Friday, October 5, 2012

डॉ. अबान मेस्त्री
‘पहिल्या पूर्णवेळ (प्रोफेशनल) महिला तबलावादक’ म्हणून डॉ. अबान मेस्त्री यांची नोंद लिम्का बुकाने घेतली होती खरी; पण हे कौतुक सामान्यजनांना.. ‘भाजे येथील २३०० वर्षांपूर्वीच्या (इसवी सन पूर्व २००) लेण्यात तबलासदृश वाद्य वाजविणाऱ्या एका महिलेचे उत्थितशिल्प दिसते’ हे अबान मेस्त्री यांनीच प्रबंधात नमूद केले होते! अबान यांची गेल्या ५० वर्षांची सांगीतिक कारकीर्द केवळ तबल्याच्या तालाने नव्हे, तर सतार आणि कंठसंगीत, तसेच हिंदी व संस्कृतच्या विद्यापिठीय अभ्यासाने बहरली होती, हे संगीताच्या जाणकारांना अधिक महत्त्वाचे वाटते.
तबल्याचा घरंदाजपणा टिकवणाऱ्या थोडय़ांपैकी अबान होत्या, त्या केवळ एखाद्या घराण्याच्या वृथाभिमानामुळे नव्हे, तर अभिजाततेची चतुरस्र जाण  मिळवल्यामुळे. ‘तबला आणि पखवाजाची घराणी व परंपरा’ या विषयात त्यांनी पीएच. डी. (गांधर्व महाविद्यालयाची ‘संगीताचार्य’ पदवी) मिळवली, तेव्हा गेल्या ५०० वर्षांतील ३० महान वादकांनी कोणकोणती भर घातली, याचा धांडोळा त्यांनी घेतला होता.  ‘तबले की बंदिशें’ या  पुस्तकातून त्यांनी सप्रयोग (सीडीसह) तालतत्त्वाचे महत्त्व विशद केले. पंडित केकी एस. जिजिना, पं. लक्ष्मणराव बोडस आणि उस्ताद आमीर हुसेन खान या तिघा गुरूंपैकी जिजिनांच्या त्या पट्टशिष्या. या गुरूसह त्यांनी ‘स्वर साधना समिती’ ची स्थापना १९६१ मध्ये केली. अर्थात, ‘सूर सिंगार संसदे’सारख्या अन्य संस्थांच्या संमेलनांतही अबान यांचा सहभाग असे. पं. जिजिना,  फिरोज दस्तूर आदींनी लखलखीत केलेली पारसी समाजातील हिंदुस्तानी शास्त्रीय गायन-वादनाची, सध्या अस्तंगत होत चाललेली परंपरा अबान यांनी जागती ठेवलीच, पण ग्रंथबद्धही केली. अबान यांचे निधन गेल्या रविवारी झाल्यामुळे हा दुवा निखळला आहे. देशभरातील  संगीत संमेलनांत जाणकारांची, तसेच विदेशातही श्रोत्यांची दाद मिळवणारी, देशभरातील महत्त्वाच्या विद्यापीठांत अध्यापन करणारी आणि ‘डॉटर्स ऑफ महाराष्ट्र’ सारख्या पुस्तकात मानाचे स्थान मिळवणारी ही ‘वादिका’ भारत सरकारच्या पुरस्कारांपासून वंचितच राहिली. परंतु शोकसभेऐवजी येत्या शनिवारी गायन-वादनाची बैठक होणेच उचित ठरावे, इतकी अविरत, अम्लान संगीतसेवा अबान यांनी केली होते.
==========================================================================
 

No comments: