Wednesday, April 24, 2013

गंगूबाई हनगल



गानयोगिनी

आयुष्यभर गाणे आणि गाणे हाच ज्यांचा ध्यास होता, त्या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गंगूबाई हनगल म्हणजे शास्त्रीय संगीताच्या प्रांगणात शांतपणे तेवणारी निरांजनातील वातच! गंगूबाईंच्या जन्मशताब्दी वर्षांची सांगता येत्या ५ मार्च रोजी होत आहे. या निमित्ताने त्यांच्या कृतार्थ जीवनाचा वेध घेणारा खास लेख..
२१ जुलै २००९ रोजी वयाच्या ९७ व्या वर्षी डॉ. गंगूबाई हनगल हे जग सोडून गेल्या. किराणा घराण्याच्या खॉंसाहेब उस्ताद अब्दुल करीमखॉं यांच्या नावानं प्रसिद्ध असलेल्या शाखेतल्या गवयांत त्या सर्वात वयोवृद्ध गायिका होत्या. जवळजवळ एक शतकभराचं कृतार्थ जीवन त्यांना लाभलं. आपल्या प्रदीर्घ आयुष्यातली ऐंशीहून अधिक वर्षे त्या गात होत्या. 'गंगव्वा' (गंगू) हे आजीचं, म्हणजे आईच्या आईचं नाव. हनगल हे त्यांच्या गावाचं नाव. तेच त्यांनी आडनाव म्हणूनही स्वीकारलं. वडील चिक्कूराव नाडगीर व्यवसायानं वकील होते व ब्राह्मण समाजातले होते. त्यांची आई अंबाबाई ऊर्फ अंबाक्का कर्नाटकी पद्धतीचं गाणं फार छान गात असे.
आईच्या गाण्यातूनच संगीताचे प्राथमिक संस्कार छोटय़ा गंगूवर झाले. अंबाक्कांचं 'जावळी' व 'पल्लवी' गायन ऐकण्याकरिता पुष्कळदा खॉंसाहेब उस्ताद अब्दुल करीमखॉं यांच्या घरी येत असत. त्या वेळी कधीकधी छोटय़ा गंगूचं गाणं ऐकत असत. 'बेटा, गला बहुत अच्छा है तेरा. खूब गाना और खूब खाना' असा तोंडभरून आशीर्वादही देत असत. त्यातला 'खूब गाना' हा पूर्वार्ध गंगूबाईंनी अखेपर्यंत आचरणात आणला. शाळेला जाताना वाटेवरच्या ग्रामोफोनच्या दुकानात तबकडय़ा वाजवीत असत. छोटी गंगू तासन्तास ती गाणी ऐकत असे. जोहराबाई आग्रेवाली (१८६८-१९१३) या विख्यात गायिकेची गाणी तिला फार आवडत. 'मुलतानी', 'पूरिया' अशा रागांची नावं ठाऊक नव्हती, पण त्याच्या रेकॉर्ड्स मात्र पाठ झाल्या होत्या. जोहराबाईंसारखं जोशपूर्ण गाता आलं पाहिजे हे त्यांच्या मनानं अगदी लहानपणीच घेतलं.
कुमार गंधर्व व भीमसेन जोशी यांच्यावरही ग्रामोफोन रेकॉर्ड्सचा संस्कार अगदी लहानपणीच झाला होता, याची आठवण या संदर्भात होते. विशेष योगायोगाचा भाग असा की, जोहराबाई १९१३ साली गेल्या व त्याच वर्षी गंगूबाई जन्माला आल्या. त्या काळी हुबळी, धारवाड, बेळगाव परिसरात हिंदुस्थानी पद्धतीचं गाणं प्रचारात व प्रसारात होतं. धारवाडात भास्करबुवा बखले संगीत शिक्षक म्हणून दाखल झाले होते. करीमखॉं जवळच मिरजेला व बेळगावात 'आर्य संगीत विद्यालय' चालवीत होते. अशा वातावरणात छोटय़ा गंगूला उत्तर हिंदुस्थानी संगीत जास्त आवडायला लागलं होतं. तिचा स्वाभाविक कल पाहून आईनं तिच्या परीनं शिक्षणाची व्यवस्था करायचा खूप प्रयत्न केला. तिच्यावर दक्षिणी संगीताची छायाही पडू नये यासाठी स्वत:चं कर्नाटकी पद्धतीचं गाणं बंद करून टाकलं. संगीतातल्या मेहनतीबाबत आई विशेष आग्रही होती. कर्नाटकी पद्धतीप्रमाणे नोटेशन करायला त्या आईकडून शिकल्या व त्याचा गाणं शिकताना खूपच उपयोग झाला. परवडत नसतानाही गाणं व नृत्य यांचं मिळेल तिथून शिक्षण चालूच होतं. पाचवीनंतर शाळा सुटलीच, पण गाण्यात मात्र बरीच प्रगती झाली. सोळाव्या वर्षी १९२९ साली, गुरुराव कौलगी यांच्याशी लग्न झाले. ते वकील होते, पण त्यांनी वकिली कधीच केली नाही. अनेक यशस्वी/ अयशस्वी उद्योग मात्र केले. गंगूबाईंच्या गाण्याला मात्र त्यांचं प्रोत्साहनच असे. १९६६ साली ते गेले. गायनकलेवरती आपल्या मोठय़ा कुटुंबाचा निर्वाह अनेक वर्षे करावा लागेल व होऊ शकेल अशी त्या वेळी गंगूबाईंना कल्पनासुद्धा नव्हती. १९३०-३२ सालापर्यंत त्या हुबळी धारवाड सोडून कुठेच बाहेर गेल्या नव्हत्या. पुढे मात्र या विद्येच्या बळावर त्यांनी हिंदुस्थानातल्या सगळ्या महत्त्वाच्या संगीत परिषदा तर गाजविल्याच; पण उतारवयात युरोप व अमेरिकेतल्या परदेशी रसिकांनाही मंत्रमुग्ध केलं. गाण्याच्या बाबतीत त्यांच्यापुढं हिराबाई बडोदेकरांचा आदर्श होता. १९२० ते ३० या कालखंडात हिराबाईंनी तरुण मुलींसाठी मंचावरचं शास्त्रीय गाणं व नाटक-सिनेमातलं अभिनयाचं क्षेत्र खुलं करून दिलं होतं. त्यांच्यासारखं स्टेजवर बसून गावं असं गंगूबाईंना लहानपणापासून वाटत होतं. ते त्यांनी करून दाखवलं. आपल्या शालीन व नम्र वागणुकीनं दोघींनीही पुरुष गवयांप्रमाणे समाजात आपलं स्थान पक्कं केलं. गंगूबाई तर पुरुषाप्रमाणे गाताना डाव्या हातात पुरुषानं वापरायचं रिस्ट वॉच (घडय़ाळ) वापरत असत. रियाज करताना तानपुरा घेऊनच गात असत. मात्र मंचावर क्वचितच स्वत: तानपुरा छेडीत असत. कारण गाताना दोन्ही हात मोकळे असणं त्यांना आवश्यक वाटत असावं. भीमसेनजींप्रमाणे त्यांचं गाणं नुसतंच श्रवणीय नव्हे, तर प्रेक्षणीयसुद्धा असे. मुद्रा-अभिनय, देहबोली व हातांच्या हालचाली गाण्याला अधिकच खुलवत असत. लहानपणी शिकलेल्या नृत्याचाही त्यात काही वाटा असावा. साथसंगतीला मामा व नात्यातलीच मंडळी असत. गाण्यातली साथ मुलगी क्रिष्णा करत असे. तिलाही त्या भरपूर गाऊ देत असत. त्यांचा आवाज पुरुषी असल्यानं मायलेकींची ही स्त्री-पुरुष आवाजातली अनोखी जुगलबंदी चांगलीच रंगत असे.
गंगूबाई ७५ वर्षांच्या झाल्या त्या वेळी हुबळीत मोठा महोत्सव झाला. त्यात गंगूबाईंची प्रदीर्घ मुलाखत डॉ. अशोक रानडे यांनी घेतली. सुदैवानं ती ध्वनिचित्रफितीवर उपलब्ध असून कंठ संगीताच्या विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना व रसिकांना फार उपयोगाची आहे. या मुलाखतीत आपल्या गाण्याच्या जडणघडणीविषयी त्या म्हणतात, ''माझ्या गुरुजींनी (सवाई गंधर्वानी) माझ्याकडून रोज अर्धा अर्धा तास खर्ज साधना करवून घेतली. ज्या काळात स्त्रियांना ती सांगितली जात नसे त्या काळी त्यांनी मला करायला लावली. त्याचा मला खूपच उपयोग झाला. तानक्रिया अंगात मुरावी याकरिता तास तास/ दीड दीड तास मला पलटे घोटायला लावायचे. मेहनत करायला सांगून ते आत जाऊन आपली कामं करत असत. कित्येक वेळा तेच तेच घोटून कंटाळा येई. इतकं चांगलं गाऊनही पुढचं का सांगत नाहीत, असा विचार मनात येऊन डोळ्यात पाणी येई. पण त्यांचं समाधान होईतो करावं लागे.
अगदी सुरुवातीच्या ध्वनिमुद्रणांमध्ये मात्र त्यांचा आवाज फार बारीक व पातळ होता. १९३० सालाच्या आसपास 'हिज मास्टर्स व्हॉइस' (एच.एम.व्ही.) या ग्रामोफोन कंपनीचे मुंबईतले अधिकारी नवीन आवाजाच्या शोधात फिरत फिरत हुबळी, बेळगाव, धारवाड परिसरात आले. अंबाक्का व गांधारी या मायलेकींच्या गाण्याची चाचणी झाली व ध्वनिमुद्रिका काढायचं ठरलं. तसा रीतसर करारही झाला. पण पोटाच्या ऑपरेशननंतर आईचं निधन झालं. त्यामुळं ते मागं पडलं. पाठोपाठ एक वर्षांच्या आत वडीलही गेले. मग मात्र त्यांनी गायनविद्येकडे व्यवसाय म्हणून अधिक गंभीरपणे लक्ष द्यायला सुरुवात केली. बापूराव पेंढारकर यांच्या 'विजयाची लग्ने' या हिंदी व मराठी बोलपटात त्यांनी नायकासमोर गाणं म्हटलं होतं. दुर्दैवानं तो बोलपट आज उपलब्ध नाही. १९३२ ते ३५ या काळात त्यांनी मुंबईला येऊन ग्रामोफोन कंपनीकरिता सुमारे साठ गाणी ध्वनिमुद्रित केली.
मिया मल्हार, खंबावती, जोगिया, मालकंस, अडाणा, शुद्ध सारंग, मुलतानी, शंकरा, देसकार, हिंडोल, सुहा सुघराई, बागेश्री, देस, मांड, दुर्गा, बहार, भूपाली, बिहाग, पूरिया, कामोद व भैरवी रागांतल्या तीन-साडेतीन मिनिटांच्या ध्वनिमुद्रिका त्यांनी दिल्या. त्यात त्यांचा तरुणपणीचा उंच व टिपेला जाऊन भिडणारा स्त्री-स्वर ऐकायला मिळतो. या रेकॉर्ड्सच्या लेबलवरती व कॅटलॉगमध्ये 'गांधारी हनगल' असं लिहिलेलं आढळतं. ऑगस्ट १९३५ च्या एच.एम.व्ही. कॅटलॉगमध्ये त्यांच्या गायनाची 'विविध वृत्त'ने छापलेली तारीफ छापली असून आतील पानावर चांदणीच्या आकारात त्यांचा फोटो छापलेला आहे. 'ग्रामोफोन क्षितिजावरील नवीन तारा' असं त्यात म्हटलंय. या काळात सवाई गंधर्वाची तालीम सुरू झाली होती खरी, पण ते सतत नाटकांच्या दौऱ्यांमध्ये व्यस्त असल्यानं ती खंडित स्वरूपातली होती. गुरुजी धावतपळत येत, काही सांगत व त्याचा रियाज करायला सांगून निघून जात. मग गंगूबाई जमेल तसा व तितका सराव करत. पण त्यात काही शिस्त नव्हती. शास्त्रीय संगीताबरोबरच गझल व ठुमरी गायनाच्या चार-पाच ध्वनिमुद्रिका त्यांनी दिल्या. त्याही चांगल्याच खपल्या. पण सर्वात जास्त लोकप्रिय झाल्या त्या मराठी गाण्यांच्या. ही वीसेक गाणी आहेत. त्या काळात पं. नारायणराव व्यास व पं. विनायकराव पटवर्धनांसारखे काही गवई राग संगीताकरिता मराठी चिजा रचून जनसामान्यांपर्यंत शास्त्रीय संगीत नेण्याचा प्रयत्न करीत होते. १९३०-१९३२ च्या कालखंडात त्यांच्या ध्वनिमुद्रिकाही बाजारात आल्या. त्याकाळचे विख्यात नाटककार भा. वि. तथा मामा वरेरकर व शीघ्र कवी स. अ. शुक्ल ऊर्फ 'कुमुद बांधव' यांनी अशा रचना करून दिल्या. उदा. 'कशी सदया न ये माझी दया' (राग जोगिया) 'हरीचे गुण गाऊ या' (राग भीमपलास). यमन रागातली 'ए री आली पिया बिन' ही चीज प्रसिद्धच आहे. त्यावर 'चल लगबग ये झणी' ही शुक्ल कवींची रचना गंगूबाईंनी मुद्रित केली. विशेष म्हणजे त्यात साथीला चक्क सतार हे वाद्य आहे. ध्वनिमुद्रिकांच्या माध्यमातून गंगूबाईंचं गाणं जिकडंतिकडं वाजू लागलं. मुलांसाठी गायलेली दोन गाणी सर्वाधिक गाजली. मामा वरेरकर यांची ही दोन गाणी एका रेकॉर्डवर पाठपोठ आली. 'आईचा छकुला' व 'बाळाचा चाळा' ही गाणी फोनवर वाजवली जात व घरोघरीचे छकुले व छकुल्या ती ऐकता ऐकता झोपी जात.
अशाच दोन अनोख्या मराठी भावगीतांची हकीकतही मोठी गमतीशीर आहे.
एच.एम.व्ही.त त्या वेळचे विख्यात गायक जी. एन. जोशी शुक्ल कवींची दोन द्वंद्वगीतं मुद्रित करीत होते. त्यांची चाल काहीशी पाश्चात्त्य पद्धतीची (वॉल्टझ) प्रकारातली होती. त्यांच्या बरोबरीच्या सहगायिकेला ते उंच स्वरातलं व तारसप्तकातलं गाणं काही केल्या पेलत नव्हतं. त्यामुळं सगळेच काळजीत होते. इतक्यात गंगूबाई त्यांच्या ठरलेल्या मुद्रणासाठी स्टुडिओत आल्या. त्यांना पाहून जी. एन. जोशींनी गाण्याची विनंती केली. पण त्यांनी साफ नकार दिला. पण ज्या गायिकेला ते जमत नव्हतं तिनंच आग्रह केल्यावरती मग त्या तयार झाल्या. त्यातूनच 'चकाके कोर चंद्राची' व 'तू तिथे अन् मी इथे हा' ही दोन गाणी मुद्रित झाली व खूपच गाजली. मराठी भावगीतांच्या इतिहासातली ही पहिली युगलगीतं.
सुमारे पंधरा वर्षांपूर्वी दक्षिण मुंबईच्या टाटा थिएटर परिसरात एन.सी.पी.ए.मध्ये गंगूबाईंचा सत्कार समारंभ होता. तिथं ही ध्वनिमुद्रिका घेऊन गेलो होतो. ती बघून त्यांना खूप आनंद झाला. 'कोण ऐकतं का हो ही गाणी आता?' असं विचारून कृष्णाबाईंनाही त्यांनी ती रेकॉर्ड दाखवली. ५० वर्षांपूर्वीच्या त्या काळातल्या आठवणींमध्ये त्या रंगून गेल्या. एच.एम.व्ही. स्टुडिओत रेकॉर्डिग झालं त्या वेळी ही तान्ही होती. तिला थोपटून, झोपवून मग गाणी करायचे. एका गाण्याचे पंधरा रुपये मिळत. पण ह्य़ा ध्वनिमुद्रिकांमुळेच त्यांचं नाव झालं व गाण्याची निमंत्रणं मिळू लागली. १९३६ च्या सुमारास मुंबईत गोरेगाव येथे पहिला जलसा झाला. रेडिओ व गणपती उत्सवातही त्यांची गाणी होऊ लागली. विशेष म्हणजे त्याच सुमारास ज्यांचा आदर्श समोर ठेवला त्या हिराबाई बडोदेकर यांच्या रेकॉर्ड्स बाजारात येत होत्या. तसेच गुरुजी सवाई गंधर्व व मुंबईतले गुरुबंधू मास्टर फिरोज दस्तूर यांच्याही ध्वनिमुद्रिका प्रकाशित होत होत्या. १९३६ च्या आसपास प्रकृतीच्या कारणानं नाटक कंपनी बंद करून गुरुजी कुंदगोळला येऊन राहिले. मग १९३७ ते १९४१ अशी सलग चार वर्षे गंगूबाईंना गुरुजींच्या घरी जाऊन गाणं शिकायला मिळालं. हुबळी ते कुंदगोळ रेल्वेनं प्रवास करावा लागे. कधी लहान मूलही सोबत असे. रस्त्यानं जाताना 'बघा बघा. धडपणे संसार करायचा सोडून ती पाहा गाणारी चालली आहे. लाज कशी वाटत नाही' अशी शेरेबाजीही ऐकावी लागे. पण ह्य़ा सगळ्याला त्या पुरून उरल्या. कधी परतीची गाडी संध्याकाळी उशिरानं येई. मग गुरुबंधू व मानलेला भाऊ भीमण्णा (भीमसेन जोशी) कंदील घेऊन स्टेशनवर सोबत येई. गुरुजींनी काय नवीन शिकवलं त्याची एकमेकांत उजळणी होई. बहीण-भावाचं हे नातं फार फार प्रेमाचं होतं व अखेपर्यंत टिकून होतं. ह्य़ा तालमीमुळं त्यांचं गाणं पक्कं व परिपक्व झालं. घशावरच्या उपचारांनंतर आवाज बदलून रुंद व पुरुषी झाला. त्या आवाजातली ध्वनिमुद्रिका १९५५ साली 'बाई गंगूबाई हनगल' या नावानं निघाली. त्यात 'मारवा' व 'भैरव' हे राग त्या गायल्या आहेत. 'मारवा' रागातली 'सुन सुन बतिया'ची रेकॉर्ड आत्माराम भेंडे त्यांच्या 'डायल एम फॉर मर्डर' या नाटकात वातावरणनिर्मितीसाठी पाश्र्वसंगीत म्हणून वाजवीत असत.
पुढं ई. पी. व एल. पी. रेकॉर्ड्सचा जमाना आल्यावर त्यांनी काही रेकॉर्ड्स केल्या. कॅसेट्स व सी.डी.च्या माध्यमातूनही त्यांच्या देश-विदेशातल्या मैफिली वितरित झाल्या. त्यांच्या मागे खूप छायाचित्रं व ध्वनिमुद्रणं पुढच्या पिढय़ांसाठी उपलब्ध आहेत. त्यांच्या नातवानं हुबळीत 'स्मरण मंदिर' नावाचं संग्रहालय उभं केलं असून तिथं त्यांचे तानपुरे व फोटो पाहायला मिळतात. त्यात तरुणपणीच्या तानपुऱ्याच्याच उंचीच्या गंगूबाई पाहावयास मिळतात. त्या छायाचित्राचं उतारवयात उद्घाटन करतानाही दिसतात. आवाजाच्या बाबतीत विद्यमान स्त्री गायिकांमध्ये त्या एकमेव मर्द गायिका होत्या. पद्मविभूषण, सन्माननीय डॉक्टरेट या सर्वोच्च मानाच्या पदव्या त्यांना प्रदान करण्यात आल्या. त्या मात्र 'अहो, मी तर फक्त पाचवी पास आहे' असं बोलून दाखवत असत. मात्र गाण्यावरचं त्यांचं प्रेम विलक्षण होतं व निष्ठा गाढ होती. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला त्या एकदा गेल्या होत्या. देवीचं दर्शन घेऊन सभामंडपात आल्या. थोडय़ा विसावल्या व हळूहळू गायला लागल्या. त्या आल्याची व गात असल्याची बातमी कानोकानी पोहोचली. पाहता पाहता श्रोते जमा झाले. कलाकार म्हणून त्या फार मोठय़ा होत्याच. पण एक माणूस व विचारी अशा जागरूक नागरिक म्हणूनही गंगूबाई हनगल फार फार थोर होत्या.

Monday, February 18, 2013

'स्वरार्थ रमणी'चा सन्मान

honor of kishori amonkar भारतीय अभिजात संगीताच्या गेल्या पन्नास वर्षांच्या कालपटलावर आपली ठसठशीत मुद्रा उमटविणाऱ्या गायक कलावंतांमध्ये पंडिता किशोरी आमोणकर यांचे नाव अग्रभागी आहे. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पहिल्या पुरस्कारासाठी किशोरीताईंची निवड जाहीर करून महाराष्ट्राने त्यांच्या कलेला महत्त्वपूर्ण दाद दिली आहे. ज्या महाराष्ट्राचे नाव संगीताच्या क्षेत्रात अतिशय मानाने घेतले जाते, त्या महाराष्ट्रातच संस्थापित झालेल्या जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ कलावंत म्हणून किशोरीताईंनी साऱ्या विश्वाला संगीताच्या माध्यमातून कवेत घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या गायनाने दिव्यत्वाची प्रचिती आलेले लाखो रसिक त्यांच्या प्रतिभास्पर्शाने अक्षरश: पावन झाले आहेत. पंडित भीमसेन जोशी, पंडित कुमार गंधर्व आणि किशोरीताई या तिघांनी गेल्या पाच दशकातील भारतीय संगीतावर अधिराज्य गाजवले आहे. या तिघांच्याही गायनशैली निरनिराळ्या असल्या तरीही त्यांच्या गायनाने भारतीय अभिजात संगीताला उत्तुंग शिखरावर नेऊन ठेवले आहे. भारतीय संगीतात गेल्या काहीशे वर्षांमध्ये काळाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या नवोन्मेषी प्रतिभेने त्यात मोलाची भर घालणारे कलावंत निर्माण झाले. त्यांनी आपल्या प्रज्ञेने या संगीताला नवी झळाळी प्राप्त करून दिली. त्यामुळे ते प्रवाही राहिले. गुरू-शिष्य परंपरेत गुरू मुखातून मिळालेल्या कलेवर आपल्या बुद्धीने आणि प्रतिभेने त्यात भर घालणे हे भारतीय अभिजात संगीताचे वैशिष्टय़ मानले जाते. गुरूप्रमाणेच गाणे आणि त्याच्या गायकीत स्वत:ची भर घालून ते नव्याने सादर करणे या दोन प्रकारांमध्ये स्वप्रतिभेच्या कलावंतांना नेहमीच महत्त्वाचे स्थान प्राप्त होते. किशोरीताई यांनी अशी भर घातली आणि त्यामुळे संगीत आजवर टिकून राहण्यास मदत झाली. जयपूर घराण्याची तालेवार तालीम मिळाल्यानंतर त्यातील सौंदर्यस्थळांचा शोध घेताना किशोरीताईंनी संगीताचा शास्त्रीय अभ्यास केला. जुने पुराणे ग्रंथ वाचून त्यांचा अर्थ समजावून घेऊन, त्याचा संगीतात कसा उपयोग करता येईल, याचा विचार त्यांनी केला. त्यामुळे घराणे तेच असले, तरी त्या घराण्यातील अन्य कलावंतांपेक्षा त्यांचे गायन नेहमीच वेगळे भासत आले. 'स्वरार्थ रमणी' हा त्यांनी सिद्ध केलेला ग्रंथ हे त्यांच्या अभ्यासू वृत्तीचे एक सुरेख दर्शन आहे. सौंदर्यशास्त्राच्या गहन गुहेत शिरून तेथील मौल्यवान रत्नांचा आपल्या गायनाद्वारे साक्षात्कार घडवण्याचे सामथ्र्य त्यांच्यापाशी आहे. त्यांच्यासाठी गायन कला हे साध्य नाही, तर ते जीवनाच्या पलीकडील विश्वापर्यंत जाण्याचे एक अमोल साधन आहे. त्यामुळे संगीताद्वारे त्या आपल्याबरोबरच रसिकांनाही एका अनवट आणि अद्भुतरम्य दुनियेत घेऊन जातात आणि त्यांना परीसस्पर्शाची अनुभूती मिळवून देतात. त्यांच्या या योगदानाबद्दल महाराष्ट्रानेच नव्हे, तर साऱ्या देशाने त्यांचे ऋणी राहायला हवे. संगीत ही अमूर्त कला असली तरी ती माणसाच्या जगण्यातील अर्थ शोधणारी कला आहे, असे मानणाऱ्या कलावंतांपैकी किशोरीताई एक आहेत. भीमसेनजींनी ज्याप्रमाणे आपल्या संगीतातून साऱ्या विश्वाला भारतीयत्वाचे एक अपूर्व दर्शन घडवले, त्याप्रमाणेच किशोरी आमोणकरांनीही या संगीताच्या ताकदीची प्रखर जाणीव करून दिली. रागसंगीताप्रमाणेच भक्तिसंगीतातील परंपरेत त्यांनी स्वत:ची मुद्रा उमटवली. भावगीतासारख्या शब्दसंगीतातील त्यांचे अस्तित्व आणखी एका वेगळ्या प्रांतातून सफर घडवते. संगीत हे केवळ स्वरांमध्ये नसते, तर त्यातून व्यक्त होणाऱ्या भावदर्शनांत असते, याची जाणीव त्यांचे गायन ऐकताना सतत होते. हे भावदर्शन मनाच्या गाभ्याचा ठाव घेते आणि रसिकाला वेगळ्या विश्वात घेऊन जाते. त्यांच्या या सन्मानाबद्दल त्यांचे अभिनंदन करीत असताना, त्यांचे ऋणही मान्य करायला हवेत.
======================================================================= सदर लेख रविवार, १८ फेब्रुवारी २०१३ च्या लोकसत्ताच्या 'विशेष' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.

Sunday, October 21, 2012

पं.अभिषेकी महोत्सव

पं. अभिषेकी महोत्सव

 तरंगिणी प्रतिष्ठानतर्फे कला अकादमी, गोवा सांस्कृतिक संचालनालय आणि पेनिन्सुला लँड्स यांच्या संयुक्त विद्यमाने पणजीतील मा़  दीनानाथ मंगेशकर सभागृहात  पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव नुकताच आयोजित करण्यात आला होता. ‘लोकसत्ता’ या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक होते. अनेक विश्वविख्यात कलावतांनी या महोत्सवाला हजेरी लावली होती. आपलं घराणं किंवा आपल्या गुरूने दिलेली विद्या, हीच श्रेष्ठ आणि त्यांचाच प्रसार करण्यासाठी आपण झटायचं, असा संकुचित दृष्टिकोन बाळगणारे अनेक गायक आपण पाहतो़
मात्र संगीताकडे घराणेशाहीच्या पलीकडे जाऊन पाहू शकणारे जितेंद्रबुवांसारखे कलाकार विरळच़  पं.जितेंद्र अभिषेकी शिक्षण घेतानाही एखाद्याच घराण्यात अडकून राहिले नाहीत़  त्यांनी उस्ताद अमझद हुसेन खान यांच्याकडे शिक्षण घेतले, तसे गिरिजाबाई केळकर आणि जगन्नाथबुवा पुरोहितांकडूनही शास्त्रीय संगीताचे धडे घेतल़े  त्यानंतरही काही दुर्मिळ रागांसाठी त्यांनी बडे गुलाम अली खाँसाहेबांचे शिष्यत्व पत्करल़े  परिणामत: त्यांची गायकी तर समृद्ध झालीच, पण त्याचबरोबर समग्र हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची माहिती झाल्यामुळे त्यांना सगळ्यातील उत्तम, उद्दात्त आणि उन्नत, ते ते निवडून स्वत:ची ‘अभिषेकी शैली’ निर्माण करता आली़  अर्थात यात कोणत्याही एका घराण्याचा सांगीतिक वारस जपण्याचा अट्टहास नव्हता, तर उत्तमाचा शोध घेणारी सर्वसमावेशकता होती़  त्यामुळेच आजही पंडितजींनी स्थापन केलेल्या तरंगिणी प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवावर कोणत्याही एका घराण्याची छाप नसत़े
१३ आणि १४ ऑक्टोबरला पणजीत पार पडलेल्या  या महोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे प्रमुख विश्वस्त शौनक अभिषेकी, पणजीच्या महापौर वैदेही नायक, कला अकादमीचे अध्यक्ष विष्णू सूर्या वाघ, उपाध्यक्ष राजा खेडेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडल़े  यंदाच्या महोत्सवात तर पहिल्यांदाच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या पल्याड उडी मारून दाक्षिणात्य संगीतालाही स्थान देण्यात आले होत़े   ‘कर्नाटकी ब्रदर्स’ या जोडगोळीने कानसेन गोवेकरांची पूर्ण तृप्ती केली़  शशिकिरण आणि गणेश अर्थात कर्नाटकी ब्रदर्सनी आजवर देश- विदेशात अनेक मैफली गाजविल्या आहेत़  सलग २४ तास मैफलीचा विश्वविक्रमही त्यांच्या नावावर आह़े  त्यांच्या मैफलीत दाक्षिणात्य पद्धतीनुसार तबल्याऐवजी मृदंगम् या तालवाद्याचा आणि संवादिनीऐवजी व्हायोलिन या स्वरवाद्याचा साथीसाठी वापर करण्यात आला होता़  तबल्यापेक्षा काहीशी रुंद असणारी मृदंगम्ची चाट जोरकस आणि अधिकाधिक वारंवारतेने वाजवून नादनिर्मिती करण्याचा दाक्षिणात्य संगीतातील सुरेल प्रघात आह़े  त्यामुळे त्यातून निर्माण होणारा ठेका म्हणजे दाक्षिणात्य संगीतच, अशी ओळख श्रोत्यांच्या कानात वर्षांनुवष्रे तयार झाली आह़े  त्याचाच परिणाम म्हणून मृदंगम्वर साथीला असणाऱ्या साई गिरीधर यांनी ठेका दाक्षिणात्य धरताच श्रोत्यांनी मनमुराद दाद दिली़  त्यांच्यासोबत व्हायोलिनवर साथीला पद्मा शंकर होत्या़  कर्नाटकी ब्रदर्सनी मैफलीला सुरुवात केली ती आदितालातील हंसध्वनी या हिंदुस्थानी संगीत श्रोत्यांनाही परिचित असणाऱ्या रागाऩे  याची बंदिश(गीत) होती, ‘बातापी गणपतम् भजे गौ’.  त्यानंतर श्री रागात तेलुगू गाणे ‘एदरो महानुभावो’ आणि शेवट स्वामी दयानंद सरस्वती यांच्या ‘भो शंभो, शिवशंभो, स्वयंभू’ या रेवती रागातील संस्कृत भक्ती गीताने करण्यात आला़  मैफलीचे विशेष आकर्षण ठरली, कर्नाटकी ब्रदर्सनी खास या महोत्सवासाठी रचलेली ‘गानोत्सवम्, कलोत्सवम्, पंडित अभिषेकी संगीत महोत्सवम्’ ही बंदिश!
महोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा शेवट सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर- टिकेकर यांच्या पल्लेदार गायनाने झाला़  जौनपुरी, आसाजोगीया, वृंदावनी अशा क्रमाने आरतीताईंनी कार्यक्रमाला सुरुवात केली़  मध्यंतराची वेळ लोटून गेली, तरी श्रोत्यांचे मन भरेना़  आता आणखीन काय गाऊ, या आरतीताईंच्या प्रश्नाला प्रत्येक वेळी चोखंदळ गोमांतकी श्रोत्यांकडून टप्पा, अवघा रंग.. अशा फर्माइशी येतच होत्या आणि आरतीताईही न कंटाळता त्या पुरवीत होत्या़  अशा भारावलेल्या वातावरणात मध्यंतर झाले.
शोभा चौधरी आणि अभिषेकीबुवांचे शिष्य डॉ़  राजा काळे यांचे गायनही पहिल्या दिवशी ऐकायला मिळाल़े  मात्र यात सर्वात फक्कड जमली, ती पंडित गणपती भट यांचीच मैफल! गोड गळा आणि संथ लयीतील सुंदर बढतींसाठी प्रसिद्ध असलेल्या गणपतीबुवांनी तीन तालात ‘पिया मेरे परदेस बसत हैं’या  बंदिशीला सुरुवात केली आणि प्रत्येक समेवर टाळ्यांच्या कडकडाटाला जी सुरुवात झाली, ती शेवटचे भजन ‘रघुनंदन आगे नाचुंगी’पर्यंत कायम होती़  दुसऱ्या दिवशी पं.विजय सरदेशमुख यांचे ‘मैं कैसे भरू पानी’ ही ठुमरी आणि ‘शून्य गढ- शहर- शहर-घर- वस्ती, कोण सोता कोन जागे है। लाल हमारा हम लालन के, तन सोता ब्रह्म जागे हैं। ’ हे भजन, असे शास्त्रीय- उपशास्त्रीय गायन झाल़े  शास्त्रीय संगीताची झिंग चढते, असे जे म्हटले जाते; त्याची प्रत्यक्षानुभूती सरदेशमुखांच्या गायनाने घेता आली़  जयपूर- अत्रौली घराण्याच्या गायिका श्रुती सडोलीकर यांनी आळवलेला यमन- बिलावल आणि त्यानंतर खास जयपूर घराण्याचा म्हणून ओळखला जाणारा खट हे दोन्ही राग फक्कड जमल़े  पण खट राग सर्वसामान्य श्रोत्यांना फारसा परिचित नसल्यामुळे, त्याचा खऱ्या अर्थाने आस्वाद शास्त्रीय संगीताच्या पक्क्या कानसेनांनाच घेता आला.  श्रुतीताईंनी स्वत: स्वरबद्ध केलेले ‘कैसे दिन कटे हैं’ हे  श्रोत्यांच्या फर्माइशीवरून गायलेले भजन मात्र सर्वानाच तृप्त करणारे ठरल़े  गोमांतकी गायिका प्रचला आमोणकर यांचा पटदीप राग आणि भरवी ‘सगुण संपन्न पंढरीच्या राया’ श्रोत्यांची दाद मिळवून गेल़े  शुद्ध आग्रा घराण्याच्या गायकीसाठी प्रसिद्ध असलेल्या गुलाम हुसेन खाँ ऊर्फ राजा मियॉं यांनी महोत्सवात आपली कला सादर केली़  त्यांना तबल्यावर भरत कामत आणि संवादिनीवर सुधीर नायक यांनी साथ केली़  आग्रा घराण्याच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी नोमतोमने सुरुवात करत पूर्वा राग गायला़  त्यानंतर ‘बाजे मोरी पायलीया कैसे’ या बंदिशीने मैफल संपवली़  प्रसिद्धी किंवा श्रोते मिळविण्यासाठीही इतर कोणत्याही घराण्याचा फारसा प्रभाव आपल्या गायकीवर पडू न देता वर्षांनुवर्षे विशुद्धता राखणे शक्य आहे, हेच राजा मियॉंच्या गायकीने दाखवून दिल़े
बैठय़ा स्वर-तालाला महोत्सवात उभे केले, ते बिरजू महाराजांच्या शिष्या पार्वती दत्ता आणि त्यांच्या शिष्यांनी! दत्ता यांनी आपल्या शिष्या पल्लवी गोसावी, राधिका शेलार, जिजाऊ कोलते यांच्या सोबतीने कथ्थकच्या तरल अदाकारी सादर करीत उपस्थितांच्या मनावर मोहिनी घातली़  तीन तालाच्या वेगवेगळ्या लयीतील रचना, ध्यान, कृष्णशृंगार अशा एक ना अनेक गोष्टी त्यांनी सादर केल्या आणि दादही मिळवली़  त्यातही समेपूर्वी संपणाऱ्या तीन तिहाया, तबलजीने केवळ समेचा ‘धा’ वाजवून त्याला दिलेली साथ आणि त्यावर नर्तिकीची नाजूक अदाकारी! हा प्रकार तर अक्षरश: घायाळ करणारा होता़  बैठकीची सांगता, पं.बिरजू महाराज यांच्या ‘शाम मूरत मन भाये’ या सुरेल तराण्याने झाली़
कोणत्याही संगीत महोत्सवाचा असतो तसा अभिषेकी महोत्सवाचाही वाद्यसंगीत हा महत्त्वाचा भाग होता़  वाद्यसंगीताच्या सर्व मैफलींना सुप्रसिद्ध तबला वादक योगेश सम्सी यांनी साथ केली़  पं. नयन घोष यांच्या सतारीतून निघालेल्या गावती रागाने श्रोत्यांची मने जिंकली़  मात्र श्रोत्यांच्या काळजाला हात घातला तो, अतुलकुमार उपाध्याय आणि राजेंद्र कुळकर्णी यांच्या व्हायोलिन आणि बासरीच्या जुगलबंदीनेच! जुगलबंदीची सुरुवात राग नटभरवने झाली़  जुगलबंदीने श्रोत्यांना खरोखर सांगीतिक समाधीच लागल्याचा प्रत्यय आला, ते सभागृहातील वीज एकाएकी गुल झाल्यावर! एकदा नव्हे, तर दोनदा सभागृहात अंधार पसरला़  रंगमंचावर कोणी दिसेना, तरी श्रोते आणि कलाकार दोघांनाही त्याचे भान नव्हत़े  रंगमंचाच्या दिशेने येणाऱ्या सूर- तालावर प्रेक्षकांच्या टाळ्यांनी धरलेला ठेका क्षणभरही विचलित झाला नाही़  या ‘अंधाऱ्या जुगलबंदीत’ही विशेष चमक दिसली ती सम्सी यांच्या तबल्याची़  समेवर येताना त्यांच्या तबल्यातून वाजणाऱ्या अक्षरश: प्रत्येक तिहाईला दाद मिळत होती, टाळ्या पडत होत्या़  जुगलबंदीनंतर अभिषेकीबुवांना श्रद्धांजली म्हणून त्यांचे ‘घेई छंद मकरंद’ हे पद वाजविण्यात आल़े  तेही गोमांतकी श्रोत्यांच्या मनात रुंजी घालणारे होत़े
दोन दिवसांत वेगवेगळ्या घराण्यांच्या गायक- वादकांनी ज्या संगीत सोहळ्याची पायाभरणी केली, त्यावर कळस चढवण्यासाठी पं.हरिप्रसाद चौरसियांनी हातात बासरी घेतली़  या वेळी त्यांच्यासोबत होता त्यांचा शिष्य संतोष संत आणि परदेशी शिष्य आमोस़  तबल्यावर साथीला अर्थातच योगेश सम्सी़  त्यांनी सुरुवात केली ती, राग मारुबिहागपासून आणि मग रसिकाग्रहास्तव यमन नि पहाडी यांचीही बहार उडवून दिली़  वयोमानानुसार हरिजींचे हात- मान थरथरत होती़  बासरीतून निघणारा स्वर न् स्वर मात्र अगदी पक्का होता़  पहाडी वाजवताना तर टिपेच्या स्वराची आखूड बासरी घेऊन हरिजींनी तबलजीच्या साथीने अशा काही लीला केल्या की, तबला हे साथीचे वाद्य न राहता त्याची स्वरवाद्याशी जुगलबंदीच सुरू आहे, असे वाटत होत़े  हरिजींच्या कलेला गोमांतकीयांनी उभे राहून अभिवादन केल़े  ‘एक तो हरि खुद बन्सी बजाये, या फिर हरिप्रसाद बजाये।’ हे निवेदन करणाऱ्या डॉ़  अजय वैद्य यांचे वाक्य श्रोत्यांनी अक्षरश: अनुभवल़ं  अभिषेकी महोत्सवाची सांगता व्हायला हवी तशी किंवा त्यापेक्षा कितीतरी पट अधिक सुंदर झाली़
हत्तीला पाहावे पाण्यात, तसे कलाकाराला पाहावे रसिकांच्या गराडय़ात आणि  गोमांतकीयांनी महोत्सवात उत्तमोत्तम कलावंतांना दोन्ही दिवस असा काही गराडा घातला, की कलाकारही भारावून गेल़े  सकाळी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी रसिकांनी सभागृह भरून जायचे, ते रात्री भैरवी होईपर्यंत़  गायकाने आपण गाणार असलेल्या रागाचे नाव सांगितले की शेजारी बसलेल्या चिमुरडीच्या तोंडूनही, ‘अरे वाह! आता हा राग’, असे उद्गार निघत होत़े  महाविद्यालयीन तरुण- तरुणीही शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात तासन्तास खिळून असल्याचे पाहायला मिळत होत़े  तबलजीने ठेका धरताच, बहुतेक श्रोते हातावर तालाच्या मात्रा मोजू लागत आणि समेवर दाद देत़  आपल्या आवडीच्या रागाच्या फर्माइशी करून मैफलीत सक्रिय सहभाग दाखवीत, त्यामुळे कलाकाराला साहजिक अधिक हुरूप येत होता़  ‘अरसिकेषु कवित्व निवेदनम् शिरसी मा लिख’, असे जगनिर्मात्याला विनविणारा कवी जर गोमांतकात आला असता, तर त्याने नक्कीच ‘रसिकेषु कवित्व निवेदनम् शिरसी लिख’, असा वाक्प्रयोग प्रचलित केला असता.

