Thursday, January 28, 2010

पन्नालाल घोष ऊर्फ अमोल ज्योती घोष

नमस्कार मंडळी,
भारतीय अभिजात (शास्त्रीय) संगीताच्या आपल्या परंपरेत अनेक उत्तमोत्तम दिग्गज कलाकार होउन गेले. काही कलाकार समाजापुढे आले तर काही आले नाहीत वा येऊ शकले नाहीत. त्याबद्दल नंतर कधीतरी. जे समोर आले त्यातील काही कलाकारांची थोडीशी ओळख करुन देण्याचा हा प्रयत्न. नुकतेच पं. अरविंद गजेंद्रगडकर यांचे 'स्वरांची स्मरणयात्रा' हे पुस्तक वाचनात आले आणि त्यापासून स्फुर्ती घेऊन आपणही चार शब्द लिहावेत असं वाटून गेलं आणि त्यामुळे हा प्रपंच. तर करू या सुरुवात.
========================================================================
पन्नालाल घोष ऊर्फ अमोल ज्योती घोषआजचा आपला विषय आहे, पं. श्री. पन्नालाल घोष यांच्याविषयी.
पन्नालाल घोष ऊर्फ अमोल ज्योती घोष. एक अतिशय प्रतिभावान कलाकार. प्रतिभावान अश्यासाठी की पन्नालालजींना बासरींच शिक्षण देण्यासाठी वयाच्या ३६ व्या वर्षांपर्यंत कोणी गुरुच नव्हता. पन्नालालजींचा जन्म आताच्या बांगलादेशातल्या बारीसाल ह्या गावी झाला. त्यांच्या जन्माबद्दल बरीच गडबड आहे असं खुद्द पन्नालालजी सांगायचे. पण इतिहासकारांनी ज्या तारखा सांगण्यात आल्या त्यातील ३१ जुलै हा दिनांक व १९११ हे वर्ष ठरवलं. पन्नालालजींचा जन्म सांगितीक घरातच झाला. त्यांचे आजोबा हरिकुमार घोष हे प्रख्यात धृपदिये व पखवाज वादक होते. पन्नाबाबुंनी स्वरांचे काही ज्ञान आजोबांकडुन लहानपणीच घेतलं होतं. पन्नाबाबुंचे वडिल अक्षयकुमार घोष हे प्रख्यात सितारिये होते. त्यांनी ढाक्याचे प्रख्यात सतार वादक गुरु भगवान चंद्रदास ह्यांच्याकडून विद्या मिळवली होती. पन्नाबाबुंची आई सुकुमारी ह्या प्रख्यात गायिका होत्या तर काका भवरंजनजी हे संगीतकार होते.
पन्नाबाबूंबाबत दोन आख्यायिका प्रसिद्ध आहेत. पन्नाबाबू ९ वर्षांचे असताना शाळेतून येताना गावाबाहेर पडक्या मंदिरामध्ये एक साधु त्यांना मुरली वाजवताना दिसला. पन्नाबाबूंचं ते ऐकताना भान हरपलं. तो साधु भानावर आला पण पन्नाबाबू तसेच होते. साधुला मोठं कौतूक वाटलं. म्हणुन त्याने मग पन्नाबाबुंना ती बासरी भेट दिली. दुसरी आख्यायिका अशी की पन्नाबाबू गंगेकाठी फिरायला गेले असताना त्यांना गंगेत काहीतरी वहात येताना दिसले. म्हणुन पन्नाबाबूंनी गंगेत बुडी मारुन जाऊन पाहीलं तर ती एक बासरी होती. गंगेचा प्रसाद म्हणुन ती बासरी त्यांनी ठेऊन घेतली आणि तेव्हाच ठरवलं की आता जीवन बासरीसाठी अर्पण करायचं.
पन्नाबाबूंनी ३६ व्या वर्षांपर्यंत स्वतःच रियाज करुन विद्या मिळवली होती. त्यांची प्रतिभाइतकी होती की बडे बडे लोक त्याचवेळी त्यांना ओळखू लागले होते. ह्याचं एक कारण हेही होतं की तोपर्यंत बासरीवादन इतकं मागे पडलं होतं की अभिजात संगीतामध्ये तीचं अस्तित्वच राहिलेलं नव्हतं. पन्नाबाबूंमूळे तिला परत संजिवनी मिळाली आणि लोकांनी पन्नाबाबूंचं बासरीवादन पाहून लोकांनी तोंडात बोटं घातली. शिवाय ह्याला आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे पन्नाबाबूंचं उमदं, सात्त्विक, निरहंकारी, प्रेमळ व्यक्तिमत्व कारणीभूत होतं. ते म्हणायचे सुद्धा की आयुष्याच्या उत्तरार्धात ही कला परमेश्वरासाठीच अर्पण करणार.
पन्नाबाबूंना व्यायामाची खूप आवड होती. ते म्हणायचे सुद्धा कलाकारानं नेहमी व्यायामाकडे लक्ष दिले पाहीजे. ते स्वतः लाठीकाठी, बॉक्सिंग व मार्शल आर्टचे खेळाडू व प्रशिक्षक राहिले आहेत.
मंडळी, पन्नालाल घोष हे पहिले शास्त्रीय संगीतकार आहेत की जे १९३८ साली युरोप दौर्‍यासाठी गेले होते. पण जागतिक युद्धामूळे त्यांना दौरा अर्धवट टाकुन परतावे लागले. त्यानंतर १९३६ पासून पन्नाबाबूंनी 'न्यु थिएटर' चे रायचंद्र बोराल यांच्या बरोबर काम करायला सुरुवात केलेली. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अनिल बिस्वास यांची बहीण 'पारुल घोष' ह्या पन्नाबाबूंच्या पत्नि होत. चलत/बोलत चित्रपटांच्या त्या पहिल्या गायिका होत.
त्यानंतर पन्नाबाबू मुंबईला स्थायिक झाले व हिंदी चित्रपटसृष्टीसाठी काम करु लागले. मुंबईमध्येच त्यांनी प्रख्यात 'बॉम्बे फिल्म स्टुडियो' मध्ये काम करायला सुरुवात केलेली. प्रसिद्ध 'बसंत','आंदोलन','पोलिस' सारख्या अनेक चित्रपटांना त्यांनी संगीतबद्ध केलेलं आहे.
पन्नाबाबू १९४६ साली पहिल्यांदा प्रसिद्ध सितारवादक उस्ताद अल्लाऊद्दिन खाँसाहेब यांना भेटले. उस्ताद अल्लाऊद्दिन खाँसाहेब हे पं. रविशंकर यांचे गुरु. पन्नाबाबूंनी मग खाँसाहेबांना (बाबांना) विनंती केली पण बाबा ऐकायला तयार नव्हते. ते म्हणत होते की तुम्ही आधिच इतके मोठे आहात तुम्हाला गरज नाही. पण पन्नाबाबूंनी पाठपुरावा केल्यावर मानले आणि मग पन्नाबाबूंनी बाबांच्या बरोबर ६ महिने कठोर शिक्षण घेतलं आणि पन्नाबाबूंचं तेज लखलखीत झालं. त्यानंतर पन्नाबाबू दिल्ली आकाशवाणी साठी काम करु लागले. एक खास गोष्ट म्हणजे पन्नाबाबूंवर उस्ताद करीम खाँसाहेब यांचा मोठाच प्रभाव होता.
पन्नाबाबूंनी बरेच प्रयोग केले. ३२ इंच लांबीची लांब बांबूची बासरी बनवून घेतली. त्यांना त्यातुन घनगंभीर स्वर हवे होते. म्हणुन मग पन्नाबाबूंनी बासरीला ७ वे भोक पाडून घेतले व एक नवा अध्याय लिहीला. याशिवाय ६ तारी तानपुरा, तीव्र स्वरांची तानपुरी व सुरपेटी यांचा पण शोध लावला. या व्यतीरिक्त त्यांनी दीपावली, पुष्पचंद्रिका, हंसनारायणी, चंद्रमौळी व आपल्या लाडक्या मुलीच्या मृत्युच्या दु:खाने व्यथित होउन तिच्या नावाने तिची आठवण म्हणुन 'नुपुरध्वनी' अश्या रागांची रचना केली. पन्नाबाबूंच्या ज्या संस्मरणीय मैफिली झाल्या त्यातली संगीतमार्तंड पं. ओंकारनाथ ठाकुर यांच्याबरोबरची एक. त्यावर्षी कलकत्याच्या अखिल भारतीय संगीत परिषदेत पं. ओंकारनाथ ठाकुरांबरोबर संयोजकांनी जुगलबंदी ठेवलेली. पण पन्नाबाबूंनी पंडितजींच्या घनगंभीर आवाजाला शोभेल अशी ३६ इंच लांबीची लांब बांबूची बासरी काढली आणि सगळी सभा विस्मयात बुडाली. पण पुढच्याच वेळात पंडितजींच्या बरोबर पन्नाबाबूंची मुरली सुद्धा ताना सही सही घेऊ लागली आणि सगळी सभा आश्चर्याचे एक एक धक्के खाऊ लागली. मैफिलीनंतर खुद्द संगीतमार्तंडांनी पाठीवर शाबासकी देऊन गौरव केलेला. असा हा अजातशत्रु, अतिशय धार्मिक, सात्त्विक, प्रेमळ व लिजंड्री कलाकार २० एप्रिल १९६० ला अवघ्या ४९ व्या वर्षी हृदयविकाराचा झटका येऊन ह्या विश्वातून निघुन गेला. पण जाताना ह्या दुनियेला बासरी देऊन गेला व अगणित शिष्य परिवार देऊन गेला.
अश्या ह्या मोठ्या कलाकाराला व मोठ्या माणसाला शतशः प्रणाम !!!

 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------
तळटिप : हिंदुस्तानी संगीतामधल्या कलाकारांची एक आठवण म्हणुन हा एक प्रयत्न. काही त्रुटी राहील्यास नक्की सांगा. आपल्या प्रतिक्रिया ऐकायला नक्कीच आवडेल.
छायाचित्र : जालावरून साभार. पन्नाबाबूंच्या काही चिजा इथे ऐकता येतील.

No comments: