयशस्वी उद्योग मात्र केले. गंगूबाईंच्या गाण्याला मात्र त्यांचं प्रोत्साहनच असे. १९६६ साली ते गेले. गायनकलेवरती आपल्या मोठय़ा कुटुंबाचा निर्वाह अनेक वर्षे करावा लागेल व होऊ शकेल अशी त्या वेळी गंगूबाईंना कल्पनासुद्धा नव्हती. १९३०-३२ सालापर्यंत त्या हुबळी धारवाड सोडून कुठेच बाहेर गेल्या नव्हत्या. पुढे मात्र या विद्येच्या बळावर त्यांनी हिंदुस्थानातल्या सगळ्या महत्त्वाच्या संगीत परिषदा तर गाजविल्याच; पण उतारवयात युरोप व अमेरिकेतल्या परदेशी रसिकांनाही मंत्रमुग्ध केलं. गाण्याच्या बाबतीत त्यांच्यापुढं हिराबाई बडोदेकरांचा आदर्श होता. १९२० ते ३० या कालखंडात हिराबाईंनी तरुण मुलींसाठी मंचावरचं शास्त्रीय गाणं व नाटक-सिनेमातलं अभिनयाचं क्षेत्र खुलं करून दिलं होतं. त्यांच्यासारखं स्टेजवर बसून गावं असं गंगूबाईंना लहानपणापासून वाटत होतं. ते त्यांनी करून दाखवलं. आपल्या शालीन व नम्र वागणुकीनं दोघींनीही पुरुष गवयांप्रमाणे समाजात आपलं स्थान पक्कं केलं. गंगूबाई तर पुरुषाप्रमाणे गाताना डाव्या हातात पुरुषानं वापरायचं रिस्ट वॉच (घडय़ाळ) वापरत असत. रियाज करताना तानपुरा घेऊनच गात असत. मात्र मंचावर क्वचितच स्वत: तानपुरा छेडीत असत. कारण गाताना दोन्ही हात मोकळे असणं त्यांना आवश्यक वाटत असावं. भीमसेनजींप्रमाणे त्यांचं गाणं नुसतंच श्रवणीय नव्हे, तर प्रेक्षणीयसुद्धा असे. मुद्रा-अभिनय, देहबोली व हातांच्या हालचाली गाण्याला अधिकच खुलवत असत. लहानपणी शिकलेल्या नृत्याचाही त्यात काही वाटा असावा. साथसंगतीला मामा व नात्यातलीच मंडळी असत. गाण्यातली साथ मुलगी क्रिष्णा करत असे. तिलाही त्या भरपूर गाऊ देत असत. त्यांचा आवाज पुरुषी असल्यानं मायलेकींची ही स्त्री-पुरुष आवाजातली अनोखी जुगलबंदी चांगलीच रंगत असे.
गंगूबाई ७५ वर्षांच्या झाल्या त्या वेळी हुबळीत मोठा महोत्सव झाला. त्यात गंगूबाईंची प्रदीर्घ मुलाखत डॉ. अशोक रानडे यांनी घेतली. सुदैवानं ती ध्वनिचित्रफितीवर उपलब्ध असून कंठ संगीताच्या विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना व रसिकांना फार उपयोगाची आहे. या मुलाखतीत आपल्या गाण्याच्या जडणघडणीविषयी त्या म्हणतात, ''माझ्या गुरुजींनी (सवाई गंधर्वानी) माझ्याकडून रोज अर्धा अर्धा तास खर्ज साधना करवून घेतली. ज्या काळात स्त्रियांना ती सांगितली जात नसे त्या काळी त्यांनी मला करायला लावली. त्याचा मला खूपच उपयोग झाला. तानक्रिया अंगात मुरावी याकरिता तास तास/ दीड दीड तास मला पलटे घोटायला लावायचे. मेहनत करायला सांगून ते आत जाऊन आपली कामं करत असत. कित्येक वेळा तेच तेच घोटून कंटाळा येई. इतकं चांगलं गाऊनही पुढचं का सांगत नाहीत, असा विचार मनात येऊन डोळ्यात पाणी येई. पण त्यांचं समाधान होईतो करावं लागे.
अगदी सुरुवातीच्या ध्वनिमुद्रणांमध्ये मात्र त्यांचा आवाज फार बारीक व पातळ होता. १९३० सालाच्या आसपास 'हिज मास्टर्स व्हॉइस' (एच.एम.व्ही.) या ग्रामोफोन कंपनीचे मुंबईतले अधिकारी नवीन आवाजाच्या शोधात फिरत फिरत हुबळी, बेळगाव, धारवाड परिसरात आले. अंबाक्का व गांधारी या मायलेकींच्या गाण्याची चाचणी झाली व ध्वनिमुद्रिका काढायचं ठरलं. तसा रीतसर करारही झाला. पण पोटाच्या ऑपरेशननंतर आईचं निधन झालं. त्यामुळं ते मागं पडलं. पाठोपाठ एक वर्षांच्या आत वडीलही गेले. मग मात्र त्यांनी गायनविद्येकडे व्यवसाय म्हणून अधिक गंभीरपणे लक्ष द्यायला सुरुवात केली. बापूराव पेंढारकर यांच्या 'विजयाची लग्ने' या हिंदी व मराठी बोलपटात त्यांनी नायकासमोर गाणं म्हटलं होतं. दुर्दैवानं तो बोलपट आज उपलब्ध नाही. १९३२ ते ३५ या काळात त्यांनी मुंबईला येऊन ग्रामोफोन कंपनीकरिता सुमारे साठ गाणी ध्वनिमुद्रित केली.
मिया मल्हार, खंबावती, जोगिया, मालकंस, अडाणा, शुद्ध सारंग, मुलतानी, शंकरा, देसकार, हिंडोल, सुहा सुघराई, बागेश्री, देस, मांड, दुर्गा, बहार, भूपाली, बिहाग, पूरिया, कामोद व भैरवी रागांतल्या तीन-साडेतीन मिनिटांच्या ध्वनिमुद्रिका त्यांनी दिल्या. त्यात त्यांचा तरुणपणीचा उंच व टिपेला जाऊन भिडणारा स्त्री-स्वर ऐकायला मिळतो. या रेकॉर्ड्सच्या लेबलवरती व कॅटलॉगमध्ये 'गांधारी हनगल' असं लिहिलेलं आढळतं. ऑगस्ट १९३५ च्या एच.एम.व्ही. कॅटलॉगमध्ये त्यांच्या गायनाची 'विविध वृत्त'ने छापलेली तारीफ छापली असून आतील पानावर चांदणीच्या आकारात त्यांचा फोटो छापलेला आहे. 'ग्रामोफोन क्षितिजावरील नवीन तारा' असं त्यात म्हटलंय. या काळात सवाई गंधर्वाची तालीम सुरू झाली होती खरी, पण ते सतत नाटकांच्या दौऱ्यांमध्ये व्यस्त असल्यानं ती खंडित स्वरूपातली होती. गुरुजी धावतपळत येत, काही सांगत व त्याचा रियाज करायला सांगून निघून जात. मग गंगूबाई जमेल तसा व तितका सराव करत. पण त्यात काही शिस्त नव्हती. शास्त्रीय संगीताबरोबरच गझल व ठुमरी गायनाच्या चार-पाच ध्वनिमुद्रिका त्यांनी दिल्या. त्याही चांगल्याच खपल्या. पण सर्वात जास्त लोकप्रिय झाल्या त्या मराठी गाण्यांच्या. ही वीसेक गाणी आहेत. त्या काळात पं. नारायणराव व्यास व पं. विनायकराव पटवर्धनांसारखे काही गवई राग संगीताकरिता मराठी चिजा रचून जनसामान्यांपर्यंत शास्त्रीय संगीत नेण्याचा प्रयत्न करीत होते. १९३०-१९३२ च्या कालखंडात त्यांच्या ध्वनिमुद्रिकाही बाजारात आल्या. त्याकाळचे विख्यात नाटककार भा. वि. तथा मामा वरेरकर व शीघ्र कवी स. अ. शुक्ल ऊर्फ 'कुमुद बांधव' यांनी अशा रचना करून दिल्या. उदा. 'कशी सदया न ये माझी दया' (राग जोगिया) 'हरीचे गुण गाऊ या' (राग भीमपलास). यमन रागातली 'ए री आली पिया बिन' ही चीज प्रसिद्धच आहे. त्यावर 'चल लगबग ये झणी' ही शुक्ल कवींची रचना गंगूबाईंनी मुद्रित केली. विशेष म्हणजे त्यात साथीला चक्क सतार हे वाद्य आहे. ध्वनिमुद्रिकांच्या माध्यमातून गंगूबाईंचं गाणं जिकडंतिकडं वाजू लागलं. मुलांसाठी गायलेली दोन गाणी सर्वाधिक गाजली. मामा वरेरकर यांची ही दोन गाणी एका रेकॉर्डवर पाठपोठ आली. 'आईचा छकुला' व 'बाळाचा चाळा' ही गाणी फोनवर वाजवली जात व घरोघरीचे छकुले व छकुल्या ती ऐकता ऐकता झोपी जात.
अशाच दोन अनोख्या मराठी भावगीतांची हकीकतही मोठी गमतीशीर आहे.
एच.एम.व्ही.त त्या वेळचे विख्यात गायक जी. एन. जोशी शुक्ल कवींची दोन द्वंद्वगीतं मुद्रित करीत होते. त्यांची चाल काहीशी पाश्चात्त्य पद्धतीची (वॉल्टझ) प्रकारातली होती. त्यांच्या बरोबरीच्या सहगायिकेला ते उंच स्वरातलं व तारसप्तकातलं गाणं काही केल्या पेलत नव्हतं. त्यामुळं सगळेच काळजीत होते. इतक्यात गंगूबाई त्यांच्या ठरलेल्या मुद्रणासाठी स्टुडिओत आल्या. त्यांना पाहून जी. एन. जोशींनी गाण्याची विनंती केली. पण त्यांनी साफ नकार दिला. पण ज्या गायिकेला ते जमत नव्हतं तिनंच आग्रह केल्यावरती मग त्या तयार झाल्या. त्यातूनच 'चकाके कोर चंद्राची' व 'तू तिथे अन् मी इथे हा' ही दोन गाणी मुद्रित झाली व खूपच गाजली. मराठी भावगीतांच्या इतिहासातली ही पहिली युगलगीतं.
सुमारे पंधरा वर्षांपूर्वी दक्षिण मुंबईच्या टाटा थिएटर परिसरात एन.सी.पी.ए.मध्ये गंगूबाईंचा सत्कार समारंभ होता. तिथं ही ध्वनिमुद्रिका घेऊन गेलो होतो. ती बघून त्यांना खूप आनंद झाला. 'कोण ऐकतं का हो ही गाणी आता?' असं विचारून कृष्णाबाईंनाही त्यांनी ती रेकॉर्ड दाखवली. ५० वर्षांपूर्वीच्या त्या काळातल्या आठवणींमध्ये त्या रंगून गेल्या. एच.एम.व्ही. स्टुडिओत रेकॉर्डिग झालं त्या वेळी ही तान्ही होती. तिला थोपटून, झोपवून मग गाणी करायचे. एका गाण्याचे पंधरा रुपये मिळत. पण ह्य़ा ध्वनिमुद्रिकांमुळेच त्यांचं नाव झालं व गाण्याची निमंत्रणं मिळू लागली. १९३६ च्या सुमारास मुंबईत गोरेगाव येथे पहिला जलसा झाला. रेडिओ व गणपती उत्सवातही त्यांची गाणी होऊ लागली. विशेष म्हणजे त्याच सुमारास ज्यांचा आदर्श समोर ठेवला त्या हिराबाई बडोदेकर यांच्या रेकॉर्ड्स बाजारात येत होत्या. तसेच गुरुजी सवाई गंधर्व व मुंबईतले गुरुबंधू मास्टर फिरोज दस्तूर यांच्याही ध्वनिमुद्रिका प्रकाशित होत होत्या. १९३६ च्या आसपास प्रकृतीच्या कारणानं नाटक कंपनी बंद करून गुरुजी कुंदगोळला येऊन राहिले. मग १९३७ ते १९४१ अशी सलग चार वर्षे गंगूबाईंना गुरुजींच्या घरी जाऊन गाणं शिकायला मिळालं. हुबळी ते कुंदगोळ रेल्वेनं प्रवास करावा लागे. कधी लहान मूलही सोबत असे. रस्त्यानं जाताना 'बघा बघा. धडपणे संसार करायचा सोडून ती पाहा गाणारी चालली आहे. लाज कशी वाटत नाही' अशी शेरेबाजीही ऐकावी लागे. पण ह्य़ा सगळ्याला त्या पुरून उरल्या. कधी परतीची गाडी संध्याकाळी उशिरानं येई. मग गुरुबंधू व मानलेला भाऊ भीमण्णा (भीमसेन जोशी) कंदील घेऊन स्टेशनवर सोबत येई. गुरुजींनी काय नवीन शिकवलं त्याची एकमेकांत उजळणी होई. बहीण-भावाचं हे नातं फार फार प्रेमाचं होतं व अखेपर्यंत टिकून होतं. ह्य़ा तालमीमुळं त्यांचं गाणं पक्कं व परिपक्व झालं. घशावरच्या उपचारांनंतर आवाज बदलून रुंद व पुरुषी झाला. त्या आवाजातली ध्वनिमुद्रिका १९५५ साली 'बाई गंगूबाई हनगल' या नावानं निघाली. त्यात 'मारवा' व 'भैरव' हे राग त्या गायल्या आहेत. 'मारवा' रागातली 'सुन सुन बतिया'ची रेकॉर्ड आत्माराम भेंडे त्यांच्या 'डायल एम फॉर मर्डर' या नाटकात वातावरणनिर्मितीसाठी पाश्र्वसंगीत म्हणून वाजवीत असत.