गोव्यात जणू भारतच लोटल्याचा भास -पं.हरिप्रसाद
alt गोव्यात आपण यापूर्वीही आलो आहोत़  मात्र या महोत्सवासाठी जमलेली श्रोत्यांची प्रचंड गर्दी पाहून, अवघा भारतच तर गोव्यात लोटल्याचा भास आपल्याला झाल्याचे उद्गार पंडित हरिप्रसाद चौरसियांनी काढल़े  त्यांना साथ करणाऱ्या परदेशी शिष्याबद्दल छेडले असता, वृंदावन या आपल्या मुंबई आणि भुवनेश्वर येथे चालणाऱ्या गुरुकुलमध्ये असे किमान ४० ते ४५ परदेशी शिष्य असल्याची माहिती त्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली़  तसेच आपण त्यांना परदेशी मानत नसून, तेही आपलेच आहेत़  आपली कला पुढे चालविण्याचा ते प्रयत्न करीत असल्याचे सांगितल़े  कलाकार गरीब घरातूनही पुढे येत असतो़  त्यामुळे अशा कलाकारांसाठी वृंदावनात शिक्षणासह इतरही गोष्टी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितल़े  त्यांना सादरीकरणाची सवय व्हावी म्हणून आपण त्यांना साथीला घेत असल्याचेही त्यांनी सांगितल़े.


 पं.हरिप्रसाद यांचा परदेशी शिष्य
alt आमोस हा ३१ वर्षीय इस्रालयी तरुण आह़े  बारा वर्षांपूर्वी भारतात फिरायला आलेला असताना त्याने झाकीर हुसेन आणि शाहीद परवेज यांची मैफल ऐकली आणि त्याला भारतीय संगीताचे वेड लागल़े  पुढे पंडितजींचा जेरुसलेममधील कार्यक्रम त्याने ऐकला आणि बासरी शिकण्यासाठी सर्वस्व वाहायची त्याची सिद्धता झाली़  त्यानंतर पंडितजींच्या सांगण्यावरून त्याने हॉलंडमध्ये जाऊन बासरी या विषयात पदवीपर्यंत शिक्षण घेतले आणि सध्या तो मुंबईतील पंडितजींच्या अंधेरी येथील वृंदावनमध्ये राहून पंडितजींचे मार्गदर्शन घेत आह़े  भावी आयुष्यातील योजनांबद्दल, ‘बासरी, बासरी, बासरी’ इतकेच उत्तर त्याने दिल़े

एक ज्येष्ठ ‘टाळीया’
alt ज्ञानेश्वर टाकळकर उपाख्य माऊली यांनी आयुष्यभर केवळ टाळ या एकाच वाद्याचा ध्यास घेतला़  वय वष्रे ८६ असलेल्या या ‘टाळीया’ने ३५ वर्षे पं़ भीमसेन जोशी यांना साथ केली़  त्यांच्या अभंगवाणीत वा कार्यक्रमात कधीही माऊलींचा टाळ वाजला नाही, असे झाले नाही़  उतारवयात भीमसेनजींनी अभंगवाणीचे कार्यक्रम थांबविले, तरीही केवळ माऊलींची साथ सुटू नये, यासाठी ते शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची भैरवी तरी भजनाने करत आणि माऊलींना सोबत ठेवत़  माऊलींनी आजवर किशोरी आमोणकर, राजन- साजन मिश्र, पं.जसराज, अश्विनी भिडे, राम कदम, सुधीर फडके, श्रीनिवास खळे अशा असंख्य बडय़ा असामींना टाळाची सोबत केली आह़े  पूर्वी उदरभरणाइतके उत्पन्न यातून मिळत नसे, त्यामुळे पुण्याच्या महात्मा फुले मंडईत एका व्यापाऱ्याकडे दिवाण म्हणून काम करून, ते आपला छंद जोपासत़  पण आता परिस्थिती बदलल्याचे ते सांगतात़  आता त्यांचा मुलगा आनंद आणि नातू प्रथमेशसुद्धा टाळ वाजवतो़  महोत्सवात भजनाची सुरुवात झाली की, माऊली रंगमंचावर अवतरत आणि लोक  खास त्यांच्यासाठी टाळ्यांचा कडकडात करीत होत़े.

======================================================================= सदर लेख रविवार, २१ ऑक्टोबर २०१२ च्या लोकसत्ताच्या 'विशेष' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार. 

Monday, October 8, 2012

पं. यशवंतबुवा जोशी

महाराष्ट्रात अभिजात संगीताची गंगोत्री आणणाऱ्या बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांची गायकी त्याच दिमाखात आणि त्याच लयीत परंपरेने टिकवून ठेवणाऱ्या यशवंतबुवा जोशी यांच्या निधनाने भारतीय संगीतातील एका संपन्न परंपरेतला एक तेजस्वी तारा निखळला आहे. गायकी शिकायची तर ती अंगात मुरवावी लागते. ती नुसती स्वरांच्या अंगाने म्हणजे बंदिशीची स्वररचना मुरवून चालत नाही, तर लयीत घोळलेल्या स्वरशब्दांसह मुरवावी लागते.
यशवंतबुवांनी पुण्यात पं. मिराशीबुवा यांच्याकडे ग्वाल्हेर घराण्याची जी तालीम घेतली, ती त्यांच्यासाठी आयुष्याची शिदोरी ठरली. मिराशीबुवांनी थेट बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्याकडून ही गायकी आत्मसात केली आणि ती त्यांनी त्यांच्या शिष्यांपर्यंत इतक्या सहजपणे पोहोचवली, की त्यामुळे ग्वाल्हेर घराण्याचे मूळ स्वरूप त्यातील सगळय़ा सौंदर्यखुणांसह यशवंतबुवांनी ती अधिक सशक्तपणे आणि सर्जनशीलतेने रसिकांपर्यंत पोहोचवली. अंगकाठी किडकिडीत, पण आवाजात ताकद अशी की भलेभले थक्क व्हायचे. लयीच्या दुनियेतले यशवंतबुवा हे एक अतिशय सृजनशील कलावंत होते. तालातील मात्रांचे वजन सांभाळत, आलापी आणि बोलबढत करताना यशवंतबुवा जी करामत करायचे, ती फार सुंदर असे. पं. जगन्नाथबुवा पुरोहितांकडे गाणे शिकायला सुरुवात केल्यानंतर यशवंतबुवांना लयीकडे बघण्याची नवी दृष्टी मिळाली. त्यामुळे त्यांच्या गायनाला परिपूर्णता लाभली. मैफलीत यशवंतबुवांच्या आवाजाची फेक, त्यांची तान आणि त्यांची लयीवरची हुकमत चटकन ध्यानात येत असे. त्यामुळे त्यांच्या गाण्यात रटाळपणा कधीच जाणवत नसे. रागाचा रसपरिपोष करण्यासाठी अंगी प्रतिभा असावी लागते. ती त्यांच्याकडे होती. त्यामुळे ग्वाल्हेर गायकीचे मूळ स्वरूप सांभाळताना ती सतत नवरसनिर्मिती कशी करत राहील, याचा ध्यास त्यांनी आयुष्यभर घेतला. घराणेदार गायकीचा अभिजात अनुभव देणारे यशवंतबुवा हे उत्तम गुरू होते. गाणे शिकवायचे, म्हणजे केवळ राग आणि बंदिश शिकवायची नसते, तर घराणेदार गायकी त्यांच्यामध्ये मुरवायची असते, याचे भान त्यांनी त्यांच्या गुरूंप्रमाणेच ठेवले. त्यांचे निधन संगीतासाठी आणि ग्वाल्हेर घराण्यासाठी चटका लावून जाणारे आहे.
 ========================================================================
सदर लेख सोमवार, ८ ऑक्टोबर २०१२ च्या लोकसत्ताच्या 'लेख' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.

