Wednesday, February 16, 2011

स्मरण यात्रा




स्मरण यात्रा
नादब्रह्माचा उपासक
विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर


(लेखक - स्वरभास्कर)
पं.भीमसेन जोशी!नादब"ह्माच्या या श्रेष्ठ उपासकाने दि. 24 जानेवारी 2011 रोजी इहलोकीची यात्रा संपवली असली तरी रसिकांच्या हृदयात या अभिजात गायकाचं स्थान अढळच राहणार आहे.
गाणं शिकण्याच्या एकमेव ध्यासाने झपाटलेला आणि त्यासाठी पडतील ते कष्ट घेणारा हा गानयोगी...त्यांच्या या ध्यासाची प्रचिती देणाऱ्या काही आठवणी इथे दिल्या आहेत....
आपल्या गुरूच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी त्यांनी सुरू केलेला सवाई गंधर्व संगीत महोत्सव म्हणजे रसिकांसाठी पर्वणीच...भारतभरातल्या ज्येष्ठ अन्‌ श्रेष्ठ कलावंतांना दाद देतानाही इथे येणारा रसिक आतुर असायचा तो भीमसेनजींना ऐकायला...त्यांच्या मैफिलीने होणाऱ्या सांगता सोहोळ्याचं साक्षी असणं हे प्रत्येक रसिकाचं स्वप्न! या मैफिलीचं शब्दचित्रही इथे देत आहोत.
पं. भीमसेन जोशी म्हणजे संगीतविश्र्वाचा स्वरभास्कर. भारतीय संगीताचा मानदण्ड! संगीताच्या सुरेल दुनियेचा नादसागर. जवळजवळ पाच तपं कोट्यवधी रसिकांना मुग्ध करणारा चिरयौवन स्वर!
या गंधर्वकंठातला एकेक नितळ, निकोप स्वर म्हणजे सजीव भावशिल्प. पंडितजींच्या स्वराला स्पर्श आहे भगवान श्रीकृष्णांच्या वेणूचा आणि नारदांच्या वीणेचा. शास्त्रीय संगीतातील त्यांची कलाकुसर अशी, की नामवंत शिल्पांनीही लाजावं, चांदण्यांनीही हळुवार व्हावं. आलापीची अमृतवेल गुंफणारी अजोड "याल गायकी... शृंगारात फुललेली सलज्ज ठुमरी... भक्ती आणि करुण रसांचा परमोत्कर्ष साधणारी नादस्वरांत चिंब भिजलेली संतवाणी... आणि सुगम संगीतातील विलोभनीय सुबद्धता- ही चतुरस्रता अनुपमेय!
गानरसिकांच्या हृदयसिंहासनावरील अनिभिषिक्त गानसम"ाट म्हणजे पं. भीमसेन जोशी! पं. भीमसेन जोशी म्हणजे एक व्यक्ती नाही, ते एक संस्थान आहे आणि तेही साधंसुधं नव्हे, तर संगीत.
एक व्यक्ती म्हणून, गायक म्हणून, नादब"ह्माचा उपासक या नात्यानं पंडितजी शुक्लपक्षातील चंद्रकलेप्रमाणं वाढले आहेत. जमिनीमधून निघालेला हा एक कोंब पाहता पाहता इतका वाढला, की त्याचा गगनाला गवसणी घालणारा वेलू झाला.
गुरुगृही भीमसेन दाखल झाला खरा, पण प्रारंभी वर्षभर सवाई गंधर्वांनी भीमसेनला प्रत्यक्ष गाणं असं शिकवलं नाहीच.
भीमसेनच्या कष्टप्रद उमेदवारीला मात्र प्रारंभ झाला.
भीमसेननं उमेदवारी केली, ती अगदी मनापासून. अंतकिरण ओतून. त्याकाळी कुंदगोळला पाण्याचे फार हाल असत. पाणी एकूण कमीच. पाणी आणायचं, ते साधारण अर्धा-एक मैल अंतरावर असलेल्या तळ्यातून. दोन मोठ्या घागरी घेऊन भीमसेन तळ्यावर जायचा आणि तिथून पाणी भरून घागरी खांद्यावरून आणायचा.घरातलं पाणी भरून होईतोपर्यंत भीमसेनच्या फेऱ्या अखंड चालू असत. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा काहीही असो. हा क"म काही चुकायचा नाही.
गुरूंनी वा गुरुपत्नींनी सांगितलेली कोणतीही गोष्ट भीमसेन ताबडतोब अमलात आणत असे.केर काढणं, घर झाडणं, कपबशा विसळणं, गुरुजींचे कपडे धुणं, पाणी भरणं अशी कष्टाची सर्व कामं भीमसेननं आनंदानं केली.
सवाई गंधर्व भीमसेनला "भिमू' अशी हाक मारायचे. भीमसेनला गुरुंबद्दल आत्यंतिक भक्ती आणि आदर होताच.थोेडी भीतीही होती. आदरयुक्त भीती. "भिमू' म्हणून हाक आली की, भीमसेन घाबरायचा. आपलं काही चुकलं तर नाही ना, असं त्याला वाटायचं. थोड्याच दिवसांत भीमसेन त्या कुटुंबात अगदी मिसळून गेला. एकजीव झाला.
स्वयंपाकघरातलं काम असू दे, बैठकीवरचं असू दे किंवा अंगणातलं असू दे, भीमसेन नेहमी आघाडीवरच.
एकदा सीताबाईंनी चैत्रातलं हळदीकुंकू काढलं.हळदीकुंकू काढलं खरं, पण कैऱ्या काही मिळेनात. आता? कैऱ्या तर पाहिजेतच. त्याशिवाय हळदीकुंकू कसं व्हायचं?छोट्या गोष्टीसाठी गाडी अडून बसली.सीताबाईंनी चिंता वाटू लागली.
घरात चाललेली कुजबूज भीमसेनच्या लक्षात आली.
त्यानं प्रमिलाताईंना हाक मारून विचारलं, "पमाक्का काय झालं?'
"अरे, आज घरात हळदीकुंकू आहे.'
"मग?'
"मग काय? घरी कैऱ्या नाहीत. आपलं गाव हे असं! कैऱ्या नाहीत तर, हळदीकुंकू कसं व्हायचं?'
"एवढंच ना! आता आणतो की!'
"अरे, पण आणणार कुठून? गावात कुठंही नाहीत.'
"नसेनात. मी आणून देतो ना!'
भीमसेननं घरातली सायकल बाहेर काढली आणि पाय वेगाने मारत हुबळी गाठली. कैऱ्या खरेदी केल्या. दुप्पट वेगानं तो कुंदगोळला परतला.कपाळावरचा घाम पुसत भीमसेननं प्रमिलाताईंना हाक मारली आणि त्यांच्या पुढं कैऱ्या ओतल्या. म्हणाला, "पमाक्का, ह्या घ्या कैऱ्या.'
सगळ्यांनी भीमसेनंकडं कौतुकानं पाहिलं.
सीताबाई म्हणाल्या, "आहे हो! मुलगा कामाचा आहे.'
गुरुगृही भीमसेनचा खाक्या हा असा होता.
भीमसेनच्या मनात एकच विचार होता. गाण्यासाठी आपण घरातून बाहेर पडलो. भ"मंतीत कष्टही सोसले, पण गाणं काही लाभलं नाही. केवळ ईश्र्वरी कृपेनं गुरू लाभला आहे. आता त्याचे चरण सोडायचे नाहीत.वाटेल तितके कष्ट सोसावे लागले तरी चालतील, पण आता गाणं आलं पाहिजे.म्हणूनच कष्ट उपसतानाही त्याचा स्वभाव सतत आनंदीच राहिला.
कठोर सत्त्वपरिक्षेत उत्तीर्ण
...साधारणति वर्ष, दीड वर्षांनंतर सवाई गंधर्वांच्या लक्षात आलं की, भीमसेन हा चिवट विद्यार्थी आहे.
गाण्याबद्दल त्यांच्या मनात खरोखरच भक्ती आहे, श्रद्धा आहे.
मधेच कच खाऊन पळणारा हा विद्यार्थी नव्हे.
असा हा पूर्ण पारखून घेतलेला शिष्य सवाई गंधर्वांना आवडला.
एवढ्यात आणखी एक प्रसंग असा घडला की, ज्यामुळं भीमसेनाचं रूपांतर एका संगीत शिल्पात करण्याचा दृढ निश्र्चय सवाई गंधर्वांनी केला.
दक्षिणेकडील एक प्र"यात गायक पंचाक्षरीबुवा अधूनमधून सवाई गंधर्वांकडं येत असत. बऱ्याच वेळी त्यांच्याबरोबर शिष्यांचा प्रचंड जथा असे. शंभर-दीडशे शिष्य घेऊन बुवा यायचे.
प्रसंगविशेषी सवाई गंधर्व त्यांना थट्टेनं म्हणत, "या शंभर शेळ्या घेऊन गावोगाव फिरता, पण यातली एक तरी दूध देते काय?'
मग पंचाक्षरीबुवा दूध देणाऱ्या शेळीला, म्हणजे गाणं येणाऱ्या शिष्याला गायला लावत.
एका प्रसंगी पंचाक्षरीबुवांनी बसवराज राजगुरूंना गायला सांगितलं. बसवराजांची पंचाक्षरीबुवांनी केलेली तयारी ऐकून, यापेक्षा अधिक चांगला शिष्य तयार करण्याची इच्छा सवाई गंधर्वांना अंतर्यामी झाली.कारण दुसऱ्याच दिवसापासून त्यांनी भीमसेनला गाण्याची तालीम देण्यास प्रारंभ केला.ती तालीम, तो अभ्यास अस्सल खानदानी होता. सिद्ध झालेल्या परंपरागत शिस्तीचा होता.सकाळी साधारण तास-दीड तास आणि संध्याकाळीही साधारणपणे तेवढाच वेळ सवाई गंधर्व भीमसेनचा गळा तयार करून घेत असत.
कुठलाही श्रेष्ठ कलावंत नादब"ह्माची अशी श्रद्धामय पूजाच बांधतो. अशी पूजा पहाण्याचं आणि ऐकण्याचं भाग्य भीमसेनला लाभलं.
सवाई गंधर्व स्वति एक राग भीमसेनला गाऊन दाखवत. त्यानं तो लक्षपूर्वक ऐकायचा. नंतर त्यामधील एकेक तुकडा घेऊन तो पक्का घोटायचा. एकेक जागा पक्की करून मगच पुढं जायचं. तोपर्यंत तोच पलटा घोकायचा. त्याला इलाज नसायचा. स्वति पंडितजींनीच सांगितलं,
"तोडीतली एखादी तान घेतली की, ती सारखी अनेक वेळा पुनि पुन्हा म्हणत राहायची. तेच तेच गात राहायचं. विशेषति माझ्या त्या वयात कंटाळा आणणारी गोष्ट होती.'
"एक तास, दोन तास, रोज ती तोडी घोटत बसायचं. डोकं अगदी दुखायला लागायचं, पण त्याचा फायदा आता मला समजतोय. तोडीत काही करायची जी शक्ती आहे, ती त्यावेळच्या मेहनतीनं मी प्राप्त करून घेतली आहे.'
संगीतासाठी असे कष्ट करावे लागतात, त्यावेळी स्वरसिद्धी प्राप्त होते.
भीमसेननं उमेदवारी करताना जी अफाट मेहनत केली, ती पुढील पिढीला प्रेरणादायी तर आहेच, पण मेहनत कशी करावी, याचा तो वस्तुपाठच आहे.
पहाटे चार वाजता उठून भीमसेन खर्ज लावत असे. मग मंद्रसप्तकाची मेहनत सुरू होई. ती सात-साडेसातपर्यंत.आंघोळ करून पुन्हा मेहनतीला बसायचं ते थेट माध्याह्नकालपर्यंत. पुन्हा दुपारी दोन-अडीचपासून संध्याकाळी सहापर्यंत आणि रात्री जेवण झालं की, पुन्हा थेट मध्यरात्रीपर्यंत.अशी अफाट मेहनत केली, म्हणूनच आज सप्त स्वर हात जोडून पंडितजींपुढं उभे आहेत.
संगीताचा हा अभ्यास जवळजवळ तीन वर्षं चालू होता. अखंड. गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली.
रसिकांना तृप्त करणारी
सवाई गंधर्व महोत्सवाची सांगता!
माझ्या डोळ्यांपुढं तर कै. सवाई गंधर्व पुण्यतिथी महोत्सवाचं दृश्य सदैव असतं. अवघ्या भारतातून आपली हजेरी लावण्यासाठी शेकडो कलावंत इथे धावत येतात. महोत्सवात सेवा सादर करायला मिळाली, की स्वतलिा धन्य समजतात.
रेणुकास्वरूप मुलींच्या भावे स्कूलमध्ये घातलेला किंवा न्यू इंग्लिश स्कूल रमण बागेतला मंडप तीन रात्री जागत असतो. स्वरांत भिजत असतो.
पण पहिल्या दिवसापासून अवघ्या श्रोत्यांंचं लक्ष सांगतेच्या पहाटेकडं असतं. कारण शेवटी गाणार असतात पंडितजी. तीनही दिवस मंडपात अतोनात गर्दी असतेच, पण पंडितजींच्या गाण्याच्या वेळी तिथे महासागर उसळतो. अखेरच्या काही तासात मुक्तद्वारही असते. त्यामुळे पंडितजींचं गाणं ऐकायला मिळेल, तिकीटही काढावं लागणार नाही, असा खास "सदाशिवी' हिशेब करून अनेक रसिक मंडळी मंडपात घुसतात.
पहाटेपासूनच सगळ्यांनी मोक्याच्या जागा अडवून धरलेल्या असतात. मंडपात तर मुंगी शिरायलाही जागा नसते. निसर्गाची हाक आली, तरी मंडळी जागा सोडायला तयार नसतात. कारण पंडितजींच्या गाण्याच्या वेळी ती जागा पुन्हा मिळणं केवळ अशक्य असतं.
मंडप गर्दीनं वाहू लागला, की त्याचं लोण कोनाकोपऱ्यात जातं. व्हरांडे तुफान भरतात. मंडपाबाहेरची जागाही भरते. लोकांना येण्याजाण्यासाठी ठेवलेल्या जागासुद्धा अतिक"मणानं तुडुंब भरतात आणि शेवटी शेवटी तर गर्दीचा रेटा हळूहळू रंगमंचाकडे जायला लागतो. काही मंडळी चक्क रंगमंचावरच बैठक ठोकतात आणि मग तेथूनच खालच्या श्रोतृवर्गाकडे "जितं मया' अशा मुद्रेनं पाहतात.
नुकतंच कोणाचं तरी गाणं संपलेलं असतं. बहुधा वसंतराव देशपांडे, फिरोज दस्तूर किंवा नियाझ-फैज अहमद. दमलेला ध्वनिक्षेपक बसक्या आवाजात अवघ्यांच्या आभाराचं गोड काम करीत असतो आणि ते गोड काम केव्हा संपतं, याची अवघा मंडप औत्सुक्यानं आणि थोड्याशा अस्वस्थतेने वाट पाहत असतो.
भारतीय बैठकीवर बसल्यामुळे अंगही हलवायला जागा नसलेला कुणी रसिक श्रोता तेवढ्या गर्दीतूनही धडपडत वर उठत वाद्यांच्या खोलीकडं नजर टाकतो आणि तोंडात जमवलेल्या पानाचा प्रसाद बसलेल्या लोकांना मिळू नये, म्हणून ऊर्ध्व दिशेला तोंड करत बोबड्या आवाजात म्हणतो,
"आता बुवा येणार बरं का!' आता औत्सुक्य अगदी कळसाला पोहोचलेलं असत. वाद्य रंगमंचावर येऊ लागतात आणि ध्वनिक्षेपक गरजतो,
"आता आपली सेवा सादर करण्यासाठी रसिकांचे लाडके संगीतसम"ाट भीमसेन जोशी रंगमंचावर येत आहेत.'
टाळ्यांचा धुवांधार कडकडाट होतो. नुकतंच स्नान केलेले, गुरूजींचा आशीर्वाद घेतलेले आणि खांद्यावर शाल पांघरलेले पंडितजी मोठ्या तब्येतीनं रंगमंचाकडे येत असतात. एखाद्या वनसिंहानं वनातून सहज चालताना इतर मृगांचे मुजरे घ्यावेत, तसा हा गानसिंह रंगमंचाकडं जाताना चाहत्यांचे नमस्कार स्वीकारत रूबाबानं रंगमंचावर येतो.
"नमवी पहा भूमि हा चालताना' ही "मानापमाना'तली ओळ आठवून माझ्या चेहऱ्यावर स्मित उमटतं. तोपर्यंत पंडितजी आपल्या गुरुजींच्या प्रतिमेला नमस्कार करतात. मरहूम अब्दुल करीमखॉंसाहेबांच्या तसबिरीपुढं लीन होतात आणि रंगमंचाच्या मध्यावर येऊन अवघ्या रसिकांना अभिवादन करतात. पुन्हा टाळ्यांच्या कडकडाट होतो. खांद्यावरची शाल पंडितजी मांडीवर पसरतात. जुळवलेले तानपुरे पुन्हा एकदा बारकाईनं तपासतात. एखादा सूक्ष्म दोष राहिला असेल तर तो काढून टाकतात. गाभाऱ्यातून येणाऱ्या स्वरांच्या आवर्तनामुळे अंगावर रोमांच यावेत, तसे ते दोन वा चार जव्हारदार तानपुरे बोलायला लागतात. तानपुरे जमवणं हीसुद्धा एक कला आहे. पंडितजींच्या इतके सुरेल तानपुरे क्वचितच कोणी जमवितात. मी एकदा हे पंडितजींना म्हटलं होतं. पंडितजी हसले. तर्जनी-अंगठा जुळवत मला म्हणाले, "कुमार काय झकास जुळवायचा तानपुरे!' एव्हाना अवघी सभा तटस्थ, एखाद्या चित्रासारखी स्तब्ध झालेली असते. पंडितजी आपल्या झब्यांचं वरचं सोन्याचं बटण काढतात आणि एकाच दृष्टिक्षेपात श्रोत्यांना आपलंसं करतात.
पंडितजी आपले डोळे मिटतात. सगळ्या चित्तवृत्ती अंतर्मुख करतात आणि कोमल रिषभाला हळुवार स्पर्श करून षड्‌जात आपला स्वर एकरूप करतात. अवघी सभा एकदम एकच शब्द म्हणते, "अहाहा!'
षड्‌जाच्या पहिल्या पूर्ण आकाराबरोबर अवघी सभा ते जिंकून घेतात. तोडीचा स्वरविस्तार जसा फुलू लागतो, तसे अवघे श्रोते सर्वांगाची कर्णेन्द्रिये करून बसतात.
एकेका स्वराची ताकद अशी की, तो निखळ मोती भासावा. आलापीची बढत एका लहान कोंभानं पाहता पाहता डेरेदार वृक्ष व्हावं तशी. तानांचा पल्लेदारपणा असा की, ऐकणाऱ्याचा जीव गुदमरावा. गमकेच्या ताना, जबड्याच्या ताना, गळी ताना यांचा दमसास असा की, पंडितजी समेवर येईपर्यंत अवघी सभा आपला श्र्वास रोधून बसलेली असते.
शुद्ध आकार, रागाची संयतदार बढत. आलापीची वेलासारखी गुंफण, प्रदीर्घ दमसासाचे लांब लांब सट्टे यामुळे "यालाची होणारी एकूण रचनाकृती अधिकच रमणीय असते. कमळ तर सुंदर असतंच, पण शतपत्र कमळांनी भरलेल्या पुष्करिणीचं सौंदर्य निरूपमच.
तोडी असा अनेक अंगांनी फुलत जातो. जो जो स्वर पंडितजींच्या कंठातून बाहेर यावा, तो जणू सोनेरी होतो आणि त्या स्वरामध्ये सगळा मंडप उजळून निघतो.
"याल संपल्यावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत असताना जेवढा वेळ जातो तेवढीच विश्रांती पंडितजी घेतात आणि "पिया मिलनकी आस' हा आर्त जोगिया पुकारतात. त्या स्वरांची आर्तता ऐकताना श्रोत्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. करुण रसाखाली अवघे जण नहात असतात. तारसप्तकातला कोमल रिषभ अचूक लक्ष्यवेध व्हावा, तसा अत्यंत सुरेल, अत्यंत आर्जवी, अतिशय हळुवार आणि इतका काही तरल होऊन येतो, की अशा एखाद्या क्षणी नादब"ह्माची परमावधी होते. तो सच्चा स्वर आपल्या काळजात साठवून त्याच्यावरून जीव ओवाळून टाकायला प्रत्येक श्रोता आसुसलेला असतो.
पण एवढ्यानं भागत नाही. कारण त्या तारकोमल रिषभाची कोमलता प्रत्येक जण हळुवारपणे जपत असतानाच पंडितजींचा पोटाच्या घुमाऱ्यातून आलेला पूर्ण ताकदीचा तारमध्यम अवघं वातावरण भारून टाकतो.
हा क्षण आला, की जाणकार मंडळीच काय, पण मंडपातला एकूण एक श्रोता आसवांच्या साथीनंच पियाच्या विरहातली व्याकुळता अनुभवू लागतो.
पंडितजींनी इतक्या ताकदीनं तो जोगिया जमवलेला असतो, की त्या स्वरांचा मंडप हलवण्याचं धाष्टर्‌यच कोणाला होत नाही. त्या स्वरांचा लगाव प्रत्येकाच्या अंतकिरणात गुंजत असतो आणि म्हणूनच आपली एखादी बेसूर टाळी वाजवून मस्त जमलेल्या रंगाचा भंग करणारा कुणीच अरसिक श्रोता नसतो.
पंडितजी तेवढी संधी अचूक पकडतात आणि भगवंताला साद घालतात.
"देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल
तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल....'
आणि बघता बघता करूण रसाच्या माथी अवघ्या संतांचा आणि विठ्ठलाचा लाडका शांत भक्तिरस बसवतात. अवघा मंडप त्या भक्तिरसावर डोलू लागतो.
भावानं, भक्तीनं मधाळलेला अभंगाचा प्रत्येक शब्द आणि तो उमटतोय परिसकंठी भीमसेनांच्या मुखातून - त्या नादकल्लोळात सगळे स्वरास्वरांनी विरघळत जातात.
पंडितजी आपली बैठक जेव्हा आवरती घेतात, तेव्हा "अगा, नवल वर्तले' अशीच भावना प्रत्येक श्रोत्याच्या मनात असते. तो अवघा सोहळाच देवदुर्लभ असतो.
==========================================================
विद्यावाचस्पति श्री. शंकर अभ्यंकर लिखित पं. भीमसेन जोशी यांचे सांगीतिक चरित्र "स्वरभास्कर' यातून साभार. 16 मार्च 2010 (गुढीपाडवा) या दिवशी स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांना, "आदित्य प्रतिष्ठान'तर्फे लक्ष्मी वासुदेव यांच्या प्रीत्यर्थ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

No comments: