Thursday, April 1, 2010

यशवंतबुवा जोशी
यशवंतबुवा जोशींच्या गाण्याचे ध्वनिमुद्रण ऐकणाऱ्या कुणालाही ते धिप्पाड आणि थोराड अंगयष्टीचे असतील, अशी खात्री वाटेल. त्यांच्या गायनातील आक्रमकता रसिकाला जेवढी खिळवून ठेवते, तेवढेच त्यातील लालित्यही त्याला भावते. त्यांना प्रत्यक्ष पाहिल्यानंतर कुणाही रसिकाचा होणारा भ्रमनिरास बुवाही आनंदाने बघत असतात. वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी बुवांना मुंबईच्या चतुरंग प्रतिष्ठानने जाहीर केलेला चतुरंग संगीत सन्मान पुरस्कार म्हणजे बुवांच्या सांगीतिक कारकीर्दीतील आणखी एक मानाचा तुराच मानायला हवा. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केवळ गाणेच करायचे असा हट्ट धरणारी यशवंतबुवा जोशींची शेवटचीच पिढी असावी. पुण्यात बालपणी हलाखीच्या स्थितीतही बुवांची इच्छा अभिजात संगीतात काही करण्याचीच होती. इचलकरंजीला मिराशीबुवांकडे त्यांनी गाणे शिकायला सुरुवात केली आणि ग्वाल्हेर गायकीतील खाचखळगे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या स्वरांच्या महालाची रचना यांचे ज्ञान मिळवले. पण एवढय़ावर बुवांची सर्जनशीलता पुरी पडेना म्हणून मग त्यांनी आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गुरू जगन्नाथबुवा पुरोहित आणि गजाननबुवा जोशी यांच्याकडेही संगीताचे शिक्षण घेतले. ग्वाल्हेर आणि आग्रा या दोन्ही घराण्यांची वैशिष्टय़े आपल्या गळय़ात उतरवताना आवश्यक असणारे कलात्मक भान बुवांकडे असल्यामुळेच त्यांनी स्वत:ची एक शैली निर्माण केली. जगन्नाथबुवांकडे गाणे शिकत असताना पं. राम मराठे, माणिक वर्मा, पं. सी. आर. व्यास, पं. जितेंद्र अभिषेकी अशी नंतरच्या काळात स्वनामधन्य झालेली कलावंतांची एक फळीच शिष्य म्हणून हजर असे. असे सर्जनशील गुरुबंधू मिळाल्यावर यशवंतबुवांचे गाणे आणखी फुलेल, यात नवल नव्हते. अप्रतिम खडा आवाज आणि आक्रमक शैली यामुळे यशवंतबुवा अल्पावधीतच रसिकप्रिय झाले. मैफलीला सुरुवात होताच पहिल्या चार आलापातच सगळी मैफल काबूत आणण्याची यशवंतबुवांची मिजास कुणालाही थक्क करायला लावणारी असे. बुवा काही वर्षांपासून प्रत्यक्ष मैफलीत गाणे करत नसले तरीही त्यांच्या मनात मात्र आजही तेच तडफदार आणि दमदार गाणे पाझरत असते. लयकारी, बोलबनाव, ताना यामध्ये बुवा अगदी माहिर मानले जातात. मैफलीमध्ये आवाज लागला नाही, असे बुवांच्या बाबत फारच क्वचित घडले असेल. त्यामुळे हमखास बहारदार मैफल करणारा कलावंत अशीच त्यांची ओळख सांगितली जाते. बुवा जगन्नाथबुवांकडे त्यांच्याबरोबर शिकणारे राम मराठे, जितेंद्र अभिषेकी यांच्यासारखे सहाध्यायी म्हणजे बुवांचा जीव की प्राण असत. स्वरांची ही मैत्री इतकी सच्ची होती, की रामभाऊ मराठेंच्या व्यावसायिक मैफलीत ऐनवेळी तबलजी येऊ शकला नाही तर यशवंतबुवा अगदी प्रेमाने त्यांना उत्तम साथ करायचे. रामभाऊंनीही बुवांबरोबर साथ करताना आपले व्यावसायिक यश कधी मध्ये येऊ दिले नाही. बुवा जेवढे उत्तम कलावंत, तेवढेच उत्तम गुरूही आहेत. मैफली गवयांना शिष्य तयार करायला बहुधा वेळच मिळत नाही, परंतु बुवांनी जाणीवपूर्वक एक संपन्न अशी शिष्यपरंपरा तयार केली. आजच्या आघाडीच्या कलावंत आशा खाडिलकर, शोभा जोशी, ओंकार दादरकर, राम देशपांडे यांच्यासारखे शिष्य बुवांचे गाणे आजही ताजेतवाने ठेवत आहेत. बुवांच्या गाण्यात लगाव आग्ऱ्यासारखा असला तरी ग्वाल्हेरचे लालित्य ते स्वरास्वरांमधून लीलया दाखवतात. ते  जगन्नाथबुवांकडे शिकायला हजर झाले, तेव्हा ते बुवांना म्हणाले होते की, तुझ्या गाण्यात रग आहे, आता त्यावर एक  अनुस्वार द्यायला हवा बुवांनी मग आपल्या गाण्यात लालित्याचे जे रंग भरले, त्याने रसिक मंत्रमुग्ध होत असत. पुरस्कार, प्रसिद्धी याच्या मागे न धावता आयुष्यभर आनंदाचे झाड लावणारे हे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आजही स्वरांच्या दुनियेतच रममाण आहे.  उत्तम कलावंत आणि उत्तम गुरू म्हणून  संगीतक्षेत्राला माहीत असणाऱ्या यशवंतबुवांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. कालिदास सन्मानानेही ते सन्मानित झाले आहेत. वयाच्या उत्तरार्धात का होईना, त्यांच्या कला कारकीर्दीची दखल घेतली गेली, हे भाग्याचे आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
सदर लेख बुधवार, ३१ मार्च २०१० च्या लोकसत्ताच्या 'व्यक्तिवेध' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.