Friday, October 5, 2012

डॉ. अबान मेस्त्री
‘पहिल्या पूर्णवेळ (प्रोफेशनल) महिला तबलावादक’ म्हणून डॉ. अबान मेस्त्री यांची नोंद लिम्का बुकाने घेतली होती खरी; पण हे कौतुक सामान्यजनांना.. ‘भाजे येथील २३०० वर्षांपूर्वीच्या (इसवी सन पूर्व २००) लेण्यात तबलासदृश वाद्य वाजविणाऱ्या एका महिलेचे उत्थितशिल्प दिसते’ हे अबान मेस्त्री यांनीच प्रबंधात नमूद केले होते! अबान यांची गेल्या ५० वर्षांची सांगीतिक कारकीर्द केवळ तबल्याच्या तालाने नव्हे, तर सतार आणि कंठसंगीत, तसेच हिंदी व संस्कृतच्या विद्यापिठीय अभ्यासाने बहरली होती, हे संगीताच्या जाणकारांना अधिक महत्त्वाचे वाटते.
तबल्याचा घरंदाजपणा टिकवणाऱ्या थोडय़ांपैकी अबान होत्या, त्या केवळ एखाद्या घराण्याच्या वृथाभिमानामुळे नव्हे, तर अभिजाततेची चतुरस्र जाण  मिळवल्यामुळे. ‘तबला आणि पखवाजाची घराणी व परंपरा’ या विषयात त्यांनी पीएच. डी. (गांधर्व महाविद्यालयाची ‘संगीताचार्य’ पदवी) मिळवली, तेव्हा गेल्या ५०० वर्षांतील ३० महान वादकांनी कोणकोणती भर घातली, याचा धांडोळा त्यांनी घेतला होता.  ‘तबले की बंदिशें’ या  पुस्तकातून त्यांनी सप्रयोग (सीडीसह) तालतत्त्वाचे महत्त्व विशद केले. पंडित केकी एस. जिजिना, पं. लक्ष्मणराव बोडस आणि उस्ताद आमीर हुसेन खान या तिघा गुरूंपैकी जिजिनांच्या त्या पट्टशिष्या. या गुरूसह त्यांनी ‘स्वर साधना समिती’ ची स्थापना १९६१ मध्ये केली. अर्थात, ‘सूर सिंगार संसदे’सारख्या अन्य संस्थांच्या संमेलनांतही अबान यांचा सहभाग असे. पं. जिजिना,  फिरोज दस्तूर आदींनी लखलखीत केलेली पारसी समाजातील हिंदुस्तानी शास्त्रीय गायन-वादनाची, सध्या अस्तंगत होत चाललेली परंपरा अबान यांनी जागती ठेवलीच, पण ग्रंथबद्धही केली. अबान यांचे निधन गेल्या रविवारी झाल्यामुळे हा दुवा निखळला आहे. देशभरातील  संगीत संमेलनांत जाणकारांची, तसेच विदेशातही श्रोत्यांची दाद मिळवणारी, देशभरातील महत्त्वाच्या विद्यापीठांत अध्यापन करणारी आणि ‘डॉटर्स ऑफ महाराष्ट्र’ सारख्या पुस्तकात मानाचे स्थान मिळवणारी ही ‘वादिका’ भारत सरकारच्या पुरस्कारांपासून वंचितच राहिली. परंतु शोकसभेऐवजी येत्या शनिवारी गायन-वादनाची बैठक होणेच उचित ठरावे, इतकी अविरत, अम्लान संगीतसेवा अबान यांनी केली होते.
==========================================================================
 

Monday, September 10, 2012

बाबुल मोरा... काही नावाजलेल्या गायकांच्या माध्यमातुन...







पं. मनोहर चिमोटे
भारतीय संगीतात वाद्यसंगीताचे एक स्वतंत्र आणि समृद्ध असे दालन आहे. वाद्यांमधून अभिजात संगीताचा संपन्न अनुभव देऊ शकणाऱ्या प्रतिभासंपन्न कलावंतांची खाणच भारतात गेल्या काही शतकांमध्ये निर्माण होत आलेली आहे. भारतीय संगीताच्या अभिव्यक्तीसाठीच्या वाद्यांबरोबरच परदेशातून आलेल्या रीड ऑर्गन (पायपेटी) किंवा हार्मोनिअम या वाद्यांनी भारतीय संगीतात गेल्या दोन शतकांच्या काळात भरीव कामगिरी केली आहे. ब्रिटिश राजवटीत आलेल्या या वाद्यांचे भारतीयीकरण करून त्यांना आपल्या संगीतात इतक्या सहजपणे मिसळवून टाकण्याची किमया येथील कलावंतांनी अशी काही करून दाखवली, की परदेशीयांना हे वाद्य आपलेच आहे काय, अशी शंका यावी. पंडित मनोहर चिमोटे हे असे एक अव्वल दर्जाचे हार्मोनियम वादक होते. हार्मोनियम या मूळ वाद्याची जवळीक अ‍ॅकॉर्डियन, ऑर्गन या वाद्यांशी असली, तरीही तिची निर्मिती भारतीय संगीतासाठी नव्हती. चिमोटे यांनी पन्नास वर्षांपूर्वी तिला भारतीय रुपडे चढवले आणि तिला येथील संगीताच्या दरबारात मानाचे स्थान मिळवून दिले. हार्मोनियमचे आगमन होण्यापूर्वीच्या काळात गायनाची संगत करण्यासाठी सारंगी हे तंतुवाद्य उपयोगात येत असे. वादकांच्या कर्तृत्वाने हार्मोनियमने गायनाच्या साथीचे वाद्य म्हणून प्रवेश केला आणि आता ते वाद्य भारतीय संगीताच्या मैफलीतील एक अविभाज्य घटक बनले आहे. पंडित चिमोटे यांनी परदेशी बनावटीच्या स्वर निर्माण करणाऱ्या स्वरपट्टय़ांवर भारतीय स्वरांचे केलेले आरोपण फारच यशस्वी झाले. गंधार हा स्वर भारतीय संगीतातील एक स्वयंभू स्वर समजला जातो. गंधाराच्या स्वरावर आधारित त्यांनी तयार केलेल्या हार्मोनियमचे नावही आपोआप ‘संवादिनी’ असे झाले आणि मग ती भारतीयच होऊन गेली. चिमोटे यांचा जन्म नागपूरचा आणि कर्मभूमी मुंबई. लहानपणी पंडित भीष्मदेव वेदी या प्रख्यात वादकाकडून त्यांनी हार्मोनियम वादनाचे धडे घेतले आणि मग त्यावर स्वप्रतिभेने नवनवीन प्रयोग केले. भारतातील अनेक दिग्गज कलावंतांबरोबर त्यांनी मैफलींमध्ये साथ केली होती. जेव्हा हे वाद्य स्वतंत्रपणे संगीत निर्माण करू शकते असा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला, तेव्हा त्यांनी साथ करणे बंद केले आणि त्यानंतर केवळ स्वतंत्रपणे संवादिनीचे एकलवादन करण्यासाठीच आपले आयुष्य व्यतीत केले. मैफलीत गायकाच्या बाजूला असणारे हे वाद्य तिच्या मध्यभागी आणण्याचे श्रेय पंडित चिमोटे यांना द्यायला हवे. भारतातल्या सगळ्या संगीत महोत्सवात त्यांच्या संवादिनी वादनाने रसिकांची वाहवा मिळवली. ‘सूरमणी’, राज्य शासनाचा पुरस्कार, आदर्श संगीत शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले. त्यांनी विद्यादानाचे जे मोठे कार्य केले, त्यामुळे अनेक युवक संवादिनी वादनाकडे वळू लागले. व्हायोलिन, सतार, बासरी या वाद्यांबरोबर संवादिनीची जुगलबंदी घडवणारे चिमोटे हे एकमेव कलाकार होते. त्यांच्या निधनाने संगीताच्या क्षेत्रात स्वकर्तृत्वाने झळाळणाऱ्या एका विद्वान कलावंताचा अस्त झाला आहे. ===============================================================
सदर लेख सोमवार, १० सप्टेंबर २०१२ च्या लोकसत्ताच्या 'लेख' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.