पुढं ई. पी. व एल. पी. रेकॉर्ड्सचा जमाना आल्यावर त्यांनी काही रेकॉर्ड्स केल्या. कॅसेट्स व सी.डी.च्या माध्यमातूनही त्यांच्या देश-विदेशातल्या मैफिली वितरित झाल्या. त्यांच्या मागे खूप छायाचित्रं व ध्वनिमुद्रणं पुढच्या पिढय़ांसाठी उपलब्ध आहेत. त्यांच्या नातवानं हुबळीत 'स्मरण मंदिर' नावाचं संग्रहालय उभं केलं असून तिथं त्यांचे तानपुरे व फोटो पाहायला मिळतात. त्यात तरुणपणीच्या तानपुऱ्याच्याच उंचीच्या गंगूबाई पाहावयास मिळतात. त्या छायाचित्राचं उतारवयात उद्घाटन करतानाही दिसतात. आवाजाच्या बाबतीत विद्यमान स्त्री गायिकांमध्ये त्या एकमेव मर्द गायिका होत्या. पद्मविभूषण, सन्माननीय डॉक्टरेट या सर्वोच्च मानाच्या पदव्या त्यांना प्रदान करण्यात आल्या. त्या मात्र 'अहो, मी तर फक्त पाचवी पास आहे' असं बोलून दाखवत असत. मात्र गाण्यावरचं त्यांचं प्रेम विलक्षण होतं व निष्ठा गाढ होती. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला त्या एकदा गेल्या होत्या. देवीचं दर्शन घेऊन सभामंडपात आल्या. थोडय़ा विसावल्या व हळूहळू गायला लागल्या. त्या आल्याची व गात असल्याची बातमी कानोकानी पोहोचली. पाहता पाहता श्रोते जमा झाले. कलाकार म्हणून त्या फार मोठय़ा होत्याच. पण एक माणूस व विचारी अशा जागरूक नागरिक म्हणूनही गंगूबाई हनगल फार फार थोर होत्या.

Monday, February 18, 2013

'स्वरार्थ रमणी'चा सन्मान

honor of kishori amonkar भारतीय अभिजात संगीताच्या गेल्या पन्नास वर्षांच्या कालपटलावर आपली ठसठशीत मुद्रा उमटविणाऱ्या गायक कलावंतांमध्ये पंडिता किशोरी आमोणकर यांचे नाव अग्रभागी आहे. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पहिल्या पुरस्कारासाठी किशोरीताईंची निवड जाहीर करून महाराष्ट्राने त्यांच्या कलेला महत्त्वपूर्ण दाद दिली आहे. ज्या महाराष्ट्राचे नाव संगीताच्या क्षेत्रात अतिशय मानाने घेतले जाते, त्या महाराष्ट्रातच संस्थापित झालेल्या जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ कलावंत म्हणून किशोरीताईंनी साऱ्या विश्वाला संगीताच्या माध्यमातून कवेत घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या गायनाने दिव्यत्वाची प्रचिती आलेले लाखो रसिक त्यांच्या प्रतिभास्पर्शाने अक्षरश: पावन झाले आहेत. पंडित भीमसेन जोशी, पंडित कुमार गंधर्व आणि किशोरीताई या तिघांनी गेल्या पाच दशकातील भारतीय संगीतावर अधिराज्य गाजवले आहे. या तिघांच्याही गायनशैली निरनिराळ्या असल्या तरीही त्यांच्या गायनाने भारतीय अभिजात संगीताला उत्तुंग शिखरावर नेऊन ठेवले आहे. भारतीय संगीतात गेल्या काहीशे वर्षांमध्ये काळाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या नवोन्मेषी प्रतिभेने त्यात मोलाची भर घालणारे कलावंत निर्माण झाले. त्यांनी आपल्या प्रज्ञेने या संगीताला नवी झळाळी प्राप्त करून दिली. त्यामुळे ते प्रवाही राहिले. गुरू-शिष्य परंपरेत गुरू मुखातून मिळालेल्या कलेवर आपल्या बुद्धीने आणि प्रतिभेने त्यात भर घालणे हे भारतीय अभिजात संगीताचे वैशिष्टय़ मानले जाते. गुरूप्रमाणेच गाणे आणि त्याच्या गायकीत स्वत:ची भर घालून ते नव्याने सादर करणे या दोन प्रकारांमध्ये स्वप्रतिभेच्या कलावंतांना नेहमीच महत्त्वाचे स्थान प्राप्त होते. किशोरीताई यांनी अशी भर घातली आणि त्यामुळे संगीत आजवर टिकून राहण्यास मदत झाली. जयपूर घराण्याची तालेवार तालीम मिळाल्यानंतर त्यातील सौंदर्यस्थळांचा शोध घेताना किशोरीताईंनी संगीताचा शास्त्रीय अभ्यास केला. जुने पुराणे ग्रंथ वाचून त्यांचा अर्थ समजावून घेऊन, त्याचा संगीतात कसा उपयोग करता येईल, याचा विचार त्यांनी केला. त्यामुळे घराणे तेच असले, तरी त्या घराण्यातील अन्य कलावंतांपेक्षा त्यांचे गायन नेहमीच वेगळे भासत आले. 'स्वरार्थ रमणी' हा त्यांनी सिद्ध केलेला ग्रंथ हे त्यांच्या अभ्यासू वृत्तीचे एक सुरेख दर्शन आहे. सौंदर्यशास्त्राच्या गहन गुहेत शिरून तेथील मौल्यवान रत्नांचा आपल्या गायनाद्वारे साक्षात्कार घडवण्याचे सामथ्र्य त्यांच्यापाशी आहे. त्यांच्यासाठी गायन कला हे साध्य नाही, तर ते जीवनाच्या पलीकडील विश्वापर्यंत जाण्याचे एक अमोल साधन आहे. त्यामुळे संगीताद्वारे त्या आपल्याबरोबरच रसिकांनाही एका अनवट आणि अद्भुतरम्य दुनियेत घेऊन जातात आणि त्यांना परीसस्पर्शाची अनुभूती मिळवून देतात. त्यांच्या या योगदानाबद्दल महाराष्ट्रानेच नव्हे, तर साऱ्या देशाने त्यांचे ऋणी राहायला हवे. संगीत ही अमूर्त कला असली तरी ती माणसाच्या जगण्यातील अर्थ शोधणारी कला आहे, असे मानणाऱ्या कलावंतांपैकी किशोरीताई एक आहेत. भीमसेनजींनी ज्याप्रमाणे आपल्या संगीतातून साऱ्या विश्वाला भारतीयत्वाचे एक अपूर्व दर्शन घडवले, त्याप्रमाणेच किशोरी आमोणकरांनीही या संगीताच्या ताकदीची प्रखर जाणीव करून दिली. रागसंगीताप्रमाणेच भक्तिसंगीतातील परंपरेत त्यांनी स्वत:ची मुद्रा उमटवली. भावगीतासारख्या शब्दसंगीतातील त्यांचे अस्तित्व आणखी एका वेगळ्या प्रांतातून सफर घडवते. संगीत हे केवळ स्वरांमध्ये नसते, तर त्यातून व्यक्त होणाऱ्या भावदर्शनांत असते, याची जाणीव त्यांचे गायन ऐकताना सतत होते. हे भावदर्शन मनाच्या गाभ्याचा ठाव घेते आणि रसिकाला वेगळ्या विश्वात घेऊन जाते. त्यांच्या या सन्मानाबद्दल त्यांचे अभिनंदन करीत असताना, त्यांचे ऋणही मान्य करायला हवेत.
======================================================================= सदर लेख रविवार, १८ फेब्रुवारी २०१३ च्या लोकसत्ताच्या 'विशेष' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.